प्रसिद्ध सिनेलेखक, कवी, गीतकार आणि बुद्धिवादी नास्तिक विचारवंत जावेद अख्तर आणि इस्लाम धर्माचे विद्वान संशोधक, लेखक मुफ्ती शमाईल नदवी यांच्यात लल्लनटॉप या यूट्यूब
चॅनेलवर झालेली आस्तिकता आणि नास्तिकता विषयावरील चर्चा गाजली. असा विषय आजच्या काळात चर्चिला गेला, हेच मोठे यश. अर्थात, ही चर्चा ठीकठाकच म्हणावी लागेल. कारण अशा गहन, गुंतागुंतीच्या आणि हजारो वर्षांच्या वैचारिक परंपरेत रुजलेल्या विषयावर पुरेसा वेळ तिथे दिला गेला नाही. मुळात हा हजारो वर्षं चर्चिला जाणारा विषय एका छोट्याशा कार्यक्रमातून दोन माणसांच्या वादविवादातून अंतिम निर्णयाला पोहोचेल अशी आशाही व्यर्थच आहे. अत्यंत मर्यादित वेळेत असे प्रश्न ‘सोडवणे’ किंवा त्यावर सखोल चर्चा करणे प्रत्यक्षात अशक्यच असते. मात्र, आजच्या विषारी, ध्रुवीकरण झालेल्या काळात लल्लनटॉपचा संपादक सौरभ द्विवेदी आणि त्याच्या टीमने हा वादग्रस्त विषय इतक्या संयमाने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि सभ्यतेच्या चौकटीत राहून मांडला, हेच मुळात अधिक आश्चर्यकारक आणि निश्चितच कौतुकास्पद आहे.
चर्चेचे नियम
या चर्चेवर चर्चा सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची अट स्पष्ट करून घ्यावी लागते—या चर्चेत आणि या लेखात ‘खुदा’ हा शब्द जिथे येईल, तिथे तो ‘देव’ या समानार्थी, सामान्य शब्दासाठी वापरलेला आहे. तो ‘अल्लाह’ या विशिष्ट इस्लामी ईश्वर-संकल्पनेसाठी नाही, किंवा इतर कोणत्याही धर्मातील खास ईश्वर-संकल्पनेसाठीही नाही. देव आणि खुदा हे जनरल, म्हणजेच कॉमन शब्द आहेत. देव कुठल्याही धर्मातील असू शकतो; ऊर्दूमध्ये त्यालाच खुदा म्हणतात. एका ठिकाणी ‘अल्लाह’ हा शब्द वापरला गेल्यावर जावेद साहेब थोडे सावध झाले आणि त्यांनी तात्काळ तो शब्द बदलून पुन्हा ‘खुदा’ असा उल्लेख केला. यामागे एक स्पष्ट व्यवहार्य कारण आहे. कोणत्याही धर्मातील माथेफिरू, धर्मांध व्यक्तीकडून आपले अनैसर्गिक मरण ओढवून घेऊ नये. हा निव्वळ शहाणपणाचा व्यवहारवाद आहे. कुणालाही अकाली मरण आवडत नाही.
महत्त्वाचे म्हणजे, ही चर्चा देवाच्या अस्तित्वावर होती; त्यामुळे धर्म हा विषय मुद्दाम चर्चेच्या बाहेर ठेवण्यात आला होता.
चर्चेची सुरुवात
चर्चेची सुरुवात मुफ्ती शमाईल नदवी यांनी केली. सुरुवातीपासूनच त्यांची भूमिका काहीशी आक्रमक वाटत होती. त्यांनी आधीच दोन-तीन वैचारिक वर्तुळे आखून घेतली होती, जेणेकरून चर्चा सुरू होताच ती एका अर्थाने संपुष्टात यावी. त्यांचा पहिला मुद्दा असा होता की देव अस्तित्वात आहे की नाही, याचा शोध विज्ञानाच्या आधारे घेणेच चुकीचे आहे. विज्ञान हे मुळात चुकीचे टूल आहे. हा युक्तिवाद म्हणजे आधी झाडावर बाण मारायचा आणि मग त्या बाणाभोवती वर्तुळ आखायचे आणि मग बाण नेमका लक्ष्यावरच लागला, असा दावा करायचा. मुफ्ती नदवी यांचे म्हणणे होते की विज्ञान कधीच देव आहे की नाही हे सिद्ध करू शकत नाही. कारण विज्ञान हे एम्पिरिकल एव्हिडन्स म्हणजे मानवी इंद्रियांना जाणवणार्या, तपासता येणार्या पुराव्यांवर आधारलेले असते. विज्ञानाचा संबंध केवळ भौतिक वास्तवाशी आहे— दिसणार्या, मोजता येणार्या, निसर्गातील वस्तूंशी. मात्र देव हे आधिभौतिक म्हणजेच सुपरनॅचरल वास्तव आहे. त्यामुळे जी साधने आपण भौतिक वास्तवासाठी वापरतो, ती या आधिभौतिक वास्तवासाठी वापरता येणार नाहीत.
मुफ्ती नदवी सातत्याने इंग्रजी शब्द वापरत होते,हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पण त्याचवेळी त्यांनी आणखी एक वर्तुळ आखले आणि त्यात बाण मारला. तो असा की, देव आहे की नाही याबाबत विज्ञानाच्या आधारे दिले जाणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे ग्राह्यच धरले जाणार नाहीत. म्हणजेच चर्चेचे नियम मुफ्ती यांनी स्वत:च्या सोयीसाठी आधीच ठरवून टाकले होते. त्यांचा तिसरा मुद्दा म्हणजे रिव्हिलेशन म्हणजे प्रकटीकरण. आजच्या काळात प्रकटीकरण हे चर्चेचे मानक ठरू शकत नाही, कारण लेखकाच्या मते प्रकटीकरण हा ज्ञानाचा स्रोत आहे, तर जावेद अख्तर यांच्या मते तो ज्ञानाचा स्रोत नाही. त्यामुळे या चर्चेसाठी ते मानक ग्राह्य धरता येणार नाही.
शब्दाचा गोंधळ
मुफ्ती शमाईल नदवी सतत कॉन्टिन्जन्सी हा शब्द वापरत होते. सुरुवातीला त्याचा अर्थ जावेद यांना समजत नव्हता; मलाही तो स्पष्ट नव्हता. शेवटी जावेद साहेबांनी थेट त्या शब्दाचा अर्थ आणि संदर्भ विचारला, तेव्हा कुठे त्याचा अर्थ स्पष्ट झाला. एखादे विधान कॉन्टिन्जंट (आकस्मिक) असते, म्हणजे ते ना अनिवार्यरित्या सत्य असते ना अनिवार्यरित्या अशक्य असते. ते खरेही असू शकते किंवा खोटेही, ते प्रत्यक्ष परिस्थितीवर अवलंबून असते.
अनिवार्य सत्य हे नेहमी आणि सर्व संभाव्य जगांमध्ये खरे असते (उदा. २ +२ = ४) त्याउलट असलेले विधान सर्व परिस्थितीत खोटे असते. उदाहरणार्थ, ‘आज पाऊस पडेल’ हे विधान आकस्मिक आहे. ते होईलही, होणारही नाही, पण त्या विधानातून अनिवार्य सत्याचा आविष्कार होत नाही. दर्शनशास्त्रात याला आकस्मिक सत्य किंवा संयोगात्मक सत्य म्हणतात.
चर्चेचा खरा गाभा : अन्याय आणि दु:ख
या संपूर्ण चर्चेचा मूळ आधार माझ्या आकलनानुसार असा आहे की जगातील अमानुषता, क्रौर्य, अन्याय, अत्याचार हे सर्व न थांबवणारी एक काल्पनिक सर्वशक्तिमान शक्ती आहे, ती देवाची. जावेद अख्तर यांनी थेट प्रश्न विचारला : गाझामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर निष्पाप मुले मारली जात आहेत. जगभरात बलात्कार, गुन्हे, हिंसा सुरू आहेत. मग हे देवाकडून का थांबवले जात नाही? असे घडूच का दिले जाते? यावर उत्तर देताना ‘ही माणसांची परीक्षा आहे’, ‘डॉक्टरसुद्धा इंजेक्शन देतात’, ‘फ्री विलचा गैरवापर आहे’ अशी स्पष्टीकरणे देण्यात आली. या युक्तिवादांतून मुफ्ती साहेबांची भूमिका काहीशी हट्टाग्रही वाटत होती. जावेद अख्तर सतत गाझातील मुलांचा उल्लेख करत होते. मुफ्ती नदवी सुरुवातीला या प्रश्नाला टाळत होते. मात्र शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांचे प्रश्न घेतले गेले, तेव्हा मारिया शकिल यांनी पुन्हा हाच प्रश्न विचारला : ‘गाझामध्ये वर्षानुवर्षे लहान मुले मारली जात आहेत. जर देव दयाळू आहे, तर तो हे थांबवत का नाही?’ यावर मुफ्ती नदवी म्हणाले की यावर दोन मते आहेत— नास्तिकांचे आणि आस्तिकांचे. नास्तिकांना वाटते की ही मुले हकनाक मारली जात आहेत, त्यांचे मरण ‘बेकार’ जात आहे. मात्र आस्तिकांचे मत असे आहे की हे मरण बेकार जाणार नाही; त्याची त्यांना भरपाई मिळेल. पाप करणार्याला शिक्षा होईल. ते म्हणाले की देव केवळ दयाळू आणि सर्वशक्तिमान एवढाच नाही; ही मोठी गैरसमजूत आहे. देव मानवी कल्पनेतील वैशिष्ट्यांनी मर्यादित नाही. जर जगात कुणाला त्रास होत असेल आणि देव तो थांबवत नसेल, तर त्याचा अर्थ देवाने माणसाला मुक्त स्वातंत्र्य दिले आहे. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी डॉक्टर–इंजेक्शनचे उदाहरण दिले. मुलाच्या दृष्टीने इंजेक्शन म्हणजे वेदना; डॉक्टर वाईट वाटतो. पण मोठ्या चित्रातून पाहिले तर डॉक्टर मुलाच्या भल्यासाठीच ते करतो. सर्व चित्र देवाकडे आहे; आपल्याला फक्त एक छोटा पिक्सेल दिसतो.
यावर जावेद अख्तर यांचा उपरोधिक प्रतिसाद होता : ‘तुमचे हे मत इस्रायलच्या पंतप्रधानांना कळवा; ते खूप खुश होतील.’
यानंतर चर्चा अधिक तीव्र झाली. जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे विचारले : तीन वर्षांच्या मुलाला ग्रेनेडने उडवले जाते, आणि तुम्ही याला देवाची परीक्षा म्हणता? जर फ्री विलमुळे हे घडत असेल, तर ते फ्री विल देणारा दोषी नाही का? यावर नदवी म्हणतात, त्या मुलांना खुदा नहीं उडा रहा है, इजरायल त्यांना उडवत आहे. इथं इजरायल दोषी आहे.
माणूस आणि मानवता
या संपूर्ण वादात एक गोष्ट ठळकपणे दिसली ती ही,जावेद अख्तर यांनी कुठेही कट्टरतेचा अहंकार दाखवला नाही. त्यांच्या नास्तिकतेमागे नेहमीच एक उद्देश राहिला आहे. मानवता. शहीद भगतसिंग, पेरियार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या बौद्धिकतेमागेही हाच व्यापक मानवी उद्देश होता. जावेद साहेबांनी स्वतः सांगितले : ‘मी सर्वज्ञ नाही. मला सर्व काही माहीत आहे असा दावा करत नाही. पण तुम्ही मात्र सर्वज्ञ असल्याचा दावा करता.’
चर्चेच्या शेवटी, कोणतीही कटुता न ठेवता जावेद अख्तर म्हणाले : ‘हा कार्यक्रम संपल्यानंतर मी आणि मुफ्ती साहेब एकत्र जेवायला जाणार आहोत.’
याच एका वाक्यात या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्त्वाचा संदेश दडलेला आहे.
तो आपल्याला कळला आहे का? या चर्चेतून ईश्वरी शक्तीविषयी काही प्रश्न मनात निर्माण झाले का? अशा निरोगी, नियंत्रित आणि आकसविहीन चर्चा सर्व मंचांवर व्हायला हवेत. पण, देव आणि धर्म ही ज्यांच्यासाठी दुकाने आहेत, त्यांच्या राजवटीत अशा चर्चा कधी होतील का?
देवच जाणे!
