माणूस जेव्हा स्वतःला पृथ्वीचा मालक समजू लागला, तेव्हाच निसर्ग आणि मानव यांच्यात संघर्षाची बीजे रोवली गेली. जंगले तोडली गेली, नद्या वळवल्या गेल्या, डोंगर पोखरले गेले, समुद्र भरले गेले आणि तरीही माणसाला समाधान मिळाले नाही. विकासाच्या नावाखाली निसर्गाची अशी लूट झाली की आज जंगले संपत चालले आहे. दोष मात्र जंगलातील प्राण्यांवर ढकलला जातो.
वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष हा एखाद्या अचानक घडलेल्या अपघाताचा परिणाम नाही; तो मानवनिर्मित संकटाचा थेट परिणाम आहे. वाढती लोकसंख्या, बेफिकीर शहरीकरण, जंगलांवरील अतिक्रमण आणि तथाकथित विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल या सगळ्यांचा स्फोटक परिणाम म्हणजे आजचा वन्यजीव–मानव संघर्ष.
मुंबई ठाण्याची सीमा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. मात्र शहराचा श्वास कोंडलेला! मुंबई ठाण्यासारख्या कोट्यवधी लोकसंख्येच्या महानगरासाठी हे राष्ट्रीय उद्यान हे केवळ जंगल नाही, ते या शहराचे हिरवी फुफ्फुसे आहेत. जगण्यासाठी आवश्यक असलेला श्वास आहे. १०० चौरस किलोमीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेले हे उद्यान जगातील मोजक्या महानगरांतील राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. मात्र या उद्यानाच्या चारही बाजूंनी माणसाने विळखा घातला आहे. अतिक्रमणे, झोपडपट्ट्या, उंच इमारती, महामार्ग, मेट्रो प्रकल्प, कचर्याचे ढीग आणि अनियंत्रित पर्यटन यामुळे या जंगलाचे नैसर्गिक संतुलन बिघडले आहे. जंगलातील शांतता भंग पावली आहे. याच जंगलात बिबट्या आहे. तो इथे कालपर्यंत सुरक्षित होता. आज मात्र त्यालाच ‘धोकादायक’ ठरवले जाते.
बिबट्या दोषी नाही!
बिबट्या हा अत्यंत बुद्धिमान, लवचिक आणि परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेणारा प्राणी आहे. जंगलात अन्न, पाणी आणि सुरक्षित अधिवास उपलब्ध असेल, तर तो कधीही मानवी वस्तीत येत नाही. पण जेव्हा जंगल तुटते, नैसर्गिक शिकारी कमी होतात आणि पाणवठे नष्ट होतात, तेव्हा बिबट्याला पर्याय उरत नाही. आज जंगलाच्या कडेला असलेल्या वस्त्यांमध्ये कुत्रे, डुकरे, कचर्यावर जगणारे प्राणी सहज उपलब्ध असतात. हेच बिबट्याचे नवे ‘शिकार क्षेत्र’ बनते. दोष बिबट्याचा नसतो; दोष आपण निर्माण केलेल्या परिस्थितीचा असतो.

दुटप्पीपणाची परिसीमा
आज महाराष्ट्रात बिबट्या मानव संघर्ष केवळ मुंबई ठाण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. नाशिक, जुन्नर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर, यवतमाळ—जवळपास संपूर्ण राज्यात ही समस्या तीव्र होत चालली आहे. दरवर्षी अनेक नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होतात, काहींचा मृत्यू होतो. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पण त्याचवेळी दरवर्षी अनेक बिबट्यांचाही मृत्यू होतो, कधी अपघातात, कधी जेरबंद करताना, तर कधी जंगलापासून दूर नेऊन सोडल्यामुळे. माणूस मेल्यावर शोक व्यक्त होतो; पण बिबट्या मारला गेल्यावर ‘सुटका झाली’ असे समाधान मानले जाते. हा दुटप्पीपणा नाही का?
जेरबंद बिबटे : उपाय की अपयश?
प्रश्न खूप साधा आहे. बिबट्याला पकडून पिंजर्यात टाकल्याने समस्या सुटतील का?उत्तर ठामपणे नाही असेच आहे. कारण एक बिबट्या पकडला की त्या परिसरात ‘रिक्त जागा’ निर्माण होते आणि तिथे दुसरा बिबट्या येतो. कधी अधिक आक्रमक, कधी अधिक भुकेला. म्हणजे समस्या कायम राहते. अनेक वैज्ञानिक अभ्यासांनी सिद्ध केले आहे की बिबट्यांचे स्थलांतर किंवा पुनर्वसन हा बहुतांशी अयशस्वी प्रयोग ठरतो. नवीन परिसरात सोडलेला बिबट्या अधिक गोंधळलेला आणि धोकादायक ठरतो. मग आपण उपाय करत आहोत की केवळ आपण अपराध भावनेपासून सुटका करून घेत आहोत?
खरे गुन्हेगार कोण?
आज आपण सरळ बिबट्याला दोष देतो. पण खरे प्रश्न विचारायची हिंमत आपल्यात आहे का?
जंगले कुणी तोडली?
वन्यप्राण्यांचे अधिवास कुणी नष्ट केले?
नद्या, डोंगर, पाणवठे कुणी गिळले?
जंगलाच्या सीमेलगत अनियंत्रित वस्ती कुणी वाढवली?
उत्तर स्पष्ट आहे.
हे सगळं आपण माणसांनी केलं आहे.
बिबट्या शहरात आला म्हणून बातम्या होतात; पण शहर जंगलात शिरलं, यावर कुणीच बोलत नाही.
हा प्रश्न फक्त वन विभागापुरता मर्यादित नाही. तो नगररचना विभागाचा आहे, प्रशासनाचा आहे, राजकारण्यांचा आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचाही आहे. जंगलालगत वस्ती वसवताना कोणतीही पर्यावरणीय योजना आखली जात नाही. कचरा व्यवस्थापन शून्य आहे. रात्री उघड्यावर अन्न टाकले जाते. कुत्र्यांची संख्या वाढते. आणि मग बिबट्या येतो.

अन्न संपतेय, म्हणून संघर्ष वाढतोय
बिबट्या मानव संघर्ष वाढण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलातील नैसर्गिक संतुलन बिघडणे. बिबट्याचे नैसर्गिक खाद्य असलेले हरण, सांबर, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांची संख्या अनेक भागांत झपाट्याने कमी झाली आहे. जंगलतोड, अवैध शिकार, पाणवठ्यांचा नाश आणि मानवी हस्तक्षेप यामुळे बिबट्याला जंगलात पुरेसे अन्न मिळेनासे झाले आहे.
या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या खाद्यप्राण्यांची ब्रीडिंग करून त्यांची संख्या वाढवून जंगलात सोडणे हा उपाय उपयुक्त ठरू शकतो का, हा प्रश्न उपस्थित होतो. वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही संकल्पना चुकीची नाही. भारतात आणि परदेशात मर्यादित प्रमाणात असे प्रयोग झालेले आहेत. मात्र हा उपाय योग्य नियोजन, तज्ज्ञ देखरेख आणि जंगलाच्या वहनक्षमताचा (ण्arrब्ग्हु ण्aज्aम्ग्ूब्) अभ्यास करूनच राबवावा लागतो. अन्यथा नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच हा चमत्कारिक उपाय नाही, तर दीर्घकालीन व्यवस्थापनाचा एक भाग आहे.
उपाय काय?
उपाय कठीण आहेत, पण अशक्य नाहीत—
१. जंगलांचे संरक्षण आणि विस्तार.
२. वन्यप्राण्यांसाठी जैविक कॉरिडॉर.
३. जंगलालगत नियोजनबद्ध वस्ती.
४. कचरा व्यवस्थापन आणि भटकी कुत्री नियंत्रण.
५. नागरिकांमध्ये जनजागृती.
६. बिबट्याला शत्रू न मानता सहअस्तित्वाची भूमिका.
आज आपण बिबट्याला दोष देतो. उद्या वाघ शहरात आला तर? परवा हत्ती? मग आपण सगळ्या जंगलांनाच पिंजर्यात टाकणार आहोत का?
खरा प्रश्न बिबट्याचा नाही.
खरा प्रश्न आपल्या विकासाच्या दिशेचा आहे. आज आपण थांबलो नाही, तर उद्या इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
जंगल संपेल आणि मग माणूसही!

