त्यानंतर चाळीतील तरणेबांड पण बरेचसे वांड हिरो जगन तालेवार बोलण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, मला तर लग्न झाल्यापासून या दिनाची आवश्यकता वाटत होती. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या पत्नीने माझ्या डोक्यावर मिर्या वाटायला कशी सुरुवात केली, हे अख्ख्या चाळीला माहीत आहे.
गंगाराम टमाट्याच्या चाळीत ‘पुरुष दिन’ साजरा करण्याची नोटीस चाळ कमिटीने बोर्डावर लावली. त्यावेळी महिलांप्रमाणे पुरुषांनाही आश्चर्य वाटलं. कारण यापूर्वी ‘पुरुष दिन’ हा शब्दसुद्धा एकाही चाळकर्याने कधी ऐकला नव्हता. महिला दिन, बाल दिन, मातृ दिन, पितृ दिन आणि अशी कितीतरी कसल्या कसल्या दिनांची नावं कानावरून जात असली तरी पुरुष दिनाचं अप्रूप सर्वांनाच वाटत होतं. महिला दिन चाळीतील महिला उत्साहाने साजरा करायच्या. एखाद्या पक्षाची पुढारीण महिला किंवा सामाजिक कार्यकर्ती हिला समारंभाची प्रमुख पाहुणी म्हणून बोलावले जायचे. मग ती पाहुणी शक्य तेवढा पुरुषांचा उद्धार करून स्त्रीने पुरुषांनी बांधलेल्या शृंखलांतून बाहेर पडून मुक्त व्हावे आणि पुरुषांची बरोबरी नव्हे तर त्यांच्यापेक्षा उच्च कर्तृत्वाची शिखरे गाठावीत, असे परंपरेने चालत आलेलं आवाहन करायची. मग चाळीतील महिलाही आपल्याल्या कुवतीप्रमाणे पुरुष जातीकडून स्त्री वर्गावर कसा अन्याय होतो याचे पाढे वाचायच्या… शेवटी हळदीकुंकू होऊन समारंभाची सांगता व्हायची. त्यानंतर भेटवस्तू म्हणून दिलेलं वाण किती हलक्या दर्जाचं आहे यावर कुजबुज आणि महिला पदाधिकारी व काही चाळकरी महिला यांच्यातील शाब्दिक चकमक या दरवर्षी नित्यनेमाने होणार्या गोष्टी होत्या.
पण यंदा ‘पुरुष दिना’ची घोषणा झाली आणि पुरुष दिनाला चाळीतल्या पुरुषांनी नेमकं काय करावं याविषयी चाळ कमिटीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षांनी प्रास्ताविक करताना पुरुष दिन साजरा करणे कसं आवश्यक आहे, हे ठासून सांगितलं. ते म्हणाले, आज जगातील महिला एकत्र आहेत. सर्व देशांमधील महिला एकत्र येत आहेत. आपल्या देशातील, राज्यातील, शहरातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, वाडीवाडीतील आणि चाळीचाळीतील महिला एकत्र येत असताना आपण पुरुषांनी एकत्र न येऊन कसे चालेल?
महिलांच्या एकजुटीमुळे त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होत नाही. पण पुरुषांची अवस्था मात्र दीनवाण्या प्राण्यासारखी होत चालली आहे. म्हणूनच पुरुष दिनाची कल्पना ज्याच्या सुपीक डोक्यातून आली त्या पुरुषाचे अभिनंदन करण्याचा ठराव आपण एकमताने संमत करुया व नंतर आपल्या चाळ कमिटीतर्फे यंदाच्या पुरुष दिनाला काय कार्यक्रम आयोजित करता येईल याविषयी चर्चा करुया.
उपस्थित चाळकर्यांनी टाळय़ा वाजवून अध्यक्षांच्या सूचनेचं स्वागत केलं. त्यानंतर चाळीतील वयोवृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिक अप्पा पोटदुखे उभे राहताच सर्वांनी त्यांना बसूनच बोला असा आग्रह केला. पोटदुखे म्हणाले, अध्यक्ष महाराज आणि माझ्या चाळकरी बंधुंनो, माझी हाडे आता मसणात गेली आणि कधी नव्हे ती यंदा तुम्हाला पुरुष दिन करण्याची कल्पना सुचली त्याचा मला काय उपयोग आहे? कारण आता आमचे वरपासून खालपर्यंत सर्व अवयव निकामी होत चालले आहेत. तरीही तुमच्या या पुरुष दिनाला माझा पाठिंबा आहे. खरं तर वर्षातून एकदाच महिला दिन असतो. बाकीचे सर्व पुरुष दिनच असतात. महिला दिन सर्वांनाच माहीत असायचा, पण पुरुष दिन नावाचा प्रकार अस्तित्वात आहे, हे मात्र अनेकांना माहीत नव्हतं. या वर्षी जरा मोठय़ा प्रमाणात पुरुष दिनाची बोंबाबोंब झाली म्हणून माझ्यासारख्या म्हातार्यापर्यंतही ही बातमी पोचली. स्त्री-पुरुषांच्या अनेक संघटना आहेत. स्त्रियांच्या स्त्री मुक्ती संघटना आहेत. तशाच पुरुषांच्याही पुरुषमुक्ती संघटना आहेत. त्यात बहुतेककरून संसारात स्त्रियांकडून पुरुषांवर होणार्या छळाला बळी पडणार्या पुरुषांच्या संघटना आहेत. तरीही पुरुष दिन साजरा करण्याची पाळी यावी इतके काही पुरुष दीनदुबळे झाले आहेत, असं मला वाटत नाही. कारण कोणत्याही संघटनांमध्ये पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्तच असते. तरीही ‘पुरुष दिन’ साजरा करून काय साध्य होणार आहे हे मला कळत नाही. तरीही तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मी माझे चार शब्द संपवतो. सर्वांनी टाळ्या वाजवून म्हातारबुवांचं कौतुक केलं.
त्यानंतर चाळीतील तरणेबांड पण बरेचसे वांड हिरो जगन तालेवार बोलण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, मला तर लग्न झाल्यापासून या दिनाची आवश्यकता वाटत होती. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या पत्नीने माझ्या डोक्यावर मिर्या वाटायला कशी सुरुवात केली, हे अख्ख्या चाळीला माहीत आहे. अहो, एक दिवस असा जात नाही की शेजार्यांना आमचा तमाशा बघायला मिळत नाही. नुसती हुकूम देत असते मला. नोकरी करूनही घरची सगळी कामंही करायला लावते. अगदी घरगडी करून टाकलाय मला. एका पुरुषमुक्ती संघटनेचा मी सभासद झाल्याचं कळताच केवढा हंगामा केला तिने. एवढी आदळाआपट केली की चकलीचा साचा फेकून मारला मला. बघा केवढं टेंगूळ आलंय कपाळावर. म्हणून माझी तर सूचना आहे की, जे जे पुरुष घरात बायकोकडून अन्याय सहन करत मूग गिळून गप्प बसतात त्यांनी या दिवशी आपल्या समारंभात आपले तोंड खोलून आपल्यावर होणार्या अन्यायाचा पाढा वाचावा.
आपण काही पुरुषांचे हळदीकुंकू साजरे करू शकत नाही, पण त्या दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन मस्तपैकी ओली पार्टी करावी आणि स्वतःवर पत्नीकडून होणार्या अन्यायाला वाचा फोडावी. परंतु जगनचे हे भाषण सुरू असतानाच बाहेरून सर्रकन एक चप्पल आली आणि जगनच्या थोबाडावर बसली. पाठोपाठ त्यांची पत्नी प्रकट झाली आणि त्याला शर्टाला धरून घेऊन गेली.
या अचानक झालेल्या घटनेने सभेत एकदम शांतता पसरली. पण चाळ कमिटीचे सेक्रेटरी लुकतुके यांनी धीर सोडला नाही. ते पुढे येऊन म्हणाले, चांगली कार्ये करताना अशा अडचणी येणारच. ही तर त्याची झलक आहे. पण लक्षात ठेवा, पुरुष जातीने जपलेला आजपर्यंतचा वरचढपणाचा वारसा आपण खाली पडू देता कामा नये. स्त्री-पुरुष ही संसाराची दोन चाके आपण म्हणत असलो तरी आतापर्यंत सगळं जग पुरुषाचं, पुरुषांनी, पुरुषांसाठी, पुरुषांच्या मनाप्रमाणे चालवलेलं जग आहे या आजपर्यंतच्या समजुतीला तडा देण्याचे प्रयत्न काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत. जगनची पत्नी हे त्याचे प्रतीक आहे. पण आपण निदान वर्षातून एक दिवस तरी आपला हक्काचा साजरा करून आपली ताकद जगाला म्हणजे चाळीला दाखवून देऊ. ज्याअर्थी एवढा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा होतोय त्याअर्थी त्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. त्यामुळे आपल्या चाळीतील पुरुषांनी त्यात खारीचा वाटा उचललाच पाहिजे. त्यादृष्टीने आपण कार्यक्रमाची आखणी करुया. पुरुषमुक्ती दिनाचे गाणे आपले गजाभाऊ बसवणारच आहेत. त्याशिवाय त्या दिवशी पुरुषांचे काही डान्स, विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतील. चाळीतील महिलांचाही यात सहभाग असेल. प्रत्येक महिला या समारंभात आपल्या नवर्याला ओवाळेल आणि त्यानंतर आपल्या नवर्याने केलेले पराक्रम या विषयावर आपली जाहीर प्रतिक्रिया देईल. ‘मी माझ्या नवर्याला दीनवाणा बनवणार नाही’ ही सामुदायिक शपथ चाळीतील सर्व महिला एकसुरात घेतील आणि त्यानंतर ‘धन्य पुरुष दिन’ हे पुरुषांचे सामुदायिक समूहगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता होईल. लुकतुक्यांच्या या भाषणानंतर मात्र चाळकरी महिलांचा जमाव भांडणाच्या आवेशात भोवताली जमलेला पाहून एकच पळापळ झाली…