दिवाळी अगदी तोंडावर आलेली असते अशा वेळच्या वातावरणात चैतन्य तर पसरत असतेच, पण घराघरांतून फराळाच्या पदार्थांचा दरवळही पसरत असतो. अर्थात हे फराळाचं कौतुक आपल्या महाराष्ट्रीय लोकांना अंमळ जास्तच. बारा महिने तेरा त्रिकाळ सगळे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध असले तरी घरोघर बनणारा दिवाळीचा फराळ खाणार्याबरोबर बनविणार्यालाही एक वेगळाच आनंद व समाधान देतो, नाही का?
गेल्या आठवड्यात ऑफिसमध्ये एका अमराठी सहकार्याशी असेच दिवाळीबद्दल वगैरे बोलणे सुरू होते, आमच्याकडे अशी चार दिवस नसते म्हणे दिवाळी. एकच लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे दिवाळी. थोडे फार खारे व गोड पदार्थ आणले की झालं काम. आजकाल बाकी पदार्थांना मागणी असली तरी काजूकतलीला जास्त भाव आहे, पण आमच्या लहानपणी म्हणे गुलाबजामला पर्याय नसे!! भारतात कुठेही गेलं तरी हमखास मिळणारे हे गुलाबजाम न आवडणारा विरळाच!!
नुसत्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलं बघा. माझ्यासाठी गुलाबजाम व वाढदिवस हे अतूट समीकरण होतं आणि आहे. काय करायचंय रे गोड असं आईने किंवा रश्मीने विचारलं की येणारं उत्तर त्यांनाही माहिती असतंच! पाकात आकंठ बुडालेले चमकदार लालसर रंगाचे गोल गरगरीत गुलाबजाम म्हणजे माझा जीव की प्राण; या बाबतीतही ओम माझा वारसा पुरेपूर चालवतो बरं!! खूप आवडतात त्यालाही गुलाबजाम, पाकातले वा कोरडे कसेही.
पूर्वी इंस्टंट गुलाबजामची पाकिटं मिळत असली तरी जास्त भर खव्याच्याच गुलाबजामवर असे. ताजा खवा मिळाला एवढे एक निमित्त पुरेसे असायचे घाट घालायला! हो तसा घाटच घालावा लागतो बरं, अगदी येताजाता बनवून टाकले असं खव्याच्या गुलाबजामचं तरी नाही होत. खवा छान रगडून त्यात त्याच्या पावपट चाळलेला मैदा आणि थोडी वेलदोड्याची पूड मिसळून एकजीव गोळा करून घ्यायचा. मग साधारण मध्यम आकाराच्या सुपारीएवढे गोळे बनवून हे गोळे मंद ते मध्यम आचेवर साजुक तुपात तळायचे. हे गोळे बनवताना त्याला चीर नाहीये हे जसं बघावं लागतं नं, तसाच फार जोर लावून पण चालत नाही. हलक्या हातांनी, पण एकसंध आणि एकसारखे गोळे वळले जायला हवेत. दुसरीकडे साखरेचा एकतारी पाक करून त्यात तळून थोडे निवलेले गुलाबजाम अलवारपणे सोडायचे. एकदम गरम सोडले तर काहीवेळा फुटतात. पाकात चवीला वेलदोड्याची पूड, केशर वगैरे घातलं की जास्त खुलतो स्वाद.
अर्थात अनेक युक्त्या क्लृप्त्या करून प्रत्येकजण चांगल्यात चांगले गुलाबजाम बनवायचा प्रयत्न करत असतोच. कुणी खव्यात थोडे भिजवलेले पोहे घालतात तर कुणी तुपावर परतलेला बारीक रवा. कधी चिमूटभर बेकिंग पावडर तर कधी चव मोडायला मिठाचा कण. अर्थात पाकात मुरलेला कोणताही गुलाबजाम म्हणजे निव्वळ सुख!!
तळलेले, पण पाकात न पडलेले गुलाबजाम पाकात पडलेल्या गुलाबजामांकडे मोठ्या असूयेने बघतात असे मला फार वाटते. पाकात पडल्याशिवाय त्या कोरड्या गोळ्यांना कोण हो विचारतंय? ना गोड चव ना ओलावा! जोवर ते स्वत:ला पाकात पूर्णपणे समर्पित करत नाहीत, तोवर काही गती नाही बघा त्यांना. फारसा अभ्यास नसला आणि बोलण्याचा अधिकार नसला तरी, हिंमत करतोय मुंडक उपनिषदाचा संदर्भ घेण्याची. मुंडक उपनिषदातील जीवात्मा आणि परमात्म्यासारखीच ही गुलाबजामची दोन रूपं जणू! त्या रूपकातील झाडाच्या शेंड्यावर म्हणजे सर्वोच्च जागी असलेला पक्षी म्हणजे परमात्मा आणि बुंध्याशी बसलेला पक्षी म्हणजे जीवात्मा. शिष्य शौनक जेव्हा अंगिरस ऋषींना या दोघांबद्दल विचारतो, ते उत्तरतात की दोघांमध्येही साधर्म्य आहेच, जीवात्मा हे परमात्म्याचेच प्रतिबिंब आहे. परंतु तो अनेक व्यवधानांमध्ये, मायेच्या जाळ्यात अडकलाय. दोन फांद्यांच्या मध्ये लगडलेली फळं जशी त्याला त्या मूळ ध्येयापासून म्हणजेच परमात्म्यापासून दूर ठेवतात तसेच वास्तविकतेत आपण अनेक पाशांमध्ये अकारण गुरफटतो. ज्यावेळी या सर्वांच्या पलीकडे जाऊन खालच्या फांदीवरच्या पक्षाला वरच्या पक्ष्यापर्यंत पोहोचायची तळमळ लागते आणि सर्व अडीअडचणी किंवा प्रलोभनांवर मात करत तो तिथे पोहोचतो, तो नकळतच त्या परमात्म्यात विलीन होतो, आयुष्याचं सोनं होतं! काही भाष्यकार या दोन पक्ष्यांच्या रुपकांत जीवात्म्या व परमात्म्याच्या जागी अपराविद्या आणि ब्रम्हविद्या असेही संदर्भ देतात. मूळ ब्रम्हज्ञान जोवर लाभत नाही तोवर इतर गोष्टी गौणच!
केवळ तळलेला खव्याचा गोळा जसे गुलाबजाम नसतो, तसेच भक्तिभावाच्या गोडीशिवाय केवळ प्रपंचात गुंतलेला मनुष्यही परिपूर्ण नसतो. अंतरंगीचा भाव बदलण्याची, येणारी सकारात्मकता स्वीकारण्याची क्षमता प्रत्येकातच असते; मात्र तिचा डोळस, यथोचित व सुयोग्य वेळी केलेला वापरच आपली त्या अंतिम ध्येयाकडची वाटचाल सुकर करतो, शिवाय निजधामी निश्चित पोहोचवतो. एकदा का मनात तो भगवंताविषयीचा अनुराग साठायला लागला की आयुष्याचं सार्थक होतं, गोडी वाढायला लागते, अगदी पाकात मुरलेल्या गुलाबजामसारखीच!!