• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तीर्थावळीतील तत्त्वज्ञान

ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध)

marmik by marmik
February 3, 2026
in विशेष लेख
0
तीर्थावळीतील तत्त्वज्ञान

वारकरी संप्रदायात तीर्थावळीच्या अभंगांना विशेष महत्त्व आहे. पूर्वी काही फडांवर वारकरी होण्यासाठी तीर्थावळीच्या अभंगांच्या पाठांतराची अट होती. तीर्थावळीचे अभंग पारंपरिक वारकरी फडांच्या जागराच्या भजनातही आवर्जून म्हटले जात असत. तीर्थावळीचे अभंग नामदेवरायांनी लिहिलेले आहेत. तीर्थावळीचे अभंग म्हणजे नामदेवराय आणि ज्ञानोबाराय यांनी केलेल्या सहप्रवासाचं वर्णन आहे. या अभंगातून प्रवासाला निघण्यापासून ते पंढरपुरात परत आल्यानंतर घातलेल्या मावंद्यापर्यंत अनेक गोष्टींचं तपशीलवार आणि हृद्य चित्रण आलेलं आहे. त्यातून वारकरी संप्रदायाची विचारसरणीही उलगडली जाते. त्या काळातल्या दोन संतांचं नातं आपल्याला समजतं. त्यामुळेच वारकरी संप्रदायात तीर्थावळीला विशेष महत्त्व आहे.
मुळात वारकरी संप्रदायात तीर्थयात्रा नाकारलेली आहे. तीर्थाटनाची मूळ कल्पना ज्या ज्ञानोबारायांची आहे त्यांनीही परमार्थासाठी तीर्थाटनाची जरुरी नाही हे स्पष्ट केलेलं आहे. ‘तुम्ही व्रते नियमु न करावे। शरीराते न पीडावे। दुरी केही न वचावे। तीर्थासी गा।।’ असं ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत म्हणतात. बहुतेक वारकरी संतांनी तीर्थाटनाचा निषेध केलेला आहे. ‘तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी ।।’ ही तुकोबारायांची भावना आहे. त्यांनीच ‘जाऊनिया तीर्था तुवा काय केले। चर्म प्रक्षाळिले वरी वरी ।।’ असं म्हटलेलं आहे. तीर्थाच्या ठिकाणी जाऊन फक्त वरवरची कातडी धुतली जाईल पण आतून मन धुतलं जाणार नाही, असं तुकोबाराय स्पष्ट सांगतात.
तरीही ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थाटनाला गेले त्याची कारणं वेगळी होती. तीर्थाटनाची कल्पना ज्ञानोबारायांची होती. त्यांचा तीर्थाटनाचा हेतू फक्त नामदेवरायांची सोबत मिळण्याचा होता. नामदेवरायांसोबत सहप्रवास करता यावा आणि त्यानिमित्ताने त्यांच्याकडून वारकरी अंगाने काही मूलभूत संकल्पना समजून घ्याव्यात ही ज्ञानोबारायांची भावना होती. त्यासाठीच त्यांनी नामदेवरायांना तीर्थाटनाची गळ घातली. ‘तुझीये संगतीचे नित्य सुख घ्यावे। सार्थक करावे संसाराचे।।’ अशी ज्ञानोबारायांची तळमळ होती. त्यांचा आग्रह नामदेवरायांना मोडता आला नाही.

सुरुवातीला नामदेवराय तीर्थाटनाला अनुकूल नव्हते. पंढरपूरविषयीची अपार आत्मीयता आणि प्रेम यामुळं पंढरपूर सोडून इतर ठिकाणी तीर्थाला जाण्याची त्यांची भूमिका नव्हती. ‘सर्व सुख मज आहे पांडुरंगी। जावे कवणा लागी कोण्या तीर्था ।।’ असा नामदेवरायांचा निर्धार होता. ‘प्रसंगे नामयाचे संगति सुख घ्यावे। म्हणोनी ज्ञानदेवे धरिले चरण ।।’ असा नामदेवांच्या संगतीचा ज्ञानोबारायांचा आग्रह वाढत गेला. त्यामुळे नामदेवराय आणि ज्ञानोबाराय तीर्थाटनाला निघाले. तीर्थाटनाला निघाल्यानंतर त्यांचा संवाद सुरु झाला. अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने ते एकमेकांशी बोलत होते. नामदेवरायांना मात्र पंढरपूर सोडून आल्याचं दुःख होत होतं. विठ्ठलाचा विरह त्यांना सहन होत नव्हता. त्यावेळी ज्ञानदेवांनी त्यांची समजूत घातली. विठ्ठल फक्त पंढरपुरात नसून तो सर्वत्र आहे हा सिद्धांत ज्ञानदेवांनी सांगितला. ‘व्यापकु विठ्ठलु आहे सर्वदेशी। जरी सांडोनिया पाहसी भेदभ्रमु ।।’ असं ज्ञानदेव म्हणाले. एकंदरीतच त्यांचा सहप्रवास फार आनंदाने आणि प्रेमाने चालला होता. ‘ऐसे नित्यानंदभरित क्रमिताती मार्गु। हृदयी तो अनुरागु आवडीचा ।। प्रेमे वोसंडत करिती स्वहितगोष्टी। द्राविती कसोटी अनुभवाची ।।’ असा त्यांचा प्रवास सुरु होता. या प्रवासात ज्ञानदेवांनी नामदेवांना भक्तिमार्गातील काही मूलभूत संकल्पना स्पष्ट करुन देण्याची विनंती केली.
ज्ञानदेव म्हणे परियेसी नामया।
अद्वैत आत्मया प्रेममूर्ती ।।
भक्तिभाग्य तुवा जोडिले अविनाश।
सांग पा सविलास मार्ग त्याचा ।।
अशा रीतीने ज्ञानदेवांनी नामदेवरायांना भक्तीमार्गाचा बोध विचारला. भजन, नमन, ध्यान, श्रवण, मनन, निजध्यासन, भक्ती, धृती आणि विश्रांती या नऊ प्रमुख संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करण्याची विनंती केली. ‘पंढरीरायाचा तू प्रेमभांडारी। आस पूर्ण करी मज याचकाची ।।’ असं ज्ञानदेव म्हणाले. त्यांनी नामदेवरायांच्या प्रेमपूर्ण बोलण्याची तारीफ केली. ‘सिंधुहूनी सखोल सुरस तुझे बोल। आनंदाची वोल नित्य नवी ।।’ असं नामदेवरायांचं बोलणं होतं. ते नामदेवरायांचे सखोल, सुरस आणि आनंदाचा अनुभव देणारे बोल ऐकण्यासाठी ज्ञानदेव आतुर होते. ‘ते मज सादर ऐकवी सत्वर। श्रवण क्षुधातूर जाले माझे ।।’ ही ज्ञानदेवांची अवस्था झाली. त्यावर प्रतिसाद देत या नऊ अध्यात्मिक संकल्पनांचा मूळ गाभा फार अर्थपूर्णतेने नामदेवरायांनी ज्ञानोबारायांना सांगितला. त्या नऊ प्रमुख संकल्पना आणि नामदेवरायांनी त्याचा सांगितलेला अर्थ
१) भजन
सर्वांभूती दया सर्वभावे करुणा।
जेथे मी-तूपणा मावळला ।।
भजन तया नाव मज वाटे गोड।
येर ते काबाड वायाविण ।।
भजन म्हणजे सर्वांभूती दया आणि करुणा. ही दया आणि करुणा म्हणजेच भजन. भजन म्हणजे साधारणपणे भक्तिगीतांचं गायन असा आपला समज आहे. वारकरी संप्रदायातला भजनाचा आचारधर्मही साधारण तसाच आहे. संतांचे अभंग टाळ, मृदंग आणि वीणा या वाद्यांच्या सहाय्याने गाणं म्हणजे भजन अशी वारकर्‍यांची धारणा आहे. त्या भजनामागचा विचार इथे नामदेवराय सांगतात. भजनातून जर दया आणि करुणा उपजत नसेल तर त्या भजनाला अर्थ नाही. दया आणि करुणा म्हणजे भजन अशी भजनाची अभिनव व्याख्या नामदेवराय सांगतात. भजनातून मी-तूपणा मावळायला हवा. भेदाभेद संपायला हवेत. तेच खरे भजन.

२) नमन
नमन ते नम्रता न देखे गुणदोष।
अंतरी प्रकाश आनंदाचा ।।
येर ते दांभिक जाणावे मायावी।
विश्वास मी जिवी न धरी त्यांचा ।।
नमनाची व्याख्या सांगताना नामदेवराय म्हणतात की नमन म्हणजे नम्रता. नमन करण्यातून नम्रता यायला हवी. ‘नम्र जाला भूता। तेणे कोंडिले अनंता ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. जो इतरांप्रती नम्र होतो तो देवालाही वश करतो. नमन करताना आपण गुणदोषांचा विचार करता कामा नये. आपल्या अंतरातल्या आनंदाच्या प्रकाशात मग्न राहिल्यावर सर्वांप्रती नम्रताभाव आपोआप निर्माण होतो. नम्रता नसलेला कोणीही दांभिकच असतो असं नामदेवराय म्हणतात. वारकरी एकमेकांची जात, वर्ण, लिंग, धर्म, वय, गुण, दोष आणि व्यवसाय असं काहीही न पाहता एकमेकांच्या पाया पडतात त्याचं मूळ वारकर्‍यांच्या या व्यापक नमन संकल्पनेत आहे.

३) ध्यान
ध्यान तया नाव निर्विकार निके।
जे विश्वी माझ्या देखे विठोबासी ।।
अखंड हृदयी तेचि आठवण।
साजिरे समचरण विटेवरी ।।
ध्यान म्हणजे संपूर्ण विश्वात विठ्ठलाला बघणं. हृदयात त्याची अखंड आठवण ठेवणं. खरंतर मायावादी तत्त्वज्ञानात जग हे माया मानलेलं आहे. वारकरी परंपरा मात्र जगाला परमेश्वराचा विलास मानते. त्यामुळेच नामदेवरायांनी विश्वात विठ्ठलाला बघणं म्हणजे ध्यान अशी व्याख्या केलेली आहे.

४) श्रवण
नादी लुब्ध जैसे आसक्त हरिण।
जाय विसरोन देहभाव ।।
यापरि तल्लीन दृढ राखे मन।
या नावे श्रवण आवडीचे ।।
श्रवणभक्ती ही नवविधा भक्तीपैकी एक आहे. श्रोता हा वारकरी संप्रदायात महत्त्वाचा मानला गेलेला आहे. श्रोत्याला ज्ञानदेवांनी ‘महेशाची मूर्ती’ म्हटलेलं आहे. वक्ता वर असतो तर श्रोता खाली. तराजूत जड वस्तू खाली असते तर हलकी वस्तू वर असते. त्याप्रमाणे वक्ता वर आणि श्रोता खाली असतो. श्रोता आणि वत्तäयाच्या संदर्भात ही कोटी वारकरी कीर्तनकार नेहमी करत असतात. वारकरी संप्रदायात श्रवणाला फार महत्त्व आहे. इथे नामदेवराय श्रवणाची व्याख्या सांगतात. श्रवण म्हणजे तल्लीन मनाने आणि आवडीने ऐकणं. ज्याप्रमाणे हरीण नादावर लुब्ध असतं त्याप्रमाणे आपण कानात प्राण आणून ऐकणं म्हणजेच श्रवण.

५) मनन
व्यवसायी चित्त ठेवुनी कृपण।
लाभाचे चिंतन सर्वकाळ ।।
यापरि अखंड स्वहित विचारण।
करिजे ते मनन सत्वशीळ ।।
मनन म्हणजे चिंतन. ‘काळ सारावा चिंतने।’ असं तुकोबाराय म्हणतात. वारकरी संप्रदायात चिंतन महत्त्वाचं मानलेलं आहे. मनन म्हणजे स्वहिताचा सतत विचार करणं. इथे स्वहित म्हणजे आत्मोद्धार. ज्याप्रमाणे एखादा कंजूष माणूस सतत व्यवसायातून लाभाचा विचार करत असतो, त्याप्रमाणे सतत आत्मकल्याणाचा विचार करणं म्हणजे सात्विक मनन होय असं नामदेवराय सांगतात.

६) निजध्यासन
परपुरुषी जैसी आसक्त व्यभिचारिणी।
न लागे तिच्या मनी कामधाम ।।
कीटकी भृंगुटिये जैसे अनुसंधान।
निके निजध्यासन एकविध ।।
व्यभिचारी स्त्री परपुरुषावर आसक्त होते. तिचं कामाधामात लक्ष लागत नाही. त्याप्रमाणे एकविध भावाने परमेश्वराचा ध्यास घेणं म्हणजे निजध्यासन होय. निजध्यासनाची ही व्याख्या नामदेवरायांनी केलेली आहे.

७) भक्ती
सर्वभावे एक विठ्ठलुचि ध्याये।
सर्वांभूती पाहे रुप त्याचे ।।
सर्वांहूनि निराळा रजतमावेगळा।
भोगी प्रेमकळा तेचि भक्ती ।।
भक्ती म्हणजे परमेश्वराची प्रेमकळा भोगणे असं नामदेवराय म्हणतात. सतत सर्वांभूती विठ्ठल पाहून त्याचं प्रेम प्राप्त करण्याचा ध्यास लागण्यातच भक्तीची सार्थकता आहे. भक्तीत ज्ञान महत्त्वाचं नसून प्रेम महत्त्वाचं आहे. ‘भक्तीप्रेमावीण ज्ञान नको देवा।’ असं त्यामुळेच एकनाथ महाराज म्हणतात.

८) धृती
सत्वाचा सुभटू असंग एकटू।
वैराग्य उद्भटू एकनिष्ठ ।।
प्रारब्धाचा भोगी नेणे देहस्मृती।
अखंड ते धृती निर्विकार ।।
धृती म्हणजे धैर्य. अध्यात्मात वारकरी अंगाने धृती म्हणजे सात्विकपणाने, निसंग होऊन, लोकापवादाची पर्वा न करता देहभान हरपून परमार्थ करणं म्हणजे धृती असं नामदेवराय म्हणतात.

९) विश्रांती
निर्वासना मन निजलाभे संपूर्ण।
नेणे स्वरुपज्ञान विकल्पाचे ।।
अनुरागे गोविंद ध्यायिजे एकांती।
यापरती विश्रांती आणिक नाही ।।
विश्रांतीची व्याख्या नामदेवरायांनी सांगितली आहे. त्यांच्या मते मनातून सर्व वासना काढून टाकून एकांतात प्रेमाने गोविंदाचं ध्यान करणं यातच खरी विश्रांती आहे.
अशा रीतीने नामदेवरायांनी ज्ञानोबारायांना अध्यात्मातल्या महत्त्वाच्या नऊ संकल्पना स्पष्ट करुन सांगितल्या. ज्ञानदेवांच्या निमित्ताने हा बोध संपूर्ण भाविकांसाठी महत्त्वाचा ठरला.

Previous Post

एमआयएमच्या `शतकी’ यशाची कहाणी

Next Post

द ग्रेट महाराष्ट्र सर्कस!

Next Post
द ग्रेट महाराष्ट्र सर्कस!

द ग्रेट महाराष्ट्र सर्कस!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.