नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांतूनही भारतीय जनता पक्ष हाच महाराष्ट्रातील नंबर वन पक्ष असल्याचं स्पष्ट झालं. राज्यात अजूनही महायुतीच धुरंधर आहे, हेही अधोरेखित झालं. पण या निकालाच्या खोलात शिरलं की हा निकाल हेच वास्तव आहे की फुगवटा आहे, हे कळेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. तत्पूर्वी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला होता. पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत दोन्ही राष्ट्रवादींनी तुरळक अपवाद वगळता एकत्रच निवडणूक लढवली. तुतारीच्या नेत्यांनी घड्याळावर निवडणूक लढली. पण आता दोन्ही राष्ट्रवादींचं घोडं अडल्याने घड्याळावर विजयी झालेल्या तुतारीच्या उमेदवारांची मोठी गोची झालीय. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत. त्यांची मुलगी अंकिता पाटील घड्याळाच्या चिन्हावर जिंकली. तसंच शिरूरमध्ये माजी आमदार अशोक पवार यांची पत्नीही विजयी झाली. राष्ट्रवादी एक होणार नसल्याने या नेत्यांची कोंडी झालीय.
विदर्भ, खान्देश निवडणुकीविना
महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता ३४ जिल्ह्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे. यापैकी केवळ १२ जिल्ह्यांतच सध्या राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक घेतलीय. यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि परभणी, तसंच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजे या निवडणुकीतून सध्या केवळ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, पालघर आणि ठाणे वगळता कोकण आणि अर्ध्या मराठवाड्याचा कल समोर आला. अख्खा विदर्भ आणि खान्देश या निवडणुकीपासून अलिप्त आहे. १२ जिल्ह्यांत विधानसभेच्या २८८पैकी ९६, तर लोकसभेच्या ४८पैकी १६ जागा येतात. म्हणजेच एक तृतीयांश महाराष्ट्रात या निवडणुका झाल्यात.
भाजप नंबर वन पण…
१२ जिल्हा परिषदेच्या ७३१ गटांसाठी ही निवडणूक झाली. यात गेल्या वेळी १४१ जागा असलेल्या भाजपने सर्वाधिक २२५ जागा जिंकल्या. त्याखालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १६५ (गेल्या वेळी एकत्र राष्ट्रवादीला २१७), शिंदेसेनेलाही १६२ जागा मिळाल्या. विरोधी पक्षांत काँग्रेसला सर्वाधिक ५५ (१२६), मूळ शिवसेनेला ४३ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निव्वळ २६ जागा मिळाल्या. सोलापूरच्या सांगोल्यात शेकापच्या आघाडीला तीन गट मिळाले. मनसेलाही लातूर आणि रत्नागिरीत प्रत्येकी १ जागा मिळाली. धाराशिवमध्ये समाजवादी पक्षाने एक गट जिंकला. २० अपक्षांनाही यश मिळाले. भाकप आणि माकप या डाव्या पक्षांना भोपळाही फोडता आला नाही. महापालिका निवडणुकीत माध्यमांनी देशभर चर्चा केलेल्या एमआयएमला एकही जागा मिळाली नाही. गेल्या वेळी एकत्र शिवसेनेला १४८ गट मिळाले होते. यंदा दोन्ही शिवसेनेची एकत्र गोळाबेरीज तब्बल २०५ इतकी होते. पण पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा यासारख्या जिल्ह्यांत एकत्र लढूनही दोन्ही राष्ट्रवादींना १९१ जागाच जिंकता आल्या. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या जागांमध्ये प्रचंड घट झाल्याचं या निकालातून दिसतंय. घटलेल्या जागा भाजपच्या खात्यात जमा झाल्याचं वरकरणी दिसतं.
याच १२ जिल्ह्यांतील १२५ पंचायत समितीतील गणांसाठीही निवडणूक झाली. यात गेल्या वेळी १ हजार ४५४ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक ४१९, तर शिवसेनेला ३००, भाजप २८४, तर काँग्रेसला २७७ गणांमध्ये यश मिळाले होते. ३४ अपक्षही विजयी झाले होते. इतर छोटे-छोटे पक्ष, स्थानिक आघाड्यांना १४० जागा मिळाल्या. यावेळी मात्र यामध्ये मोठी उलथापालथ बघायला मिळाली. यावेळी १ हजार ४६२पैकी भाजपने सर्वाधिक ४५९ गण जिंकले. त्याखालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी ३०६, तर शिंदेसेनेला ३०२ गणांमध्ये यश मिळाले. काँग्रेसला ९७, मूळ शिवसेनेला ८९, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४६ गण मिळाले. मनसेलाही लातूरच्या रेणापूरमध्ये दोन गण मिळाले. धाराशिवच्या इटकूरमध्ये वंचित बहुजन आघाडीने एका गण जिंकला. डाव्या पक्षांना इथेही यश मिळाले नाही. ३१ अपक्ष आणि इतर छोटे-छोटे पक्ष, स्थानिक आघाड्यांना ५३ गण जिंकता आले. म्हणजेच गेल्या वेळी १९.२९ टक्के जागा मिळालेल्या भाजपला यंदा जिल्हा परिषदेत ३०.७८ टक्के यश मिळालं, तर काँग्रेसचं यश हे १७.२४ टक्क्यांवरून थेट ७.५२ टक्क्यांवर घसरलं. दोन्ही राष्ट्रवादींचा टक्का २९.६९वरून २६.१३ वर आला. याउलट दोन्ही शिवसेनांचा एकत्रित यशाचा टक्का मात्र २०.२५ वरून २८.०४ वर झेपावला. पंचायत समितीतही यश-अपयशाचा हाच ट्रेंड बघायला मिळाला.
१२ पैकी ४ जिल्ह्यांतच बहुमत
पुणे ही राज्यातली सर्वांत श्रीमंत जिल्हा परिषद. इथे राष्ट्रवादी काँग्रेसने ७३पैकी तब्बल ५१ जागा जिंकल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही १ गट जिंकला. त्याखालोखाल भाजपला १०, मूळ शिवसेना ६, शिंदेसेना ५ जागा मिळाल्या. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्याखालोखाल शिवसेनेला १३, तर भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ७ गट मिळाले होते. २ अपक्षही जिंकले होते. पंचायत समितीतही राष्ट्रवादी काँग्रेसला १४६ पैकी तब्बल ९० गण मिळाले. त्याखालोखाल भाजपला २८, शिंदेसेनेला १२, तर शिवसेनेला १०, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४ गण, तर २ अपक्षही विजयी झाले. १३ पैकी ८ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवले. भाजप आणि मूळ शिवसेनेला प्रत्येकी एक पंचायत समिती मिळाली. पण तीन ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे.
अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीच्या यशात सहानुभुतीचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातंय. पण महिनाभराआधी झालेल्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील १७ पैकी १० जागी सत्ता मिळवली होती. विशेष म्हणजे, तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांविरोधात लढत दिली होती. यावेळी आंबेगावसारखा अपवाद वगळला, तर दोघांनी एकत्र निवडणूक लढल्याचाही राष्ट्रवादीला फायदा झाल्याचं दिसतं. प्रत्येक तालुक्यातच नाही, तर गटातला, गणातला मातब्बर नेता भाजपने आपल्याकडे घेतला होता. दौंडचे आमदार राहुल कुल, काँग्रेसमधून आलेले भोरचे माजी आमदार संग्राम थोरात, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यासारखी मातब्बर नेतेमंडळी भाजपमध्ये आहेत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. प्रचार केला होता. त्यानंतरही भाजपला राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात हालचाल करण्याइतकाही स्कोप मिळाला नाही.

सोलापूरमध्ये मात्र भाजपने प्रचंड यश मिळवले. पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. ६८पैकी भाजपने थेट ३८वर झेप घेतली. २०१७मध्ये भाजपकडे केवळ ७ जागा होत्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा मात्र २५वरून १६वर घसरल्या. यामध्ये अजितदादा गटाला १०, तर शरद पवार गटाला ६ जागा मिळाल्या. शिंदे गटाला ८ आणि इतरांना ६ जागा मिळाल्या. काँग्रेस आणि शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. गेल्या वेळी शिवसेनेकडे ५ गट होते. पंचायत समितीमध्ये भाजप ३५वरून ७४, दोन्ही राष्ट्रवादी ४५वरून २१ व १० जागांवर आल्या. शिंदेसेनेला १३ जागा मिळाल्या. पंचायत समितीतीही काँग्रेस आणि शिवसेनेला यश मिळाले नाही. ११ पैकी ६पंचायत समित्यांवर भाजपची सत्ता आली. सांगोल्यात शेकापच्या तालुका आघाडीने भाजप, शिंदे गटाचा पराभव करत बहुमत मिळवले. माळशिरसमध्ये मोहिते-पाटील गटाने सत्ता कायम राखली. पंढरपूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी ८ जागा मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने सभापती ठरेल.
सोलापुरातलं भाजपचं हे यश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राबवलेले ऑपरेशन लोट्स, विरोधक निधी कुठून आणणार याबद्दल आक्रमक प्रचार यांना दिलं जातंय. गेल्या वर्षभरात भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील मातब्बर नेते फोडून पक्षात घेतले होते. स्थानिक भाजपनेत्यांचा विरोध डावलून हे प्रवेश देण्यात आले होते. तसंच भाजपने करमाळा, माढा या पट्ट्यात मोहिते पाटलांच्या विरोधात शिंदे बंधूंना सोबत घेण्याची रणनीती अवलंबली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातला भाजपचा हा प्रवेश यंदाच्या निवडणुकीतली लक्षणीय घटना आहे.
रत्नागिरीकरांनी यंदाही स्पष्ट बहुमताचा कौल दिला. जिल्ह्यात ४ आमदार आणि दोन मंत्री असलेल्या शिंदेसेनेने ५६पैकी सर्वाधिक ४१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला प्रत्येकी ५, तर भाजपला ४ गटांमध्ये यश मिळाले. गुहागरमध्ये मनसेलाही १ जागा मिळाली. जिल्ह्यात तालुक्यात ठिकाणी शिंदेसेना आणि भाजप महायुतीत, तर काही ठिकाणी आमनेसामने लढले. गेल्यावेळी शिवसेनेला ३९, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ आणि काँग्रेसला एका गटात यश मिळाले होते. दुसरीकडे ९पैकी ८ पंचायत समित्यांवर शिंदेसेना-भाजप महायुतीने बहुमत मिळवले. चिपळूणमध्ये मात्र राष्ट्रवादीला १८ पैकी सर्वाधिक ७ जागा मिळाल्यात. शिवसेनेला ४ जागा मिळाल्यात. दोघं एकत्र आले, तर बहुमताचा जादुई आकडा पूर्ण होऊ शकतो. पंचायत समितीच्या ११२पैकी सर्वाधिक ७३ जागा शिंदेसेनेला मिळाल्या. शिवसेनेला केवळ १८ जागांवर समाधान मानावं लागलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिंदेसेना, भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच लढत झाली. रत्नागिरी, राजापूर, लांजा, गुहागर आणि चिपळूणमध्ये शिंदेसेना आणि भाजपची युती होती. संगमेश्वरमध्ये भाजप, शिंदेसेनेने राष्ट्रवादीलाही सोबत घेतले होते. खेड, दापोली आणि मंडणगडमध्ये मात्र शिंदेसेना आणि भाजप आमनेसामने होते. सत्ता नसलेल्या दुबळ्या विरोधी पक्षांना फारसा स्कोप न देण्याची महायुतीची रणनीती होती. याच रणनीतीसमोर ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांचाही निभाव लागला नाही.
सिंधुदुर्गात राणेंच्या नेतृत्वात भाजप-शिंदेसेनेने एकत्र निवडणूक लढवत ५० पैकी तब्बल ४१ जागा जिंकल्या. यामध्ये ३१ जागा लढवत भाजपने २७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं. शिंदेसेनेला १४ तर अपक्षांना ६ आणि शिवसेनेला ३ गट मिळाले. गेल्यावेळी झेडपीत २७ जागांसह काँग्रेसची सत्ता होती. राणे कुटुंब तेव्हा काँग्रेसमध्ये होतं. आता भाजपमध्ये आहे. गेल्या वेळी शिवसेनेला १६, तर भाजपला ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली होती. जिल्ह्यातील ६ पंचायत समित्यांमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. मालवण आणि दोडामार्गमध्ये शिंदेसेना आणि भाजपला समान जागा मिळाल्यात. नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत राणे कुटुंबातच फाईट झाल्याचं चित्र समोर आलं होतं. स्वबळावर सिंधुदुर्गात सत्तेत येण्यासाठी भाजपने शिंदेसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न फोल गेल्याचं निकालातून स्पष्ट झालं होतं. यावेळी मात्र ती चूक भाजप आणि शिंदेसेनेने दुरुस्त केली. त्याचं फलित जिल्हा परिषदेत मिळालं.
८ जिल्ह्यांत त्रिशंकू निकाल
१२ पैकी ८ जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड या जिल्हा परिषदांचा समावेश होतो. कोल्हापूरमध्ये ६८ पैकी महायुतीला जिल्हा परिषदेच्या तब्बल ५१ जागी यश मिळाले. महाविकास आघाडीला १७ जागा मिळाल्या. मंत्री हसन मुश्रीफांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ जागा लढवून २० जागांवर यश मिळवले. सतेज उर्फ बंटी पाटलांच्या नेतृत्वात काँग्रेसने ३४ जागा लढवत १५ जागा जिंकल्या. गेल्या वेळी १४ जागा जिंकलेल्या भाजपला यावेळी ४१ जागा लढवून १२ जागांवरच समाधान मानावे लागले. शिंदेसेनेने ३३ जागा लढवल्या, पण केवळ ९ जागांवरच यश मिळाले. जनसुराज्यने बालेकिल्ल्यातील १५ जागा लढवून ५ जागा जिंकल्या. यड्रावकरांच्या शाहू आघाडीला ४, तर शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भुदरगड शिवशाहू आघाडी आणि अपक्ष यांना प्रत्येकी १ जागा मिळाली. गेल्या वेळी काँग्रेस १४, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ११ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला १० जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पंचायत समितीमध्ये १३६पैकी सर्वाधिक ३३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या. त्याखालोखाल भाजप ३१, काँग्रेस २४, शिंदेसेनेला २०, तर जनसुराज्य शक्तीला ११ आणि इतरांना १७ गण मिळाले.

कोल्हापुरातील हा निकाल महायुतीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची यशकथा आहे. हसन मुश्रीफांना नेहमीच दोन-तीन तालुक्यांचे नेते असं हिणवलं जायचं. पण यावेळी मुश्रीफांनी जिल्हाभर नेतृत्वाची चुणूक दाखवली. कोरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने मारलेली मुसंडी लक्षणीय आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात एकही आमदार नसताना काँग्रेसनं मिळवलेलं यश चर्चेचा विषय बनलंय. सतेज पाटील यांचीच चर्चा होतेय. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड ताकद लावल्यानंतरही शिंदेसेनेला मात्र जिल्ह्यात हाराकिरीला सामोरं जावं लागलंय. मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे, भाजप समर्थक अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील हे अपयशाचे मानकरी ठरले.
सांगलीचा निकाल हा भाजपच्या अपयशाची स्टोरी आहे. गेल्यावेळी ६१पैकी २३ जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला १४, तर काँग्रेसला १० आणि शिवसेनेला ३ गटात यश मिळाले होते. दोन अपक्षही विजयी झाले होते. यावेळी मात्र प्रचंड सत्ता असतानाही भाजपच्या जागांमध्ये मोठी घट झालीय. जयंत पाटलांच्या नेतृत्वात १८ जागांसह शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरलाय. भाजपला १६, काँग्रेसला ११, तर शिंदेसेनेला ७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या. शिवसेना, रयत क्रांती आणि जनसुराज्य शक्ती यांना प्रत्येकी १ जागा मिळाली. जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था आहे.
पंचायत समितीच्या एकूण १२२ जागांपैकी सर्वाधिक ३४ जागा भाजपकडे आहेत. त्याखालोखाल २७ जागा शरद पवार गट, काँग्रेस २१, अजित पवार गट २०, शिंदे गट १९ आणि अपक्षाला एक जागा मिळाली. पण जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांपैकी तीन ठिकाणी शरद पवार गट, तर तासगावात अजित पवार गटाची सत्ता आली. शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादींचे बहुमत आले. पलूस, कडेगावात काँग्रेसने सत्ता मिळवली. शिंदेसेनेलाही खानापूर, आटपाडीत बहुमत मिळाले. केवळ जतमध्ये भाजपला बहुमत मिळाले. मिरजमध्ये मित्रपक्षांच्या मदतीने भाजपची सत्ता येऊ शकते.
सांगली जिल्हा परिषदेत शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांची गोळाबेरीज केली, तर ३० होते. ३१ हा बहुमताचा जादुई आकडा आहे. याउलट भाजपसह इतर सर्व पक्षांकडे ३१ जागा आहेत. पण स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या भाजपच्या इच्छेने महायुतीतले मतभेद हे मनभेदांमध्ये रूपांतरित झालेत. निवडणुकीत शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड संघर्ष झाल्याचं बघायला मिळालं. बाबर यांचं अस्तित्व संपवण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली होती, तर जयंत पाटील, विश्वजीत कदम यांनी अप्रत्यक्षपणे शिंदेसेनेला ताकद देण्याचं काम केलं. सांगलीत एक नवा पॅटर्न उदयाला येण्याची शक्यता आहे.
भाजपने सांगलीत स्वबळावर सत्तेत येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तालुक्या तालुक्यातील नेत्यांना पक्षात घेतलं होतं. मिरजमध्ये तर जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोन विधानसभा निवडणुकीतील विरोधी उमेदवारांना पक्षात घेऊनही भाजपला पंचायत समितीत स्वबळावर सत्ता मिळाली नाही. कडेगाव, पलूसमध्येही विश्वजीत कदमांविरोधात सर्व विरोधकांना भाजपने एकत्र आणूनही तिथे यश आले नाही. सांगलीच्या या निकालाचे वर्णन नेते भाजपमध्ये, मतदार मात्र भाजपविरोधात, असेही करता येईल.
सातारा जिल्हा परिषदेतही मतदारांनी भाजपचे स्वबळाचे मनसुबे उधळून लावले. एकूण ६५पैकी स्वबळावर किमान ३३ जागा जिंकण्याचे आडाखे बांधलेल्या भाजपला २७ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपने ६१ जागा लढवल्या होत्या. याउलट गेल्या वेळी ३९ जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीने केवळ ३६ जागा लढवत २० जागांवर यश मिळवले. शिंदेसेनेनेही ३१ जागा लढवून १५, तर काँग्रेसने ८ जागा लढवून १ जागा जिंकली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली. जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवली. तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढले. पंचायत समितीच्या १३०पैकी सर्वाधिक ५३ जागा भाजपने जिंकल्या. त्याखालोखाल अजित पवार गट ४३ आणि शरद पवार गट ३, तर शिंदेसेना २९ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या.
सातार्यात भाजपकडे ८ पैकी चार आमदार आहेत. शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे असे दोन मातब्बर मंत्री आहेत. उदयनराजे भोसलेंच्या रूपात खासदारही भाजपचा आहे. याच बळावर भाजपने शत-प्रतिशतचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी भाजपने शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याशीच पंगा घेतला. पाटणमध्ये जाऊन देसाईंचा टांगा पलटी करण्याची भाषा वापरली. अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील यांच्याविरोधातही वाईत जाऊन रान पेटवलं. गोरेंच्या माण तालुक्यात त्यांचे चुलत बंधू आणि वहिनी या दोघांनाही मतदारांनी पराभवाचं तोंड दाखवलं. फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंना संपवण्याचा पण केला होता. पण फलटणमधील ८पैकी ५ गट रामराजेंच्या नेतृत्वात शिंदेसेनेने जिंकले. भाजपला केवळ २ जागा मिळाल्या. सातारकरांनी भाजपचा हा अतिआक्रमक प्रचार नाकारल्याचं निकालातून सिद्ध झालं. आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.
संभाजीनगरमध्ये भाजपने २३वरून २४ वर झेप घेतली. तर शिंदेसेनेने २२ जागा जिंकल्या. शिवसेनेने ९, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४, तर शरद पवार गट, काँग्रेस, प्रहार आणि अपक्ष यांनी प्रत्येकी १ जागा जिंकली. गेल्या वेळी एकत्र शिवसेनेने १८, तर काँग्रेसने १६ आणि राष्ट्रवादी व अपक्षांनी प्रत्येकी ३ जागा जिंकल्या होत्या. जिल्ह्यातील पंचायत समितीच्या १२६पैकी भाजपला ३७ गणांत यश मिळाले. गेल्या वेळी भाजपकडे ५० गण होते. दुसरीकडे काँग्रेस २१वरून ३, तर इतर ७वरून १० वर गेले. शिंदेसेना ५५, तर शिवसेनेला ९ गणांत यश मिळाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ११, तर शरद पवार गटाने एक जागा जिंकली. जिल्ह्यात १ खासदार, ५ आमदार आणि १ मंत्री असतानाही शिंदेसेनेला मर्यादित यश मिळाले. स्वबळावर लढूनही भाजप किंवा शिंदेसेना दोघांनाही बहुमत मिळाले नाही. त्यामुळे ६३पैकी ३२ जागा कोणालाही मिळाल्या नसल्याने सत्तास्थापनेसाठी दोघांकडूनही एकमेकांना टाळून इतरही पर्यायांची चाचपणी सुरू आहे. अशावेळी मूळ शिवसेना सोबत आल्याशिवाय सत्तेचं नवं समीकरण आकाराला येऊ शकत नाही, हे ध्यानात घेतलं पाहिजे.
लातूरमध्ये गेल्या वेळी ५९पैकी ३६ जागा जिंकत भाजपने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. पण यावेळी भाजपला केवळ निम्म्या १८ जागांवरच समाधान मानावे लागले. याउलट काँग्रेस १५वरून थेट २३ वर गेली. राष्ट्रवादी काँग्रेस ५वरून १२वर झेप घेतली. मनसे, ठाकरेंची शिवसेना, शिंदेसेना यांना प्रत्येकी १ जागा मिळाली. २ जागी अपक्ष जिंकले. पंचायत समितीच्या ११८ जागांपैकी सर्वाधिक ४४ जागा भाजपने जिंकल्या. त्याखालोखाल ३८ जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस २५, तर शरद पवार गट ३, शिवसेना व शिंदेसेना प्रत्येकी १, तर ४ गणात अपक्षांना यश मिळाले.
लातूरमध्ये ६पैकी ५ आमदार महायुतीचे आहेत. ३ भाजप, २ राष्ट्रवादी काँग्रेस आणि १ काँग्रेसचा आमदार आहे. अमित देशमुखांच्या नेतृत्वात मविआने महायुतीला तगडी फाईट दिली. महायुतीला निसटते बहुमत मिळाले. पण सत्ता कोणाची यावरून लातूरमध्येही महायुतीत कुरघोडी सुरू असल्याचे चित्र आहे.
धाराशिवमध्ये ५५पैकी भाजपने ४वरून १९वर झेप घेतली. शिंदेसेना १५, ठाकरेंची शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस २६वरून ६, काँग्रेस १३वरून ३, समाजवादी पक्ष १ आणि अपक्ष ३ जागांवर विजयी झाले. गेल्या वेळी शिवसेनेकडे ११ जागा होत्या. पंचायत समितीच्या ११० पैकी ४० जागा भाजप, ३१ जागा शिंदेसेना, १९ जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ११, काँग्रेस ५, वंचित बहुजन आघाडी १ आणि इतर ३ जागांवर विजयी झाले.
जिल्ह्यातील ४ पैकी २ आमदार आणि १ खासदार मूळ शिवसेनेचा आहे. भाजप आणि शिंदेसेनाचा प्रत्येकी १ आमदार आहे. पण महायुतीने ५५पैकी तब्बल ४० जागा जिंकल्या. आता अध्यक्ष कोणाचा आणि कोण होणार यावरून शिंदसेना आणि भाजपमध्ये मतभेदाचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या राजकारणात शिंदेसेनेचे तानाजी सावंत आणि भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे दोन ध्रुव म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ऐनवेळीच्या घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
परभणी जिल्हा परिषदेत ५४पैकी सर्वाधिक २४ जागा जिंकत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. तरीही बहुमताच्या मॅजिक फिगरपासून भाजप दूर आहे. पण भाजपने गेल्यावेळच्या ५वरून २४वर घेतलेली झेप लक्षणीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २४वरून १५वर घसरलीय. शिवसेना ६, शिंदेसेना ५, काँग्रेस ३, तर १ जागा अपक्षाला मिळाली. गेल्या वेळी शिवसेनेकडे १२ जागा होत्या.
परभणीत भाजपच्या वाढलेल्या जागांमध्ये मंत्री मेघना बोर्डीकर आणि गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा वाटा आहे. गुट्टे हे रासपचे आमदार असले, तरी त्यांनीच तालुक्यात भाजपचे तिकीट वाटप करून उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद लावली. तसंच गेल्या वर्षभरात भाजपने मोठ्या प्रमाणात शिवसेना व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पक्षात घेतले. पण सत्तास्थापनेसाठी महायुतीच प्रचंड स्पर्धा आहे. राष्ट्रवादीची सत्ता गेली. त्यामुळे शिंदेसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात ठेवायचे असेल तर भाजपकडे शिंदेसेनेशिवाय किंवा फोडाफोडीशिवाय पर्याय नाही.
महाराष्ट्राच्या मातीतला पक्ष नेस्तनाबूत
रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतला सगळ्यात लक्षणीय निकाल लागला. महाराष्ट्राच्या मातीतला, बहुजनांचा पक्ष शिवछत्रपतींच्या रायगडमध्ये नेस्तनाबूत झाला. गेल्या वेळी २३ जागांसह सत्ताधारी असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला एकही जागा मिळाली नाही. ५९पैकी २१ जागांसह शिंदेसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरला. त्याखोलाखाल राष्ट्रवादी काँग्रेस १६, भाजप १५, शिवसेना ५ आणि काँग्रेसला २ जागांवर यश मिळाले. गेल्यावेळी एकत्रित शिवसेनेला १८, तर राष्ट्रवादीला १२ जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ३ जागा मिळाल्या होत्या. पंचायत समितीतही शिंदेसेना ३७, भाजप ३२, राष्ट्रवादी २८, शिवसेना १४, तर शेकापला ७ जागा मिळाल्या.
शेकापची ४० वर्षांपासून झेडपीत सत्ता होती. गेल्या पाच वर्षांत भाजपाने मोठ्या प्रमाणात शेकापच्या नेत्यांना फोडून पक्षात घेतले. राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, माजी झेडपी अध्यक्ष नीलिमा पाटील, चित्रा पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील अशा दिग्गजांना भाजपने पक्षात घेतले. पण या दिग्गजांना निवडणुकीत यश आले नसले, तरी त्यातून शेकापला शून्यावर आणण्यात मोठी कामगिरी बजावल्याचे निकालाने स्पष्ट केले. महायुतीत सत्ता कोणाची हा पेच रायगडमध्येही कायम आहे.
या निकालातून आणखी एक पॅटर्न समोर आलाय. भाजप १२ जिल्ह्यांतील सगळ्यांत मोठा पक्ष ठरला, असला तरी भाजपला केवळ सिंधुदुर्ग आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांतच स्वबळावर सत्ता मिळालीय. ही भाजपच्या यशाची राज्यव्यापी मर्यादा या निकालाने अधोरेखित केली. त्रिशंकू निकाल लागलेल्या आठ ठिकाणी कशा प्रकारे सत्ता समीकरण आकार घेते, त्यावर महायुतीच्या राजकारणाची दिशाही कळेल. पण तूर्तास भाजप हा महाराष्ट्रातील नंबर वन पक्ष असला, तरी तो कुबड्यांशिवाय सत्तेत येऊ शकत नाही, हेही वास्तव आहे. वेगवेगळे लढले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला असता, हेही निकालातून स्पष्ट झाले. लातूर, सांगली आणि कोल्हापूर हे महाविकास आघाडीसाठी यशाचे सूत्र असू शकते, ही बाबही समोर आली. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेतलं काँग्रेस आणि शिवसेनेचं हे यशापयश शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद मायनस केल्यानंतरचं आहे.
जिल्हा परिषद निवडणूक झालेल्या १२ जिल्ह्यांत विधानसभेचे २८८ पैकी ९६ मतदारसंघ येतात. निम्म्याहून अधिक ग्रामीण महाराष्ट्रात अजून निवडणूक व्हायचीय. ओबीसी आरक्षणामुळे आधीच ७-८ वर्षांपासून लांबलेल्या या निवडणुकीचा सूर्य उर्वरित २२ जिल्ह्यांत कधी उजाडणार, हा खरा प्रश्न आहे.

