• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अरे संसार संसार…

ऋषिराज शेलार (अर्ध्या मुर्ध्या गोष्टी)

marmik by marmik
January 10, 2026
in विशेष लेख
0
अरे संसार संसार…

अर्ध्या संध्याकाळ झाली तसा कामावरून गावात आलाय. गावात आलाय म्हणजे कामावरील सुपरवायजरने मोटारसायकलने त्याला फाट्यापर्यंत लिफ्ट दिलेली. तेथून तो डुलत डुलत गावात शिरलेला. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे. गल्लीगल्लीतील ओळखीच्या सार्‍यांना हात दाखवत आवाज देऊन काही बोलत तो पुढे जातोय.

चौकातल्या कडुनिंबाच्या झाडाखालच्या पारावर अर्ध्या येऊन बसतो. इथून समोरच ‘जय संताजी’ किराणा स्टोअर्स आहे. तिथे उशिरापर्यंत गिर्‍हाईकांची वर्दळ असतेच. आजही बरीच वर्दळ, गर्दी दिसतेय. कुठला सण तर इतक्यात नाही ना? अशी शंका यावी इतकी!
‘भुर्‍या कधी येतोय? आँ?… एवढा वेळ?… आता रात्रीच्या काय माश्या मारू का इतका वेळ?… हां! ये लवकर! एकटा बसलोय भुतावानी!’ किती वेळ एकटं राहणार ना? कोणीतरी कंपनी द्यायला पाहिजे की नको? म्हणून अर्ध्यानं मोबाईल काढून भुर्‍याला आवत्नं दिलं. घरी जाऊन बी करणार काय? तेच रोजचे तोंडं पाहायचे! आठ-नऊपर्यंत बॅकग्राउंडला मोठ्या आवाजात टीव्ही वाजणार, त्यात घरातले डाच करणार! त्यानंतर नऊला खाली मान घालून दोन घास गिळायचे अन् कवटीत डोळे घालायचे. हाच घरी गेल्यानंतरचा रोजचा नित्यक्रम! कटकटीचं कारण तेच… न मिळणारी परमनंट नोकरी. न जुळणारे लग्न. थातुरमातुर इतर कारणं!

त्यावर एवढ्यात अर्ध्यानं उपाय शोधलाय. उशिरा घरात जायचं. तोवर अर्धं घर पेंगलेलं असतं. फारतर डोळे किलकिले करून कुणीतरी बघतं वा घोरण्याची नवी लकेर छेडतं. त्यात सगळ्यांना ओलांडून टोपल्यापर्यंत पोहोचायचं. एकदोन भाकरी कुस्करून ताटात घ्यायच्या, वर पळीभर भाजी वतायची, गरगुट करायचा आणि गिळायचा. की झालं जेवण! खरकटे भांडे नीट कोपर्‍यात ठेवून द्यायचे. मग आपणच आपलं अंथरूण घालायचं नि निमूटपणे झोपून घ्यायचं! शांततेत! अशानं किमान शांत झोप तरी मिळते.

अर्ध्या पुन्हा मोबाईल चाळतो. दोन मोटारसायकल जवळ येऊन थांबतात.

‘अर्ध्या आज लवकर आलास?’ एकजण नाकावरची मफलर आणखी घट्ट ओढत विचारतो.

‘नाही रे! रोजचीच वेळ नं ही!’ अर्ध्या पुन्हा शंकेनं मोबाईलमधील वेळ तपासत बोलतो.

‘अरे लग्न झालंय तिचं! आतातरी सोड तिला!’ अर्ध्याच्या नजरेसमोरील किराणा दुकानाशेजारच्या घरातील परतमुळासाठी आलेल्या नि

भांडे घासणार्‍या कुणा नवविवाहितेकडं बघून दुसर्‍या मोटारसायकलवरील दुसरा अर्ध्याची खेचू बघतो.
‘ऐ बाबा! काही बोलू नको! तिचा भाऊ माझी खेटराने दृष्ट काढील.’ अर्ध्या भिऊन बोलतो. का ओढवून संकट घ्यायचं? आधी काही डोकेदुखी कमी आहे का?

‘अरे तू ह्या… याला पाह्यलं का? काय नाव रे…?’ पहिला अर्ध्याला प्रश्न विचारताना शेजारी असलेल्या दुसर्‍याकडे बघतो.
‘त्याचाच फोन येतोय, बघ! (कानाला मोबाईल लावतो.) आँ?… आलो! (शेजारच्याकडे बघत) ऐ, चल तो
हॉस्पिटलजवळ थांबलाय… हां थांब आलोच!’ बोलत कान-खांद्यामध्ये मोबाईल ठेवत वाकड्या मानेनं दुसरा गाडीला किक मारतो. त्यापाठोपाठ पहिलाही गाडी स्टार्ट करून निघून जातो.

‘ही बेणी बी गेली!’ अर्ध्या चरफडतो.

तितक्यात मागून अरुण येताना दिसतो. हातात एक पिशवी. पाठीला पोक काढून खाली मान घालून हाताच्या बोटावर कसलीतरी

आकडेमोड करत तो चाललाय.

‘का रे अरुण? किराणा का?’ अर्ध्या अरुणला हटकतो.

‘अँ? हां हे थोडे सामान घ्यायचे होते.’ केवळ उत्तर म्हणून अरुण उत्तर देतो.

‘काय मटण मसाला की मशरूम घेतोस मग?’ अर्ध्या त्याची मस्करी करू बघतो.

‘नाही रे! हे चहा-साखर, मीठ-साबण नेहमीचंच!’ अरुण मात्र त्याच्याच गणगणीत उत्तर देतो.

‘आज लवकर आलास का?’ अर्ध्या सरळ प्रश्न करतो.

‘हां थोडं घरी काम होतं.’ अरुण शांतपणे उत्तर देतो.

‘झालं असंल की मग! बस थोडा वेळ. तू असा पोरांत पहिल्यासारखं बसतच नाही.’ अर्ध्या त्याला थांबवू पाहतो. वेळ घालवायला कुणी सोबत नको? एकतर भुर्‍या येईना! मग असं एकट्यानं कितीवेळ बसणारे कोणी?
‘नाही, मला जावं लागंल! परत हे सामान घरी नेऊन द्येयचं आहे. परत सैंपाकाला…’ अरुणची जीभ अडखळते. चेहरा उतरतो. अर्ध्या काय समजायचं ते समजतो.

‘अरे जा मग! पण एखाद्या दिवशी निवांत ये! बोलू जरा! ‘ अर्ध्या त्याला जाऊ देतो.

हा अरुण कुठेतरी कपड्याच्या की भांड्याच्या दुकानात काम करतो. महिना पंधराएक हजार मिळत असतील. त्यात सहासात वर्षे झाली, तेव्हा बापानं लग्न लावून दिलं होतं त्याचं. त्यावेळी वाटलेलं, आयला! याचं लग्न झालं आणि आपलं होईना? बरोबरची सगळी पोरं चाट पडली होती. बायको बी दिसायला बरी मिळाली होती. पण नव्याची नव्हाळी! जसजसे दिवस गेले तसे त्याला तापल्या तव्याचे चटके बसू लागले. प्रपंच हातावरचा. पगार बेताचा. घरात खाणारी चार तोंडं. त्यात तीन वर्षांत आणखी दोन वाढली. त्यात साखरपुडा, दिवट्या, लग्न, परतमुळ-सत्यनारायण, डोहाळे, बाळंतपण असा क्रम लागत गेला. त्यात कमाई आठाण्याची, खर्च दीड रुपड्याचा झाला, त्यात गड्याचा कणा वाकला. आधी रुबाबात गाड्यांवर मित्रांसोबत धूर सोडत पळायचा. जबाबदारी आणि प्रपंच मागं लागल्यापासून मात्र वाघाचा अगदी बैल झाला. आधी दिलखुलास हसत असायचा. आता हसला तरी करुण वाटतो. मागं काहीतरी कुठून काही फायनान्स काढलं होतं म्हणे त्यानं! त्यात आणखी हालत खराब झाली, त्यामुळं पाठीचा बाक वाढला. आता तो कायम उदासवाणा दिसतो. चिंताग्रस्त. त्यात आजारपण, दवाखर्च वगैरे संकटकालीन खर्च अशी भर पडल्यानं गडी कोमेजल्यासारखा दिसतो.

तो समोर किराणा दुकानात पोहोचला. आधीच्या एकदोन जणांपाठोपाठ नंबर न लावता जरा मागेच रेंगाळला, त्यात आणखी एकदोन जणांनी नंबर लावून सामान घेतलं, तोवर अरुण बाजूलाच उभा! अर्ध्याचं पारावरून सारं लक्ष अरुणकडं! तो घेतोय काय? घेतोय किती? हे त्याला पहायचंच होतं. अखेर कुणी न उरल्याचं बघून तो पुढे सरकतो. एकदोन चीजवस्तूंची नाव हळुवार सांगतो. त्यात हाती पडलेल्यात कमी दर्जाची, हलक्या प्रतीची अथवा नव्या ब्रँडची स्वस्त वस्तूंची माहिती घेतो. एक हात पँटच्या खिश्यात घालून चारवेळा पैसे आतल्या आत बोटाने मोजून बघत पुन्हा ‘यात कमी किंमतीची नाही का?’ वा ‘छोटं पॅकेट कितीला मिळेल?’ असल्या चौकश्या करून भावाची थोडीफार घासाघीस करून बघतो. अखेर काही थोड्याफार वस्तू घेऊन तो तिथून निघतो. फक्त पुन्हा अर्ध्याकडे न वळता दुसरा रस्ता पकडतो. बहुतेक त्यानं अर्ध्याला बघितलं असावं की तो लक्ष ठेऊन आहे म्हणून. म्हणजे माघारी जाताना अर्ध्या पुन्हा हटकेल अशी शक्यता दिसल्यानेच तो वेगळी वाट धरतो.

‘अय अर्ध्या, मोबाईल कुठंय तुझा? किती फोन करायचे? पोरं पुतळ्याजवळ जमलेत सारे ग्रुपचे! तुला फोन करू राहिलो तर तू इथंच पुतळ्यावानी बसलाय! ऊठ चल!’ भुर्‍या पल्सर घेऊन पाराजवळ येतो. अन् हॉहॉर्न वाजवून अर्ध्याचं लक्ष वेधतो.

अर्ध्या आहे कुठं?

तो मनानं अरुणच्या अर्ध्या पिशवीत काय काय सामान आहे? हे डोकवायला धावलाय बहुतेक. पण भुर्‍याच्या हॉर्ननं त्याची तंद्री भंगते.
‘हा आलोच एक मिनिटांत!’ अर्ध्या भुर्‍याकडं न बघताच त्याला थांबायला सांगत कधीचा स्विच ऑफ पडलेला मोबाईल स्विच ऑन करत किराणा दुकानात जातो. काउंटरवर असलेल्या पोराला पाठमोर्‍या दूर गेलेल्या अरुणकडे बोट दाखवत ‘त्यानं काय घेतलं?’ एवढं विचारतो.
‘तो? सायको? तो दीड-दोनशे रुपडे घेऊन येतो. न् त्यात कोणकोणतं सामान नेता येईल? याची बेरीज-वजाबाकी करकरून सामान घेतो. एखादा आयटम महाग असला तर डायरेक घेतच नाही. आणि ह्याच टायमाला शक्यतो येतो, म्हणजे पहायला कुणी नसंल हे बघून!’ पोरगा हसून उत्तर देतो. अर्ध्या ऐकून घेतो.

‘ऐ अर्ध्या! तू अर्धवट आहेच पण येडाबिडा बी आहे काय रे? तुला चल म्हणतोय तर्…’ भुर्‍या निर्वाणीचा आवाज देतो.
‘चल!’ अर्ध्या माघारी येऊन गाडीवर बसत भुर्‍याला फक्त एक शब्द बोलतो. त्याच्या डोक्यात केवळ अरुण बसलेला.
त्या रस्त्यावरून पथदिव्यांच्या उजेडाच्या लपंडावात जात असताना अर्ध्या स्वतः बद्दल विचार करू लागतो. उदाहरणार्थ, त्याचंच लग्न झालं नि बायको घरात आली, तर् ह्या टेम्पररी नोकरीत येणारा पगार, खाती तोंडं वाढल्यावर येणारा खर्च ह्या सार्‍यांची बेरीज-वजाबाकी करून बघत तो महिन्याच्या खर्चाचा ताळेबंद मांडून बघत जातो.

‘आयला, ह्याच्यापेक्षा गोसावडा बनलेलं बरं!’ अर्ध्याच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडतात. कदाचित भुर्‍याच्या कानापर्यंत ते पोहोचत नाहीत.

 

Previous Post

कशासाठी? पोटासाठी!

Next Post

वेगे वेगे धावू, पण पदकांपर्यंत जाऊ का?

Next Post
वेगे वेगे धावू, पण पदकांपर्यंत जाऊ का?

वेगे वेगे धावू, पण पदकांपर्यंत जाऊ का?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.