• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

धुक्यात नव्हे, धुरक्यात हरवलेले शहर!

प्रशांत सिनकर (निसर्गायन)

marmik by marmik
January 19, 2026
in निसर्गायण
0
धुक्यात नव्हे, धुरक्यात हरवलेले शहर!

ठाणे शहर सध्या रोजच दाट धुक्याच्या पांघरुणात जणू हरवून जात आहे. खाडीसमोरील डोंगररांगा, इमारतींच्या रांगा, रस्त्यांवरील वाहतूक आणि सूर्यप्रकाश सगळंच काही काही काळासाठी धुक्याआड लपलेलं दिसत आहे. अनेकांना हे दृश्य निसर्गसौंदर्याचं वाटत असलं, तरी या धुक्यामागे दडलेला धोका मात्र गंभीर आहे. कारण हे केवळ नैसर्गिक धुके नसून, वाढत्या प्रदूषणात, धूर धुळीत मिसळलेलं धुरके म्हणजेच ‘स्मॉग’ असण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

शहरीकरणाच्या वेगात शहरांनी निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम आज हवामानावर, आरोग्यावर आणि जीवनमानावर दिसून येतो. धुरके हे हवामानातील बदलाचं लक्षण असलं, तरी ते पर्यावरणीय असंतुलनाचं ठळक चिन्ह आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, बांधकामांचा स्फोट आणि हरित क्षेत्राचा होत चाललेला र्‍हास यामुळे शहरांची ‘श्वास घेण्याची क्षमता’ कमी होत चालली आहे.

धुक्याच्या काळात हवेत असलेले सूक्ष्म प्रदूषक जमिनीजवळ अडकून राहतात. यामध्ये प्रामुख्याने पीएम २.५ आणि पीएम १० हे अतिसूक्ष्म कण असतात. हे कण इतके बारीक असतात की ते सहजपणे आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात आणि रक्तप्रवाहातही मिसळू शकतात. यामुळे श्वसनविकार, दम्याचे झटके, हृदयविकार, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे यांसारख्या समस्या वाढतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आधीच वेगवेगळ्या व्याधी जडलेले नागरिक यांच्यासाठी हा धोका अधिक गंभीर ठरतो.

सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस शहरातील प्रदूषणाची पातळी अधिक वाढलेली असते. वाहनांतून निघणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामातील धूळ आणि कचरा जाळण्यामुळे हवेत विषारी वायू मिसळतात. धुक्यामुळे हवेची हालचाल कमी होते आणि हे प्रदूषक हवेतच अडकून राहतात. त्यामुळे दिसायला सुंदर वाटणारं धुकं प्रत्यक्षात आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

ठाण्यासारखं शहर खाडी, तलाव, डोंगर आणि हिरवळींसाठी ओळखलं जातं. ही नैसर्गिक परिसंस्था शहरासाठी फुफ्फुसांसारखी काम करत होती. मात्र खाडी भराव, डोंगर उतारांवरील बांधकामे, वृक्षतोड आणि मोकळ्या जागांच्या र्‍हासामुळे नैसर्गिक वायुवीजन व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. पूर्वी खाडीमार्गे येणारी थंड हवा आज सिमेंटच्या जंगलात अडकून पडते आणि प्रदूषण बाहेर जाण्याऐवजी शहरातच साठून राहतं. बांधकाम क्षेत्र हे शहरातील प्रदूषणाचं मोठं कारण ठरत आहे. बहुतांश ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. उघड्यावर पडलेली वाळू, सिमेंट, अपूर्ण रस्ते आणि उडणारी धूळ यामुळे हवेत सूक्ष्म कणांचे प्रमाण प्रचंड वाढते. धुक्याच्या काळात हे कण अधिक काळ हवेत टिकून राहतात आणि श्वसनाचा धोका दुपटीने वाढतो.

हवामान बदलाचा परिणाम आता केवळ जागतिक पातळीवर मर्यादित राहिलेला नाही. स्थानिक पातळीवरही त्याचे परिणाम तीव्रतेने जाणवू लागले आहेत. ऋतूंची नियमितता बिघडली आहे. कधी अचानक थंडी वाढते, कधी आर्द्रता जास्त होते, तर कधी पावसाचं स्वरूप बदलतं. या सगळ्याचा थेट परिणाम म्हणजे धुक्यासारख्या घटना अधिक काळ टिकणं आणि प्रदूषण अडकून राहणं.

धुरकं हे निसर्गाचं मौनातलं भाष्य आहे. निसर्ग माणसाला सतत इशारे देतो आहे. कधी तापमानवाढीच्या रूपाने, कधी अनियमित पावसाच्या रूपाने, तर कधी धुरक्याच्या रूपाने. मात्र विकासाच्या अंध धावपळीत हे इशारे दुर्लक्षित केले जात आहेत. आज या इशार्‍यांकडे गांभीर्याने पाहिलं नाही, तर उद्या त्याची किंमत अधिक मोठी मोजावी लागेल.

या परिस्थितीत प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. हवेच्या गुणवत्तेची तपासणी, प्रदूषण नियंत्रण नियमांची कठोर अंमलबजावणी, बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. केवळ आकडेवारी जाहीर करून थांबण्याऐवजी त्यावर ठोस उपाययोजना होणं आवश्यक आहे. शहरातील हरित क्षेत्र वाढवणं, वृक्षलागवड आणि नैसर्गिक परिसंस्थांचं संरक्षण करणं ही काळाची गरज बनली आहे. तितकीच जबाबदारी नागरिकांचीही आहे. रोजच्या जीवनशैलीत छोटे बदल करूनही मोठा फरक घडवता येऊ शकतो. अनावश्यक वाहनवापर टाळणं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, कचरा जाळण्याला विरोध करणं, झाडे लावणं आणि त्यांचं संगोपन करणं या सगळ्या गोष्टी प्रत्येक नागरिक करू शकतो. पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारी जबाबदारी नसून सामूहिक जबाबदारी आहे, ही जाणीव रुजण्याची गरज आहे.

धुक्यात हरवलेलं ठाणे शहर हे केवळ एक दृश्य नाही, तर ते भविष्यातील संकटाची सावली आहे. आज हे धुके, नव्हे धुरके काही काळानंतर विरून जाईल, पण प्रदूषणावर नियंत्रण मिळवलं नाही, तर ही सावली अधिक गडद होत जाईल. आरोग्य, पर्यावरण आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्य यासाठी आजच योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. निसर्ग आपल्याशी संवाद साधतो आहे. प्रश्न इतकाच आहे, आपण तो संवाद ऐकणार आहोत का, की पुन्हा एकदा त्याकडे दुर्लक्ष करणार आहोत?

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, धुक्यात अनेक विषारी घटक मिसळलेले असतात. कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड्स, सल्फर डायऑक्साईड तसेच औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रातून निघणारी धूळ आणि रासायनिक कण यांचा समावेश होतो. वाहनांमधून निघणारा धूर आणि औद्योगिक उत्सर्जन या कणांमध्ये हवेतील शिसे, कॅडमियम आणि अँटीमनी यांसारखे विषारी धातू देखील मिसळतात. हे सर्व घटक धुक्यात अडकून राहतात आणि दीर्घकाळ हवेत उडत राहतात, ज्यामुळे श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकाराचा धोका आणि अ‍ॅलर्जीसारखे आरोग्याचे गंभीर परिणाम होतात.

शहरीकरणाच्या वेगामुळे नैसर्गिक परिसंस्था कमकुवत झाली आहे. खाडीमार्गे येणारी थंड हवा आता उंच इमारतींमध्ये अडकते, वृक्षतोड आणि हरित क्षेत्राची घट शहरातील नैसर्गिक वायुवीजन व्यवस्थेला बाधक ठरतो. त्यामुळे धुक्याचा कालावधी वाढतो आणि प्रदूषक हवेत अडकून राहतात. वाहनांमधून निघणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामातील धूळ यामुळे हवेत विषारी कण वाढतात आणि धुक्यामुळे त्यांचा पैâलाव होऊन आरोग्यावर धोका निर्माण होतो. हवामानातील बदल, अनियमित पावसाचे स्वरूप, वाढती आर्द्रता आणि अचानक तापमानवाढ यामुळे धुरक्याच्या घटना दीर्घकाळ टिकतात.

धुक्याचे दृश्य सौंदर्यदृष्टीने आकर्षक वाटले तरी त्यामागचा वैज्ञानिक वास्तवता गंभीर आहे. शासन, नागरी समाज आणि शहरी नियोजन करणार्‍यांनी संयुक्त प्रयत्न करून आजच उपाययोजना केल्या तरच भविष्यातील आरोग्य, पर्यावरण आणि शहरी जीवन सुरक्षित ठेवता येईल.

Previous Post

आर्थिक कोंडीत अडकला शेर-ए-बांगला!

Next Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post
फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.