• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

`दशावतारी’ दिलीप

श्रीराम रानडे (यांचा मी सांगती )

marmik by marmik
January 19, 2026
in मनोरंजन, विशेष लेख, सिनेमा
0
`दशावतारी’ दिलीप

माझ्या जीवनात कला, साहित्य, नाट्य, चित्रपट, लोकनाट्य आणि समाजकारण, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांतील नानाविध नामांकित व्यक्तींचा सहवास मला मिळाला. त्यांच्याबरोबर वाटचाल करण्याची मला संधी मिळाली. कळत नकळत माझ्या हौशी कलाप्रवासावर त्यांचा ठसा उमटला. त्यांच्या संगतीने माझीही चार पाऊले कलाक्षेत्राच्या दिंडीत थिरकली… या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच-

`दशावतार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातील `बाबुली’च्या भूमिकेमुळे दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा कीर्तीशिखरावरच विराजमान झाले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सुशिक्षित, अशिक्षित नागरिक, ग्रामीण स्त्री-पुरुष, मुले-मुली सर्वांच्या तोंडी एकच कौतुकोद्गार, ‘वा प्रभावळकर वा! तुम्ही कमाल केलीत. केवळ अप्रतिम!’ या स्तुतिपाठातील `या वयात सुद्धा’ हे वाक्य प्रभावळकरांना आणि त्यांच्या अगदी निकटच्या मित्रपरिवाराला मात्र नक्कीच खटकते! अनेक भेटींत त्यांनी हे बोलून दाखविले आहे आणि आम्ही त्याच्या मित्रांनीही रसिकांच्या या वाक्यावर नाराजीची फुल्ली मारलेली आहे.

दिलीप प्रभावळकर काल आज आणि उद्याही तितकेच ताजे, टवटवीत आणि उत्साहीच असणार आहेत. हे विधान मी अनुभवामधून व्यक्त करतो आहे. कारण त्यांचे आणि माझे `मैत्र’ किमान ४०-४५ वर्षांचे आहे आणि अनेक प्रसंगांचा मी स्वत: साक्षीदार आहे.
`शारदाश्रम’ दादर येथे नवीन उभारलेल्या इमारतीमध्ये (ज्या उभारणीमध्ये दिलीपच्या वडिलांचा भालचंद्र प्रभावळकरांचाही सहभाग होता) प्रभावळकरांचे बालपण रंगले. गणेशोत्सवात नाटके, बॅडमिंटन स्पर्धा, जादूचे प्रयोग, नाट्यछटा, एकांकिका अशा विविध करमणुकीच्या आणि क्रीडाकौशल्याच्या संधी तिथे लाभल्या. अभ्यासात हुशार, वाचनाची आवड, उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू, लहान-सहान प्रवचने देण्याची हातोटी अशी नाना अंगे असणारा हा वरून अत्यंत `साळसूद’ पण आतून अत्यंत खट्याळ असा मुलगा. (माझे हे विधान खोटे वाटत असेल तर प्रभावळकरांनीच लिहिलेली त्यांच्या बाल-किशोर आणि कॉलेज जीवनात घडलेले प्रसंग वर्णन करणारी पुस्तके अवश्य वाचा.)
वास्तविक दिलीप आणि मी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने आमने सामने उभे असलेले स्पर्धक. प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन (पीडीए) आणि थिएटर अ‍ॅकॅडमी (टीए), पुणे या संस्थामधून मी काम करायचो आणि दिलीप, रत्नाकर मतकरी यांच्या `बालनाट्य’ मुंबई या संस्थेतर्पेâ सादर होणार्‍या नाटकात काम करायचा. त्यामुळे आमच्या उभय संस्थांत एकमेकात चढाओढ असणं, `खुन्नस’ असणं अगदी स्वाभाविकच होतं. आम्ही दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखून होतो.

पण आमची खरी ओळख पटली ती `एक डाव भुताचा’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात. दिलीप प्रभावळकर आणि मोहन जोशी हे अगदी भिन्न-भिन्न स्वभावाचे पण सच्चे कलाकार मित्र मला गवसले ते या चित्रपटामुळे. `चिमणराव’ या दूरदर्शन मालिकेमुळे `एक काऊऽऽ’ या खास आवाजातील हाकेमुळे दिलीप घराघरात पोहोचला होताच. अगदी लोकप्रिय झाला होता. गुजराती, हिंदी आणि इतर भाषिकांतही चिमण घरोघरी पोहोचला होता. पण अद्यापी तो चित्रपटामधून फारसा स्थिरावला नव्हता. ‘एक डाव भुताचा’मध्ये प्रमुख भूमिकांमध्ये असणारे रंजना आणि अशोक सराफ यांच्याव्यतिरिक्त इतर कलाकारांची सोय सासवड येथील शाखेतच केली होती.

दिलीपही त्यात होता. मी आणि मोहन जोशी नोकरी करत होतो. त्यामुळे एक दिवस त्याची स्कूटर एक दिवस माझी स्कूटर असा आमचा रात्री-अपरात्रीचा पुणे ते सासवड आणि सासवड ते पुणे असा प्रवास सुरू असायचा.

कधी-कधी आम्हालाही सासवडला मुक्काम करावा लागे. दिलीपची फार कुचंबणा व्हायची. कारण त्या ठिकाणी आंघोळीची आणि स्वच्छतागृहाची योग्य व्यवस्था नव्हती. युनिटमध्ये माझ्याशिवाय त्याच्याही ओळखीचे फारसे कोणी नव्हते. अप्पा एरंडे या नावाचे सासवडलाच राहणारे माझ्यासारखेच एक हौशी पण वयस्कर कलाकार होते. त्यांचा दिलीपवर फार जीव. कसे कोण जाणे, पण दिलीपची ही अडचण त्यांना समजली आणि त्यांनी दिलीपला आंघोळीसाठी आणि इतर गोष्टींसाठी आग्रहाने आपल्याच घरी येण्याचे निमंत्रण दिले. `गाड्याबरोबर नळ्याची यात्रा’ या म्हणीप्रमाणे मीही दिलीपच्या शर्टाचे टोक पकडून अप्पा एरंडेंच्या बंगल्यावर पोचलो. (प्रभावळकरांना `अहो-जाहो’ संबोधण्याऐवजी `अरे दिलीप’वर मी आलो आहे, हे चतुर वाचकांच्या लक्षात आले असेलच.) अप्पा आणि त्यांच्या परिवाराने दिलीपचा (आणि आपोआपच माझासुद्धा) जो `पाहुणचार’ केला, त्याला खरोखरच तोड नाही. त्यांनी शौचालयातील पाण्याचा डबा आपल्या हाताने नळावरून पाणी भरून ठेवला. संकोची स्वभावाच्या दिलीपच्या चेहर्‍यावरील ते `भाव’ आजही मला जसेच्या तसे आठवतात. आंघोळीनंतर कांदापोहे, उपमा असा आग्रहाने खायला घातलेला नाश्ता, गरमा-गरम चहा… वा! लाजवाब! त्या दिवसांची आजही आठवण झाली की दिलीप संकोचून म्हणतो- `आप्पांनी आपलं कौतुक जरा जादाच केलं नाही?’ मीही त्याला होकार भरतो.

रात्री शूटिंग नसेल तर दिलीप आणि मी सासवडच्या एसटी स्टँडवर गप्पा मारत बसायचो! बहुतेक गप्पा नाटक, अभिनय, नवीन वाचन, नवीन पुस्तके, दूरदर्शन मालिका, त्याचे नवीन लिखाण याच विषयावर असायच्या. नकळत मी दिलीपच्या अधिकाधिक जवळजवळ येत गेलो. शूटिंग संपलं पण मैत्री घट्ट होत गेली. त्यावेळी त्याचा अधिक मुक्काम मुंबईलाच असायचा, पण आई-बाबा पुण्यात लॉ कॉलेज रस्त्यावरील `अबोली’ अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होते. प्रयोग, शूटिंग किंवा आई-बाबांना भेटण्यासाठी दिलीप पुण्याला यायचा. त्याच्या पाळतीवर मी असायचोच. मी त्याच्या घरीच जाऊन त्याला भेटायचो. त्यानंतर काही दिवसांतच घरच्या सर्व लोकांशी माझी चांगलीच ओळख झाली. आई-बाबा, आत्या सर्वांशीच. मग दिलीप नसला तर तरी त्यांच्या घरी माझं जाणं-येणं सुरू झालं.

दिलीपचे बाबा फिरायला बाहेर पडायचे. रस्त्यात भेटले की आवर्जून चौकशी करायचे. त्याच्या नवीन नाटकातल्या, सिनेमातल्या, भूमिकेची मी स्तुती केली की हसून दाद द्यायचे. पण मी त्याला असा सल्ला दिला, अशी तयारी करून असा लवलेशही बोलण्यात नसायचा. वास्तविक व्यावसायिक कलाकार हो, असा सल्ला त्यांनीच दिलीपला दिला होता. फार्मास्युटिकल कंपनीमधील बड्या पगाराची आणि अधिकारपदाची नोकरी सोडायला दिलीप मुळीच तयार नव्हता. बाबा हा बेभरवशाचा व्यवसाय आहे, सर्वांना यश मिळेलच असे नाही, ठराविक उत्पन्नाची शाश्वती नाही, अशा अनेक सबबी दिलीपने पुढे केल्या, पण बाबा त्याच्यामागे ठाम उभे राहिले. आणि दिलीपनेही त्यांच्या विश्वासाला किंचितही तडा लागू दिला नाही. एकदा व्यावसायिक म्हणून कला क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर मिळेल त्या संधीचे त्याने सोनेच केले. दूरदर्शन, नाटक, चित्रपट, कथा, नाट्य, एकांकिका लेखन, वृत्तपत्रे, मासिके यातून स्तंभलेखन, बाल कुमारांसाठी लेखन असा अखंड लेखनाचा सातत्यपूर्ण प्रवासही त्याने सुरूच ठेवला. ही सगळी तारेवरची कसरत तो करतो तरी कशी याचं आम्हा सर्व मित्रांना आश्चर्य वाटायचे आणि आजही वाटते- हा भला माणूस आपल्या भूमिकेचा अभ्यास कसा, केव्हा आणि कुठे करतो? आणि विविध प्रकारचे लेखन कसे करतो, तोंडाने तर कधीही फुशारकी मारत नाही. मी ही भूमिका अशी साकारली, मी त्या दिग्दर्शकाला अशी सूचना केली, मी त्या सर्व सहकलाकाराला असं असं कर म्हणजे तुझ्या कामाला उठाव येईल, मी त्याला स्टेजवर असं सांभाळून घेतले… नो-नेव्हर- दिलीपच्या तोंडून अशी भाषा आम्ही कधीही ऐकली नाही. स्तंभलेखांचं आणि विविध गोष्टींचे लेखन त्यानं वडील
हॉस्पिटलमध्ये रुग्णशय्येवर असताना रात्री-बेरात्री त्यांच्या उशा-पायापाशी केलेलं आहे. पण काही थोडक्या मित्राशिवाय याची कुठेही वाच्यता नाही.

आमची मैत्री आता चांगलीच बहरू लागली. `नाट्यदर्पण’ हे रंगभूमीला पाहिलेले मासिक सुधीर दामले चालवत असत. काही वर्षातच `नाट्यदर्पण’ने चांगलेच बाळसे धरले. दामले आणि त्यांचे सर्व सहकारी, वेगवेगळ्या कलात्मक योजना योजण्यात आणि त्या अत्यंत यशस्वीपणे पार पाडण्यात तत्पर. मुंबईच्या `रंगभवनात’ त्यांनी `नाट्यदर्पण’ रजनी सुरू केली. कलावंतांना हक्काचा रंगमंच मिळाला आणि रसिकप्रेक्षकांची दाद मिळू लागली. माझ्या अंगात मुळातूनच नाट्यवेड असल्यामुळे मी आवर्जून पुण्याहून मुंबईला जायचो. रात्रभर तो अनुपम सोहळा बघायचो आणि पहाटेची पहिली गाडी पकडून पुण्याला परत. अनेक बड्या-बड्या कलावंतांचे विविधगुणदर्शन मी अनुभवले आणि मनात साठवले आहे.

एके वर्षी दिलीपने जुन्या काळात गाजलेला संगीत नाटकातील नट कृष्णराव हेरंबकर साकारला. आता म्हातारा झालेला, विक्षिप्तपणे वागणारा, अजूनही नाट्यगीत म्हणण्याची खुमखुमी बाळगणारा, आपल्या बोळक्या तोंडातून संवाद म्हणण्याचा प्रयत्न करणारा, डोळ्यावर सोडावॉटरच्या बाटल्यांच्या काचा वाटाव्यात असा चष्मा लावणारा, जुन्या फाटक्या वहाणा, मळके धोतर, मळका शर्ट आणि कोट, डोक्यावर मळकी काळी टोपी, गळ्यात मफलर अशी रंगभूषा-वेशभूषा केलेला म्हातारा दोन तरुण मुलींचा खांद्यावर हात टाकत रंगमंचावर प्रवेश करता झाला. त्यातील एकीला नाव विचारताच तिने `मोनिका’ असे सांगताच आजपासून मी तुला `मनुका’च म्हणणारा कृष्णराव हेरंबकर दिलीपने असा काही जबरदस्त उभा केला की पूछो मत! आणि `प्रिये पहा’ हा गाणं साभिनय म्हणताच हशा आणि टाळ्यांनी रसिकांनी प्रचंड दाद दिली. कृष्णराव हेरंबकर शेवटी वृद्ध कलाकारांची व्यथा मांडतात, तेव्हा डोळे आपोआप पाझरू लागतात. `नाट्यदर्पण’च्या कार्यक्रमात मी हा `कृष्णराव हेरंबकर’ प्रथम पाहिला आणि त्याचे रसभरीत वर्णन किर्लोस्कर, स्त्री मनोहरचे संपादक श्री. भा. महाबळ यांना ऐकविले.

अरे! इतकं तू कौतुक करतो आहेस आणि प्रभावळकर तुझे इतके जवळचे मित्र आहेत तर यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी त्यांची दीर्घ मुलाखत का घेत नाहीस?
त्यांनी यापूर्वी निळू फुले यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती आणि मी माझ्या परीने ती घेतलेलीही होती. त्या वर्षीच्या `किस्त्रीम’ दिवाळी अंकात वाचकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला होता. महाबळांच्या प्रस्तावाला मी होकार दिला. दिलीपसमोर मी ही कल्पना मांडली. प्रथम त्याने नाही रे- उगीच कशाला, वेळ काढणं अवघड आहे, असा सूर लावला. पण मी जेव्हा हट्ट धरला तेव्हा अखेर होकार मिळाला. पण त्यानंतर मात्र त्यांना जे सहकार्य केलं त्याबद्दल त्याला धन्यवाद द्यावे तितकेच थोडेच! महाबळांनी हे काम वेळेवर पूर्ण करून घेण्यासाठी त्यांचा तरुण सहकारी राजेश दामले याला माझ्याबरोबर दिला. आम्ही दोघांनी मिळून ती दीर्घ मुलाखत पूर्ण केली आणि `किस्त्रीम’च्या दिवाळी अंकात प्रकाशितही झाली. वाचकांचा तिला उत्तम प्रतिसादही मिळाला. त्याचीच फलश्रुती म्हणून पुढील सलग तीन वर्षे विक्रम गोखले, मोहन जोशी आणि `एक होता विदूषक’ या चित्रपटाच्या निमित्ताने जब्बार पटेल आणि त्यांचे सहकारी यांच्यावरही मी लेख लिहिले.

`किस्त्रीम’च्या दिवाळी अंकांमुळे दिलीप आणि मी अधिकच जवळ आलो. त्यांच्या छंद संस्था निर्मित, लिखित, दिग्दर्शित आणि ‘चिमणराव’, `प्रिन्स’, `वांटुंग पिन् पिन’, `नाना’, `दिप्ती’, `बॉबी’ आणि `कृष्णराव’ या सहा भूमिकेमुळे तुफान गाजलेल्या `हसवाफसवी’मुळे दिलीपच्या नावाला झळाळी आली. हा चिमणरावांच्या भूमिकेतच अडकणार का, या प्रश्नाला दिलीपने अभिनयाच्या माध्यमातून दिलेले हे परस्पर चोख उत्तर होते. `हसवाफसवी’चे एक वाचन माझ्या घरीही झाले होते, ते दिलीपनेच केले होते. त्यावेळी (वैâ.) वसंत सोमण, (वैâ.) जयंत बेंद्रे, विजय कुलकर्णी उपस्थित होते, हे मला पक्केच स्मरते आहे. `हसवाफसवी’ला इतके प्रचंड यश मिळेल असे त्यावेळी दिलीपलाही वाटले नव्हते आणि आम्हालाही. ज्येष्ठ नागरिक संघ, मंडळे यांच्यासाठी दीड तासांचा सलग कार्यक्रम अशीच सुरुवातीची कल्पना होती. पण सातत्याने नवनवीन कल्पना, टीमवर्क, बरोबरीच्या सहकार्‍यांची निवड, सातत्य आणि उत्तम दर्जाचे प्रयोग अशा अनेक गुणांमुळे पुणे- मुंबई- महाराष्ट्र देश-परदेशात `हसवाफसवी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ७५० प्रयोगांचा टप्पा गाठल्यानंतर प्रभावळकरांनी प्रयोग हाउसफुल्ल होत असतानाही आपणहून प्रयोग थांबविले. या संदर्भात मी माझी नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. प्रयोग थांबवायला नको होते असे माझे स्पष्ट मत आजही आहे, पण दिलीपचा `निग्रही स्वभाव’- नाही म्हणजे नाही- हाही दिसून आला.
`हसवाफसवी’च्या अनेक हृद्य आठवणी माझ्या संग्रही आहेत. परदेशातील प्रयोगानंतर एक वृद्ध गृहस्थाने आपल्या मनगटावरील भारी किंमतीचे घड्याळ दिलीपच्या मनगटावर बांधले. टिळक स्मारक मंदिर, पुणे येथील एक प्रयोगानंतर एक गृहस्थ आपली पत्नी आणि लहान मुलीला घेऊन भेटायला आले. त्यांनी उदबत्तीचा पुडा प्रभावळकरांना अत्यंत प्रेमाने भेट दिला. `ती मुलगी एकटीच खुदूखुदू हसत मला जवळून निरखित होती’ हे प्रभावळकरांनी साप्ताहिक सकाळच्या एका लेखात लिहिले आहे. `हसवाफसवी’ पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी लिहिले आहे- `प्रेक्षकांचे हसणं, गंभीर-अंतर्मुख होणं या भावना मी नियंत्रित करू शकतो- लेखक म्हणून आणि नट म्हणून- या जाणीवेत विलक्षण थ्रिल आहे! हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही.’

`गाता गळा आणि शिंपता मळा’ या उक्तीप्रमाणे मराठी, हिंदी आणि इंग्रजी कलाकृती, नाटक, चित्रपट, दूरदर्शन या सर्व माध्यमांतून त्यांची आवर्जून मागणी होऊ लागली, पण त्यांनी प्रत्येक मागणीच्या बाबतीत चोखंदळपणाच दाखविला. भरमसाठ भूमिका कधीही स्वीकारल्या नाहीत. ज्या स्वीकारल्या त्यांचा मनापासून आदर केला, अभ्यास केला आणि कोणतेही शारीरिक, मानसिक, बौद्धिक कष्ट उपसण्यात कमतरता राहू दिली नाही.

एकच उदाहरण सांगतो- एका चित्रपटातील भूमिकेत त्यांचे डोळे लाल भडक होतात, असे दृश्य होते. दिग्दर्शकाला तो `क्लोजप’ मनासारखा मिळत नव्हता, अखेर दिलीपने चक्क शीर्षासन केले. रक्त डोळ्यात उतरविले आणि योग्य त्या परिणामाचा शॉट `ओके’ झाला. (‘या वयात सुद्धा’ या रसिकांच्या प्रश्नाचे उत्तर इथेच सांगून टाकतो. दिलीप आजही काही योगासने नेहमीप्रमाणे करतो. घराभोवती नियमितपणे चालण्याचा व्यायाम करतो. रस्त्यावर चालणे त्याच्या चाहत्यांमुळे अनेकवेळा त्याला अशक्य होऊन बसते.)
चाहत्यांच्या त्यांच्याभोवती गराडा असतो त्याची सही घेणे, त्याच्याबरोबर सेल्फी काढणे, तो सारस्वत बँकेचा ब्रँड अँबेसिडर असताना त्याच्या मांडीवर आपल्या लहान मुलाला बसवून जोडप्याने फोटो काढून घेणे, असंख्य नमुने मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. रसिकांचे प्रेम किती ऊतू जाते याचा मी प्रत्यक्ष बघितलेला, अनुभवलेला प्रसंग असा- दिलीपच्या एकुलत्या एक मुलाचे केदारचे
ऑपरेशन जहांगीर हॉस्पिटलमध्ये होते. त्याच्या पोटात पित्ताच्या खडे होते. आत
ऑपरेशन सुरू होते आणि बाहेर दिलीप, मधु गानू (ज्याचं वर्णन जयवंत दळवींनी असं केले आहे- श्रीराम प्रभूंचा जसा हनुमंतू तसा पुलंचा मधू गानू) आणि मी बाहेर थांबलो होतो.
ऑपरेशन कितीही लहान असो, मोठे असो- ते यशस्वी होईपर्यंत रुग्णाचे नातेवाईकांच्या चेहर्‍यावर काळजी असते. त्याही अवस्थेत याचे चाहते आपल्या डायर्‍यांत, कागदांवर स्वाक्षर्‍या घेत होते, शेकहँड करत होते आणि हा माणूस निर्विकारपणे कोणतीही नाराजी न दाखवता ते करीत होता. कलाकारांना स्वतःचे एक खासगी आयुष्य असते, प्रसंग काय? वेळ काय? याचे भान सुशिक्षित-सुजाण प्रेक्षकांनी पाळायला नको का?
ऑपरेशन झाले. केदार अजून गुंगीतच होता. त्याच्या खोलीत आम्ही बसून होतो दुपारचे तीन-साडेतीन वाजले. दिलीपने आपली बॅग आवरली. केदारच्या डोक्यावरून एकदा हात फिरवला आणि तो खोलीबाहेर पडला. संध्याकाळच्या रेल्वेने त्याला हैदराबादला शूटिंगसाठी जायचं होते.
गॅलरीमधून गानू आणि मी त्याच्या जाणार्‍या पाठमोर्‍या आकृतीला बघत होतो. दिलीप सर्वांगाने उंच आहेच आहे. त्याक्षणी तो मला दिव्य-भव्य वाटला. एक प्रेमळ पिता आणि एक सच्चा कलाकार म्हणून.

अनेक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केले आहे. नाटक, प्रहसने, नाट्यछटा, कथा, बालवाङ्मय, क्रीडा-कला जगातील त्यांची निरीक्षणे- एक ना अनेक विषय. आजवरचे सर्व लेख वेगवेगळ्या प्रकाशनांकडून पुस्तकरूपाने प्रकाशित. अनेक बक्षिसे- महाराष्ट्र शासनाचीसुद्धा, पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या. आज माझ्या संग्रही दिलीपच्या स्वाक्षरीसह भेट म्हणून आलेली सगळी पुस्तके आहेत. माझ्या पुस्तक संग्रहाचा तो अत्यंत अभिमानाचा आणि दृढ मैत्रीचा भाग आहे. ‘प्रिय श्रीराम व सौ. संजीवनी रानडे यांस सप्रेम भेट’, खाली दिलीप प्रभावळकर अशी लपेटदार सही आणि तारीख. दिलीपचे अक्षर सुंदर आणि सहज आहे. कोरून लिहिल्यासारखे नाही. त्याच्या सहज अभिनयासारखे आणि लेखनासारखेच. त्याची ही पुस्तके भेट देण्याची हौस केवळ स्वतःचीच पुस्तके भेट देण्यापुरतीच मर्यादित नाही, तर आम्ही आवर्जून वाचावे अशी पुस्तके आम्हांला आणि रूपाली आणि आरती या आमच्या अमेरिकास्थित दोन्ही मुलींना आवर्जून भेट देतो. त्याच्याबद्दल आम्हाला प्रचंड कौतुक आहे आणि त्याही त्याच्यावर तितकेच आदरयुक्त प्रेम करतात.

`भारद्वाज प्रकाशन’ ही पुस्तक प्रकाशन संस्था माझे वडील कै. शंकर वामन रानडे यांनी सांगली येथे १९२५मध्ये सुरू केली. अनेक अडचणींमुळे ती ५-६ वर्षांत बंद पडली. १९९४मध्ये आम्ही रानडे परिवारातर्फे  त्याचा पुन्हा श्रीगणेशा केला. केवळ वडिलांची स्मृती कायम राहावी हा आमचा उद्देश. हौस म्हणून सुरू केलेल्या या संस्थेला दिलीपने आपल्या १२ एकांकिका एका रुपयाचीही अपेक्षा धरता प्रकाशित करण्यासाठी सुपूर्द केल्या. त्या ‘भारद्वाज’तर्फेच प्रकाशित झाल्या पाहिजेत असा त्याचा आग्रह आणि मला त्या प्रकाशित करणं सर्वथैव अशक्य! अखेर उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी आणि आमचे भारद्वाज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन भागांत त्या प्रकाशित झाल्या. त्यानंतर `चिमणरावांचा गजरा आणि प्रहसने’ आम्ही संयुक्तपणे प्रकाशित केले. एकपत्रिका आणि बालनाटिका हे प्रथम ‘भारद्वाज’ने आणि नंतर दिलीप माजगावकरांच्या राजहंसने प्रकाशित केले. या सर्व व्यवहारात मी त्याला एक रुपयाही दिलेला नाही, कारण मलाच तो मिळाला नाही. नुकतीच भारद्वाजने आपली शंभरी पूर्ण केली (स्थापना १९२५). दिलीप प्रभावळकरसारखा सव्यसाची मान्यवर लेखक `भारद्वाज’सारख्या अगदी छोट्या प्रकाशन संस्थेचा लेखक आहे, हे सांगताना ऊर भरून येतो.

कलेच्या, साहित्याच्या क्षेत्रात तर मोठा आहेच, पण माणूस म्हणूनही दिलीप किती मोठा आहे याची मी स्वतः प्रचिती घेतली आहे. दिलीपच्या ओळखीच्या एक वयोवृद्ध स्त्री कर्वे शिक्षण संस्थेच्या वृद्धाश्रमात राहत होत्या. त्यांची इच्छा होती की दिलीपने त्यांच्या आश्रमात यावे आणि तिथे राहणार्‍या वृद्ध स्त्रियांबरोबर काही काळ घालवावा, त्यांची करमणूक करावी. दिलीपने ते आमंत्रण स्वीकारले, त्या आश्रमात तो मला बरोबर घेऊन गेला. तिथे त्याने आपली कला सादर केली. त्या वृद्ध स्त्रीने वाचून दाखवलेले भाषण कौतुकाने ऐकले. दिलीप प्रभावळकरांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा सात्विक आनंद तेथील स्त्रियांच्या चेहर्‍यावर होता. कार्यक्रमानंतर त्या वृद्ध स्त्री आम्हाला त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. प्रिâजमधून त्यांनी पेढे काढले. आम्हा दोघांच्या हातावर ठेवल्ो आणि म्हणाल्या माझा नातू अमेरिकेत असतो. त्याचा वाढदिवस आहे आज. त्याच्यासाठी हे पेढे. नकळत आमच्या डोळ्यात अश्रू तरळले. आजही गप्पांच्या ओघात हा विषय निघाला की आम्ही गलबलून जातो.

सांगलीचे कमलेश मराठे आणि गीता मराठे यांचा मुलगा राजू दुर्दैवाने त्याला बालवयातच दुर्धर रोगाने ग्रासले, तो अपंग झाला. पण त्याची आणि दिलीपची अशी काही गाढ, घट्ट आणि सच्ची मैत्री जमली की विचारू नका. रुग्णशय्येवरच्या असह्य वेदना तो दिलीपच्या कॅसेट्स पाहत सहजपणे सहन करायचा. मुंबईत आला की दिलीप त्याला आपल्या गाडीमधून मस्तपैकी सफर घडवून आणायचा. आज तो या जगात नाही, पण त्या छोट्या राजूची आणि दिलीपची दोस्ती आमच्या कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय आहे.
आमचे मित्र, राजहंसचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार घेत होते. त्यांना भेटायला दिलीप आणि मी, माझी पत्नी संजीवनी एका सायंकाळी गेलो होतो. थोडाच वेळ भेटा, असं सुचवणार्‍या तेथील नर्स स्टाफला, दिलीप प्रभावळकरांसमवेत आम्ही आलो आहोत, असे समजल्यावर त्यांनी ही सूचना आपणहून रद्द केली. उलट एकामागून एक येऊन अनेक नर्स दिलीपचे दर्शन घेण्यासाठी, त्याला अगदी जवळून बघण्यासाठी आतुर झाल्या होत्या, हे त्यांच्या देहबोलीवरून आणि डोळ्यांतून उसळणार्‍या भावनांमधून स्पष्ट दिसत होते. आम्ही परत जाण्यासाठी निघालो तोवर दिलीप प्रभावळकर आले आहेत ही वार्ता वॉर्डमध्ये पसरली होतीच. दिलीप प्रत्येक पेशंटला भेटत होता, एक-दोन शब्द त्यांच्याबरोबर आपुलकीने बोलत होता, त्यांना धीर देत होता. एका कॉटवर एक स्त्री बसलेली होती. कॉटच्या बाजूला तिचा नवरा उभा होता. त्याने दिलीपचे हात हाती घेतले आणि गहिवरल्या आवाजात म्हणाला, ही माझी बायको. गेले आठ दिवस तिने डोळे उघडले नव्हते. अंथरुणावर पडून आहे, तुम्ही आल्याची कुणकुण तिला कशी काय लागली कोण जाणे, पण तुम्हाला केवळ जवळून पाहण्यासाठी ती आज उठून बसली आहे. दिलीप प्रभावळकर या आमच्या मित्राची- या अस्सल कलाकाराची- या माणसाची केवढी ही चिरंतन कामगिरी. त्याला त्रिवार मुजरा!

दिलीपची लोकप्रियता आजही किती मोठी आहे याचा अनुभव मी नुकताच घेतला. कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून कोथरूडच्या नाट्य शाखेच्या वतीने प्रशांत दामले, दिलीप प्रभावळकर आणि इतर यशस्वी कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. आम्ही उभयतां या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होतो. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी रंगपटात गेलो होतो. पण भेट होऊ शकली नाही. मी त्याला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला- आजचा कार्यक्रम अतिशय उत्तम साजरा झाला. मी आणि संजीवनी आलो होतो. अभिनंदन आणि अभिवादन. त्यावर दिलीपचे उत्तर आले समीर हंपीने चोरदरवाजाने लगबगीने बाहेर काढल्यामुळे भेटता आले नाही.

साहित्य, पत्रकारिता, चार्टर्ड अकाऊंटंट, प्रकाशन, या विविध क्षेत्रांत काम करणार्‍या आम्हा मित्रांचा एक ग्रुप आहे. दिलीप प्रभावळकर, दिलीप माजगावकर, अरविंद व्यं. गोखले, मिलिंद संगोराम, सुधीर गाडगीळ, शेखर ढवळीकर, मुकुंद संगोराम, रवींद्र देसाई असे आम्ही भेटत असतो. चेष्टा-मस्करी, गप्पा-टप्पा, हास्यविनोद अनेक विषयांवर चर्चा याला ऊत येतो. मिलिंद संगोराम आणि रवींद्र देसाई अकालीच हे जग सोडून गेले. त्यांच्या आठवणी निघतात. चवी-चवीने खात हा मित्रमेळावा रंगतो. त्यावेळी दिलीपच्या मुखातून, घडलेले प्रसंग, किस्से ऐकतानाची गंमत न्यारीच असते.

उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हातालाही समजताना समजता कामा नये, याविषयी दिलीप आणि त्याचा परिवार अतिशय दक्ष असतो. त्याचा अनेक सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांशी, उदा. पिरंगुटच्या संस्कार या उल्हास केंजकेच्या संस्थेशी, विजय फळणीकर यांच्या `आपले घर’ या संस्थेशी, अंधशाळेशी अनेक धर्मादाय संस्थांशी जिव्हाळ्याचा संबंध. पण कुठेही प्रसिद्धीचा लवलेशही नाही ना अपेक्षा.
`दशावतार’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाआधीचा दिलीपचा प्रवास, त्याची प्रकृती, त्याची नाटके, त्याचे लिखाण, त्याच्या कमिटमेंट्स, परदेश दौरा या सगळ्या गोष्टी त्याच्या परिवाराने आणि त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी अनुभवले आहेत. या सर्व अडचणींवर मात करून दिलीपचा `दशावतार’ दशांगुळे उंचावला याचे आम्हाला विलक्षण कौतुक आहे. त्याच्याविषयीचा आदारभाव अनेकपटींनी वृद्धिंगत झाला आहे. कारण ही फलशृती आहे- सुसंस्कार, विद्या, व्यासंग, नम्र वृत्ती, आचार-विचार-उच्चार, शुद्धता एकरूपता, समर्पण, त्याग आणि माणुसकीचा निर्मळ झरा अशा अनेक गुणांची!

तात्पर्य : रसिकांना एक नम्र विनंती- `प्रभावळकरांच्या कलेचे लेखनाचे, त्यांनी केलेल्या कार्याचे जरूर कौतुक करा. जे आवडले त्याला दाद द्या, न आवडले तरी जरूर नापसंती व्यक्त करा. तो तुमचा अधिकारच आहे. पण चुकूनही `या वयात सुद्धा?’ हा प्रश्न त्याला विचारू नका. कारण दिलीप प्रभावळकर हा एक चिरतरुण उमदा, कलाकार, लेखक आणि सच्चा माणूस आहे.

 

Previous Post

अ‍ॅसिडिटी थांबली, पण अन्य व्याधी जडल्या..

Next Post

वडाप!

Next Post
वडाप!

वडाप!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.