एका हुकूमशहानं दुसर्या हुकूमशहाला घालवलं.
अमेरिकेनं वेनेझुएला हा देश आक्रमण करून जिंकला आहे. अमेरिकेनं १५० अत्याधुनिक लढाऊ विमानं पाठवून वेनेझुआलाच्या राजधानीत अध्यक्ष निकोलस मदुरो यांना अटक करून अमेरिकेत नेलं आहे. पुढला काही काळ वेनेझुएलातलं सरकार आपण चालवणार, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.
गेले काही महिने अमेरिकन नौदल आणि हवाई दल वेनेझुएलाची जहाजं जप्त करत होतं, नष्ट करत होतं. ती जहाजं ड्रगची तस्करी करत असत, अमेरिकेचं तेल चोरत असत, असं प्रेसिडेंट ट्रम्प यांचं म्हणणं होतं. वेनेझुएलातून येणार्या ड्रग्जमुळं अमेरिकेत लाखो लोकं मरतात, असा ट्रम्प यांचा दावा होता. तसंच वेनेझुएलन गुन्हेगार अमेरिकेत बेकायदा घुसत असतात असंही ट्रम्प म्हणत होते. वेनेझुएलानं नीट वागावं नाही तर तिथलं सरकार बदलावं लागेल, असंही ट्रम्प गेले काही महिने ट्रम्प म्हणत होते.
निकोलस मदुरो गेली १२ वर्षं वेनेझुएलाचे अध्यक्ष होते. मदुरो ट्रक ड्रायव्हर होते. त्यांनी ड्रायव्हरांची युनियन चालवली. वेनेझुएलाचे माजी समाजवादी अध्यक्ष ह्युगो शावेझ यांचे मदुरो हे शिष्य. शावेझ यांच्या मृत्यूनंतर अध्यक्षपद मदुरो यांच्याकडं चालत आलं. मदुरो अफरातफरी, दंडेली करून निवडणुक जिंकत असा आरोप होता, जबाबदार संस्थांनी या आरोपात तथ्थ्य असल्याचं म्हटलं होतं. मदुरो हुकूमशहा आहेत, ते विरोधकांचे गळे दाबतात, त्यांना मारून टाकतात; वृत्तपत्रांना वेनेझुएलात स्वातंत्र्य नाही असा आरोप वेनेझुएलातले विरोधी पक्ष करत असत. मदुरो यांच्या दंडेलीविरोधात आंदोलन करणार्या मारिया मचाडो यांना देश सोडून अज्ञातवासात जावं लागलं होतं. यंदा त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे.

ड्रग आणि तेल हे वेनेझुएलातले दोन मोठे उद्योग आहेत. पैकी तेल उद्योग देशमालकीचा झालाय, ड्रग उद्योग खाजगीच आहे. ड्रग उद्योगाचा वेनेझुएलन समाजावर पगडा आहे, राजकीय पुढारी त्या उद्योगाच्या पैशावर सरकारं काबीज करत असतात. मदुरो ड्रग उद्योगाचे अनधिकृत संचालक आहेत असा आरोप होत असे. दोन्ही उद्योगातलं उत्पन्न पुढारी आणि धनिक यांच्या खिशात जातं, देश मात्र टंचाई आणि महागाईचा शिकार झाला, हे वेनेझुएलातलं वास्तव आहे. परिणामी वेनेझुएलातली बहुसंख्य प्रजा त्रस्त होती. त्यांना मदुरो यांची राजवट मान्य नव्हती. प्रजा उघडपणे म्हणत असे की अमेरिकेनं हस्तक्षेप करून मदुरो यांचं सरकार बरखास्त करावं. त्यामुळंच जनतेनं अमेरिकेच्या कारवाईचं स्वागत केलं आहे.
महासत्ता झाल्यापासून अमेरिकेनं (युएसए, उत्तर अमेरिका) दक्षिण अमेरिकेला आपल्या ताटाखाली ठेवण्याचा प्रयत्न सतत केला. दक्षिण अमेरिकेतलं तेल आणि इतर साधन संपत्ती युएसला हवी होती. दक्षिण अमेरिकेतली सरकारं आपल्या मर्जीनुसार चालतील असा प्रयत्न युएस करत असे. तिथली अनेक सरकारं अमेरिकेनं नाना प्रकारे पाडली आहेत, अनेक वेळा मर्जीतली बाहुली तिथं बसवली आहेत. अमेरिकेचं हे वर्तन देशप्रेमापोटी, देशाच्या हितासाठी होतं काय? काही लोकांना तसं वाटतं. अमेरिकेचा हा उद्योग भांडवलशाही-बाजारकेंद्री आहे असं डाव्यांचं, समाजवाद्यांचं म्हणणं आहे.
इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट मान्य करावी लागते की अमेरिका हे ब्रिटन-फ्रान्स -पोर्तुगीझ-स्पॅनिश इत्यादींप्रमाणंच एक साम्राज्य आहे. चीन, जपान, फिलीपीन्स हे देशही अमेरिकेनं स्वतःच्या ताटाखाली ठेवले होते. अमेरिकेवर शिक्का कुठलाही मारा, अमेरिकेला द.अमेरिका-वेनेझुएलात इंटरेस्ट आहे हा भाग महत्वाचा. मदुरो हुकूमशहा होते की नाही? होते. मदुरो भ्रष्ट होते की नाही? होते. मदुरो समाजवादी होते की नाही? होते. या सर्वाची बेरीज होऊन मदुरो वेनेझुएलाचे अध्यक्ष होते. वेनेझुएलाचा त्रास अमेरिकेला होत होता की नाही? होत होता. त्यामुळं अमेरिकेला वेनेझुएलाचं काही तरी करणं भाग होतं.

पण शेवटी तो एक स्वतंत्र देश आहे. तिथं कशा कां होईना निवडणुका होतात. तिथली जनता आणि तिथलं राजकारण हा त्यांचा प्रांत. अशा प्रांतात इतर देशांनी अशा प्रकारे हस्तक्षेप करणं कितपत योग्य? इराणमधली जनता इराणी सरकारच्या कामगिरीवर नाराज आहे. तिथं जनता आंदोलन करत आहे. ट्रम्प म्हणाले की अमेरिका कुठल्याही क्षणी इराणमधे हस्तक्षेप करणार आहे.जगभर प्रत्येक देशात जनतेत असंतोष आहे. अनेक कारणांसाठी जनतेचा तिथल्या सरकारांवर रोष आहे. बर्याच ठिकाणी सरकारं भ्रष्ट मार्गानं निवडून आलीत असा आरोप होतोय. जगभरच्या जनतेत मतमतांतरं आहेत. अमेरिका प्रत्येक देशात जाऊन तिथली सरकारं बरखास्त करणार आहे काय? खुद्द अमेरिकेतच ट्रम्प यांच्यावर भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीचे आरोप आहेत. चीन किंवा कुठल्याही शक्तिवान सत्तेनं अमेरिकेत घुसून ट्रम्पना अटक करून अमेरिकन सरकार ताब्यात घ्यावं काय?
हिटलरनं उच्छाद माजवला, सार्या जगाला त्याचा त्रास झाला. हिटलरविरोधात लढाई करावी लागली. जगानं एकत्र येऊन काही एक विचार करून जर्मनीविरोधात लढाई केली. लढाई करणार्या देशांचे स्वार्थ त्यात होते की नाही? नक्कीच होते. पण त्या स्वार्थापलिकडच्या गोष्टी हिटलरच्या उद्योगात गुंतलेल्या होत्या. कुठल्याही देशात हस्तक्षेप करत असताना खूप विचार व्हायला हवा. शेवटी तिथली माणसं आणि त्यांचं नशीब हाही भाग असतोच. एखाद्या देशाचा त्रास होत असेल तर स्वतःचा बचाव करणं हाही मार्ग असतो. त्या देशात घुसून तो ताब्यात घेणं योग्य नाही.
अमेरिकेनं अफगाणिस्तानातली सत्ता बदलली, तिथं राज्य केलं. अफगाणिस्तानचं काय झालं? अमेरिकेनं इराकवर आक्रमण केलं, इराकची सत्ता चालवली. इराकचं काय झालं? अमेरिका वियेतनाममधे घुसली, वियेतनामची वाट लावली. आता वेनेझुएलाची वाट लावणार. वेनेझुएलाचा सत्ताधारी नालायक असेल. शेवटी वेनेझुएलाच्या जनतेनंच त्यातून वाट काढायला हवी. ट्रम्प नावाच्या एका भ्रष्ट हुकूमशहानं मदुरो नावाच्या हुकूमशहाला हाकलून लावणं या घटनेला विनोद म्हणता येईल काय?

