हिवाळ्यातल्या थंडीत किंवा आपल्याकडच्या पावसाळ्यातल्या गारव्यात रात्रीच्या जेवणात कम्फर्ट फूड म्हणून वरणफळं किंवा चकोल्या, शेंगोळे, गुरगुट्या भात आणि पिठलं, खिचडी, दक्षिण भारतीय रस्सम भात, सांबार भात किंवा उत्तर भारतीय राजमा चावल इत्यादी पदार्थ खाऊन मनाला समाधान मिळतं. आपल्या या कम्फर्ट फूडसारखंच समाधान आणि ऊब घट्ट सूपसारखे किंवा स्ट्यूसारखे पदार्थसुद्धा देतात. चिकन किंवा इतर मांसाचे तुकडे, भाज्या, धान्य, कडधान्ये, डाळी आणि मसाले घातलेलं सूप किंवा स्ट्यू पोटभरीचे असतेच, शिवाय ते खाल्ल्यावर समाधान वाटतं आणि एक प्रकारचा उबदारपणा जाणवतो. म्हणूनच कदाचित अशा सूप किंवा स्ट्यूना परदेशात हार्टी सूप किंवा स्ट्यू म्हणतात.
जगभरातल्या बहुतांश खाद्यसंस्कृतींमध्ये थंडीतल्या रात्रीच्या जेवणासाठी सूप किंवा स्ट्यूसारखे पारंपारिक पदार्थ केले जातात. नूडल्स घालून केलेली सूप्स किंवा रामेनचे वेगवेगळे आशियाई खाद्यसंस्कृतीमधले प्रकार, पास्ता, भात किंवा इतर एखादे धान्य घालून केलेले सूपचे इटालियन, युरोपियन प्रकार, पास्तासोबतच डाळी घालून केलेले सूपचे प्रकार, आप्रिâकेतल्या वेगवेगळ्या देशांत कधी डाळी किंवा कडधान्ये तर कधी मांसाचे तुकडे तर कधी बटाटे, रताळे, शेंगदाणे असे पदार्थ घालून केले जाणारे अनेक सूपचे प्रकार किंवा अमेरिकेतला सूप आणि स्ट्यू या दोन्ही पदार्थांच्या मध्ये गणला जावू शकणारा चिली हा पदार्थ हार्टी सूप्स आणि स्ट्यू म्हणून खाता येवू शकतात. या लेखमालेतील आधीच्या काही लेखांमध्ये यापैकी काही सूप्सचा उल्लेख आणि पाककृती आल्या आहेत.
चिली या पदार्थाचे नाव मी पहिल्यांदा एका मराठी वेबसाईटवरच वाचलं होतं. चिकन चिली नावाची पाककृती होती ती. चिकन चिली नावावरून हे आपल्या ओळखीचे चायनीज चिली चिकन असेल असं वाटलं होतं. पण हा पूर्ण वेगळा पदार्थ होता. राजमा, टोमॅटो, चिकन आणि काही भाज्या घातलेला स्ट्यूसारखा पदार्थ होता तो. एक वन डिश मिल म्हणून हा पदार्थ आमच्या घरी सगळ्यांनाच आवडला, एरवी राजमा न खाणार्या घरातल्या लहान मुलांनाही हा पदार्थ आवडला होता. राजम्याचा वापर आणि इतर काही मसाल्यांमुळे मला हा पदार्थ मेक्सिकन असेल असं वाटलं होतं. पण जरा माहिती शोधल्यावर कळलं, हा पूर्णपणे मेक्सिकन पदार्थ नसून अमेरिकेतल्या टेक्स-मेक्स खाद्यसंस्कृतीतला पदार्थ आहे. टॉमॅटो, लाल ढोबळ्या मिरच्या (चिली पेपर्स), राजमा/ बीन्स आणि बीफ वापरून हा पदार्थ बनत असला तरी आता चिकन, टर्की किंवा शाकाहारींसाठी सोया चंक्स घालूनसुद्धा चिली बनवली जाते. खरं तर चिलीचा उगम अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतात झाला आणि त्यावर मेक्सिकन खाद्यसंस्कृतीचा प्रभाव असला तरी अमेरिकेतही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे चिली बनवली जाते. बर्याच ठिकाणी चिलीमध्ये राजमा/ बीन्स घालत नाहीत. काही ठिकाणी यात पास्तासुद्धा घातला जातो. काही ठिकाणी टोमॅटो न वापरता व्हाइट चिकन चिलीसुद्धा बनवतात. प्रांतागणिक चिलीमध्ये घालायचे मसाले बदलत असले तरी बहुतेक वेळा जिरे पूड, पॅपरिका, वेगवेगळ्या प्रकारच्या लाल किंवा हिरव्या मिरच्या (चिली पेपर्स) व ऑरगॅनो हे मसाले चिलीमध्ये वापरले जातात. याशिवाय टोबॅस्को सॉस, वुस्टरशायर सॉस, दालचिनी असे वेगवेगळे मसाले किंवा सॉसही वेगवेगळ्या चिलीच्या प्रकारांमध्ये वापरले जातात. हा स्ट्यू बीफ किंवा बीफचा खिमा वापरून करतात, शिवाय बर्याच पाककृतींमध्ये वेगवेगळ्या विकतच्या सॉसचा, कॅनमधल्या टॉमॅटोंचा आणि विकत मिळणार्या ब्रॉथचा वापर केला जातो. यात वापरले जाणारे बरेच मसाले किंवा सॉस सहसा आपल्या घरांमध्ये नसतात. आरोग्यदायी पद्धतीने चिली बनवताना मी त्यात आपल्याकडे सहजासहजी मिळणार्या आणि आपल्या जिभेला सवय असलेल्या घटक पदार्थांचा वापर केला आहे.
व्हेजिटेरियन चिली / शाकाहारी चिली
साहित्य : १ वाटी राजमा, लाल-पिवळी आणि हिरवी ढोबळी मिरची बारीक चिरून दीड वाटी, २ मध्यम आकाराचे कांदे, ४ मोठे टॉमॅटो चिरून, वाटीभर स्वीट कॉर्न, इतर भाज्या घालायच्या असल्यास (मशरूम, झुकिनी, गाजर इत्यादी) चिरून एक ते दीड वाटी, लसणाच्या तीन चार पाकळ्या, अर्धी वाटी सोया चंक्स, १ तमालपत्र, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धणे पूड, अर्धा चमचा ऑरेगॅनो पावडर, चिमूटभर गरम मसाला, चिली फ्लेक्स, तिखट, चवीप्रमाणे मीठ, तेल, चीज किंवा सावरक्रीम (ऐच्छिक).
कृती : रात्रभर भिजवून राजमा कुकरमध्ये मीठ घालून मऊ शिजवून घ्यावा. एका मोठ्या कढई किंवा डच ओव्हनसारख्या भांड्यात थोड्या तेलात तमालपत्र घालून फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा. एखाद्या मिनिटाने त्यात बारीक चिरलेला लसूण घालून परतावे. यात चिरलेल्या ढोबळ्या मिरच्या आणि इतर भाज्या घालून परत परतावे. २-३ मिनिटांनी यात टॉमॅटो घालून अधून मधून हलवत शिजू द्यावे. कच्चा टॉमॅटो घातल्याने व्यवस्थित शिजायला वेळ लागतो. चार टॉमॅटो चिरून घालण्याऐवजी १-२ चिरलेले टॉमॅटो आणि बाकी टॉमॅटोची प्युरी पण घालता येते. टॉमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत सोया चंक/ सोयाबीन वड्या मीठ घातलेल्या पाण्यात पाकिटावरच्या सूचनेप्रमाणे िशजवून घ्यावेत. शिजलेल्या सोयाबीन वड्यांना दुसर्या पाण्यात घालून पिळून घ्यावे. हे सोया चंक आता हाताने थोडे कुस्करावे. टॉमॅटो शिजत आले की चिलीमध्ये हे कुस्करलेले सोया चंक/ सोयाबीन वड्या, शिजलेला राजमा आणि वाफवलेले स्वीट कॉर्न्स घालावेत. यात आता चवीप्रमाणे मीठ आणि इतर मसाले घालावेत. तिखटाचे प्रमाण तुम्हाला हवे तेवढे ठेवावे. सहसा चिलीमध्ये २-३ प्रकारच्या तिखट, कमी तिखट, गोडुस अशा वेगवेगळ्या मिरच्या कुटून वापरल्या जातात. तुमच्या घरात असलेल्या सुक्या लाल मिरच्या ओबडधोबड वाटून त्यासोबत चिली फ्लेक्स, पाप्रिका, घरातले लाल तिखट एकत्र या चिलीसाठी वापरता येईल. सहजा सहजी मिळत असल्यास यात थोड्या हालपिनो मिरच्यासुद्धा घालाव्यात. हवे असल्यास यात टोबॅस्को सॉस किंवा एखादा हॉट सॉसही घालता येतो.
राजमा थोडा मॅश करून घेतल्यास चिलीला दाटसरपणा येतो. तसा दाटसरपणा आला नसेल तर यात थोडं कॉर्नफ्लॉअर पाण्यात मिक्स करून घालून उकळावे. चिली मिळून येण्यासाठी कॉर्नफ्लॉअरऐवजी भाजलेली कणीकसुद्धा वापरता येईल. सगळे मसाले घातल्यानंतर चिली १०-१५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावी. गरज पडल्यास थोडे पाणी घालावे.
खाताना वरून किसलेले चीज किंवा सावरक्रीम घालून घ्यावे. ताजे लोणीसुद्धा वरून घेतलेलं चांगलं लागेल. ही चिली नाचोजसोबत, पावासोबत, कॉर्न ब्रेडसोबत खाता येते. नुसती चिली खायलासुद्धा छान लागते. चिली जितकी मुरेल तितकी त्याची चव जास्त चांगली लागते.
शाकाहारी चिलीऐवजी चिकन वापरायचे असल्यास, बोनलेस चिकनला थोडा वेळ लसणाची पेस्ट आणि मिरे पूड लावून मॅरिनेट करावे. हे मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे तसेच वाफवून चिलीमध्ये घालता येतील. किंवा या चिकनच्या तुकड्यांना थोड्या कणकेत घोळवून थोड्या तेलावर सगळीकडून रंग बदलेपर्यंत परतून घेऊन मग चिलीमध्ये घालता येईल.
व्हाइट चिकन चिली
(ही चिली करताना पांढर्या रंगाचे राजम्यासारखे दिसणारे कडधान्य/ बीन्स वापरले जातात. तसा पांढरा राजमा न मिळाल्यास आपण त्याऐवजी चवळी वापरून चिली करू शकतो.)
साहित्य : २ चिकन ब्रेस्ट तुकडे करून, १ वाटी पांढरा राजमा किंवा चवळी, २ मध्यम आकाराचे कांदे, १ सेलेरीचा दांडा (ऐच्छिक), १ वाटी वाफवलेले स्वीट कॉर्न, अर्धी वाटी चिरलेले मशरूम, पाव वाटी चिरलेल्या भावनगरी मिरच्या (कमी तिखट), हवे असल्यास थोड्या हालपिनो मिरच्यांचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या ३-४, अर्धा चमचा धण्याची पूड, अर्धा चमचा जिर्याची पूड, १ चमचा ऑरगॅनो, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा लसणाची पेस्ट, चवीप्रमाणे मिरे पूड आणि मीठ, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, चीज, लिंबाच्या चकत्या, थोडी भाजलेली कणीक, तेल.
कृती : पांढरा राजमा किंवा चवळी रात्रभर भिजवून कुकरमध्ये मीठ घालून मऊ शिजवून घ्यावे. चिकनच्या तुकड्यांना लसणाची पेस्ट, मीठ आणि मिरेपुड लावून १०-१५ मिनिटे मॅरिनेट करावे. हे तुकडे नंतर कणकेत घोळवून घ्यावेत. थोड्या तेलावर हे चिकनचे तुकडे शॅलो फ्राय करावेत.
एका कढई किंवा जाड बुडाच्या भांड्यात थोड्या तेलावर बारीक चिरलेला कांदा आणि लसूण परतून घ्यावा. कांद्याचा रंग बदलायला लागला की त्यात सेलेरीच्या दांड्याचे तुकडे आणि मशरूमचे तुकडे घालून परतावे. मशरूम परतले गेल्यावर यामध्ये भावनगरी मिरच्यांचे तुकडे आणि हवे असल्यास हालपिनो मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. यामध्ये आता सगळे मसाल्याचे पदार्थ आणि शिजलेला राजमा/ चवळी घालावी. दोन मिनिटांनी यात परतून ठेवलेले चिकनचे तुकडे घालावेत. चवीप्रमाणे मीठ आणि मिरे पूड घालावी. दाटपणा येण्यासाठी हवे असल्यास थोड्या पाण्यात भाजलेली कणीक घालून यात घालावी. ही चिली १०-१५ मिनिटे शिजू द्यावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सर्व्ह करताना यावर थोडी कोथिंबीर, किसलेलं चीज आणि लिंबाच्या चकत्या ठेवून सर्व्ह करावे.