• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ग्यानमूर्ती मोहन भागवतांचा भाषावाद!

अ‍ॅड. हर्षल प्रधान (मुद्देसूद)

marmik by marmik
February 26, 2026
in मुद्देसूद
0
ग्यानमूर्ती मोहन भागवतांचा भाषावाद!

भारतीय राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताज्या विधानांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, संघाची विचारधारा हिंदुत्वाच्या नावाने एकता सांगत असली तरी प्रत्यक्षात ती भाषिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक फुटीरतेच्या बीजांना खतपाणी घालते. फेब्रुवारी २०२६मध्ये मुंबईतील नेहरू सेंटर येथे झालेल्या ‘१०० वर्षांची संघ यात्रा: नवे क्षितिज’ या व्याख्यानमालेत भागवतांनी स्थानिक भाषांच्या आग्रहाला आजार म्हटले आहे. हे विधान केवळ महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या भावना दुखावणारेच नाही, तर ते एक सुनियोजित भाषावादाचे राजकारण आहे, जे देशाच्या विविधतेला धोका पोहोचवते.

डॉ. मोहन भागवत (पूर्ण नाव : मोहन मधुकर भागवत) हे संघाचे (आरएसएस) वर्तमान सरसंघचालक आहेत. ते २१ मार्च २००९पासून या पदावर आहेत आणि आरएसएसचे सहावे सरसंघचालक आहेत. त्यांची कारकीर्द संघटनात्मक मजबुती, विचारप्रसार, समाजसुधार आणि हिंदू एकतेवर केंद्रित आहे. भागवत यांचा जन्म ११ सप्टेंबर १९५० रोजी सांगली (महाराष्ट्र) येथे (मातुल गृही), कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब तीन पिढ्यांपासून संघाशी जोडलेले. वडील मधुकरराव भागवत आरएसएसचे चंद्रपूर विभाग प्रमुख आणि गुजरात प्रांत प्रचारक होते. आई मालतीबाई राष्ट्रीय सेवा भारतीशी संबंधित होत्या. मोहन सर्वांत मोठे त्यानंतर दोन भाऊ आणि एक बहीण. त्यांचे प्राथमिक शिक्षण लोकमान्य टिळक विद्यालय, चंद्रपूर येथे झाले. बीएससी (प्रथम वर्ष) जनता कॉलेज, चंद्रपूर येथे तर पशु चिकित्सा आणि पशुपालन अभ्यासक्रम सरकारी पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर (पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला) येथे झाले होते. ते पदव्युत्तर शिक्षण घेत होते, पण १९७५च्या आणीबाणीमुळे त्यांना ते सोडावे लागले. शिक्षणानंतर अ‍ॅनिमल हसबंडरी विभागात पशुवैद्यक अधिकारी म्हणून चंद्रपूरमध्ये त्यांनी सरकारी नोकरी सुरू केली. फक्त सहा महिने नोकरी केली. १९७५मध्ये आणीबाणीत ते संघाचे पूर्णकालिक प्रचारक झाले. आणीबाणीत आई-वडील तुरुंगात गेले आणि मोहनजी अज्ञातवासात राहिले. महाराष्ट्र (विदर्भ), बिहार इ. ठिकाणी काम केल्यावर १९९१मध्ये अखिल भारतीय शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रम प्रमुख. १९९९मध्ये अखिल भारतीय प्रचारक प्रमुख (देशभरातील प्रचारकांचे प्रमुख). २०००मध्ये सरकार्यवाह (महासचिव), २००० ते २००९पर्यंत एस. सुदर्शन सरसंघचालक होते. २१ मार्च २००९ रोजी मोहन भागवत सरसंघचालक झाले, तेव्हा त्यांचे वय ५९ वर्षे होते. आरएसएसच्या सर्वांत तरुण सरसंघचालकांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात. सरसंघचालक हे ग्यानमूर्ती आहेत. व्यावहारिक, शांत आणि विचारपूर्ण नेता म्हणून त्यांची ओळख आहे. संघाच्या शताब्दी वर्षात (२०२५) त्यांनी देशभर व्याख्यानमाला, संवाद सत्रे आयोजित केली. हिंदू एकता, जात मिटवणे, समाजसुधार, स्वदेशी, विश्वगुरु भारत, हिंदू-मुस्लिम संबंध, लोकसंख्या नियंत्रण इ. विषयांवर त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. ते अविवाहित आहेत आणि साधे जीवन जगतात. मुंबईत दादरमध्ये शिवाजी पार्कजवळ त्यांचे घर आहे. अधून मधून ते तेथे वास्तव्यास असतात. मोहनजींनी २०२६मध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. निवृत्तीबाबत ते म्हणतात, ‘कार्यापासून निवृत्ती होत नाही, संघ सांगेल तेव्हा मी निवृत्त होईन.’ त्यांची कारकीर्द लाखो स्वयंसेवकांसाठी प्रेरणा आहे.

मात्र त्यांनी मुंबईच्या व्याख्यानात एक असा मुद्दा मांडला ज्यामुळे मराठी भाषाप्रेमी नाराज झाले. ते म्हणतात, ‘इंग्रजी भाषा संघाच्या कामाच्या पद्धतीत कधीच येणार नाही, कारण ती भारतीय भाषा नाही.’ हे विधान दिसते साधे, पण त्यातून संघाची हिंदी-केंद्रित विचारधारा उघड होते. ते पुढे म्हणतात, ‘आम्ही इंग्रजीचे विरोधक नाही. जिथे इंग्रजी आवश्यक आहे, तिथे आम्ही त्याचा वापर करतो. पण आमचा प्रयत्न नेहमी मातृभाषा किंवा हिंदीचा वापर करण्याचा असतो.’ यात ‘मातृभाषा किंवा हिंदी’ असा उल्लेख करून ते इतर भाषांना दुय्यम स्थान देतात. आणि सर्वांत वादग्रस्त म्हणजे, भाषा आग्रहाला ‘स्थानिक आजार’ म्हणणे. हे विधान महाराष्ट्रात मराठी भाषेच्या हक्कांसाठी चालणार्‍या आंदोलनांना थेट आव्हान आहे. राज ठाकरेंनी या विधानावर सडकून टीका केली आहे, ज्यात ते म्हणतात, ‘भाषेवर प्रेम करणे आणि राज्यावर अभिमान असणे हा आजार असेल तर बहुतेक राज्यांत हा आजार आहे.’ राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेतून हे स्पष्ट होते की भागवतांचे शब्द हे केवळ वैयक्तिक मत नव्हे, तर एक राजकीय हेतू आहे जो भाषावादाला प्रोत्साहन देतो.
संघाच्या इतिहासात भाषा धोरणे ही नेहमीच हिंदुत्वाच्या छत्रछायेखाली लपवलेली राजकीय रणनीती राहिली आहे. संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात भाषा संबंधित उद्धरणे हे सिद्ध करतात. गोळवलकर म्हणतात, ‘सोयीसाठी, संस्कृत ती जागा घेण्याइतपत विकसित होईपर्यंत हिंदीला आपली दुवा भाषा म्हणून प्राधान्य दिले पाहिजे.’ यातून हिंदीला ‘दुवा भाषा’ म्हणून प्राधान्य देण्याचा आग्रह दिसतो, जे दक्षिण भारतातील तमिळ, कन्नड किंवा महाराष्ट्रातील मराठी भाषिकांसाठी धोकादायक आहे. गोळवलकर पुढे म्हणतात, ‘संस्कृत ही भाषांची राणी आहे आणि राष्ट्रीय एकतेचा आधार आहे.’ हे उद्धरण संस्कृत आणि हिंदीला उन्नत करून इतर भाषांना कमी लेखते. संघाची स्थापना १९२५मध्ये हेडगेवारांनी केली तेव्हापासूनच भाषा हे सांस्कृतिक एकतेचे साधन मानले गेले, पण प्रत्यक्षात ते हिंदी-केंद्रित होते. गोळवलकरांच्या काळात (१९४०-१९७३) संघाने ‘तीन भाषा सूत्रा’ला (मातृभाषा- हिंदी -इंग्रजी) समर्थन दिले, पण हिंदीला राष्ट्रीय संपर्क भाषा म्हणून प्राधान्य दिले. हे धोरण दक्षिण भारतात हिंदी-विरोधी आंदोलने उफाळून आणण्यास कारणीभूत ठरले.

भागवतांचे विधान हे गोळवलकरांच्या या वारशाचे विस्तार आहे. ते म्हणतात, ‘भाषेशी आपलं भांडण नाही. आम्ही आहोत, तेच आम्हाला राहायचंय.’ पण हे शब्द किती पोकळ आहेत हे मुंबई व्याख्यानमालेतील संदर्भातून दिसते. यापूर्वी संघांचे माजी कार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येऊन घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे विधान करून वाद ओढवून घेतला होता. संघाची आणि भाजपाची कार्यपद्धती साधारण अशीच राहिली आहे की एखादा वादग्रस्त विषय छेडून पाहायचा, वाद वाढला तर पळ काढायचा आणि नाही वाढला तर त्याचं श्रेय घेऊन मोकळ व्हायचं! महाराष्ट्रात मराठी भाषेच्या हक्कांसाठी आंदोलने सुरु असताना भागवतांच्या ‘स्थानिक आजार’ या शब्दांनी मनं दुखावली. राज ठाकरेंनी त्यावर उत्तर देताना म्हटले, ‘भाषेवर आग्रह धरणे आणि आंदोलन करणे हा आजार असेल तर कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब आणि गुजरातमध्येही हा आजार आहे.’ ठाकरेंची ही टीका योग्य आहे, कारण भागवतांचे शब्द महाराष्ट्रात हिंदी-मराठी वाद वाढवतात, जे संघाच्या ‘हिंदू एकता’च्या दाव्याशी विरोधाभासी आहे. संघ नेहमी म्हणतो की ‘हिंदू हे विशेषण आहे, नाव नाही’, पण भाषा बाबतीत ते हिंदीला ‘राष्ट्रीय’ बनवून इतर भाषांना ‘स्थानिक’ म्हणून हिणवतात.

या भाषावादाच्या हेतूची मुळे संघाच्या राजकीय सहयोगी भाजपाच्या धोरणांतही दिसतात. २०१९च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे दक्षिण भारतात विरोध झाला. भागवतांचे विधान हे त्याच मालिकेतील आहे. ते म्हणतात, ‘इंग्रजी अशी बोलायला हवी की, इंग्लंडचे लोक तिकिट काढून आपलं भाषण ऐकायला यायला हवेत.’ हे उपहासाने सांगितले असले तरी ते इंग्रजीला ‘विदेशी’ म्हणून हिणवते आणि हिंदीला उन्नत करते. हे धोरण देशाच्या संघराज्य व्यवस्थेला धोका आहे, कारण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४३-३५१ नुसार सर्व भाषांना समान हक्क आहेत. संघाची ही भूमिका केवळ भाषावादच नव्हे तर सांस्कृतिक साम्राज्यवाद आहे, ज्यात उत्तर भारताची हिंदी इतरांवर लादली जाते.

गोळवलकरांच्या उद्धरणांमधून हे स्पष्ट होते की संघाची भाषा धोरणे ही हिंदुत्वाच्या नावाने फूट पाडण्याची रणनीती आहे. गोळवलकर म्हणतात, ‘केवळ हिंदूच हे मान्य करतात की त्या परम वास्तवाशी असलेल्या आपल्या एकात्मतेच्या साक्षात्कारासाठी पुनर्जन्माचा सिद्धांत हा मानवी आत्म्यासाठी एकमेव मोठी आशा आहे.’ हे धार्मिक उद्धरण असले तरी भाषा संदर्भात ते हिंदू संस्कृतीला संस्कृत आणि हिंदीशी जोडते, जे इतर भाषिक समुदायांना अलग करते. संघाच्या इतिहासात १९७३-२००० या काळात हिंदीचा जबरदस्तीचा आग्रह टाळण्याचा प्रयत्न झाला, पण भागवतांच्या काळात तो पुन्हा उफाळला. २०२५-२०२६च्या शताब्दी वर्षात भागवत म्हणतात, ‘सर्व भारतीय भाषा राष्ट्रभाषा आहेत, फक्त हिंदी नाही.’ पण हे शब्द प्रत्यक्षात विरोधाभासी आहेत, कारण ते इंग्रजीला ‘गैर-भारतीय’ म्हणतात आणि हिंदीला प्राधान्य देतात.

हेडगेवार काळात काय होते?
भाषावाद हा देशाच्या विकासाला अडथळा आहे. भारतात २२ अधिकृत भाषा आहेत, आणि प्रत्येकाची सांस्कृतिक ओळख आहे. भागवतांचे ‘स्थानिक आजार’ हे शब्द तमिळनाडूत १९६०च्या दशकातील हिंदी-विरोधी आंदोलनांची आठवण करून देतात, ज्यात हजारोंनी जीव गमावले. गोळवलकरांच्या पुस्तकात म्हटले आहे, ‘सर्व भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत.’ पण हे शब्द पोकळ आहेत, कारण संघाच्या शाखांमध्ये हिंदीला प्राधान्य दिले जाते. मुंबईतील भाषणात भागवत म्हणतात, ‘संघात इंग्रजी नाही, भारतीय भाषाच चालणार.’ हे इंग्रजीला ‘विदेशी’ म्हणून हिणवते, जे वैश्विक भारताच्या कल्पनेशी विरोधाभासी आहे. या भाषावादाच्या हेतूमुळे देशात फूट पडते. उदाहरणार्थ, बांग्लादेशातील हिंदूंबाबत भागवत म्हणतात, ‘बांग्लादेशात सुमारे १.२५ कोटी हिंदू आहेत. त्यांनी ठरवलं की एकत्र राहून लढायचं, तर जगभरातील सर्व हिंदू त्यांना मदत करतील.’ हे भाषावादाला सुरक्षा मुद्द्याशी जोडते, जे धोकादायक आहे. राज ठाकरेंनी म्हटले, ‘भाषेवर प्रेम हा आजार असेल तर संघाने हिंदी लादण्याचे बंद करावे.’ संघाच्या भाषा धोरणांचा इतिहास पाहता, हेडगेवार काळात मराठीला प्राधान्य होते, पण विस्तारासह हिंदी आली. गोळवलकर म्हणतात, ‘ब्राह्मण म्हणजे डोके, राजा म्हणजे हात’ हे वर्णव्यवस्थेशी जोडले असले तरी भाषा संदर्भात ते सांस्कृतिक श्रेष्ठता दाखवते. भागवतांच्या काळात हेच ‘हिंदू एकते’च्या नावाने सुरू आहे. ते म्हणतात, ‘उदाहरणाने विश्वगुरू व्हा, भाषणाने नाही.’ पण त्यांची भाषणे स्वतः भाषावाद निर्माण करतात. देशाच्या विविधतेला सन्मान देण्याची गरज आहे, अन्यथा अशी विधाने आंदोलने उफाळून आणतील.
(प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

Previous Post

मोहनराव, मोदींना थेट सांगा,सावरकरांना भारतरत्न द्या!

Next Post

एआय क्रांती भारताच्या मुळावर!

Next Post
एआय क्रांती भारताच्या मुळावर!

एआय क्रांती भारताच्या मुळावर!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.