२७ जुलै हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख असे जिव्हाळ्याचे संबोधन मिळवलेल्या या धीरोदात्त लोकनेत्याची गुणवैशिष्ट्ये सांगणारा विशेष लेख…
– – –
शिवसेनेवर जेव्हा जेव्हा संकट कोसळले तेव्हा तेव्हा संकटाशी मुकाबला करून शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते एखाद्या शांत, संयमी आणि धीरोदात्त सेनानीप्रमाणे शिवसैनिकांना लढण्याचे बळ देतात. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या ४० आमदारांनी स्वार्थासाठी, लालसेपोटी एकाच वेळेस पक्षप्रमुखांची साथ सोडली. त्यामुळे शिवसेनेवर संकट कोसळले असले तरी संकटाला संधी मानणारे उद्धव ठाकरे हे निष्ठावंत शिवसैनिक आणि मराठी माणूस यांच्या पाठिंब्यावर शिवसेना पक्ष मजबूत करतील आणि निवडणुकीत घवघवीत यश संपादन करतील, यात शंका नाही. गेल्या २५ वर्षांचा शिवसेनेचा इतिहास हेच सांगतो.
२००३ साली एक ऐतिहासिक घटना घडली. महाबळेश्वरच्या शिवसेनेच्या शिबिरात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून प्रथमच ‘कार्यप्रमुख’ हे पद निर्माण करण्यात येऊन त्या पदाची जबाबदारी उद्धव साहेबांच्या खांद्यावर सोपवली गेली. तसं पाहिलं तर २००३ सालापूर्वी अनेक संघटनात्मक जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या होत्या. १९८९ साली सुरू झालेला ‘सामना’ आणि १९९५ साली महाराष्ट्रात स्थापन झालेले ‘शिवशाही’ सरकार या दोघांच्या जडणघडणीत उद्धव ठाकरेंचे योगदान मोलाचे होते. आता कार्यप्रमुख पदाची नवीन जबाबदारी त्यांच्यावर आली होती. ते स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांना शेतीतले काय कळते, असा आरोप त्यांच्यावर तेव्हा होत होता. त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘‘मला शेतीचे काही कळत नाही, परंतु मला शेतकर्यांच्या वेदना कळतात, त्यांच्या डोळ्यातील अश्रू व भावना कळतात.’’ खर्या अर्थाने उद्धव यांनीच शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी तेव्हा लढा दिला. शेतकर्यांच्या डोक्यावरील कर्ज कायमचे काढून त्यांचा सात बारा कोरा करणार असे आश्वासन वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून त्यांनी दिले. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन धीर दिला. त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आश्वासनाच्या पूर्ततेसाठी ठोस पावले उचलली. जे ठरवलं ते त्यांनी करून दाखवलं.
उद्धव ठाकरे यांना प्रथम २००५ आणि २००६ साली संघटनेच्या अंतर्गत धुसफुशीला, फाटाफुटीला सामोरे जावे लागले. आधी नारायण राणेंची हकालपट्टी, मग राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यावेळी त्यांच्यावर नाना आरोप झाले. उद्धव शिवसेना संपवणार, सेना संपली अशी चोहो बाजूंनी टीका झाली. राणे आणि राज यांच्या निर्गमानंतर उद्धवजींच्या नेतृत्वाचा कस लागणार होता. त्यांना कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळाली. श्रीवर्धन विधानसभा पोटनिवडणूक आणि रामटेक लोकसभा पोटनिवडणूक जिंकून त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले. त्यानंतर २००७, २०१२ आणि २०१७च्या मुंबईसह अनेक महानगरपालिकांत त्यांनी शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिले. त्यावेळेसही त्यांनी जे ठरवलं ते करून दाखवलं.
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्या वेळेस देखील उद्धव हे शिवसेनेचे नेतृत्व सांभाळू शकणार नाहीत, बाळासाहेबांच्या पश्चात त्यांना जबाबदारी पेलवणार नाही, उद्धव म्हणजे बाळासाहेब नाहीत, मा. बाळासाहेबांप्रमाणे उद्धवजींचा आदेश शिवसैनिक मानणार नाहीत, अशा एक ना अनेक शंका-कुशंकांचे काहूर राजकीय विश्लेषकांकडून व विरोधकांकडून माजवले गेले. या सर्वांवर मात करीत ते आपल्या स्वभावाप्रमाणे शांत व संयमी राहून कार्यरत राहिले. निवडणूक आयोगाच्या संघटनात्मक घटनेनुसार २३ जानेवारी २०१३ रोजी उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून घोषित झाले. त्यांची घोडदौड सुरू झाली. शिवसेना वाढवण्यासाठी धीरोदात्त सेनानीप्रमाणे त्यांनी शिवसैनिकांत जोश निर्माण केला.
भाजपाने २०१४चा विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांआधी शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती तोडली आणि शिवसेनेला एकटे पाडले. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज झाली. शिवसेनेला त्यांनी संकटात लोटले. परंतु पक्षप्रमुखांनी या संकटाचे संधीत रूपांतर केले. भाजपाच्या महायुतीचे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, डझनभर केंद्रीय नेते, अनेक राज्यांतील मुख्यमंत्री भाजपाने निवडणूक प्रचारात उतरवले तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते, पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक यांच्या बळावर निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने मैदानात उतरले. उद्धव ठाकरेंनी एकहाती निवडणूक लढवून शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले आणि पुन्हा चमत्कार करून दाखवला.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सहज बहुमत मिळेल याची शाश्वती नव्हती. तेव्हा २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्री गाठली. कारण भाजपाला लोकसभेत बहुमताचा आकडा गाठायचा होता. शिवसेनेने भाजपाची अडचण समजून घेऊन २०१९ची लोकसभा निवडणूक भाजपाबरोबर लढवली. केंद्रात भाजपाला घवघवीत यश मिळाले. महाराष्ट्रात महायुतीचे ४२ खासदार निवडून आले. त्यात शिवसेनेचे १८ होते. पण शिवसेनेला अवघे एक केंद्रीय मंत्रिपद देऊन भाजपने पुन्हा बोळवण केली. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ची विधानसभा निवडणूक महायुतीत शिवसेना लढत होती, तरी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास कार्यकर्त्यांना त्यांनी दिला. या पूर्ततेसाठी उद्धव ठाकरे निवडणुकीला सामोरे गेले. शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आणले.
निकालानंतर भारतीय जनता पक्ष दिलेल्या वचनाला जागला नाही. शिवसेनेला बेदखल केले. तेव्हा सरकार बनवण्यासाठी मग पर्यायी राजकीय हालचाली सुरू झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करून त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केले. सर्व राजकीय गणित जुळली. किमान समान कार्यक्रम आखला गेला आणि या महाविकास आघाडीचे प्रथम मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत शपथ घेतली. ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली, याचा आनंद समस्त शिवसैनिक आणि महाराष्ट्राला झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे पूर्ण केली. त्या काळात त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले, त्याची पूर्तता करण्यासाठी दमदारपणे पावले उचलली. महाराष्ट्रातील तीस लाखांपेक्षा जास्त शेतकर्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली. १० रुपयांत जेवणाच्या थाळीचे शिवभोजन केंद्र सुरू केले. हजारो गिरणी कामगारांना हक्काची घरे, पोलिसांना हक्काची घरे आणि बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व आस्थापनांत ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरीसाठी सक्तीचा कायदा केला. महाराष्ट्रातील सर्व शाळांत १२वीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली. स्थानिक स्वराज्य संस्थांतील सर्व कारभार मराठीतून करण्याचा आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीतूनच असाव्यात असा आदेश काढला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे फक्त पाठपुरावा करून न थांबता लोकचळवळ उभारली. मुंबईत मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केले. मुंबई पश्चिम उपनगरात मेट्रो रेल्वेचा एक टप्पा सुरू केला.
त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात दोन वर्षे कोरोना महामारीचा मुकाबला करण्यात गेली. पाहिजे तेव्हा निर्बंध घट्ट करून अंमलबजावणी केल्यामुळे महाराष्ट्र सरकारला कोरोना महामारी नियंत्रणात ठेवण्यात यश आले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबविले. कोरोनाच्या संकटातही चौफेर विकास केला. कोरोनाच्या संकटाचे संधीत रूपांतर करून उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळातही राज्याचे अर्थचक्र थांबू दिले नाही. त्यांनी मुख्यमंत्रीपदी अतुलनीय कामगिरी करून दाखवली हे महाराष्ट्राने पाहिले. कोरोना काळातील त्यांच्या कामगिरीचे कौतुक पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय आणि जागतिक आरोग्य संघटनांनी केले. परंतु त्याचवेळी उद्धव यांचे कौतुक विरोधकांच्या डोळ्यात खुपत होते, तसेच स्वपक्षातील नेत्यांच्या, खासदारांच्या आणि आमदारांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या. त्यामुळे उद्धव यांच्याशी दगाफटका करून त्यांनी जून २०२२मध्ये महाविकास आघाडी सरकार अस्थिर केले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
२९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ‘वर्षा’ बंगला सहकुटुंब तात्काळ सोडला. कुठल्याही मोहाने त्यांना विचलित केले नाही. २०१९ साली झालेल्या एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. मुख्यमंत्रीपदाची लालसा, महत्वाकांक्षा वा मोह त्यांना कधीच नव्हता. यानंतर कोण गेले, किती गेले याचा विचार न करता उद्धवजींनी शिवसेना खासदार, आमदार, जिल्हासंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन शिवसैनिकांना धीर दिला. लोकांचे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा दिली. आमदार गेलेत, परंतु जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणूस शिवसेनेसोबत आहे असा विश्वास उद्धवजींनी निर्माण केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील. ज्यांना निवडणूक जिंकण्याची खात्री नाही ते राजकीय स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी पक्ष आणि पक्षप्रमुखांना सोडून जात आहेत. गद्दारांनी पक्षाचे नाव व चिन्ह चोरले. निवडणूक आयोगाने उफरटा न्याय दिला. तरीही उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. एप्रिल-मे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी कुशल आणि कणखर नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे तब्बल ३१ खासदार निवडून आणले. त्यात शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले. त्यापैकी मुंबईतून तीन खासदार निवडून आले. अमोल कीर्तीकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला, नव्हे पराभव केला गेला. नोव्हेंबर २०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुती आणि निवडणूक आयोगाच्या अभद्र युतीमुळे फारसे यश मिळाले नाही. तरी शिवसेनेचे २० आमदार निवडून आले. त्यापैकी १० आमदार एकट्या मुंबईतून निवडून आले. मुंबईवर ठाव्ाâरे यांचेच राज्य चालते हे पुन्हा अधोरेखित झाले.
सरकारच्या हिंदी सक्तीपुढे मराठी भाषा क्षीण होऊ नये म्हणून मराठी भाषा रक्षणाचा लढा जनतेने पुकारला. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूतकाळातील घटना विसरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबर मराठी भाषेसाठी पुढे आले आहेत. त्यांची एकी झाली आहे. योग्यवेळी राजकीय युतीदेखील निश्चित होईल. आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा असली शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवतील हे निश्चित.
वंदनीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे, ‘‘जेव्हा बाहेर वादळ असतं, तेव्हा आपण शांत राहायचे आणि जेव्हा बाहेर शांतता असेल तेव्हा आपण वादळ निर्माण करायचं.’’ महाराष्ट्रातील या राजकीय वादळाशी उद्धवजी हे शांत, संयमी आणि धीरोदात्तपणे मुकाबला करीत आहेत. उद्धव ठाकरे जेव्हा भविष्यात वादळ निर्माण करतील तेव्हा ही गद्दार मंडळी आणि विरोधक पालापाचोळ्याप्रमाणे उडून जातील एवढे मात्र निश्चित! कारण उद्धव ठाकरे हे ‘निश्चयाचे महामेरू’ आहेत.