– प्रा. सुषमा अंधारे
भारतीय संसदेतील विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली. दृकश्राव्य माध्यमाद्वारे प्रात्यक्षिक दाखवत त्यांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या भरजरी पितांबराची अक्षरशः लक्तरंच पत्रकारांच्या समोर टांगली. ती नेमकी कुठून आणि कशी शिवावी हा भाजपासमोरचा यक्ष प्रश्न आहे. राहुलजींनी जे महत्त्वाचे पाच प्रश्न उभे केले त्यावर भाजपाकडून तर्कशुद्ध उत्तर येणं अपेक्षित होतं पण तर्कशुद्ध वादविवाद करतील ते भाजपाई कसले?
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मतांवर पडलेल्या दरोडा राहुलजींनी काल ज्या पद्धतीने स्पष्ट करून सांगितला, त्याने भाजपाची भंबेरी उडाली आहे आणि नेहमीप्रमाणे मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी कोण कुठे बसला, कुणाचं कुठे स्थान, वगैरे अत्यंत बालिश चर्चा चालवली गेली.
खरंतर या विषयावर मी बोलायचं जाणीवपूर्वक टाळत होते. कारण मूळ मुद्दा डायव्हर्ट करण्याचा जो अजेंडा अगदी मुख्य प्रवाहातल्यासुद्धा काही माध्यमांकडून सुद्धा चालवला जात आहे, त्याला पुष्टी मिळू नये हा माझा प्रयत्न होता. पण सकाळी माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीजवळ लाचार मिंध्यांनी जो थिल्लरपणा केला त्यानंतर त्यांना आरसा दाखवणे फार गरजेचे आहे असे वाटले.
१) मुळात काल कुठलीही औपचारिक अशी बैठक नव्हती तर इंडिया आघाडीतल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या समोर महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये मतांची जी चोरी झाली ती सर्व दृकश्राव्य माध्यमांद्वारे प्रात्यक्षिक दाखवण्याची घटना होती. साहजिकच अशा ठिकाणी कार्यक्रमाचा अध्यक्ष, सूचक अनुमोदक, प्रास्ताविक, आभार, भाषणांचे क्रम, आसनव्यवस्था हे मुद्देच महत्त्वाचे नव्हते. ज्याला जिथून व्यवस्थितपणे दिसू शकतं आणि आरामदायक वाटू शकत तिथे तो बसेल.
२) उद्धवसाहेबांच्या मणक्याची अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया झालेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्यामुळे मानेची हालचाल करायला किंवा बराच वेळ एका स्थितीमध्ये मान ठेवायला त्यांना त्रास होतो. साधारण एक-दीड तास चालणार्या पत्रकार परिषदेमध्ये एलईडी स्क्रीनचा डोळ्यावर पडणारा प्रकाश आणि मानेची अवघडलेली स्थिती शारीरिकदृष्ट्या आपल्याला शक्य नाही म्हणून पुढच्या रांगेतली व्यक्ती मागे जाऊन बसते. हे कुणाच्याही लक्षात येऊ शकते, अगदी लाचार मिंध्यांच्याही. पण भाजपाने काढलेल्या आदेशानुसार मुद्दा डायव्हर्ट करण्याची जी अहमहमिका लागलेली आहे, त्यात मी कसा अधिक लाचार आणि अधिक भाजपचा इमानी हे सांगण्याची जणू स्पर्धाच लागली.
३) या सगळ्यात हास्यास्पद हे आहे की उद्धव साहेबांच्या खुर्चीची चिंता ते लोक व्यक्त करत आहेत ज्यांनी उद्धव साहेबांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पळवण्यासाठी गद्दारी करून गुवाहाटी गाठली. विशेष म्हणजे, हे करताना आम्हाला अजित पवारांकडून निधी मिळत नव्हता आणि राष्ट्रवादीसोबत जाणं हिंदुत्व धोक्यात आणणार होतं, अशी मखलाशी सुद्धा त्यांनी जोडली होती. आता तेच सगळे लाचार पुन्हा एकदा अजितदादांच्या अर्थखात्यासमोर निधी मिळण्यासाठी कटोरा घेऊन रांगेत उभे आहेत.
४) त्यातच थिल्लरपणाचा कहर म्हणजे यातले काही दांडेवाले दगडधोंडे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या समाधीवर सुद्धा पोहोचले. काय कमाल आहे, जेपी नड्डाने जाहीरपणे शिवसेना संपवण्याची भाषा केली, तेव्हा माननीय शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा अजिबात पायपोस नसलेले आज ज्या नाटकी पद्धतीने हात जोडत होते, ते बघून वरून बाळासाहेबांनी सुद्धा खास ठाकरे शैलीत यांना हासडल्या असतील.
५) बरं ज्यांना उद्धव साहेबांच्या मानसन्मानाची चिंता आहे म्हणून बाळासाहेबांच्या समाधीवर जावसं वाटलं, त्यांना शिंदे साहेबांच्या मानसन्मानाची काही चिंता आहे का नाही? कारण मागच्या काही महिन्यांमध्ये भाजपाने ज्या पद्धतीने शिंदेंना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला आहे, तो पाहता शिंदेंचा मानसन्मान गहाणच टाकलेला नाही तर भाजपाने तो चक्क पायदळी तुडवला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित असणारे गृहराज्य खातं. त्यांच्याच गृहराज्यमंत्र्याच्या बारवर धाड पडते आणि ते आपल्याच मंत्र्याला वाचवू सुद्धा शकत नाहीत.
आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंचा समावेशच केला जात नाही, प्रचंड गदारोळ झाल्यानंतर मग शिंदेंना घेतलं जातं.
शिंदेंच्या मंत्र्यांकडे ओएसडी किंवा पीएस कोण असावेत हे ठरवण्याचाही अधिकार शिंदेंना दिला जात नाही.
शिंदेंच्या अखत्यारीत असणार्या नगर विकास खात्याच्या अधिकार्यांच्या भाजपा चौकश्या लावते.
अगदी काल परवा तर शिंदेंच्या अखत्यारीत असणार्या राज्य परिवहन खात्यामधील आयुक्तपदावर एकाच वेळी भाजपा आणि शिंदे दोघांकडून नियुत्तäया झाल्या आणि शिंदेंना आपल्या नियुक्तीची माघार घ्यावी लागली. या सगळ्यांमध्ये शिंदेंचा मानसन्मान काय राहिला आहे?
६) यात भाजपाचे नौटंकी अजून वेगळीच. शेलारांना महाराष्ट्र आणि शिवरायांच्या मानसन्मानाची आज अचानक आठवण झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, प्रशांत कोरटकर, ज्याच्यामुळे पुतळा पडला तो आपटे या सगळ्या लोकांनी महाराष्ट्राच्या इभ्रतीसोबत काय काय केलं? आमचं आराध्य दैवत म्हणणार्या छत्रपती शिवरायांच्या संदर्भाने किताr गलिच्छ विधानं केली? तेव्हा हे शेलार नेमके कोणत्या बिळात बसले होते?
माणसाने दांभिक असावं, पण किती? यालासुद्धा मर्यादा आहेत राव.
७) भाजपाचे काही लोक प्रोटोकॉल शिकवायला लागले. दोन खासदारांवरून स्पष्ट बहुमतापर्यंत ज्यांनी भाजपा पोचवली त्या भाजपातील अत्यंत वरिष्ठ किंबहुना पितृतुल्य असे असणारे मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांची उपेक्षा किंवा या ज्येष्ठ नेत्यांना मोदींनी काय पद्धतीने प्रताडित केले हे उभ्या भारताने बघितले मात्र त्यावर ब्र न काढणारे भाजपेयी आज प्रोटोकॉल आणि मानसन्मानाबद्दल बोलायला लागले!
८) पण मला ही हास्यजत्रा वाटत नाही, मला ही ब्लॅक कॉमेडी वाटते. राहुलजींनी जो यांचा चेहरा उघडा पाडलेला आहे तो बघता प्रचंड केविलवाणे हसरे चेहरे करत विनोद करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
माझ्याकडे अशी अनेक उदाहरणांची जंत्री आहे. पण आता जरा थांबते, कारण मी वर म्हटल्याप्रमाणे मूळ मुद्दा डायव्हर्ट होता कामा नये.
भाजपा आणि शिंदे यांनी ही ब्लॅक कॉमेडी थांबवावी आणि राहुलजींनी विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तर द्यावीत. एका शायरने फार छान ओळ लिहिली आहे,
‘तू इधर उधर की न बात कर,
ये बता कि काफिले क्यूँ लूटे…’
(लेखिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या आहेत.)