मी लोकांनी बनवलेली स्टार आहे, लोकांनी बनवलेली लीडर होणं मी पसंत करेण. मला काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केलायं. शिवसैनिक म्हणून आले आणि शिवसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातौंडकर यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कॉँग्रेस पक्ष सोडून 14 महिने झाल्यावर शिवसेनेत प्रवेश करत आहे.
या प्रवेशासाठी आपल्यावर कोणताही दबाव नव्हता, काम करण्याची इच्छा असल्यानेच शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उत्तम प्रकारे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉँग्रेस पक्ष सोडताना मी राजकारण सोडलं नव्हते. मला लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे, मला आनंद आहे की मी त्याचा भाग आहे. मुंबईत महिला सुरक्षित असून आणि त्यामुळे मुंबईचा मला अभिमान आहे. महिला सुरक्षा आणि तत्सम विषयांवर आपल्याला काम करायला आवडेल, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
विधान परिषदेसाठी होकार
महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा दर्जा वाढावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले. त्यानंतर मी माझा होकार कळविला. मी कॉँग्रेस पक्ष काही अन्य मुद्दय़ांवर सोडला होता. त्यामुळे त्यांच्याकडून एमएलसी स्वीकारण्याचा विचार मी केला नाही, असं उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केलं.
मी मराठी आहे, पाऊल पुढेच टाकणार
भाजप आणि त्यांच्या ट्रोलर्सकडून करण्यात येणाऱया टीकांचे स्वागत करते, त्यांचे सगळे ट्रोल माझ्यासाठी पारितोषकाप्रमाणे आहे. मी मराठी आहे, पाऊल पुढेच टाकणार, त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं करेन, असा टोला त्यांनी टीकाकारांना लगावला. त्याचवेळी त्यांनी सवंग आरोप करून आपल्याला प्रसिद्धी मिळवायची नाही. कंगनाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व नको, असं मत व्यक्त केलं.
मी जन्माने आणि कर्माने हिंदू
सेक्युलर याचा अर्थ इतर धर्मांचा तिरस्कार करणे नाही. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. हिंदू धर्माचा मी पूर्णपणे अभ्यास केलायं, नवव्या वर्षापासून योग करते. देव मंदिराच्या गाभाऱयात असतो, त्या प्रमाने धर्म हा जिव्हाळ्याचा आणि मनातील आस्थेचा विषय असल्याचे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
बॉलीवूड हे मुंबईच्या रक्ताशी जोडलेले
बॉलीवूडची काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न मधल्या काळात झाला. बॉलीवूड हे काही 4-5 स्टारचे नाही, जे तुम्हाला आवडत नाहीत. बॉलीवूडमध्ये असंख्य लोक काम करतात. बॉलीवूड हे मुंबईच्या रक्ताशी जोडलेले असून बॉलीवूड व मुंबई हे वेगळे होणार नाही.
सौजन्य- सामना