
‘बागेश्वर धाम’चे प्रमुख धीरेंद्र कृष्ण गर्ग उपाख्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे २९ वर्षांचे तरुण रामचरितमानस आणि शिव पुराणाच्या कथा सांगण्यासाठी प्रसिद्ध आहेत. धीरेंद्र कृष्ण यांनी कथा सांगाव्यात. प्रवचन करावे. प्रबोधन करावे. तो त्यांना अधिकार आहे. त्याचे आपण सगळेच स्वागत करतो. मध्य-उत्तर भारतात त्यांच्या कथांना भाविकांची तुंबड गर्दी असते. परंतु या कथांच्या मागे ‘दिव्य’ दरबाराच्या नावाने सामान्य लोकांना अंधश्रद्धेत ढकलण्याचा जो फड मांडला जातो, ते समाजाच्या अनारोग्याचे लक्षण आहे. कायदा अशा बुवाबाजीला मान्यता देत नाही. शिवाय प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या प्रखर समाज सुधारकांच्या भूमीत या भोंदूबाबाचा उन्माद महाराष्ट्राला शोभणारा नाही.
तीन वर्षांपूर्वी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर भाजपच्या नेत्यांनी धीरेंद्र कृष्ण याची रामकथा आयोजित केली होती. रामकथेनंतर चमत्काराचा ‘दिव्य दरबार’ भरला. प्रा. श्याम मानवांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र कृष्णला चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. देशभरातील मीडियाचे कॅमेरे ‘चमत्कार आणि आव्हान’ या प्रकरणाकडे लागले होते. शेवटी, धीरेंद्र कृष्णला आव्हान न स्वीकारता धूम ठोकत पळ काढावा लागला. त्यानंतर धीरेंद्र कृष्ण ‘भागेश्वर’ म्हणून चर्चेत आले. आता पुन्हा त्यालाच नागपूरच्या याच मैदानावर २६ एप्रिलपासून कथेच्या निमित्ताने आणले जात आहेत. स्वतः धीरेंद्र कृष्ण एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देताना आव्हान देणार्यांचे नाव न घेता खिल्ली उडवण्याचे आणि जणूकाही ‘देख लेंगे’ अशा भूमिकेत दिसत आहे. इथे रामकथा, हनुमान कथा चालतील. परंतु इथे थोतांड चमत्कारांच्या दिव्य दरबाराला स्थान नाही. धीरेंद्र कृष्णने नागपुरात कथेच्या आड दिव्य शक्ती असल्याचे सांगत चमत्कार करण्याच्या भानगडीत पडू नये. अन्यथा कितीही राजकीय संरक्षण असले तरी हा पुरोगामी महाराष्ट्र धीरेंद्रला ‘भागेश्वर’ हे कायमस्वरूपी बिरुद चिकटवेल.

धीरेंद्र कृष्ण प्रचंड वादग्रस्त आहेत. आध्यात्मिक प्रवचन करणारी व्यक्ती लाखो लोकांच्या हृदयात सन्मानपूर्वक वसलेली असते. अशा गुरूने ते स्थान अढळ ठेवावे. परंतु धीरेंद्र कृष्णमध्ये वाह्यातपणा अधिक भरलेला दिसतो. वाईट बाब अशी आहे की राजकारणी मंडळी अशा व्यक्तींचे पाठीराखे असतात. असे बाबा भोंदू असतात, हे नेत्यांना माहिती असते. परंतु लाखो लोकांची श्रद्धा बाबावर असल्याने नेत्यांचा त्या गर्दीवर आणि तिथल्या मतांवर डोळा असतो आणि मोठ्या खुबीने अशा भोंदू बाबांचा वापर केला जातो.
धीरेंद्र कृष्णने अनेक वेळा विक्षिप्त विधाने केली आहेत. त्यांच्यामुळे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वाद निर्माण झाले आहेत. काही विधाने हिंदू राष्ट्रवाद, लोकसंख्या, धर्मांतर आणि इतर समुदायांविरोधात, विशेषतः मुस्लिमांविरोधात आहेत. हिंदूंना किमान ४ मुले जन्माला घालण्याचा सल्ला धीरेंद्रकडून दिला जातो. यातील दोन मुले देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यात आणि दोन धर्माच्या प्रचारासाठी समर्पित करावीत, असे हा बुवा सांगतो. ‘हम दो, हमारे दो’मुळे हिंदू अल्पसंख्याक होण्याची भीती हा तरुण व्यक्त करतो. जो वेदांवर विश्वास ठेवणार नाही त्यांची मुले ‘नावेद-जावेद’ होतील. सिंदूर न लावलेल्या आणि मंगळसूत्र न घातलेल्या हिंदू महिलांची तुलना तो ‘रिकाम्या प्लॉट’शी करतो. अशा महिलांशी कोणीही लग्न करू शकतो किंवा त्या ‘उपलब्ध’ आहेत, असे अपमानजनक वक्तव्य करतो. ‘हल्लेलुया’ शब्दाची थट्टा करून ख्रिश्चनांना अधर्मी म्हणतो. यामुळे पंजाबमध्ये तणाव निर्माण झाला होता.
महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना ‘मोक्ष’ मिळाल्याचे हा बुवा सांगतो. धीरेंद्र कृष्णने अल्पसंख्याकांविरोधात विधाने करून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी केली. कुंभ मेळ्यात गैर-हिंदूंचे काय काम, असा प्रश्न करून सनातन धर्म न समजणार्यांनी तिथे येऊन प्रार्थना बिघडवू नये, असे सांगत त्याने ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे थिल्लर गाणे उद्धृत केले..
महाराष्ट्राला तेराव्या शतकापासून वारकर्यांच्या भागवत धर्माची समृद्ध संत परंपरा आहे. इथे भोंदू बुवाबाबांच्या उद्दामपणाला स्थान नसावे. महाराष्ट्र वारकरी संप्रदायाभोवती केंद्रित आहे. अनेक थोर संतांनी मराठी भाषेला साहित्यिक, आध्यात्मिक आणि सामाजिकदृष्ट्या शिखरावर नेले. भक्ती, समता आणि मानवता यांचा पुरस्कार करणे, जातिभेद, उच्च-नीच, लिंगभेद यांचा विरोध करणे, बोजड संस्कृत भाषेऐवजी सोप्या मराठी भाषेतील रचना, सामाजिक सुधारणा, पर्यावरण जागृती, नैतिकता यांचा संदेश देणारी ही परंपरा. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, जनाबाई, समर्थ रामदास स्वामी, सावता माळी, गोरा कुंभार, नंतरच्या काळात संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अभंग, ओवी, भारुड, गाथा असे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक क्रांतीचे माध्यम बनलेले साहित्यप्रकार मराठीला बहाल केले. आजही पंढरपूरची वारी, विठ्ठल भक्ती, अभंग गायन, कीर्तन ही परंपरा जिवंत आहे.
याशिवाय महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणारे आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणारे अनेक समाजसुधारक होऊन गेले आहेत. हे सुधारक मुख्यतः १९व्या आणि २०व्या शतकातील आहेत. ज्यांनी जातिव्यवस्था, अंधश्रद्धा, अघोरी प्रथा आणि धार्मिक अतिरेक यांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या कार्याने महाराष्ट्रात विवेकवादी चळवळींना बळ मिळाले. महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांनी धर्म आणि जातिव्यवस्थेतील अंधश्रद्धांची चिकित्सा केली. संत गाडगे बाबांनी अगदी सोप्या भाषेत जनसामान्यांमध्ये विवेक आणि नैतिकतेचा प्रचार केला. अलीकडच्या काळात प्रा. श्याम मानव आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या माध्यमातून विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रचार आणि अंधश्रद्धा, जादूटोणा, भोंदू बाबा यांविरुद्ध मोठे कार्य केले. आज दोन्ही चळवळींचे हजारो कार्यकर्ते अत्यंत चिकाटीने देशभर विज्ञानवादी दृष्टिकोन मांडताना दिसतात. त्यांच्याच प्रयत्नाने महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला. हे सुधारक महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचे आधारस्तंभ आहेत.
या परंपरेत धीरेंद्र कृष्ण कुठेही बसत नाही. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचा मुख्य पुजारी ही याची ओळख. रामचरितमानस आणि शिव पुराणाच्या कथा सांगण्याची कला गवसली आणि या व्यक्तीला बागेश्वर धाम सरकार, बागेश्वर धाम महाराज, बागेश्वर धामचे पीठाधीश्वर किंवा पीठाधीश, पंडित धीरेंद्र शास्त्री किंवा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री, बाबा बागेश्वर किंवा बागेश्वर बाबा अशी बिरुदे चिकटली. अलीकडे बाबा म्हटले की लोकांचे लोंढे त्यांच्याकडे जातात. नंतर सामान्य भक्तांची फसगत होते. आसाराम बापू, राम रहीम यासारखे कितीतरी भोंदू बाबा राजकारण्यांनीच मोठे केले होते. हे बाबाही कथा सांगायचे, देवाचा अवतार आहे असे भासवायचे. पुढे महिलांच्या शोषणाची मालिकाच उजेडात आली आणि लाखो श्रद्धाळूंचा हिरमोड झाला.

महाराष्ट्रासाठी अतिशय संतापाची गोष्ट म्हणजे एका व्हिडिओमध्ये या धीरेंद्र कृष्णने संत तुकारामांमाबद्दल अतिशय अडाणीपणाचे आणि अवमानकारक विधान केले. ‘तुकारामांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची’ या विधानातून त्याच्या वैचारिक दारिद्र्याचे दर्शन होते. एरवी एवढ्या तेवढ्याने संतापणार्या महाराष्ट्राने जगद्गुरू तुकोबारायांचा अपमान निमूट सहन केला. हाच का तो प्रबोधनकार ठाकरेंचा महाराष्ट्र? हा प्रश्न निर्माण होतो. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव घेऊन त्यांनी अंधश्रद्धा, अस्पृश्यता, बालविवाह, हुंडाप्रथा, विधवांच्या केशवपनाची रूढी, ब्राह्मणेतर चळवळ आणि भिक्षुकशाही त्यात धार्मिक पाखंड आणि पुजार्यांची हुकूमशाही यांच्याविरुद्ध जोरदार लढा देणार्या प्रबोधनकारांनी तथाकथित जातश्रेष्ठत्वाचा बुरखा फाडला. अशा या प्रबोधनकारांच्या महाराष्ट्रात ‘मै ब्राह्मण हूँ, मुझे छुवो मत’ असा जातिभेद करणार्या धीरेंद्र कृष्णला डोक्यावर घेणारे नेते कोण आहेत?
अशी बुवाबाजी!
धीरेंद्र कृष्णने आजोबा भगवान दास गर्ग उपाख्य सन्यासी बाबा यांच्याकडून धार्मिक प्रेरणा घेतली आणि बागेश्वर धामचे नेतृत्व हाती घेतले. धीरेंद्रची हनुमान भक्त म्हणून ओळख आहे आणि बागेश्वर बालाजीच्या कृपेने त्याला अलौकिक शक्ती मिळाल्या असल्याचा दावा केला जातो. ‘दिव्य दरबार’च्या माध्यमातून ‘शक्ती’ किंवा चमत्कार प्रदर्शित केले जातात. त्यात, मन वाचणे किंवा भक्तांच्या समस्या, रहस्य जाणणे, कोणीही सांगितल्याशिवाय लोकांचे नाव, फोन नंबर, वैयक्तिक माहिती, आजार, कौटुंबिक समस्या किंवा भूतकाळातील घटनांचा अचूक तपशील सांगणे, बालाजीने मला ही माहिती पोहचवली, असे सांगणे, हे प्रकार हा बुवा करतो. ‘भूत-प्रेताने त्रस्त’ लोकांना बोलावून त्यांच्याशी ‘संवाद’ साधणे, ‘प्रेता’ला नियंत्रित करणे, प्रश्न विचारणे आणि हनुमानाच्या नावाने ते पळवणे किंवा शांत करणे. याला ‘प्रेत राज सरकार’ किंवा प्रेत बाधा निवारण म्हणून दाखवले जाते. वैद्यकीय तपासणीशिवाय कर्करोग, यकृत असे गंभीर आजार ओळखणे, त्यावर मंत्र जप, दान, विशेष औषध, काढा, धाममध्ये अर्ज लावणे आदी प्रकार केले जातात. असे दावे भोळ्या लोकांना डॉक्टरांपासून दूर ठेवतात आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. तो भक्तांना कागदावर समस्या लिहिण्यास सांगून वाचल्याविना सांगतो. हे ‘कोल्ड रीडिंग’ आणि ‘हॉट रीडिंग’ तंत्रज्ञान आहे. ज्यात व्यक्तीच्या बॉडी लँग्वेज, सामान्य समस्या आणि पूर्वमाहितीचा वापर केला जातो. अमेरिकन जादूगार जेम्स रँडी यांनी अशा फसवणुकी उघड केल्या आहेत.
दिव्य दरबार सामान्यतः मंगळवार आणि शनिवारला बागेश्वर धाममध्ये किंवा विविध शहरांमध्ये आयोजित करून तो लाईव्ह दाखवला जातो. दिव्य दरबारातील तथाकथित चमत्कारामुळे धीरेंद्रवर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप सातत्याने होत असतो. धार्मिक द्वेष पसरवत अल्पसंख्यांकांविरोधात विधाने केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तरीही अशा व्यक्तीच्या पाठीशी मुख्यतः भाजप नेते असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला ‘धाकटा भाऊ’ म्हणून संबोधतात. मोदींनी २०२५ मध्ये बागेश्वर धामला भेट दिली. गिरिराज सिंह, शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ आदींनी धीरेंद्रचे समर्थन केले. काँग्रेसचे कमलनाथसुद्धा त्याचे भक्त आहेत. धीरेंद्रच्या हिंदू राष्ट्र आणि धर्मांतरविरोधी भूमिकेमुळे भाजपला फायदा होतो.

नागपुरात राडा!
५ ते १३ जानेवारी २०२३ या काळात नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर धीरेंद्र कृष्णची रामकथा आयोजित करण्यात आली होती. कथेनंतर दिव्य दरबाराचा फड मांडण्यात आला. त्यात अनेक अंधश्रद्धा पसरवणार्या बाबी होत असल्याने महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी नागपूरचे प्रमुख दक्षता अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्याकडे हा गुन्हा असल्याची तक्रार केली. त्यानंतर नागपुरात ‘बुवाबाजी विरुद्ध बुवाबाजीचा कर्दनकाळ’ असा सामना रंगला. कायद्यानुसार धीरेंद्रवर गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते. परंतु आयोजकच सरकारमध्ये बसले असल्याने तसे झाले नाही. सरतेशेवटी धीरेंद्रला दोन दिवस आधीच ‘भागेश्वर’ व्हावे लागले. दि. ८ जानेवारी २०२३ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांना प्रा. श्याम मानव यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की श्री धीरेंद्र कृष्ण महाराज हे नागपूरमध्ये आले आहेत. श्री रामकथा प्रवचन करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांचे सारेच स्वागत आदर करतील. आपणही करतो, करू. पण या निमित्ताने आलेले धीरेंद्र कृष्ण महाराज हे दिव्य दरबार (व प्रेत दरबारही) भरवताहेत. त्यात केलेल्या दिव्य शक्तीच्या दाव्याने, प्रयोगाने प्रभावित होऊन मोठ्या संख्येने धीरेंद्र महाराजांच्या भजनी लागताहेत. याद्वारे सामान्य जनतेची फसवणूक होत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कठोर कार्यवाही करणे हे आपले, शासनाचे कर्तव्य आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यांच्याच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने धीरेंद्रला रेशीमबाग मैदानावर आणले गेल्याने कोणतीही कारवाई झाली नाही. उलटपक्षी सहाय्यक आयुक्तांनी धीरेंद्रकडून कायद्याचे कोणतेही उल्लंघन झाले नसल्याची भूमिका घेत महाराष्ट्राने अथक परिश्रमाने केलेल्या कायद्यालाच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या.
८० लाख जिकंण्याचे आव्हान!
धीरेंद्रने नागपुरातून पळ काढल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘दिव्य शक्ती’साठी ३० लाखांचे पारितोषिक जिंकण्याचे आव्हान दिले होते. समितीने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी जारी केलेल्या पत्रात, ‘जालसाजीमुक्त अवस्थे’मध्ये (फ्रॉडप्रूफ कंडिशन) कोणत्याही व्यक्तीने दिव्यशक्तीचे प्रदर्शन आव्हान प्रक्रियेच्या अटींनुसार प्रमाणित केल्यास त्याला ३० लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. ‘आम्ही ईश्वर आणि धर्माचे विरोधी नाही, तर त्यांच्या नावावर होणार्या ठगबाजीच्या विरोधात आहोत’ ही समितीची भूमिका आहे. आम्ही १० व्यक्ती वेळेवर सादर करू. त्यांचे नाव, वडिलांचे नाव, वय (आधार कार्डनुसार), मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक एका कागदावर लिहून तो आधीच सीलबंद लिफाफ्यात ठेवला जाईल. हा सीलबंद लिफाफा निर्णायक पंचांच्या गठित समितीकडे सुरक्षित ठेवला जाईल. आम्ही शेजारच्या खोलीत १० वस्तू ठेवू. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू राहील. धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या तथाकथित सूक्ष्म किंवा दिव्यशक्तीने ओळख करून सांगावे आणि कागदावर लिहावे. ही प्रक्रिया दोन वेळा आयोजित केली जाईल. दोन्ही आव्हाने ९० टक्के बरोबर सांगितल्यास महाराजांच्या दाव्यात सत्यता असल्याचे मानले जाईल आणि त्यांनी आव्हान जिंकले असे मानले जाईल. आव्हान न स्वीकारल्यास चमत्काराच्या दावेदार व्यक्तीकडे कोणतीही अलौकिक शक्ती नाही आणि जनतेची फसवणूक होत आहे असे मानले जाईल. हे आव्हान धीरेंद्र कृष्ण अद्याप स्वीकारू शकला नाही. परंतु पुन्हा त्याने व्हिडीओ जारी करीत २६ एप्रिलपासून रेशीमबाग मैदानावर येत असल्याचे सांगितले आहे. धीरेंद्रच्या दैवी शक्तीला यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ८० लाख रुपये जिंकण्याचे आव्हान दिले जाणार आहे. विविध पुरोगामी सामाजिक संस्था, चळवळी या भोंदूगिरीच्या विरोधात एकत्र येत आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या खाईत ढकलला जाऊ नये म्हणून सामाजिक क्षेत्रातील लोकांनी एकसंध होणे ही गरजेची बाब आहे.

