बैठकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली होती. जाण्यापूर्वी जरा सकाळच्या ब्रेकिंग न्यूज काय आहेत, हे पाहण्यासाठी टीव्ही ऑन केला. पाहतो तो काय… खरोखरीच ब्रेकिंग न्यूज सुरू होती! देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य झळकाविले जात होते… मुख्यमंत्री मीच होणार! अशा प्रकारची वक्तव्ये केली जाणे खरोखरीच दुर्दैवी होते. त्यामुळेच, आता भाजप केंद्रीय शिष्टमंडळासमवेत बैठक करण्यामध्ये अर्थ तो काय राहिला, असे आमचे मत पडले.
कोणतेही युती-आघाडीचे सरकार स्थापन करायचे, म्हणजे खलबते ही होतातच. धोरणकर्त्यांमध्ये बंद दाराआड चर्चा केली जाते. परिणामी, निवडणुकीच्या आधी माध्यमांमधून भरपूर कंड्या पिकविल्या जातात. निवडणुकीदरम्यान प्रचारसभांमध्ये उलटसुलट वक्तव्ये केली जातात. आणि निवडणुकीचे निकाल हाती लागल्यानंतर प्रत्यक्ष सरकार स्थापन करण्याच्या कालावधीमध्ये तर अतिशय संवेदनशील परिस्थिती असते. अक्षरशः प्रत्येक शब्द आणि कृती ही अतिशय मोजून मापून करावी लागते.
गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेची मोर्चेबांधणी सुरू असताना अशीच काहीशी तणावाची परिस्थिती होती. मुख्यमंत्रिपदासंदर्भात दिलेला शब्द पाळण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यावरून युतीसंदर्भातील अनेकविध शक्याशक्यतांच्या ब्रेकिंग न्यूज सुरू होत्या. पडद्यामागूनदेखील अनेक घटना सुरू होत्या. आता महाविकास आघाडीने एक वर्षाचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केला असताना, तेव्हाच्या त्या घडामोडींना शब्दबद्ध करण्यास हरकत नाही. नेमके काय सुरू होते, नेमके कोणामुळे फिसकटले, याची सत्य माहिती राज्यातील जनतेसमोर आली पाहिजे. नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचा तो अधिकारच आहे!
सत्तास्थापनेची खलबते सुरू असताना ‘तो’ दिवस उजाडला. मुख्यमंत्री शिवसेनेचाच, या पवित्र्यावर आम्ही ठाम होतो. दिलेला शब्द पाळला जाणे महत्वाचे होते. भारतीय जनता पक्षाची स्थानिक नेतेमंडळी काही ते मानण्यास तयार नव्हती. अशा अनिर्णित परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून दोन जणांचे शिष्टमंडळ मुंबईत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रामधील मंत्री प्रकाश जावडेकर आणि प्रभारी भूपेंद्र यादव यांचा समावेश असलेले ते शिष्टमंडळ मुंबईत येणार होते. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी त्या संदर्भात माझ्याशी चर्चा केली. या शिष्टमंडळाच्या भेटीस जाण्यासाठी शिवसेनेकडून दोघा सदस्यांची निश्चिती करण्यात आली.पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बैठकीसाठी दालन राखून ठेवले.
दुपारी तीन वाजता बैठक ठरविण्यात आली. आम्ही या बैठकीबाबत खूपच आशावादी होतो. युती तुटू नये, यासाठी भाजपचे दिल्लीस्थित नेतृत्वही खूपच आग्रही होते. तसेच, मुख्यमंत्रिपदाबाबत तोडगा काढण्यासाठीदेखील ते उत्सुक होते. म्हणूनच, या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. बैठकीपूर्वी आमचीदेखील खलबते झाली. मुख्यमंत्रिपदाबाबत दिलेला शब्द पाळावा, ही एकमेव भूमिका होती.
बैठकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली होती. थोड्याच वेळात संबंधित बैठकीच्या ठिकाणी कूच करणार होतो. जाण्यापूर्वी जरा सकाळच्या ब्रेकिंग न्यूज काय आहेत, हे पाहण्यासाठी टीव्ही ऑन केला. पाहतो तो काय… खरोखरीच ब्रेकिंग न्यूज सुरू होती!
देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य झळकाविले जात होते… मुख्यमंत्री मीच होणार!
दीपावलीच्या निमित्ताने मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर प्रथेप्रमाणे माध्यम प्रतिनिधींसाठी फराळ व चहापानाचे आयोजन केले होते. त्या दरम्यान अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे माध्यम प्रतिनिधींकडून सांगितले जात होते.
मी तातडीने उद्धव साहेबांशी संपर्क साधला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पाठविलेल्या शिष्टमंडळासमवेत आमची दुपारी बैठक होणार होती. फडणवीस यांच्यासह सर्व स्थानिक नेत्यांना त्या बैठकीबाबत नक्कीच कल्पना असणार. असे असतानादेखील अशा प्रकारची वक्तव्ये केली जाणे खरोखरीच दुर्दैवी होते. त्यामुळेच, आता भाजप केंद्रीय शिष्टमंडळासमवेत बैठक करण्यामध्ये अर्थ तो काय राहिला, असे आमचे मत पडले. पर्यायाने, ही बैठक रद्द करीत असल्याचा निरोप आम्ही भाजपमधील संबंधितांना धाडला.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे, तर त्या बैठकीबाबत आम्ही खूपच आशावादी होतो. युती कायम राखण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आग्रही होते. त्यामुळेच, त्या दृष्टीने ते स्थानिक नेतेमंडळींची समजूत घातलील.
मुख्यमंत्रिपदासंदर्भातील काही तरी फॉर्म्युला वर्कआऊट होईल, अशी आमची धारणा होती. मात्र, वर्षा बंगल्यावरील त्या वक्तव्याने सारेच दरवाजे बंद झाले होते. आता बैठका-चर्चा करण्यात काहीच अर्थ नव्हता.
औपचारिक-अनौपचारिक, ऑफ दी रेकॉर्ड, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर, विश्वसनीय सूत्रांकडून माहिती… माध्यमांमध्ये आपला विचार, मनातील भावना पेरण्यासाठीच्या क्लृप्त्या काय असतात? नेमकी वेळ साधून बातम्या कशा पद्धतीने पेरल्या जातात, हे माहिती नसल्याइतपत आम्ही दुधखुळे नव्हतो. त्यामुळेच, काय अंतःस्थ हेतूने हे वक्तव्य माध्यमांमधून झळकाविण्यात आले आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच, स्थानिक नेत्यांचा दुराग्रहच असेल, त्यांच्या मनातूनच काही गोष्टींना ठामपणे नकार असेल, तर एकतर्फी प्रामाणिकपणा, आशावाद राखण्यात काही अर्थच नव्हता. ती संबंधित बैठक रद्द आणि यापुढे चर्चा नाही, असे आम्ही भाजपच्या संबंधित केंद्रीय नेतेमंडळींना कळवून टाकले.
आमच्या बाजूने निर्णय झाला होता!
‘त्या’ एका वक्तव्याने ‘त्या’ दिवशी सामना फिरला होता!
… आणि म्हणतात ना… रेस्ट ईज हिस्टरी!