काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुरेखा सिकर यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचं कळलं होतं. आता परवाच ‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉय यालाही हा अटॅक आल्याची बातमी आली. एकूणच ब्रेन स्ट्रोकचा धोका आता वाढायला लागला आहे. एका आकडेवारीनुसार जगातल्या प्रत्येक सहाव्या माणसाला ब्रेन स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. पूर्वी फक्त वय झालेल्या व्यक्तीलाच ब्रेन स्ट्रोक व्हायचा. पण आता सर्वच वयोगटातले लोक या रोगाच्या विळख्यात पडू शकतात असे दिसून आले आहे.
काय आहे ब्रेन स्ट्रोक?
मेंदूला योग्य प्रकारे ऑक्सिजन मिळाला नाही की ब्रेन स्ट्रोकच्या विळख्यात माणूस सापडू शकतो. म्हणजेच जेव्हा मेंदूच्या पेशींना पुरेशी पोषक तत्त्वे मिळत नाहीत तेव्हा ब्रेन स्ट्रोकचा आघात होतो. यासोबतच मेंदूपर्यंत पुरेसे रक्त पोहोचले नाही की ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. 2018 मध्ये आलेल्या एका अहवालानुसार जगातल्या प्रत्येक सहाव्या माणसाला या आजारातून जावे लागते. दरवर्षी ब्रेन स्ट्रोकच्या किमान 15 लाख केसेस डॉक्टरांपुढे आलेल्या आहेत.
ब्रेन स्ट्रोक कसा ओळखाल?
- डोके प्रचंड दुखणे : ब्रेन स्ट्रोकचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे डोके प्रचंड दुखणे… सहन करता येणे शक्य होत नाही अशी डोकेदुखी सुरू होते तेव्हा काहीच वेळात ब्रेन स्ट्रोक येण्याची शक्यता असते. अशावेळी जुजबी उपाय करत बसण्यापेक्षा सरळ डॉक्टरांकडे जाणेच योग्य…
- हातपायांतले त्राण जाणे : या विकाराचे दुसरे प्रमुख लक्षण म्हणजे व्यक्तीचे हातपाय कमजोर होतात. जणू हातापायांत काही त्राणच उरले नाही असे वाटायला लागते. असे वाटत असेल तरीही वेळ काढू नका. लगेच औषधोपचार होणे गरजेचे आहे.
- डोळ्यांना त्रास होणे : डोळ्यांपुढे अंधारी येऊन समोरचे धुरकट दिसू लागते. दिसायला त्रास होतो. हेदेखील ब्रेन स्ट्रोकचे एक लक्षण आहे.
- बोलताना शब्द लडखडणे : काहीवेळा बोलताना अचानक शब्द लडखडू लागतात. असे अचानक होऊ लागले तर कुछ तो गडबड है असे समजून जावे.
- सतत चक्कर येणे : दररोज नाही, पण कधीतरी अचानक सारख्या चक्कर येऊ लागतात. डोके फिरतेय की काय असे वाटू लागते. हेदेखील ब्रेन स्ट्रोक येण्याचे एक लक्षण असते.
असा करा बचाव…
- तणावापासून दूर राहा : मुळात हा विकार ताणतणाव वाढल्यामुळे होतो. त्यामुळे स्वत:ला ताणतणावापासून दूर ठेवाल तर बरे… तणाव नसेल तर तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहील. म्हणूनच मग ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोकाच उरत नाही.
- अंमली पदार्थापासून दूर राहा : अंमली पदार्थाचे सेवन जास्त प्रमाणात केले तर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. त्यामुळे दारू किंवा अन्य अंमली पदार्थांपासून शक्यतो दूरच राहा. ब्रेन स्ट्रोकपासून वाचायचे असेल तर अंमली पदार्थांपासून दूर राहावेच लागेल.
- वजन वाढवू नका : लठ्ठपणा अनेक आजारांचा मूळ असतो. ब्रेन स्ट्रोकमध्येही लठ्ठपणा खूपच महत्त्वाचा ठरतो. तुम्ही लठ्ठ असाल तर हा विकार तुम्हाला लगेच पकडू शकतो. त्यामुळे शक्यतो लठ्ठपणापासून दूर राहा. स्वत:ला फीट ठेवा. लठ्ठच झाला नाहीत, तर ब्रेन स्ट्रोकचा धोका टाळता येऊ शकतो.
- योगाभ्यास आणि ध्यानधारणा : मन शांत आणि चिंतामुक्त ठेवण्यासाठी दररोज नियमित सकाळच्या वेळी योगाभ्यास आणि ध्यानधारणा करायला हवी. यामुळे शरीरासोबतच तुमचे मनही स्वस्थ राहील.
- पौष्टिक आहार घ्या : ब्रेन स्ट्रोकसारखा गंभीर आजार दूर ठेवायचा तर पौष्टिक आहार घेण्यावाचून पर्याय नाही. जंक फूड आणि तळलेले खाद्यपदार्थ, त्यातही तिखट पदार्थ खाणे टाळा. घरात बनवलेले कोणतेही पदार्थ खाता येतील. पौष्टिक आहार तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.