• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भगव्याचं मोहोळ उठवा!

योगेंद्र ठाकूर (बेधडक)

marmik by marmik
January 17, 2026
in विशेष लेख
0
भगव्याचं मोहोळ उठवा!

गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. महायुतीला त्यांत यश मिळाले तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. महाराष्ट्र राज्याचे एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि दोन डझन मंत्री हे निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरले होते. सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला. पैशांच्या बॅगा रिकाम्या केल्या. आश्वासनांची खैरात केली. हे कमी म्हणून की काय, दिमतीला निवडणूक आयोग होताच. याच्या उलट महाविकास आघाडीतील राष्ट्रावादी (शप)चे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही निवडणूक स्थानिक खासदार, आमदार आणि नेत्यांवर सोपवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या/पदाधिकार्‍यांच्या निवडणुका असतात हे कृतीने दाखवून दिले. दिल्ली ते गल्लीपर्यंत आमचीच सत्ता हवी अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाने सत्तास्थानाचा गैरवापर करीत निवडणुका जिंकल्या. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसले तरी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका लढण्यासाठी मविआ सज्ज झाली आहे. पराजयाचे सारे हलाहल पचवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा निवडणुकीत जोशाने उतरला आहे.

यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक विशेष महत्त्वाची आहे. कारण गेली ३० वर्षे मुंबईवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. यावेळी शिवसेनेला नेस्तनाबूत करून सत्ता मिळवण्यासाठी भाजपा-शिंदेसेना जंग-जंग पछाडत आहे. शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप, कोविडकाळातील कथित अनियमित कामाची प्रकरणे उकरून काढून शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेना विजयी झाली तर कुणी तरी ‘खान’मुंबईच्या महापौरपदी बसेल अशी ‘बांग’भाजपकडून दिली जात आहे. तेव्हा ‘मुंबईचा महापौर हा मराठीच असेल, ठाकरेंचाच असेल’असे त्याला तोडीस तोड उत्तर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिले जात आहे. शिवसेना-मनसे युती झाल्यामुळे भाजपा नेते बिथरले आहेत त्यामुळे ते वाटेल ते बरळतात. त्यामुळे मुंबईसह बर्‍याच महापालिका निवडणुकांत महायुती फुटलेली पहावयास मिळते. शिस्त आणि संस्कृतीचा टेंभा मिरवणार्‍या भाजपाकडून ‘राडासंस्कृती’पाहावयास मिळाली. त्यांच्या राजकीय व्यभिचाराची जनतेलाही किळस वाटते आहे. मुंबईत महाराष्ट्रद्रोही भाजपा-महायुतीला धडा शिकवण्याची नामी संधी मराठी माणसाला चालून आली आहे.

१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ऑगस्ट १९६७मध्ये शिवसेनेने ठाणे नगरपरिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून ठाण्यावर विजयाचा झेंडा फडकवला. त्यानंतर शिवसेनेचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे वळणे स्वाभाविक होते. सुरुवातीपासूनच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र शिवसेनेने अंगीकारले होते आणि त्यानुसार वाटचाल सुरू होती. मार्च १९६८मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उतरली आणि भल्याभल्यांना पराभवाची धूळ चारली. मुंबईत प्रथमच लढवलेल्या या निवडणुकीत शिवसेनेला ४२ जागा मिळाल्या. शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. मुंबई-महाराष्ट्रात एक भगवी पहाट उगवली. या देदीप्यमान विजयाने मराठी माणूस आनंदला. शिवसैनिक सुखावला.

मग १९७१ सालच्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. मुंबई-ठाण्यातील विजयामुळे शिवसैनिकांतील आत्मविश्वास दुणावला होता. शिवसेना लोकसभा निवडणुकांच्या लढाईत प्रथमच उतरली. भरपूर प्रचार करूनही शिवसेनेला अपयश आले. शिवसेनेचे दोन खंदे शिलेदार मनोहर जोशी आणि दत्ता प्रधान यांच्यासह शिवसेनेचे सर्व उमेदवार पराभूत झाले. १९६७ व १९६८ सालच्या महापालिका निवडणुकीतील घवघवीत यशानंतरच्या या पराभवाचा शिवसेनेला फार मोठा धक्का बसला. मात्र शिवसेनाप्रमुख स्वतः खचले नाही आणि त्यांनी शिवसैनिकांनाही खचू दिले नाही. १९७६ साली आणीबाणी घोषित झाली. त्यानंतर झालेल्या १९७८च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्रात ३८ जागांवर उमेदवार उभे केले होते. जनता पक्षाच्या लाटेत शिवसेनेच्या दारूण पराभवानंतर राजकीय विरोधक आणि वृत्तपत्रांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली. शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला म्हणून शिवसेनेची वाताहत झाली असे म्हणत तोंडसुख घेतले. त्यावर मार्मिकच्या मार्च १९७८च्या अंकात ‘मुंबई महाराष्ट्राची, नाही कुणाच्या बापाची’असा अग्रलेख लिहून बाळासाहेबांनी समाचार घेतला. ‘‘होय आमचा पराभव झाला! तो पराभव मान्य करण्याइतकी दिलदारी आमच्याकडे निश्चित आहे आणि आम्ही तो मान्यही केला. निवडणुकीच्या प्रांगणात उतरताना पराभवाची तयारी ठेवावीच लागते. असे पराभव आम्ही आतापर्यंत अनेक पाहिले आहेत व पचवले आहेत. त्यामुळे या पराभवाने खचण्याइतका आमचा मणका ठिसूळ राहिलेला नाही.’’

नंतर १९७८मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेवर पराभवाची नामुष्की ओढवली. शिवसेनेचे अवघे २१ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांतूनही पराभव चाखावा लागला तरी शिवसैनिक खचला नाही. उमेद गळून पडली नाही. कारण बाळासाहेबांनी शिवसैनिकाला कधी नाउमेद होऊ दिले नाही. समाजसेवेचे असिधारा व्रत अंगिकारिलेल्या शिवसेनेचे सामाजिक कार्य सुरूच होते. एप्रिल १९८५मध्ये मुंबईतील निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली. त्यात १७० जागांपैकी ७४ जागांवर घवघवीत यश प्राप्त झाले. शिवसेनेला बहुमत मिळाले आणि मुंबई महापालिकेवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकवला. मुंबई महाराष्ट्राचीच, मराठी माणसाचीच आणि शिवसेनेचीच, हे शिक्कामोर्तब झाले.

नंतर १९९०च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आले होते, तर विरोधी पक्षनेतेपदी मनोहर जोशी यांची निवड झाली होती. १९९१च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेचे नेते छगन भुजबळ यांनी १४ आमदारांसह शिवसेना सोडली. शिवसेनेत फूट पडल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमावावे लागले. शिवसेनेला हा मोठा धक्का होता. या धक्क्यातूनही शिवसेना हतबल झाली नाही. शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रात दौरा केला. संघटनात्मक पुर्नबांधणी केली, शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण केले. तो पुन्हा लढण्यासाठी सज्ज झाला. त्याची परिणती शिवसेनेच्या अभूतपूर्व यशात झाली. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ७३ आमदार निवडून आले. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे शिवशाही सरकार स्थापन झाले. शिवसेनाप्रमुखांनी पराजयाचे चक्र उलटे फिरवून शिवसेनेला देदीप्यमान विजय मिळवून देऊन महाराष्ट्राच्या सत्तासिंहासनावर बसवले.

२००५ साली नारायण राणे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली आणि शिवसेनेत फूट पाडली. २००२ साली उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली होती. संघटना वाचण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात झंझावती दौरे करून शिवसैनिकात एकजुटीची भावना रुजवली. नवचैतन्य निर्माण केले. झाले गेले विसरून लढण्यासाठी हिंमत दिली. २००७ साली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश प्राप्त झाले. मुंबई-ठाणे-डोंबिवली-नाशिक या महानगरपालिकांवर शिवसेनेचा झेंडा फडकवला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले.

२०१४ साली भाजपाच्या लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर भाजपाच्या डोक्यात विजयाचा कैफ चढला. शिवसेनेबरोबची २५ वर्षांची युती भाजपाने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तोडली. मग उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराची राळ उडवली. भाजपाविरोधात रान उठवले आणि एकहाती शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात राजकीय पंडितासाठी हा चमत्कार होता. भाजपाची भाटगिरी करणार्‍या पत्रकारांचे सारे आराखडे फोल ठरले व आकडेही फेल ठरले.
२०१९ साली विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपा युती एकत्रित लढली. पण भाजपाने शिवसेनेला दिलेले मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन पाळले नाही. पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेचा विश्वासघात झाला. मग उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी स्थापून सत्ता स्थापली. महाराष्ट्रात अडीच वर्ष यशस्वी कारभार केल्यानंतर शिवसेनेतील महत्त्वाकांक्षी गद्दारांनी शिवसेना फोडली आणि भाजपाशी हातमिळवणी करून मिंधेंनी मुख्यमंत्रीपद मिळवले. २०२४च्या लोकसभा निवडणुकती मोदी-शहा यांचा देशभर उधळलेल्या वारूला महाराष्ट्रात वेसण घालण्याचे काम महाविकास आघाडीने केले. त्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांना निश्चितच जाते. शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले. अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला तर तीन उमेदवार १० ते २० हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. महाराष्ट्रात मविआचे ३१ खासदार निवडून आल्यामुळे विधानसभेतही विजयाची पुनरावृत्ती होईल असे राजकीय जाणकारांना वाटत होते. पण घडले उलटेच. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीला फक्त ५० जागा मिळाल्या. शिवसेना २०, काँग्रेसला १६ तर राष्ट्रवादीला १४ जागा मिळाल्या. महायुतीला २३५ जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत मविआच्या पारड्यात भरभरून मते टाकणार्‍या महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीला भरघोस मतांनी विजयी केले. ईव्हीएम मशीनच्या गैरवापराचा आणि महाघोटाळ्याचा आरोप सर्वत्र होत आहे. या सगळ्या त्सुनामीत शिवसेनेला २० जागा मिळाल्या. कारण शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. शिवसैनिक निवडणुकीत हरला तरी त्याचे समाजसेवेचे कार्य सुरूच राहते. शिवसेना जय-पराजयाची चिंता करीत नाही. पराजयाने शिवसैनिक खचून जात नाही. ते हलाहल पचवून पुढच्या निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी शिवसैनिक व मनसेसैनिक सज्ज आहेत.

मराठी माणसा, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची शपथ तुला. पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवाव्या लागतील. महायुतीच्या भ्रष्टाचारी ‘रावणा’ला जाळण्यासाठी तुला ‘राम’बनावे लागेल. घटनाबाह्य काम करणार्‍या महायुतीच्या ‘कौरवांना’संपवण्यासाठी तुला ‘पांडव’व्हावे लागेल. महाराष्ट्राला रसातळाला देणार्‍या महायुतीच्या ‘कंसा’चा वध करण्यासाठी तुला ‘श्रीकृष्ण’बनावे लागेल. मुंबईचा लचका तोडणार्‍या आणि अत्याचार करणार्‍या भाजपाच्या ‘रेहमान डवैâतचा’खात्मा करण्यासाठी तुला ‘धुरंधर’बनावे लागेल. शिवसेनेचा झेंडा मुंबई मनपावर कायम डौलाने फडकलाच पाहिजे. त्यासाठी भगव्याच मोहोळ उठवा! उठा, सज्ज व्हा…!!

 

Previous Post

हीच तर निवडणुकीची गंमत आहे…

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.