• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एआय क्रांती भारताच्या मुळावर!

विकास गोडगे (विशेष लेख)

marmik by marmik
February 26, 2026
in इतर
0
एआय क्रांती भारताच्या मुळावर!

भारतातील हा जो शहरे फुगलेला विकास दिसत आहे तो आयटी (माहिती तंत्रज्ञान) उद्योगामुळे झालेला आहे. पुणे, बंगलोर, हैदराबाद ही शहरे वाढली आहेत, ती फक्त आयटी उद्योगामुळे. ह्या शहरांमधल्या गगनचुंबी इमारती, चकाचौंध वातानुकूलित मॉल, रस्त्यावर दिसणारे उच्चशिक्षित आधुनिक तरुण-तरुणी, ही सगळी आयटी उद्योगाची देन आहे. मराठवाडा, विदर्भ असो अगर बिहार, मध्य प्रदेश, आसाम- देशाच्या अगदी कानाकोपर्‍यातील गरीबात गरीब घरातून आलेल्या तरुण-तरुणींना त्यांच्या सात पिढ्यांच्या गरिबीतून बाहेर काढण्याचे काम भारतात फक्त आयटी उद्योगामुळे झाले आहे. ह्या आयटी उद्योगामुळे फायदा झालेल्या आणि गरिबीतून बाहेर पडलेल्या कुटुंबांची संख्या एकूण लोकसंखेच्या प्रमाणात खूप कमी असली तरी, संख्येच्या प्रमाणात खूप आहे आणि समोर दिसणारी आहे.
नाहीतर भारतात आणि महाराष्ट्रात श्रीमंत होण्याचे तीनच मार्ग होते…

१.सरंजामदार, ब्राम्हण किंवा व्यापारी घरात जन्माला येणे, त्यांची एकूण संख्या दहा टक्केसुद्धा नाही.
२.सरकारी अधिकारी होणे.
३.दोन नंबरचा धंदा करणे.

सरकारी अधिकारी होण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला असला तरी त्याला खूप म्हणजे खूपच मर्यादा होत्या. परंतु आयटी क्षेत्राच्या उगमानंतर अगदी मागास खेडेगावातील तरुण-तरुणी, भूमिहीन शेतमजुरांची मुले, इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय समाजाची मुले पण कारमध्ये फिरू लागली. ही संपत्तीची फेरवाटणी नव्हती तर परदेशातून नवीन संपत्ती भारतात येत होती. अजूनही येत आहे.

ह्या विकासाला आपण ६० टक्के लोकांना मागे सोडून २० टक्के लोकांचा झालेला विकास ठरवून त्यावर टीका केली तरी त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. लबाड अर्थशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या ट्रिकल डाऊन थेरीनुसार थोडाफार परिणाम दिसत आहे. म्हणजे आयटी उद्योगामुळे काही लोकांना जास्त पगाराच्या नोकर्‍या मिळाल्या, मग त्यांच्या सेवेसाठी कॅबवाले आले, हॉटेलवाले आले, जागांना भाव आला, खानावळवाले आले, कॉलेज वाढली, पोरं आली, भाजीवाले, किराणावाले सगळे सगळे आले. अगदी कार कंपन्या पण आल्या. म्हणजे एका आयटी कर्मचार्‍याच्या मागे कमीत कमी २० लोकांना रोजगार मिळाला. आयटीवाल्यांनी झोमॅटो
अ‍ॅप काढले, स्वत: कमावलेला पैसा स्वतःच कसा खर्च करावा हे त्यांनाच कळत नव्हते म्हणून ते असले उपाय करत होते. एवढे सगळे काम आयटीने केले.

हे आयटी क्षेत्राच्या गुणवर्णनाचे घडाभर तेल नमनालाच का घातले आहे, तर तुम्हाला जरा वेगळ्याच भविष्यात मला घेऊन जायचे आहे. ते भविष्य भीषण आहे की उज्ज्वल आहे, हे मला माहित नाही, पण आपण कुणीच त्या भविष्यासाठी तयार नाही आहोत, हे मात्र मला माहित आहे. गेल्या पूर्ण वर्षात इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो ह्या तीन भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांनी मिळून आपल्या कामगार संख्येत फक्त ४५ लोकांची भर घातली आहे. ही बातमी किती मोठी आहे समजण्यासाठी, दरवर्षी भारतात १५ लाख आयटी इंजिनीअर्स
कॉलेजमधून बाहेर पडतात, हे ध्यानात घ्या. त्यात अजून एमसीए, एमसीएस, बीसीए आणि डिप्लोमा होल्डर जोडले की त्यांची संख्या २५ लाखांपर्यंत जाईल.

ही गोष्ट कधीची आहे तर गेल्या वर्षीची. गेल्या तीन वर्षांत बाहेर पडलेल्या एकूण पन्नास लाख आयटी इंजिनीअर विद्यार्थ्यापैकी फक्त वीस टक्के लोकांना आयटीमध्ये रोजगार मिळालेला असेल आणि त्यांचा सरासरी पगार पण खूपच कमी आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आयटी इंजिनीअर लोकांना पण आता शिक्षकांसारखे फुकट काम करावे लागत आहे. एक वर्षभर किंवा कधी कधी त्याहून जास्त आणि तेवढे करून पण पुढे चांगली आयटीमधील नोकरी मिळेल की नाही याची शाश्वती नाही.

अगोदरच एआयमुळे आणि जागतिक घडामोडींमुळे आयटी आणि इतर क्षेत्रांचा पण बाजार उठलेला असताना एका पाटलाने हे क्षेत्र अजून उद्ध्वस्त केले आहे… होय पाटलाने. त्याचे नाव आहे राहुल पाटील. तो बागलकोटचा आहे, इच्छुकांनी त्याची जात गुगलवर सर्च करावी. त्याने एक क्लॉड नावाचे   एआय टूल बाजारात आणले आहे त्याच्यामुळे भारतातील ९० टक्के किंवा अगदी त्यापेक्षा जास्त आयटी इंजिनीअर्सची गरज पडणार नाही आणि त्याहून पुढची गोष्ट म्हणजे अजून काही दिवसांनी हे एआय आणि अजून काही एआय टूल येतील ती ९९ टक्के आयटी इंजिनीयर्सना घरी बसवतील.

हे झालं आयटी उद्योगाचे. दुसरे उद्योग पण ह्या कचाट्यातून वाचतील असे नाही. आयटी आणि रोबोटिक्सच्या तंत्रज्ञानामुळे अगदी
मॅन्युफॅक्चरिंग करणार्‍या कंपन्यांना पण आता आहेत तेवढ्या लोकांची गरज पडणार नाही, किंबहुना चीन, जपान असे रोबॉट तयार करत आहेत जे तुमच्या घरची कामे करून तुम्हाला विरंगुळा म्हणून कुशीत घेऊन अंगाई गीत पण गातील. आणि हो, त्यांचा स्पर्श तुम्हाला अगदी माणसासारखाच वाटेल. म्हणजे गडी माणसाने बाई नाही म्हणून रडायचे नाही, आणि बाई माणसाला गड्याची गरज पडणार नाही. ऐश्वर्या रायसारखी दिसणारी ती बाई तुम्हाला कुशीत घेऊन, ‘माज्या शोण्याला काय झालं? बाळा डोकं दाबून देऊ का?’ अशी, तुम्ही न सांगता, तुमचा मूड बघून सुरुवात करेल. आणि रोबॉट जर गडी असेल तर त्याला कट्टर स्त्रीवादी स्त्रिया गुलामासारखे वापरून पुरुषजातीवर बदला घेण्याचा आनंद लुटू शकतील. पण ही ऐश अजून तरी फक्त श्रीमंतासाठी असेल. आता तुम्ही म्हणाल, श्रीमंतांना काय कमीय, त्याची खरी गरज गरीबांना आहे. तर मार्वेâट त्याचा विचार करत नाही मित्रानो, मार्वेâट खूप कठोर असते.

आपण पुन्हा मुद्द्यावर येऊ. तुम्हाला वाटेल यात शेतकरी सुरक्षित आहे. तर अजिबात नाही. भारतात प्रति हेक्टर खूपच कमी उत्पादन आहे. आता लवकरच शेतकर्‍यांनी शेती न करता ती भांडवलदार कंपन्यांना द्यावी आणि त्या कंपन्यांनी शेतकर्‍यांना वार्षिक पगार द्यावा, अशी टूम निघेल. त्याचबरोबर शेती आणि त्यावरील उत्पन्नावर मोठमोठ्या कंपन्यांचा हक्क असावा, असा ठराव मांडला जाईल. वेळच अशी असेल की शेतकरीही त्याला पाठिंबा देतील. कारण शेती अगोदर पण परवडत नव्हती, आता पण परवडत नाही आणि सरकारची धोरणे पाहता ती उद्या पण परवडणार नाही! मोठमोठ्या कंपन्या एआय आणि रोबोटिक्सच्या मदतीने हजारो एकर शेती फक्त एका रोबॉटच्या मदतीने करू लागतील. एआयवर चालणारे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ड्रोन यांच्या साह्याने शेती करताना फक्त एका आयटी इंजिनीअरची गरज असेल, शेतकर्‍याची नाही. आणि ती मानवजातीच्या, भारतीयांच्या भीषण पारतंत्र्याची सुरुवात असेल.

परवाच इलॉन मस्क म्हणाला की भविष्यात पैसा ही गोष्ट कालबाह्य ठरेल. याचा अर्थ काय? तर एआय आणि रोबोटिक्समुळे प्रत्येक गोष्टीचे उत्पादन इतके वाढेल की जगात कशाचाच तुटवडा नसेल. अन्नधान्याचा तर अजिबात नसेल. आजच भारतासारखे राष्ट्र ८० कोटी लोकांना अतिशय स्वस्त दारात अन्नधान्य पुरवू शकते तर एआय आणि रोबोटिक्सच्या शंभर टक्के वापरानंतर तर सगळ्या जगाला फुकट अन्नधान्य पुरवता येईल. गोष्ट फक्त अन्नधान्यापुरतीच मर्यादित न राहता सगळ्याच गोष्टींचे उत्पादन इतके होईल की पैसा ह्या गोष्टीला महत्त्व राहणार नाही. पण हे बोलताना मस्क त्यावेळी समाज कसा असेल यावर बोलत नाही. तो फक्त तंत्रज्ञ आणि सर्वात मोठा भांडवलदार आहे.
पैसा कालबाह्य ठरणारा हा काळ कधी येईल की नाही हे माहित नाही, पण त्याआधीचा संक्रमणाचा काळ भारतासारख्या देशासाठी भयंकर असणार आहे. का भयंकर असणार आहे तर भारताची गेल्या तीस वर्षातील प्रगती ही आयटी क्षेत्रावर झाली आहे. म्हणजे ती कुणाच्या जिवावर झाली आहे तर परदेशी कंपन्यांच्या. उदाहरणार्थ, भारतातील ह्या कंपन्यांना धंदा देणार्‍या परदेशी विमाकंपन्या, बँका, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, मेडिकल कंपन्या. त्या या एआय क्रांतीनंतरही चालूच राहतील. उलट त्यांचा जो दहा टक्के खर्च भारतीय आयटी इंजिनीयर्सवर होत होता तो वाचेल आणि त्यांचा पैसा त्यांच्याच देशात राहील. त्यामुळे अमेरिका, युरोप, जपान, चीन ह्या देशांना एआयमुळे अजून तरी इतकं घाबरायचे कारण नाही, पण भारताच्या मुळावर उठणार आहे ही एआय क्रांती. एआयमुळे अगोदरच विकसित असलेले हे देश अजून श्रीमंत होतील. ज्यावेळी भारतात मॅन्युफॅक्चरिंग क्रांती व्हायला हवी होती त्या काळात आपला देश या उत्पादक देशांना संपूर्ण आयटी सोल्युशन्स देऊन त्या कंपन्यांना मोठे होण्यासाठी मदत करत आला. अमेरिकेने आणि युरोपने पण तेव्हा भारतात एवढा पैसा जातोय याची काळजी न करता हे सगळं चालू दिले. कारण त्यांना माहित होते, भारत हे राष्ट्र त्यामुळे पंगु होणार आहे आणि ज्यावेळी हे सगळं भारताच्या हातून निघून जाईल तेव्हा भारत पुन्हा १९६०च्या दशकाच्या मागे जाऊन थांबेल. यावेळी फक्त त्याची बकालता जास्त वाढलेली असेल. काळ मोठा कठीण आहे, भविष्यकाळ भीषण असेल.

Previous Post

ग्यानमूर्ती मोहन भागवतांचा भाषावाद!

Next Post

साहित्य संस्थात भाजपची लुडबुड!

Next Post
साहित्य संस्थात भाजपची लुडबुड!

साहित्य संस्थात भाजपची लुडबुड!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.