महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत अहमद पटेल यांनी मोलाची भूमिका बजावली. गेल्या वर्षीच्या राजकीय घडामोडींच्या आठवणींना उजाळा देत काँग्रेसच्या या मुत्सदी राजकीय नेत्याला वाहिलेली ही श्रद्धांजली…
सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेसचे चाणक्य म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे नुकतेच निधन झाले. अनेक राजकीय वादळांमधून त्यांनी काँग्रेसची नौका सहीसलामत किनारी लावली होती.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी आपल्या राजकीय रणनीतीची यथोचित प्रचिती दिली होती. तीन वेळा लोकसभा आणि तब्बल पाच वेळा राज्यसभेचे खासदार निवडून आल्यानंतरही पटेल यांनी मंत्रिपद भूषविण्याचा मोह टाळला होता. राजकीय पक्षांमध्ये अनेकजण संघटनात्मक जबाबदारी स्वीकारण्यास प्राधान्य देतात. राजकारणात महाभयंकर ड्रामा सुरू असताना हे शिलेदार बॅकस्टेजला थांबून सारे डावपेच आखत असतात. त्यापैकीच अहमदभाई होते.
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये ऐतिहासिक घडामोडी झाल्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. हे सरकार आकारास येण्यात अहमदभाईंनी मोलाची भूमिका बजावली होती, असे राजकीय निरीक्षक आवर्जून सांगतात. शिवसेनेसमवेत काँग्रेसची आघाडी होणे शक्यच नाही, असा दावा देशभरातील राजकीय पंडित छातीठोकपणे करीत होते. मात्र, अहमदभाईंनी त्या परिस्थितीमध्ये आपल्या निष्णात, मुरब्बी, मुत्सद्दीपणाचा प्रत्यय दिला होता. महाराष्ट्रातील या आघाडीची अनेकार्थांनी किती दीर्घकालीन परिमाणे आहेत, हे काँग्रेस हायकमांडला पटवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
म्हणूनच की काय, अहमदभाईंना ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात –
‘अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. काँग्रेस पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांचीदेखील मोठी भूमिका होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. महाविकास आघाडीने आपला मार्गदर्शक गमावला आहे.’
गेल्या वर्षी विधानसभेचे निकाल दृष्टिपथात येऊ लागल्यानंतर बेरजेचे राजकारण मांडून काही माध्यमांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेबाहेर ठेवले जाऊ शकते, असे आडाखे बांधण्यास प्रारंभ केला होता. अर्थात, शिवसेनेची एक भूमिका मात्र कायम होती. मुख्यमंत्रिपदाबाबत जो शब्द देण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय नेतृत्वासमवेत अखेरपर्यंत संवादाची दारे खुली ठेवण्यात आली होती. परंतु, दिलेला शब्द भारतीय जनता पार्टीने पाळला नाही. आणि मग हे तिसरे समीकरण अधिकच जोर धरू लागले.
त्यातही, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र कशी येणार, असे सवाल उपस्थित करण्यात येऊ लागले. काँग्रेस हा तर धर्मनिरपेक्ष पक्ष आणि शिवसेना ही हिंदुत्ववादी. त्यामुळेच, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांची महाआघाडी स्थापन झाली, तरी काँग्रेस त्यामध्ये सहभागी कशी होणार, अशी खोच मारण्यात आली. वास्तविक, अनेक मुद्द्यांवर शिवसेनेना आणि काँग्रेसने भूतकाळात सहकार्याची भूमिका घेतली आहे. अगदी, खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तसे जाहीरपणे स्पष्ट केले होते. परंतु, महाराष्ट्रामधील हे ऐतिहासिक राजकीय समीकरण जुळू नये, यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेल्या अनेक घटकांकडून अशा पद्धतीचा बुद्धिभेद सुरूच ठेवण्यात आला होता.
या चर्चेदरम्यान दुसरा प्रश्न होता तो काँग्रेसने बाहेरून पाठिंबा द्यायचा, की सरकारमध्ये सहभागी व्हायचे? या प्रश्नावरूनही काँग्रेसमधील आमदारांसमवेत मुंबईत चर्चेची सत्रे घडत होती. अहमद पटेल त्यावर अतिशय बारीक नजर ठेवून होते. त्या संदर्भातील सर्व शक्यापशक्यतांची पडताळणी करून घेतली जात होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींना भेटणे, त्यांच्याकडून आलेले निरोप हायकमांडपर्यंत पोचविणे, त्यावर चर्चा करून बैठकीमधील प्रतिसाद पुन्हा शिवसेना-राष्ट्रवादीच्या गोटापर्यंत पोचविणे, असे कार्य पदड्यामागे राहून अहमदभाईंच्या निगराणीखाली अव्याहतपणे सुरू होते. अशा नाजूक राजकीय परिस्थितीमध्ये होत असलेल्या प्रत्येक घडामोडींचे अनेकविध अर्थ काढले जात होते. त्यावरून दररोज राजकीय अस्थिरता अधिकच गहिरी होत होती. अशा परिस्थितीमध्ये अतिशय परिपक्वपणे अहमदभाईंनी ती परिस्थिती हाताळली. कोणतीही संधीसाधू वृत्ती त्या परिस्थितीचा गैरफायदा घेणार नाही, याची पक्की नाकेबंदीदेखील केली. आणि अखेर, काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन लाभत होते. शिवसेनेकडून संजय राऊत हे सर्व राजकीय वक्तव्यांच्या तोफांचा सामना करीत होते. अशा परिस्थितीमध्ये अहमदभाईंनी अतिशय संयतपणे काँग्रेस हायकमांडसमवेत संवाद साधत हा नाजूक विषय खूपच कौशल्याने हाताळला. म्हणूनच, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या श्रद्धांजलीत म्हणतात त्याप्रमाणे, महाविकास आघाडी सरकार आकाराला येण्यात अहमदभाईंची मोलाची भूमिका होती.