ग्रहस्थिती : शुक्र मेष राशीत, हर्षल वृषभेत, मंगळ, केतू सिंहेत, प्लूटो मकरेत, राहू कुंभ राशीत, शनि, नेपच्युन मीनेत, रवि, गुरु मिथुन राशीत, बुध कर्क राशीत. दिनविशेष : २१ जुलै कामिका एकादशी, २२ जुलै भीमप्रदोष, २३ जुलै शिवरात्री आणि अमावस्या आरंभ उत्तररात्री २.२८ वा., २४ जुलै दर्श अमावस्या दीपपूजा समाप्ती, २५ जुलै जरा-जीवंतिका पूजन.
– – –
मेष : मनाची चंचलता जपा. परिस्थिती पाहून पुढे जा. व्यवहारात खबरदार राहा. वाहन चालवताना काळजी घ्या. देवधर्मासाठी भ्रमंती होईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. नोकरीत कष्ट घ्या. व्यवसायात नव्या संधी येतील. वाढीव उत्पन्न मिळेल. नव्या वास्तूच्या नियोजनाला गती मिळेल. संततीच्या वर्तनाकडे लक्ष द्या. तरुणांना मनस्ताप देणारा प्रसंग घडेल. सप्ताहाअखेरीस कुटुंबात वाद होईल. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. संसर्गजन्य आजाराचा त्रास होऊ शकतो. महिलांना आनंददायी बातमी मिळेल. मनासारख्या घटना घडतील. सामाजिक कार्यातून उत्साह वाढेल.
वृषभ : नोकरदारांना चांगले दिवस. वरिष्ठ खूष होतील. नव्या जबाबदार्या करियरला आकार देतील. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. विवाहेच्छुकांचे लग्न जुळेल. प्रेमप्रकरण डोकेदुखी वाढवेल. घरातील वातावरण चांगले राहील. नवीन घर घेऊ शकाल. व्यवसायात राग टाळा. सरकारी कामे मार्गी लागतील. पावसाळी सहलीत काळजी घ्या. मित्रांबरोबर मौजमजेवर खर्च होईल. येणे वसूल होईल. तरुणांची प्रगती होईल. नवी नोकरी मिळेल. लेखन, माहिती-तंत्रज्ञान, जनसंपर्क, कलाक्षेत्रात यश मिळेल.
मिथुन : आत्मविश्वास, उत्साह व आमदनी वाढेल. कामे पुढे सरकतील. व्यवसायात यश मिळेल. तरुणांनी धाडसाने निर्णय घ्यावेत. नोकरीत प्रवास घडेल. घरासाठी मोठा खर्च उद्भवेल. काळजी घ्या. घाई टाळा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. उद्योगक्षेत्रात आडमुठेपणा टाळा. घरातल्यांचा सल्ला ऐका. अनपेक्षित धनलाभ होईल. येणे वसूल होईल. पोटाचे, डोळ्याचे विकार त्रास देतील. मित्रांबरोबर काळजी घ्या. कुटुंबात वाद घडतील. आश्वासन देऊ नका. शेअरमधून लाभ होतील. आहारी जाऊ नका.
कर्क : गोडबोल्या मित्रांपासून सावध राहा. कोणालाही मदत करताना काळजी घ्या. उत्पन्न व खर्चाचा मेळ घालताना कसरत होईल. नातेवाईकांना सल्ला देऊ नका. देवदर्शनातून समाधान मिळेल. व्यवसायात अतिविश्वास नको. मोठा निर्णय काळजीपूर्वक घ्या. तरुणांना नोकरीची संधी येईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेम प्रकरणात चिडचिड वाढेल. तरुणांची सकारात्मकता वाढेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. आरोग्य जपा. प्रवास करावा लागेल. व्यवसायात विस्तार प्रकल्प यशस्वी होतील.
सिंह : तब्येत बिघडून चिडचिड होईल. ध्यान, योगा, वाचनातून मन प्रसन्न ठेवा. अडकलेली कामे पूर्ण होतील. मुलांकडून सुवार्ता कळेल. खेळाडूंना यश मिळेल. नोकरीत उच्चपदस्थांवर अधिक ताण येईल. वाहन जपून चालवा. सरकारी कामे मार्गी लावताना जपून. व्यवसायात धाडसी निर्णय कमाई करून देतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. नोकरी मिळेल. घरातील कामे कष्टाने मार्गी लागतील. गैरसमज टाळा. मित्रांचा सल्ला मोलाचा ठरेल. ब्रोकरना यश मिळेल. अति घाई संकटात नेईल.
कन्या : सप्ताहारंभी ठिकाणी तणावमुक्त राहाल. मित्र, नातेवाईकांच्या भेटींतून आनंद मिळेल. तरुणांचे उच्च शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तरुणांनी निर्णय घेताना भावनिक होणे टाळावे. व्यवसायात धारिष्ट्य दाखवा. भागीदारीत मनाविरुद्ध परिस्थिती येईल. अचानक धनलाभ होईल. नातेवाईकांशी वाद उकरून काढू नका. संततीकडून सुवार्ता कळेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहणार नाही, पण नाराज होऊ नका. काम करत राहा.
तूळ : नोकरीत मनासारखी स्थिती राहील. अहंकार बाजूला ठेवा. सरकारी कामांत शॉर्टकट टाळा. तरुणांना, खेळाडू, कलाकार, संगीतकारांना यश मिळेल. सत्कार होईल. घरात ज्येष्ठांचे ऐका. छोटेखानी समारंभ होईल. महिलांना यश मिळेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न लांबणीवर पडतील, निराश होऊ नका. संततीकडून चांगली बातमी कळेल. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात नवी कल्पना सुचेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात घरातील वातावरण उत्तम राखा. दांपत्यजीवनात वाद टाळा.
वृश्चिक : काही विषय सोडून देऊन पुढे चला. तब्येतीकडे दुर्लक्ष नको. तरुणांनी कामाशी काम ठेवावे. घरात तुमच्या मतांचा आदर होणार नाही. आर्थिक नियोजन कामी येईल. मित्रमैत्रिणी भेटतील. पावसाळी सहल काढाल. अति विश्वास दाखवू नका. घरासाठी महागडी वस्तू घ्याल. धार्मिक ठिकाणी मन रमेल. कागदपत्रे तपासूनच व्यवहार करा. नोकरीत बदल होतील. मन:शांती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करा. युवावर्गाला यशदायी काळ आहे. व्यवसायात तक्रारी येऊन मन:स्वास्थ बिघडेल.
धनु : मालमत्तेच्या व्यवहारात काळजी घ्या. व्यवसायात मंदीमुळे आर्थिक गणित बिघडू शकते. नोकरदारांना प्रवास करावा लागेल. मनासारखे न घडल्याने तरुण नाराज होतील. भागीदारीत लक्ष द्या. डोकेदुखी, पोटदुखी, मानदुखी या व्याधी जडतील. नवीन गुंतवणूक व बँक व्यवहारांत काळजी घ्या. शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी मिळतील. छंदातून मन:शांती मिळेल. कुणाला आर्थिक मदत करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. कलाकार, संगीतकारांना यश मिळेल. मित्रांची चेष्टामस्करी करणे महागात पडेल.
मकर : आर्थिक नियोजन उत्तम राहील, मनासारखी कामे होतील. मित्र, नातेवाईकांशी बिघडलेले संबंध सुरळीत होतील. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. अनोळखी व्यक्तीशी जपून बोला. घरातील वातावरण उत्साही राहील. नव्या योजनांना आकार मिळेल. कुणाचे मन दुखावू नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील. त्याची पूर्तता करण्यासाठी धावपळ करावी लागेल. त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. नव्या ओळखींमधून फायदा होईल. एजंट, ब्रोकरना चांगला लाभ मिळेल. व्यवसायात येणे वसूल होईल.
कुंभ : घरातल्यांसह सहलीचे बेत आखाल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. वरिष्ठ खूश होतील. तरुणांनी मनावर ताबा ठेवावा. मनाविरुद्ध घटना घडू शकतात. घरातील वाद बाहेर येऊ देऊ नका. मुलांबाबत डोकेदुखी वाढेल. बँक व्यवहारांत काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीबाबत चिंता वाढेल. नातेवाईकांमध्ये गैरसमज पसरवणारे भाष्य टाळा. अचानक प्रवास करावा लागल्याने आरोग्याचे गणित बिघडेल. सामाजिक कार्यातून आनंद मिळेल. कलाकार, लेखकांना चांगला काळ.
मीन : नोकरदारांचा सत्कार होईल. बढती, बदली, पगारवाढ होईल. मुलांना यश मिळेल. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. सामाजिक कार्यात मान वाढेल. व्यवसायात वेळेचे गणित बिघडेल. तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. कामानिमित्त विदेशात जाल. संसर्गजन्य आजारांपासून जपा. ब्रोकरनी काळजी घ्यावी. प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. कुटुंबासाठी वेळ खर्च द्या. कोर्टकचेरीची कामे अडकतील. सरकारी कामांना गती मिळेल. मेडिकल, मार्केटिंग, विमा क्षेत्रांत यश मिळेल.