हे मुखपृष्ठचित्र आहे १९७२ सालातलं. त्यात बाळासाहेबांनी एस. एम. जोशी यांचं असं चित्रण केलेलं पाहिल्याने अनेकांना धक्का बसेल. श्रीधर महादेव अर्थात एस. एम. जोशी हे समाजवादी नेते असले तरी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या त्यांच्या कामगिरीमुळे आणि एकंदर साध्या, सचोटीच्या जीवनामुळे त्यांच्याविषयी विरोधकांमध्येही आदर कायम राहिला. संयुक्त महाराष्ट्र समितीला बहुमत मिळालं असतं तर ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. जनता पक्षाच्या सरकारच्या काळात त्यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर असल्याची चर्चा होती, पण तो मोह त्यांनी टाळला. अशा नेमस्त आणि प्रामाणिक नेत्याचे तोंड रिझर्व्ह बँकेचे संचालकपद देऊन बंद करण्याचा प्रयत्न झाला, त्याबद्दलच्या सात्विक संतापातून हे व्यंगचित्र उमटले आहे… हे व्यंगचित्र आठवण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने काढलेला शिष्टमंडळांचा परदेश दौरा. शशी थरूर यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेसनेत्यापासून गद्दारपुत्रांपर्यंत सात खासदारांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय खासदार विविध देशांमध्ये जाऊन त्यांना भारताची ‘ऑपरेशन सिंदूर’मागची भूमिका समजावून सांगणार आहेत… संसदेला उत्तरदायी असलेलं सरकार देशातल्या जनतेला काही सांगत नाही, आपल्याला काही सांगत नाही आणि सगळ्या जगाला भूमिका समजावायला नवी टूर काढतंय, याबद्दल प्रश्न विचारणार कोण? सगळ्यांच्याच तोंडात हाडूक आहे.