• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांच्या संतापाचे आणि मायेचे धनी!

योगेश वसंत त्रिवेदी (आठवणी साहेबांच्या)

marmik by marmik
January 23, 2026
in आदरांजली, मानवंदना, विशेष लेख
0
बाळासाहेबांच्या संतापाचे आणि मायेचे धनी!

मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास।
कठिण वज्रास भेदूं ऐसे ।।१।।
मेले जित असों निजोनियां जागे ।
जो जो जो जें मागे तें तें देऊं ।।ध्रु.।।
भले तरि देऊं कासेची लंगोटी।
नाठाळाचे माथी हाणू काठी ।।२।।
मायबापाहूनि बहू मायावंत।
करूं घातपात शत्रूहूनि ।।३।।
अमृत तें काय गोड आह्मांपुढें ।
विष तें बापुडें कडू किती ।।४।।
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड।
ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ।।५।।

संत तुकोबारायांनी हा अभंग जणू काही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातच रचिला आहे की काय असे मनोमन वाटते. कारण या अभंगात जे वर्णन तुकोबारायांनी केले आहे ते परम आदरणीय शिवसेनाप्रमुखांचेच स्वभाव वर्णन आहे. त्यांच्या सर्वस्पर्शी स्वभावाचा अनुभव घेण्याचे, त्यांच्या संतापाचे आणि मायेचे धनी होण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.

१९८७च्या विलेपार्ले विधानसभा

पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुखांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर भारतीय जनता पक्षाचे चाणक्य, ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाची युती करण्यासाठी पुढाकार घेतला. याच दरम्यान बाळासाहेबांनी प्रबोधन प्रकाशन स्थापन केले. त्याच्या माध्यमातून एक दैनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. १३ ऑगस्ट १९६० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार या नात्याने मार्मिक हे पहिले मराठी व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले होतेच. त्यानंतर १९ जून १९६६ रोजी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (दादा) यांच्या प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर होणार्‍या टीकेला उत्तर देण्यासाठी मार्मिक हे साप्ताहिक असल्याने विलंब होत होता. म्हणूनच आपले हक्काचे दैनिक सुरू करावे या हेतूने २३ जानेवारी १९८९ रोजी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक सामना सुरू केले.

१९८८पासूनच याची जुळवाजुळव सुरू झाली होती. त्यावेळी लोकसत्तेत प्रबोधन प्रकाशनाच्या एका दैनिकासाठी उपसंपादक, वार्ताहर पाहिजेत अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या सूचनेनुसार मी दैनिक सामनासाठी अर्ज केला. प्रबोधन प्रकाशनातर्पेâ लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा मी दिली आणि ती उत्तीर्ण होताच मुद्रक, प्रकाशक सुभाष देसाई यांनी मला पत्र पाठवून बाळासाहेबांनी शिवसेना भवन येथे १५ डिसेंबर १९८८ रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले असल्याचे कळविले. तेथून आम्हाला मातोश्री येथे येण्याचा निरोप येताच आम्ही टॅक्सीने मातोश्रीवर दाखल झालो. अशोक पडबिद्री हे कार्यकारी संपादक होते. संजय डहाळे, किरण हेगडे, रवींद्र खोत, प्रकाश सावंत, रवींद्र राऊळ, राजेश दर्यापूरकर, सुचिता मराठे (आता करमरकर), शिल्पा राजे (आता
सरपोतदार), शुभांगी वाघमारे (आता पुणतांबेकर), सुधा मधुसूदन जोशी, संजय घारपुरे आदी पहिल्या फळीतल्या पत्रकारांनी मुलाखत दिली. अशोक पडबिद्री यांनी बाळासाहेबांना सांगितले, साहेब, काय योगायोग आहे पाहा. आज निवडलेले सगळे शिवसैनिकच आहेत. सारे उभे राहिले. पण मी बसलेलो होतो. साहेबांचे लक्ष माझ्याकडे गेले. ११ जून १९६६ रोजी माझे वडील वसंतराव त्रिवेदी यांनी सुरू केलेल्या आहुतीमधून मी पत्रकारिता सुरू केली असल्याने आणि नवशक्ति, मुंबई सकाळ आदी वर्तमानपत्रात पत्रकारिता केल्याचा अनुभव गाठीशी असल्याने या मुलाखतीसाठी ‘पत्रकार’ म्हणून उपस्थित होतो. साहेबांनी विचारले, ‘तुम्ही शिवसैनिक नाहीत?’ मी उत्तर दिले, ‘नाही, पण पत्रकार या नात्याने शिवसेनेशी संबंधित आहे.’ असे उत्तर दिले. साहेबांनी मला प्रश्न केला की, काँग्रेसचे विरोधक ना? वडील समाजवादी असल्याने तसेच आणीबाणीच्या काळात भूमिगत चळवळीत भाग घेतल्याने मी साहेबांना ‘१०० टक्के’ असे उत्तर दिले. मला अशाच पत्रकाराची आवश्यकता आहे, असे म्हणत साहेबांनी माझ्या पाठीवर थोपटले. हीच सुरुवात होती. यानंतर १९ ऑक्टोबर २०१३पर्यंतच्या पंचवीस वर्षांच्या सामनाच्या सेवेत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात जाण्याची संधी मिळाली.

प्रारंभी मी आणि संजय डहाळे असे दोघे बाळासाहेबांच्या सभांचे वृत्तांकन करीत असू. बाळासाहेबांचे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ इथपासून ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’पर्यंत शब्दशः भाषण देण्याचे भाग्य मला लाभले. सामनासाठी वृत्तांकन करीत असल्याने अन्य वर्तमानपत्रांतून दूरध्वनीवरून बातमी घेण्यासाठी पत्रकार दूरध्वनी करीत असत. त्यावेळी भ्रमणध्वनी नसल्याने एकाचवेळी दोन दोन पत्रकारांशी दूरध्वनीवरून बोलून पत्रकारांना बातम्या देत असे. सामनासाठी सविस्तर बातमी द्यावी लागत असल्याने शब्दशः बातमी देण्याची सवय लागली. अन्य वृत्तपत्रे त्यांना हवी तेवढी बातमी घेत असत.

१९९० साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. शिवसेना भाजपची युती होती. विधानसभेच्या २८८ जागांपैकी शिवसेना १७१ आणि भारतीय जनता पक्ष ११७ जागा लढवीत होते. गिरगाव चौपाटीवर बाळासाहेबांची सभा होती. माr या सभेचे वृत्तांकन केले. महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही, आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, असे बाळासाहेबांनी या अतिविराट सभेत ठणकावून सांगितले.मुंबईच्या ३४ मतदारसंघांपैकी ३० आमदार हे शिवसेना भाजप युतीचे होते. या निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. ज्येष्ठ विधिज्ञ मनुभाई वशी आणि मुकेश वशी हे काँग्रेस उमेदवारांतर्पेâ न्या. सॅम वरियावा यांच्या न्यायालयात बाजू मांडत होते. मी सामनाचा वार्ताहर असल्याने मला मनुभाई वशी यांनी साक्षीदार म्हणून पाचारण केले. बहुतेक खटल्यांत मी साक्षीदार होतो. रमाकांत मयेकर, सूर्यकांत महाडिक, अभिरामसिंह आदींचे खटले चालले आणि आमदारकी रद्द झाली.अभिरामससिंहांच्या खटल्यात माझ्या तोंडून हिंदुत्वाची व्याख्या काढण्याचा प्रयत्न झाला, पण तो पूर्ण झाला नाही. मनोहर जोशी यांच्या खटल्यात मनुभाई आणि जोशी सरांचे वकील जय चिनॉय यांच्यात जोरदार युक्तिवाद झाले. चिनॉय हे बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हिंदुत्वाची व्याख्या माझ्या तोंडून न्यायमूर्तींसमोर आणण्यात यशस्वी झाले. परंतु आधीच्या आमदारांची आमदारकी रद्द करण्यात आल्याने सरांचेही विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय न्या.सॅम वरियावा यांनी दिला. मनोहर जोशी सर्वोच्च न्यायालयात गेले. दरम्यान दादरचे पराभूत उमेदवार भाऊराव पाटील यांचे निधन झाले असल्याने त्यांचे चिरंजीव नितीन भाऊराव पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात सरांविरुद्ध खटला लढविला, पण मुंबई उच्च न्यायालयातील बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येची माझ्या साक्षीची नोंद सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली आणि न्या. जे. एस. वर्मा यांनी ११ डिसेंबर १९९५ रोजी मनोहर जोशी यांची निर्दोष मुक्तता केली. यादरम्यान १९९५च्या निवडणुका होऊन १४ मार्च १९९५ रोजी शिवसेना भाजप युती सत्तेवर येत शिवशाही सरकारचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते.

सरांची आमदारकी रद्द करण्यात आली तेव्हा दादरच्या शिवाजी मंदिरातील मार्मिकच्या एका वर्धापन दिन समारंभात बाळासाहेबांनी भाषणात,’आमच्या त्रिवेदीने हायकोर्टात अप्रतिम साक्ष दिली पण निकाल एकतर्फी लागला,’ असा उल्लेख केला तेव्हा अनेकांनी माझे अभिनंदन करीत, अरे व्वा, दस्तुरखुद्द साहेबांनी तुझे नाव घेतले, तुला आणखीन काय पाहिजे, अशा प्रतिक्रिया दिल्या. सामनाच्या पुणे आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हा सुद्धा साहेबांनी हिंदुत्वाच्या साक्षीचा माझ्या नावासह उल्लेख केल्याचे सहकार्‍यांनी पुण्याहून कळविले. एकदा मातोश्री येथे सामनाच्या कामासाठी गेलो होतो. तेव्हा साहेब, सुधीरभाऊ जोशी आणि मी मातोश्रीवरील तळमजल्यावर असलेल्या साहेबांच्या खोलीत बोलत असताना सुधीरभाऊंनी आवर्जून मुंबई उच्च न्यायालयातील माझ्या साक्षीचा संदर्भ दिला. साहेब, हे योगेश त्रिवेदी, मनोहर जोशी यांच्या खटल्यातील साक्षीदार, असे सुधीरभाऊंनी सांगताच साहेबांनी माझी पाठ थोपटत केवळ आशीर्वाद दिले नाहीत तर समोरच्या टी पॉयमध्ये ठेवलेली रेनॉल्डची आपल्या हातात येतील तेवढी बॉलपेनं माझ्या हातात दिली. मी ही बॉलपेनं माझ्या भाळी लावली. ही बॉलपेनं साहेबांनी दिली असल्याचे कळताच मित्रांनी ती पटापट घेऊन टाकली. ५ डिसेंबर १९९१ रोजी छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा महापौर निवासस्थानी साहेबांनी शिवसेना नेते अ‍ॅड. लीलाधर डाके यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांच्या हकालपट्टीचे निवेदन मला ‘डिक्टेट’ केले. ‘हां, घ्या लिहून. बोला, वाचा, लिहिलेले पूर्ण वाचून दाखवा. बरोबर आहे, आता हे सामन्यातून सगळीकडे द्या पाठवून,’ असा आदेश दिला. एकदा अशाच एका सभेचे वृत्तांकन केले आणि साहेबांच्या भाषणाच्या मुद्द्यांची वही वरिष्ठांना दाखवली. सूचनेनुसार बातमी तयार केली आणि ती सामनात प्रसिद्ध होताच त्या बातमीतील काही मजकूर आक्षेपार्ह वाटल्याने त्यांनी त्याच शिवाजी मंदिरात नाव न घेता परखड शब्दांत संताप व्यक्त केला. सामनाचा कुणी आला होता आणि नको ते छापले. इथे कुणी सामनाचा आला असेल तर त्याने इथून निघून जावे. त्यानंतर शिवसेनेच्या बैठकांमध्ये सामनाचा प्रतिनिधी हजर राहण्याचे बंद झाले.

महाराष्ट्रभर केलेल्या दौर्‍यात साहेब सामनाच्या प्रतिनिधींची आवर्जून चौकशी, विचारपूस करीत असत आणि योग्य त्या
सूचना देत असत. मी, संजय जोग आणि अन्य मोजके पत्रकार साहेबांच्या मोटारीच्या ताफ्यात त्यांच्या मोटारीपाठोपाठ मागच्या मोटारीतून प्रवास करीत असू. संपूर्ण मराठवाड्यात फिरलो, सभांना हजेरी लावून बातम्या रवाना करीत असू. फॅक्सने, दूरध्वनीवरून बातम्या
पाठवीत असू. यासाठी त्या त्या ठिकाणच्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देण्यात येत असत. वास्तुशिल्पकार माधवराव जोग यांचे साहेबांशी घनिष्ठ संबंध. आम्ही दौर्‍यात माधवरावांना काही गोष्टी सांगत असू, साहेब आणि माधवराव गप्पा मारीत असत आणि मग आम्हाला आमचे मुद्दे साहेबांच्या भाषणात पुढच्या सभेत ऐकायला मिळत असत. २० जानेवारी २०१० रोजी जयंत करंजवकर यांनी लिहिलेल्या आणि शाहीर विठ्ठल उमप यांच्य्ाा खड्या आवाजातील साहेबांवरील पोवाड्याच्या सीडीचे प्रकाशन साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी आपण हिंदुत्व का स्वीकारले याची सविस्तर माहिती साहेबांनी मला सांगितली. महाराष्ट्रात मराठी परंतु हिंदुस्थानात सर्वत्र शिवसेनेचे पाय पसरवायचे असतील तर हिंदुत्व हेच आवश्यक आहे, असे साहेबांनी स्पष्ट केले. आहुतिच्या प्राचीन शिवमंदिरावरील पोथी पद्धतीने छापलेल्या अंकाचे प्रकाशन साहेबांच्या शुभहस्ते, धर्मवीर आनंद दिघे यांच्या उपस्थितीत झाले तेव्हा अर्धा तास साहेब अंकाची वाट पहात होते. अरे त्रिवेदी, कुठाय आहुतिचा अंक, अशी विचारणा केली. साहेबांच्या सूचनेवरून पोथीच्या पद्धतीचा
दुसरा आहुतिचा विशेषांक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.

आशीर्वाद देईन, विदर्भ नाही देणार!

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर मातोश्री येथे साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आले. सुधीर भाऊ, मुकुंद कुलकर्णी आणि आणखीन तीन चार जण होते. बर्‍याच गप्पा झाल्या. साहेबांच्या या भेटीत मुनगंटीवार आणि मंडळींना साहेबांच्या हजरजबाबी व्यक्तिमत्वाच आणि स्मरणशक्तीचा प्रत्यय आला. हे पुस्तक काढ, तो परिच्छेद वाच, ते वाक्य वाच, असे सर्व झाल्यावर मुनगंटीवार साहेबांसमोर वाकून नमस्कार करू लागले. तेव्हा स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या मुनगंटीवार यांना साहेब ताडकन म्हणाले, आशीर्वाद देईन, पण विदर्भ नाही देणार. मुनगंटीवार नि:शब्द झाले. काय बोलणार बापडे.

अरे, माझ्या बापाची सही ठेवली नाही, माझी काय ठेवणार?
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे दादा म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुखांबरोबर निकटचे संबंध. बोरीवली येथे प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिराचे उद्घाटन बाळासाहेबांच्या शुभहस्ते होणार होते. विनोद घोसाळकर, संजय डहाळे, विजय वैद्य आणि मी अशा आमच्या चौघांच्या चर्चेतून प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर विजय वैद्य यांनी पुस्तक लिहावे असे ठरले. ‘आठवतीतले
प्रबोधनकार’ या पुस्तकाचे प्रकाशन साहेबांनी या नाट्यमंदिरात उद्घाटनसमयी केले. त्यानंतर अचानक घोसाळकर यांना साहेबांनी फोन केला आणि उद्या सकाळी विजय वैद्य यांना घेऊन बंगल्यावर या आणि येताना जितकी पुस्तके असतील तेवढी घेऊन या, असे सांगितले. घोसाळकर आणि वैद्य गॅसवर. पंचवीस पुस्तके घेऊन घोसाळकर आणि वैद्य मातोश्रीवर पोहोचले. साहेबांनी खास आवाजात विचारले, किती पुस्तके आणलीत? वैद्य दबक्या आवाजात म्हणाले, साहेब चोवीस अधिक एक. हे काय? अधिक एकची काय भानगड? साहेब, चोवीस आपल्यासाठी आणि एक आपली स्वाक्षरी घेऊन माझ्यासाठी. पटकन साहेब म्हणाले, अरे, माझ्या बापाची सही ठेवली नाहीस, तर माझी कुठून ठेवणार? वैद्यांना प्रबोधनकार ठाकरे यांच्या सहीचे पान हरवल्याचे लक्षात आले. नंतर साहेबांनी पुस्तक अतिशय चांगले असल्याचे सांगून आणखी तीन हजार प्रती छापून घ्या, असे सांगितले, तेव्हा घोसाळकर आणि वैद्य यांचा जीव भांड्यात पडला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विजय वैद्य यांचे नाव साहेबांनी नक्की केले पण ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळेवर सापडले नाहीत. वैद्य यांच्या विविध कार्यामुळे साहेबांना वैद्य यांनी नगरसेवक व्हावे अशी खूप इच्छा होती.

‘मी मंत्रालय’ आणि ‘मंत्रालय’
मंत्रालयाच्या इमारतीला २१ जून २००८ रोजी आग लागली. या घटनेवर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी ‘मी मंत्रालय’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन साहेबांच्या शुभहस्ते ८ जुलै २००८ रोजी झाले. त्यावेळी साहेब रावतेंना गंमतीत म्हणाले,’ काय रे, दिवाकर तुला काय आधी कळलं होतं की मंत्रालयाला आग लागणार आहे. एवढ्यात पुस्तक पण तयार? माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय येथील अधिकारी राजू पाटोदकर संपादित ‘मंत्रालय’ हे पुस्तक मी साहेबांना आवर्जून दिले, तेव्हा साहेबांनी उद्धव साहेबांना बोलावून सांगितले, ‘अरे दादू, हे बघ त्रिवेदीने आणलेल्या मंत्रालय पुस्तकात सचिवालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी काय काय आणि किती सामग्री वापरलीय ते दिलंय.
असंख्य आठवणी आहेत साहेबांच्या. साहेबांच्या संतापाचे आणि मायेचे धनी होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. साहेबांच्या कार्याला मानाचा मुजरा, साहेबांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

Previous Post

हिमालयाची सावली

Next Post

एक सॅल्यूट बाळासाहेबांना!

Next Post
एक सॅल्यूट बाळासाहेबांना!

एक सॅल्यूट बाळासाहेबांना!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.