
२५मार्च १९७१.याह्या खान सकाळपासून ईस्टर्न कमांडच्या ऑफिसमधे लष्करी अधिकार्यांच्या बैठकीत होते. आठ तास बैठक चालली. बैठकीतून याह्या खान ढाक्का विमानतळावर पोचले.
विमानतळावर कलकलाट होता. दोनेक हजार माणसं फ्लाईट केव्हां मिळेल याची वाट पाहात होते. व्यापारी, उद्योगपती, नोकरशहांचे नातेवाईक इत्यादी लोक. त्यांना देश सोडून जायचं होतं. गेले वीसेक दिवस देशभर आंदोलक आणि पोलिस, आंदोलक आणि सैनिक यांच्यात हाणामारी चालली होती. आंदोलक गोळा होत, सरकारी कचेर्यांवर हल्ला करत. पोलिस गोळीबार करत, अटका करत. पूर्व बंगालमधे अराजक माजलं होतं. इथून पुढं इथे थांबणं धोकादायक आहे असं ठरवून लोक निघाले होते.
याह्या कारमधून उतरले. उपस्थित अधिकार्यांनी त्यांना कडक सलाम मारले. नेहमी हस्तांदोलन करताना चार दोन वाक्यं बोलली जातात. याह्या काही न बोलता सलाम घेत घेत शिडी चढून विमानात पोचले. लष्करी विमान होतं. सहा हजार मैलांचा प्रवास ते करणार होतं. भारतावरून उड्डाण होणार नव्हतं. लंकेला वळसा घालून विमान कराचीला जाणार होतं.
याह्या सीटवर बसायचाच अवकाश, एयर होस्टेस सरसावल्या. पट्टा बांधा वगैरे सोपस्कार व्हायच्या आधीच याह्यांच्या समोर ट्रे आले. सोडा आणि स्कॉच. याह्यांना ड्रिंकची आवश्यकता होती, खूप तणाव होता. कराची विमानतळावर विमानाची चाकं टेकली. याह्या शिडीवरून उतरून कारमधे बसले. ईस्टर्न कमांडच्या प्रमुखाला संदेश गेला. सॉर्ट देम आऊट. त्यांची वाट लावा.
***
त्यांची वाट लावा.
संदेश सकाळी ११.३० वाजता टिक्का खानांच्या टेबलावर पोचला.
याह्या खानांबरोबर झालेल्या दीर्घ बैठकीत प्लान तर ठरलेलाच होता. टिक्का खानांनी सर्व तयारी केली होतीच. टिक्का खानांचे आदेश ईस्टर्न कमांडच्या ऑफिसमधून सुटले. टँक, बख्तरबंद गाड्या बाहेर पडल्या.
ढाक्यातलं ईस्ट पाकिस्तान रायफल्सचं केंद्र. रायफल्सनं बंड केलं होतं. टिक्का खानांनी अनेक वेळा रायलफल्सना नागरिकांवर गोळीबार करायचा हुकूम दिला होता. त्यांनी तो पाळला नव्हता, त्याबद्दल काही अधिकार्यांचं कोर्ट मार्शल झालं होतं. तळावर पाच हजार सैनिक होते. मध्यरात्री टँक तळापाशी पोचले. रणगाड्यांनी गोळ्यांचा पाऊस पाडला. बझूकामधून रॉकेट्स फेकली गेली. तळ उद्ध्वस्त केला. मग पाकिस्तानी सैनिक गोळीबार करत आत शिरले, दिसेल त्याला मारलं. पाच हजारांतला एकही माणूस शिल्लक राहिला नाही.
अवामी लीगचं मुखपत्र अवाम. दूरवर कार्यालय, मधे एक गल्ली, त्या गल्लीतून कार्यालयाकडं जावं लागतं. रणगाडे गल्लीत घुसले आणि दुरूनच त्यांनी कार्यलयावर तोफा डागल्या. मग जीपमधून मशीनगन घेऊन सैनिक उतरले. बेछूट गोळीबार करत पुढं सरकले. समोर येईल त्यावर गोळ्यांची बरसात. कार्यालय उद्ध्वस्त, काम करणारे मेले, वाटेतली इतर माणसंही मेली. या कार्यालयाच्या समोरच एका विदेशी बातमी संस्थेचं ऑफिस होतं. तिथून परदेशी बातमीदार हे सारं पहात होते.
रणगाडे विद्यापीठाकडं सरकले. विद्यापीठाच्या परिसरात हॉस्टेलं होती. दुरूनच रणगाड्यांनी गोळे फेकले आणि हॉस्टेलं उद्ध्वस्त केली. वाचलेले विद्यार्थी बाहेर पडून पळू लागले. त्यांच्यावर मशीनगनचा मारा करून सर्वाना मारलं. तीन चार हजार तरी विद्यार्थी होते. पटापटा प्रेतं गोळा केली आणि शहराबाहेर टाकून दिली.
शंकरीपट्टी या विभागात हिंदू बहुसंख्य राहातात. चार पाच रस्ते, गल्ल्या आहेत. वस्तीची लोकसंख्या होती आठ हजार. सैनिकांनी या वस्तीत जाण्याचे, बाहेर पडण्याचे सर्व रस्ते रगणाडे उभे करून
ब्लॉक केले. नंतर सैनिक आत घुसले, इमारती उडवल्या. हात वर करून शरण जाणार्या नागरिकांनाही गोळ्या घातल्या. तासाभरात सर्व माणसं मारून लष्कर मोकळं झालं.
***
बांगला युद्धाचा घटनाक्रम.
- ७ डिसेंबर १९७०. पाकिस्तान निवडणूक. ३१३ जागामधे १६७ जागा अवामी लीग, मुजीबुर्रहमान.
- १ मार्च १९७१. याह्याखान निर्णय, ३ मार्च रोजी होणारं लोकसभेचं अधिवेशन पुढं ढकललं.
- ७ मार्च १९७१. मुजीबुर्रहमान स्वतंत्र बांगलादेशचा निर्णय जाहीर.
- ९ मार्च १९७१. चटगाव बंदरात पाकिस्तान लष्करी जहाजांवर बहिष्कार.
- १९ मार्च १९७१. जाधवपूर विद्यापीठात पाकिस्तानी सैनिक आणि विद्यार्थी यांच्याच चकमक.
- २४ मार्च १९७१. सैयदपूर आणि रंगपूर या गावात सैनिकांनी जनतेवर गोळीबार केला. १५० माणसं मरण पावली.
- २५-२६ मार्च १९७१. टिक्का खान यांनी ढाक्का आणि एकूणच पूर्व पाकिस्तानात ऑपरेशन सर्चलाईट सुरू केलं. नागरिकांची कत्तल. काही लाख माणसं मारली.
- २६ मार्च १९७१. मुजीबुर्रहमानना अटक. त्यांनी स्वतंत्र बांगलादेश जाहीर केला, पाक सैन्याविरोधात लढण्याचं आवाहन केलं.
- ६ एप्रिल १९७१. ब्लड टेलेग्राम. अमेरिकन मुत्सद्दींनी (डिप्लोमॅट) अमेरिकन सरकारला टेलेग्राम पाठवून पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या भयानक अत्याचाराची माहिती दिली, अमेरिकन सरकार हे सारं सहन करत आहे याचा निषेध केला. अमेरिकेच्या मुत्सद्दी इतिहासातलं हे सर्वात तीव्र पत्र मानलं जातं, ब्लड टेलेग्राम या नावानं हे पत्र प्रसिद्ध आहे.
- २५ एप्रिल १९७१. ऑपरेशन जॅकपॉट सुरू. मुक्ती बाहिनी आणि भारतीय सेना यांनी संयुक्तपणे पाकिस्तानी सैन्यावर हल्ला सुरू केला. १५ ऑगस्टपर्यंत ही मोहीम चालली, त्यात पाकिस्तानी सैन्याची अपरिमित हानी झाली.
- २८ एप्रिल १९७१. भारतानं फिल्ड मार्शल मानेकशॉ यांना बांगला देशावर चाल करून जा अशी आज्ञा दिली.
- २८ सप्टेंबर १९७१. बांगलादेश हवाई दल सक्रीय झालं.
- ९ नव्हेंबर १९७१. बांगला देशाचं नौदल तयार होऊन कामाला लागलं.
- २१ नव्हेंबर १९७१. बांगला देश सैन्याची निर्मिती.
- ३ डिसेंबर १९७१. बांगलादेश हवाई दलानं पाकिस्तानी तेल साठे नष्ट केले.
- ३ डिसेंबर १९७१. पाकिस्ताननं काश्मीर, पंजाब आणि राजस्थानातल्या भारतीय सैन्याच्या ठाण्यावर हवाई हल्ला केला. भारतीय ठाण्यांचं किरकोळ नुकसान. भारतानं पाकिस्तानशी युद्ध जाहीर केलं.
- ६ डिसेंबर १९७१. जेस्सोर ठाणं आणि शहरावर बांगलादेशाचा कबजा, जेस्सोर शहर स्वतंत्र केलं. बांगलादेश-भारत यांच्या सैन्याच्या यशस्वी वाटचालीला सुरुवात, पाकिस्तानच्या पाडावाला सुरुवात.
- ६ डिसेंबर १९७१. बांगलादेशला मान्यता देणारं भूतान हे जगातलं पहिलं राष्ट्र.
- ७ डिसेंबर १९७१. युनायटेड नेशन्समधे अमेरिकेनं युद्ध ताबडतोब थांबवावं असा ठराव मांडला. रशियानं या ठरावावर नकाराधिकार वापरल्यानं हा ठराव मंजूर होऊ शकला नाही.
- ८ डिसेंबर १९७१. भारतीय सैन्याचा कराचीवर हल्ला.
- ९ डिसेंबर १९७१. भारतीय सैन्याचा बंगालमधून पाकिस्तानात प्रवेश.
- ११ डिसेंबर १९७१. अमेरिकेनं बंगालच्या उपसागरात एंटरप्राईज हे जहाज पाठवलं.
- १३ डिसेंबर १९७१. रशियानं अमेरिकेच्या एंटरप्राईजला उत्तर म्हणून रशियन नौकादलाची जहाजं बंगालच्या उपसागरात पाठवली.
१४ डिसेंबर १९७१. पराभव दिसू लागल्यावर पाकिस्तानी सैन्य आणि अल बदर या हिंसक दलानं ढाक्क्यात बुद्धिवंतांची कत्तल केली. - १६ डिसेंबर १९७१. ढाक्क्यात पाकिस्तानी ९५ हजार सैनिकांची भारताचे जनरल अरोरा यांच्यासमोर शरणागती.
- २२ डिसेंबर १९७१. बांगलादेशाचं पहिलं स्वतंत्र अस्थाई सरकार स्थापन.
***
पाकिस्तानच्या निवडणुकांवर भारत सरकारचं लक्ष होतं. मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीग पक्षाला बांगला देशात, एकूण पाकिस्तानात बहुमत मिळालं होतं. परंतु पश्चिम पाकिस्तानात एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळंच याह्या खान मुजीबना सरकार स्थापन करू देत नव्हते. प्रचारमोहिमेत मुजीब घणाघाती भाषण करून पूर्व पाकिस्तानला स्वायत्तता मागत होते हे बंगालमधल्या पेपरात येत होतं. मोहिमेतली मुजीबची भूमिका पाहाताना भविष्यात मामला चिघळणार आहे हे स्पष्ट होत होतं. परंतु भारत सरकारचं तिकडं लक्ष नव्हतं, भारतात निवडणुकांचा मोसम होता. याह्या खानांनी पूर्व पाकिस्तानात पंजाबी सैन्य, पंजाबी पोलिस, पंजाबी नोकरशहांची भरती सुरू केली होती, याकडं भारतीय परराष्ट्र खात्याचं दुर्लक्ष होतं. रॉ संघटना प्रधान मंत्री कार्यालयाला, परदेश मंत्रालयाला या खबरा देत होती. पण त्यातून निष्कर्ष काढायला भारत सरकार तयार नव्हतं.
पाकिस्तानातल्या अंतर्गत घालमेलीचं गांभीर्य भारत सरकारच्या लक्षात आलं नव्हतं. १९७१ च्या मार्चमधे पूर्व पाकिस्तान भरडून निघू लागला, तिथून निर्वासित भारतात येऊ लागले तेव्हां भारताला जाग आली. लाखो बांगला देशी भारतात येतात म्हटल्यावर तो भारताचा अंतर्गत प्रश्न झाला. तिथं भारत सरकार जागं झालं.

टिक्का खाननी पूर्व पाकिस्तानला चेचायला सुरुवात केल्यावर पाकिस्ताननं भारताविरोधात प्रचाराला सुरुवात केली. बंगाली लोकांना भारत चिथावतोय, भारताला पाकिस्तान मोडायचा आहे असा प्रचार पाकिस्ताननं सुरू केला. पाकिस्तानचा खोटेपणा बाहेर येत नव्हता, कारण पाकिस्तानात, बांगला देशात सेन्सॉरशिप होती, अत्याचाराच्या बातम्या छापायला परवानगी नव्हती. बंडखोरी करणारे पेपर बंद करण्यात आले होते. पूर्व पाकिस्तानात वीस पंचवीस परदेशी पत्रकार होते. त्यांना पकडून देशाबाहेर घालवण्यात आलं. बीबीसी या तत्कालीन आंतरराष्ट्रीय असलेल्या वाहिनी व रेडियोला बातम्याही मिळेनाशा झाल्या होत्या. खरं म्हणजे भारतात अड्डा जमवून परदेशी पत्रकार बातम्या देऊ शकले असते, पण ते जमलं नाही. भारतानं खरं म्हणजे ते घडवून आणायला हवं होतं. पण एकूणच भारत सरकार ढिस्स होतं.
इंदिरा गांधी आक्रमक नव्हत्या, सावध होत्या. बांगला देशाला अगदी मानवी पातळीवर मदत केली तरीही पाकिस्तान त्याचा गैरप्रचार करणार होतं हे इंदिरा गांधीना माहित होतं. पाकिस्ताननं आधीपासून एवढी जोरदार फिल्डिंग लावून ठेवली होती की अमेरिका, पश्चिमी देश पाकिस्तानचं वागणं बरोबर आहे असं मानत होते. मुजीब फुटीर आहेत, देशाचे तुकडे करणार आहेत, पाकिस्तान पूर्व पाकिस्तानात कारवाई करत आहे ते योग्यच आहे अशी अमेरिकेची भूमिका होती. त्यामुळं एकूणात इंदिरा गांधी सावध होत्या.
डोक्यावरून पाणी गेलं. १० लाखापेक्षा जास्त निर्वासित भारतात आले. भारतीय अर्थव्यवस्थाच डळमळीत झाली. तेव्हा इंदिरा गांधीनी बांगला स्वातंत्र्य सैनिकांना मदत करायचा निर्णय घेतला. त्यानंतर काय घडलं ते आता सर्वांनाच माहित आहे.
***
टिक्का खानानं केलेले अत्याचार सार्या जगाला दिसत होते. बांगला देश, पाकिस्तान आणि भारतातून पत्रकार बातम्या पाठवत होते, मुत्सद्दी आपापल्या देशांना खलिते पाठवत होते. फाळणी झाली तेव्हापासूनच अमेरिका पाकिस्तानधार्जिणी होती. पाकिस्तान हा अमेरिकेचा हस्तक होता. पाकिस्तानात हुकूमशाही आहे, पाकिस्तानात मानवी हक्कांचे तीन तेरा वाजत असतात हे सारं अमेरिकेला माहित होतं. पण आशियातल्या राजकारणात अमेरिकेला पाकिस्तान ही पाय ठेवायची जागा होती. पाकिस्तान बांगला जनतेला कुटतोय हे पाहात असूनही अमेरिका गप्प बसला.
भारतानं पाकिस्तानशी अधिकृत लढाई आरंभल्यावर अमेरिकेनं आपलं सातवं आरमार बंगालच्या उपसागरात पाठवलं. त्या आरमारात एंटरप्राईज ही विमानवाहू नौका होती. भारतावर हवाई हल्ला करू अशी धमकी अमेरिका देत होती.
भारताचे रशियाबरोबर राजनैतिक संबंध होते. संकट आल्यास मदत करायची असा करारही रशियानं केला होता. काही काळ टंगळमंगळ केल्यानंतर रशियानं आपल्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पाठवल्या.
अमेरिकन आरमार थबकलं, आपल्या मूळ जागेकडं परतलं.
***
पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानी सैन्यानं भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली, हजारो पाकिस्तानी सैनिक युद्धवैâदी झाले.
युद्ध संपलं.
***
हा मजकूर प्रसिद्ध होत असताना बलुचिस्तानमधली बलूच जनता स्वायत्ततेची मागणी करत आहे. पाकिस्तानतली संसाधनं पंजाब प्रांत, उरलेला पाकिस्तान हडप करत आहेत, आपल्यावर अन्याय होतोय असं बलुच जनतेचं म्हणणं आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की बलुच फुटीरतावाद्यांना भारताची चिथावणी आहे. भारत सरकार या आरोपाचा इन्कार करतंय.
बलुचिस्तान हा भारताचा शेजारी नाही. बलुचिस्तान आणि भारत यात १६५२ किमीचं अंतर आहे.

