• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

करते वेडे… शब्दकोडे!

निरंजन घाटे विशेष लेख

marmik by marmik
December 25, 2025
in विशेष लेख
0
करते वेडे… शब्दकोडे!

शब्दकोडे हा सर्वच नियतकालिकांचा अपरिहार्य भाग बनलेला आहे. वृत्तपत्रातून कोडी कधी छापली जाऊ लागली, याबद्दल कोड्यांच्या अभ्यासकांत मतभेद आहेत. इंग्लंडमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शब्दभांडार वाढविण्यासाठी मदत म्हणून अगदी प्राथमिक स्वरूपात इंग्लंडमधे कोड्यांचा वापर १९व्या शतकापासून केला जात होता. असं असलं तरीही अधिकृतरित्या पहिलं शब्दकोडं हे अमेरिकेतील नियतकालिकात छापून आलं, हे निर्विवाद आहे. आर्थर वेन या इंग्रजानं निर्माण केलेलं हे कोडं अमेरिकेत न्यूयॉर्क वर्ल्ड या साप्ताहिक वृत्तपत्रात २१ डिसेंबर १९१३च्या अंकात छापून आलं होतं. त्याचा आकार आजच्यासारखा मात्र नव्हता. तर तो पत्त्यातील चौकट होता. आर्थर वेनच्या या कोड्यानं जगाला वेड लावणारी एक प्रथा सुरू केली. ’न्यूयॉर्क वर्ल्ड’मागोमाग अनेक अमेरिकी दैनिकांनी आणि साप्ताहिकांनी कोडी छापायला सुरुवात केली.

इंग्लंडमध्ये पहिल्यांदा कोडं छापलं ते ‘पीअर्सन्स मॅगेझिन’नं. त्यानंतर लंडन टाइम्सने १९३०मध्ये नियमित स्वरूपात कोडी छापायला सुरुवात केली. टाइम्समध्ये कोडी येऊ लागल्यावर त्या मागोमाग इतर ब्रिटिश वृत्तपत्रांनीही कोडी छापायला सुरुवात केली. भारतातील ‘टाइम्स ऑफ इंडियाने’ही लगेचच कोडी छापायला सुरुवात केली. तसेही हे वृत्तपत्र लंडन टाइम्सची भारतीय आवृत्ती म्हणूनच छापले जात होते. हळूहळू शब्दकोडी सर्वच पाश्चात्य वृत्तपत्रांमधून दिसू लागली.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश हेर खात्याने शब्दकोड्यांचे महत्त्व ओळखले. जर्मनव्याप्त प्रदेशातील भूमीगत जर्मन विरोधी संघटना, त्यांच्या संपर्कात असलेले ब्रिटिश गुप्तहेर यांना सांकेतिक भाषेत संदेश पाठवण्यासाठी शब्दकोडी रचणार्‍या लोकांची मदत ब्रिटिश लष्करी गुप्त संदेशवहन यंत्रणेनं घेतली होती. बेंचली पार्क येथील लष्करी केंद्रात यांना बोलावून घेतले गेले. ह्या क्रिप्टोग्राफी केंद्रात ही मंडळी राहू लागली. त्यांनी ह्याबद्दल चकार शब्दही १९८०पर्यंत काढला नव्हता. त्यांना बेंचली पार्कमध्ये प्रवेश देतांना त्यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुप्ततेची शपथ वदवून घेण्यात आली होती. तिचा भंग केल्यास त्यांना आजन्म कारावास भोगावा लागला असता. १९९५मध्ये वैधानिक तरतुदीनुसार बेंचली पार्क आणि तिथली हेरगिरी यंत्रणा याबाबतीतली माहिती आम जनतेसाठी खुली करण्यात आली.
बेंचली पार्कमध्ये पहिली अगदी प्राथमिक स्वरूपाची संगणकी आज्ञावली तयार केली गेली, हे लक्षात घेतलं तरी कोडी आणि कोड्यांची निर्मिती करणार्‍यांचं महत्त्व लक्षात येऊ शकतं.

बेंचली पार्क आणि तिथली हेरगिरी याबाबत एक मजेशीर हकीकत सांगितली जाते. ती घडली याबद्दल वाद नाही. फक्त ती कशी घडली याच्या तपशिलाबद्दल काही मतभेद आहेत. ६ जून १९४४ ह्या दिवशी दोस्त राष्ट्रांनी नॉर्मंडी येथे सैन्य उतरवायची योजना आखली होती. त्याआधी काही दिवस न्यूबरी इथल्या एका शाळेच्या प्राचार्यांना आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांना इंग्लंडच्या गुप्तचर संस्थेने हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं. त्यांनी कोडे निर्माण करण्याच्या आणि सोडविण्याच्या स्पर्धेत ‘नॉर्मंडी’सह अनेक सांकेतिक शब्द वापरले होते. पुढे चौकशीत ह्या मुलांनी हे शब्द ऑस्ट्रेलियन आणि कॅनेडियन सैनिकांच्या बोलण्यात आलेले ऐकले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कोड्यातून वापरले होते. त्या सर्वांना गुप्ततेची शपथ घ्यायला लावून सोडून देण्यात आले.१९८५मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुप्ततेच्या कलमातून ह्या संबंधी कागदपत्रे मुक्त झाली. ती मिळवायला पत्रकारांना आणखी पाच वर्षे जावी लागली. त्यातून जी माहिती मिळाली त्यात या घटनेचा निसटता उल्लेख आहे.

भारतात मराठीत शब्दकोडी केव्हां आली, याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. १९५० साली लोकसत्तामध्ये दीनानाथ प्रभू यांनी कोड्यांचा शब्दकोश प्रसिद्ध केला.त्या शब्दकोशाची दुसरी आवृत्ती १९५३मध्ये प्रसिद्ध झाली. त्याबद्दल पुढे लिहिणार आहेच, पण दुसर्‍या आवृत्तीत काही प्रतिक्रिया छापल्या आहेत. संपादक वाटाड्या मधुकर गोसावी यांनी या कोशाला अलौकिक म्हटले आहे. कूटस्नेहीच्या संपादक सौ. मंगला गोरे यांनी या कोशामुळे कूटरसिकांचे काम सोपे झाले आहे,असे सांगितले आहे. मा.अ. केळशीकर हे कोडेलाभचे संपादक म्हणतात, ’या आवृत्तीत आधीच्या आवृत्तीतील चुकांची दुरुस्ती केली असेलच.’ काथ्याकूटच्या संपादकांची अपेक्षा या ग्रंथाचे नाव ‘कोड्यांचा संदर्भग्रंथ’ असे असायला हवे होते, अशी आहे. कोड्यांचे गुपित, या नियतकालिकात ‘शब्दकोडे ही बौद्धिक कसरत असून भाषेवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी कोडी उपयुक्त ठरतात,’ असे संपादक वासुदेव पेठे यांचे मत प्रसिद्ध झाले आहे. हे मत ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’च्या संपादकांनी कोडी छापण्याचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट करताना व्यक्त केलेल्या मताशी जुळणारे आहे. शब्दास्त्रचे संपादक ‘प्रथम बक्षिसापर्यंत पोहोचण्याचा सोपान’, असे या ग्रंथास म्हणतात. विद्याधर गोखले यांची दुसर्‍या आवृत्तीची प्रस्तावना बरीच मोठी आहे. संस्कृतप्रचुर अशा या प्रस्तावनेत अनेक सुभाषिते, तसंच कूटशब्दांबाबतची माहिती या प्रस्तावनेत मिळते. आश्चर्य म्हणजे अण्णांनी या लेखनास उर्दूचा स्पर्श टाळला आहे. कोशातील शब्द पाहताना त्यांच्या संस्कृत प्रभुत्वाची जागोजागी साक्ष मिळते.

या कोशाची परीक्षणे छापणारी सर्वच नियतकालिके कोड्यांशी संबंधित नव्हती, पण बहुतेक परीक्षणांत कोड्यांमुळे शब्दसमृद्धी वाढते, तसेच भाषेवर प्रभुत्व मिळण्यास मदत होते, असा उल्लेख आढळतो. असे असूनही म.सा.पच्या वांङ्मयेतिहास खंडात कोड्यांबद्दल अजिबात माहिती नसावी याचे आश्चर्य वाटते.

कोड्यांसंबंधित नियतकालिके आहेत, हे लोकसत्ता शब्दकोडे कोशाच्या दुसर्‍या आवृत्तीमधील परीक्षणांमधून लक्षात आल्यावर मराठीत शब्दकोड्यांविषयी किती नियतकालिके असावीत याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. दाते-कर्वे सूचीत शब्दकोड्यांची खास दखल घेतलेली दिसत नाही. मात्र मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नियतकालिक सूचीत १९४८-१९५१दरम्यान आठ नियतकालिके केवळ कोडे या विषयाला वाहून घेतलेली आढळली. ती अशी-

१)कूटज्ञ- पुणे, पाक्षिक. १९४९-५०.
२)कोड्याचा उलगडा- पुणे,१९४८-५०.
३)कोडे साहाय्यक- पुणे, पाक्षिक, १९४९-५०.
४)कूटस्नेही- मुंबई,पाक्षिक, १४४९-५०.
५)कोडेस्वप्न- मुंबई, साप्ताहिक, १९४९-५१.
६)कोड्याकडून उत्तराकडे- मुंबई, पाक्षिक, १९४८-५०.
७)कोडे तर्कशास्त्र – मुंबई, पाक्षिक, १९४९-५०.
८)शब्दकूटतज्ञ – ठाणे, १९४९-५०.
९)वाटाड्या- मुंबई,पाक्षिक, किंमत दीड आणा. (‘कोड्यांचा कोश’मध्ये, जाहिरात).
कोड्यांचा शब्दकोशमध्ये काही शब्दांचे विवरण बरंच प्रदीर्घ आहे.त्यामुळे केवळ दोन तीन शब्दांचे अर्थ दिले आहेत. पहिला शब्द आहे- अविनय.
अविनय – अ-(विनयी) उद्धट, मस्त, हट्टी, गर्विष्ठ.
स(विनयी)- अयि भामिनी तू जर थोडी ‘—–’असशील तरच प्रीतीसागराला भरती येईल बरे!!
समितीने अविनयी आणि सविनयी या मधून अविनयी या शब्दाची निवड केली. कारण, किंचित तोरा, किंचित ताठा, माफक प्रमाणातील उद्धटपणा भामिनीच्या आकर्षणात भरच घालतो.

इथे काही निवडक शब्द दिले आहेत.
वर दिलेल्या शब्दकोड्यांच्या नियतकालिकांनंतर फक्त विविध प्रकारच्या कोड्यांना वाहिलेले रहस्यरंजन नावाचे मासिक बरीच वर्षे प्रकाशित होत होते.पुढे त्यात कविता आणि नवकथा छापायला सुरुवात झाल्यानंतर त्याची लोकप्रियता ओसरली. लोकसत्तेनंतर सर्वच वृत्तपत्रांमधून कोडी येऊ लागली. अलिकडच्या काळात कोड्यांना वाहिलेली पाक्षिके पुण्यातून प्रकाशित होतात. त्यातील ‘फुल मनोरंजन’आणि ‘फुल टाइमपास’ ही ‘नवीन प्रकाशन’ची द्वैमासिके एका महिन्याआड एक अशी प्रसिद्ध होतात. यात जुळवाजुळव कोडे नावाचा वेगळा प्रकार पाहावयास मिळतो. ‘टाईमपास’ मधील कोड्यांची उत्तरे ‘मनोरंजन’ मध्ये तर ‘मनोरंजन’मधील कोड्यांची उत्तरे ‘टाईमपास’मध्ये, पाहावयास मिळतात.

अलिकडे गणिती कोड्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्याची सुरुवात अर्थात सुडोकूपासून झाली. खरं तर तो एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. हा लेख शब्दकोड्यांविषयी आहे.त्यामुळे इथे फक्त त्यांची दखल घेतली आहे.

Previous Post

तीन पिढ्यांची चव जपणारे शंकरराव वडेवाले…

Next Post

नस नस में बिबट्या

Next Post
नस नस में बिबट्या

नस नस में बिबट्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.