राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकमहोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक
डॉ. मोहन भागवत यानिमित्ताने अनेक ठिकाणी व्याख्याने, प्रवचने देत आहेत. व्याख्यानांच्या समयी अभिनेते सलमान खान आणि अन्य मान्यवरांना पाचारण करण्यात येत आहे. संघाचा सरसंघचालक अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती(ही) होऊ शकतो हेही सांगायला त्यांनी कमी केलेले नाही, ही चांगली गोष्ट आहे. बोलण्याच्या ओघात डॉ. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न किताब दिल्यास त्या किताबाचा दर्जा उंचावेल, उंची वाढेल, असेही माध्यमांसमोर त्यांनी सांगितले आहे. मी काही भारतरत्न, पद्म पुरस्कार निवड समितीत नाही, परंतु या समिती सदस्यांला हे आवर्जून सांगेन, असे त्यांनी सांगितले. भारताचे पंतप्रधान, विश्वगुरू म्हणवले जाणारे आणि मातोश्री हिराबा यांच्या देहावसानानंतर आपण ‘नॉन बायोलॉजिकल’ असल्याचा साक्षात्कार झालेले नरेंद्र मोदी यांचे आणि मोहन भागवत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या लोकार्पण सोहोळ्यात ते मोदी यांच्या समीप बसले होते. या दोन्ही सोहोळ्यांमध्ये पंतप्रधानांबरोबर सहभागी झालेले विविध उच्चपदस्थही संघाच्या मुशीतून पुढे आलेले आहेत. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी मोहन भागवत यांनी इकडे तिकडे वळसे घेण्याऐवजी थेट पंतप्रधान मोदी यांच्या कानी घालायला हरकत नसावी. शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना भारताचे राष्ट्रपती करण्याची कळकळीची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने शिवसेनेतून एक (नाथ) गट बाहेर काढून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथविण्याची, लोकशाहीचा गळा घोटणारी खतरनाक खेळी खेळली. हे मोहन भागवत यांना पसंत न पडल्याने त्यांनी, ज्या पक्षाने आणि ज्या परिवाराने आपल्या गगनभरारीत महत्त्वाची भूमिका बजावली, त्या पक्ष आणि परिवाराला तोडण्याची कारवाई करताना काहीच कसे वाटले नाही, अशा शब्दांत संबंधितांची कानउघाडणी केल्याचे विश्वसनीयरित्या कळते. मोहन भागवत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध असल्याचेच हे द्योतक आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदयसम्राटांना भारतरत्न किताब मिळावा ही जनमानसाची भावना मोहन भागवत यांनी आवर्जून पंतप्रधानांच्या कानावर घालायला हवी. अर्थात सकाळपासून रात्रीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची जपमाळ ओढणार्या भाजपच्या नेत्यांना ही मागणी प्रत्यक्षात आणणे परवडणारे नाही. याचे कारण स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व भाजप तसेच त्यांच्या तथाकथित मित्रपक्षांना पचनी पडेल असे वाटत नाही.
याचे एक उदाहरण अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना घडलेल्या घटनेतून दिसून येते. डॉ. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती, डॉ. मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात चित्रकर्ती चंद्रकला कुमार कदम यांनी रेखाटलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले. या प्रसंगी सावरकरांचे सुपुत्र विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यात अडचणी निर्माण करण्यात आल्या. परंतु शिवसेनाप्रमुखांचे निकटवर्ती ज्येष्ठ, पत्रकार मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मनोहर जोशी यांच्या डावपेचांना प्रत्यक्षात उतरवून विश्वासरावांना सपत्नीक हवाई मार्गाने संसद भवनात आणले. या कार्यक्रमाला प्रमोद महाजन हे जाणूनबुजून उपस्थित राहिले नसल्याचे सांगण्यात येते. कारण सावरकर यांचे तैलचित्र लावण्यात आले तर भाजपच्या मतांवर परिणाम होईल, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेत्यांना खरोखरीच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुखांना भारतरत्न किताब देण्याची आत्यंतिक इच्छा असेल तर मोहन भागवत यांनी वळसे घेण्याऐवजी थेट पंतप्रधानांच्या कानी ही मागणी घालून संघाच्या शताब्दी वर्षात आणि शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षात औचित्य साधावे, मोहन भागवत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तशी शिफारस करणारा ठराव मांडण्याची गळ घालावी. भागवतांचा शब्द पंतप्रधान आणि मुख्यमंत्री खाली पडू देतील असे वाटत नाही. या कामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही सहकार्य करू शकतील. तूर्तास इतकेच!
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

