परवा अचानक एका तातडीच्या कामासाठी मयूरबरोबर अलिबागला जाऊन आलो. संध्याकाळी बाहेर पडलो गावात चक्कर मारायला नी मनातल्या अनेक आठवणी उचंबळून आल्या. जेमतेम आठवड्यावर आलेल्या गणेशोत्सवाच्या खाणाखुणा ठळक दिसत होत्या सगळीकडे. सजावटीच्या सामानापासून नैवेद्याच्या नानाविध पदार्थांपर्यंत सगळी रेलचेल होती. अगदी पेडणेकरांच्या किंवा वैद्यांच्या दुकानातही बाप्पाच्या दागदागिन्यांचेच प्रदर्शन मांडलेले होते. तसं बघायला गेलं तर निर्गुण निराकारापासून सगुण साकाराच्या सर्व छटांमध्ये सहज सामावणार्या बाप्पाला खरंच का गरज असते या सगळ्याची? म्हटलं तर नाही, पण या सगळ्या उलाढालीने अनेक हातांना काम मिळते, अनेक बालमुखांनी मोदक खाऊन बाप्पा सुखावतो, नाही का?
अलिबागकरांच्या लाडक्या पुरोहितच्या दुकानातली लगबग एखाद्या सुगृहिणीसारखी भासली मला यावेळी, पैपाहुण्याचे तोंड गोड करताना बाप्पाच्या नैवेद्याच्या आवडीनिवडी जपणारी. काय नव्हतं त्यासाठी? अगदी पाच किलोच्या एका बुंदीच्या लाडवापासून छोटे कडक बुंदीचे लाडू, काजू व आंबा मोदक, टप्पोरे साखरफुटाणे… बापरे… खाणं जाऊद्या, केवळ दर्शनानीच सुखावलो मी या सगळ्यांच्या!!
माझा बालहट्ट म्हणून मी चौथीत असताना आम्ही अलिबागच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसवायला सुरुवात केली, मूळ घरी मात्र तो १० दिवस असतो. एखाद्या चलचित्रासारखे ते दिवस तरळले डोळ्यांपुढे. बाकी सगळ्या तयारीबरोबर कोणत्या वेळी कोणत्या आरत्या म्हणायच्या आणि त्यावेळी नैवेद्य काय हे साधारण ठरलेलेच असायचे, पण तरी दरवेळी होणारी ती चर्चा सुखावह असे. प्रतिष्ठापनेच्या आरतीला पेढ्यांचे मोदक मग जेवणात तळणीचे संध्याकाळी फळांचा अथवा मिठाईचा एखादा प्रकार. दुसर्या दिवशी सकाळी मान उकडीच्या मोदकांचा! निरोपाच्या आरतीला नारळ आणि साखर. या सगळ्याबरोबर प्रत्येक वेळी हातावर पडायचे चमचाभर पंचखाद्य!! साग्रसंगीत पूजेच्या दरम्यान डबाभर पंचखाद्याचा नैवेद्य दाखवलेला असायचा आणि येताजाता आम्ही फक्क्या मारायचो आवडीने, अर्थात कोणी दर्शनाला आले की मुख्य प्रसादाआधी पंचखाद्य द्यायचीच प्रथा अजूनही आहेच.
खिरापतीचाच एक प्रकार असलेले हे पंचखाद्य आता बाजारातही उपलब्ध असले तरी घरच्या खमंग पंचखाद्याची सर त्याला येणं कठीण आहे. ख अक्षरावरून सुरू होणारे पाच पदार्थ म्हणजे खारीक, खोबरे, खडीसाखर, खसखस व खि(कि)समीस हे घटक असतात. पूर्वी खारका आणून बिया काढून काप करण्यापासून तयारी करावी लागे, आता पूडच तयार मिळते छान. सुयोग्य प्रमाणात खडीसाखरेशिवाय सगळे घटक पदार्थ घेऊन ते मंद आचेवर भाजायचे आणि एकत्र करून मिक्सरवर बारीक करायचे, त्याच वेळी त्यात खडीसाखरही घालायची. खमंग आणि मधुर चवीचे पंचखाद्य बाप्पाला तर प्रिय असतेच, पण भक्तांनाही नक्कीच आवडते. नुसत्या खोबर्याची पिठीसाखर घालूनही खिरापत करतात काही ठिकाणी, अर्थात अजूनही खूप प्रकार त्या त्या भागात नक्कीच बनवले जात असतील.
या खिरापतींची एक गंमत असते बघा, मुख्य प्रसादाला कितीही महत्त्व असले तरी ही त्यापूर्वीच खाणार्याला सुखेनैव समाधान देते. अध्येमध्ये आलेल्या आगंतुकाच्या हातावरही, बाकी काही समोर नसले तरी, खिरापत नक्कीच पडते. या खिरापतींची उपलब्धी एवढी जास्त असते की सढळ हाताने काहीपण वाटलं जात असेल तर त्याला खिरापतीची उपमा मिळते. स्वत:च्या समृद्धीचा, अस्तित्वाचा जास्तीत जास्त लोकांसाठी उपयोग होऊ देणारी ही खिरापत सहज किती छान शिकवण देते नं?
वितळल्याशिवाय मेणबत्ती जसे तेजाचे रूप घेऊ शकत नाही, जोवर आपण आपल्यातल्या गुणांचा, आपल्या ज्ञानाचा, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुबत्तेचा वापर केवळ स्वत:पुरता मर्यादित न ठेवता लोकोपयोगी करत नाही तोवर कुठे हो जन्माचे सार्थक होतेय? स्वामी विवेकानंदानी म्हणूनच ‘शिवभावे जीवसेवा’ हा जीवनमंत्र दिला असावा. अडलानडलेला त्या परमेशाचेच एक रूप आहे असे समजून त्याच्या उपयोगी पडणे हे समृद्ध माणुसकीचेच एक लक्षण आहे. त्याला किती मदत होतेय याचबरोबर मला सेवेची किती संधी मिळतेय हा विचार केला की दातृत्त्वाचा अहंकार शिवत नाही मनाला. मला जे भरभरून मिळालंय त्याप्रतीची कृतज्ञता म्हणून त्याचा सुयोग्य लोकोपयोग नक्कीच समाधानकारक ठरतो.
माताजी श्री सारदादेवी सांगतात, धनवानानी अर्थदान करावे, शक्य असेल त्यांनी अन्नदान करावे तसेच या सगळ्याबरोबरच जपाला विसरू नये. हाच धागा पुढे ओढत असे म्हणावेसे वाटते की मनातली सकारात्मकता, सद्भावना, शुभेच्छा सर्वांना भरभरून दिल्या ना, तर त्या नानाविध मार्गांनी अनेकपटींनी वाढून आपल्याकडेही पुन:पुन्हा येतात आणि आपलीच समृद्धी वाढवतात. दरवेळी लाभणार्या व सुखावणार्या चमचाभर पंचखाद्यासारख्याच, नाही का?