– वैभव भाल्डे
कोरोना काळानंतर आदित्यच्या लग्नाला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. मागचं सगळं वर्ष फारच वेगळं गेलं होतं, त्यामुळे बर्याच दिवसांत घरच्या कोणाचं लग्न असलं तरी आम्ही केळवण करू शकलो नव्हतो. म्हणून नागपूरला जाताना ओल्या नारळाच्या करंज्या घेऊन गेलेलो. सर्वांना थोडा प्रश्न पडला, लग्नघरी एवढं गोडधोड असताना आणखीन या करंज्या कशाला? मुख्य म्हणजे पुण्यातून जाताना चितळेंचे नेहमीचे हुकमी एक्के आणायचे सोडून हे काय आणलंय?
मी म्हटलं, करंज्या शुभशकुनाच्या असतात आणि केळवणाला विशेष मान असतो यांचा; किंबहुना करंजीशिवाय केळवण अपुरंच!!
भारतात अगदी सगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावारूपाने या करंज्या समोर येतात. त्या त्या भागात पिकणार्या व सहज उपलब्ध असलेल्या साहित्याने बनवल्या जातात. या उत्तरेतील गुजीया, मध्य भारतातील करंज्या किंवा दक्षिणेतील कज्जीकयालू!! सर्वसाधारणपणे रव्यामैद्याचं, तुपाचं मोहन टाकून निरशा दुधात भिजवलेलं आवरण असतं आणि आतमध्ये मुख्यत: नारळाचं, खोबर्याचं सारण असतं.
या सारणाचेच किती प्रकार होऊ शकतात! बापरे!! कोकणात ओल्या नारळाची गोडी वाढवायचं काम गूळ करतो, मोदकाच्या सारणासारखेच गूळ व ओलं खोबरं पाकवून बनते हे सारण, तर देशावर साखरेचे सारण जास्त. ओल्या नारळाची जागापण सुक्या खोबर्यानी घेतलेली दिसते. मंद आचेवर सुक्या खोबर्याचा कीस भाजून हातानेच चुरडायचा, मग त्यात मिळून यायला थोडा बारीक रवा किंवा कणीक तुपावर भाजून मिसळायची. सुका मेवा आवडीनुसार शक्यतो पूड करून घालायचा, खसखस नाही हं विसरून चालणार! मग तयार मिश्रणाच्या प्रमाणात वेलदोड्याची पूड, पिठी साखर कालवली की झालं सारण तय्यार. मध्य भारतात सारणाचा एक पर्याय म्हणून मऊ तिळगुळाचाही वापर होतो.
जशी आपली दिवाळी नाही साजरी होत करंज्यांशिवाय तशी उत्तर भारतात खव्याची गुजीया होळीला असलीच पाहीजे! खवा गुलाबी परतून त्यात मनसोक्त केशर व सुका मेव्याची भरड घालावी, पारी जरा जाड असते यांची, आकाराने सहसा थोड्या लहान असलेल्या या करंज्या नेहमीसारख्या तळून नंतर पक्क्या पाकात सोडतात आणि त्या पाकाचा चमकदार थर दिसतोही छान शिवाय गोडीही वाढवतोच!!
केरळात उकडीच्या मोदकांसारखी उकड काढून तसेच गुळखोबर्याचे सारण असलेला करंजीचा केरळी अवतार वाफाळता समोर येतो तर कर्नाटकात हरबर्याच्या डाळीचं पुरण करंजीच्या सारणाची जागा घेतं, सणावाराला. या गोड प्रकारांच्या तोडीस तोड मटारच्या, ओल्या हरबर्याच्या तसंच तुरीच्या दाण्यांच्या चटकदार करंज्याही वेळोवेळी जिभेचे चोचले पुरवायला हजर असतातच नाही का? करू तेवढे प्रकार कमीच आहेत नाही का?
भारताबाहेरही या करंज्यांचे विविध प्रकार, गोड तिखट भेदभाव विसरा- अगदी शाकाहारी-मांसाहारीही प्रकार दिसून येतात. आपल्याकडे साट्याच्या, रंगीत, अशा करंज्या रुखवतांमध्ये मानाचे स्थान पटकावतातच आणि सुनेच्या माहेरच्या सुगरणपणाला दाद मिळवून देतात!!
केवढे प्रकार हे, बापरे!! नेमकी कशी बनते ही करंजी? आवरणाच्या घट्ट गोळ्याची पारी लाटून झाली की त्यात पुरेसं सारण भरायचं, कमी पडलं तर खुळखुळा बनतो बरं नंतर!! कडेला दुधाचं बोट फिरवायचं, पारी चिकटायला मदत होते दुधाची. पारी व्यवस्थित चिकटली की हाताचा अंगठा आणि पहिल्या बोटाने नाजूक मुरड घालायची आणि करंजी मंद आचेवर तळायची. अर्थात आजकाल आपण सर्रास कातण्याने कडा कापून घेतो, तो भाग वेगळा; पण मूळ कृतीमध्ये या मुरडीलाच आणि या मुरडीमुळेच या करंजीला लग्नाच्या केळवणात मानाचे स्थान मिळते मंडळी!!
शुभशकुनाची ही मधुर दूत जाणते-अजाणतेपणी शिकवण देऊन जाते बरं. पारीच्या दोन बाजू एकत्र यायला व टिकायला त्यांना स्वत:ला मुरड घालावी लागते. तसेच नवदांपत्यालाही केवळ स्वत:च्या भावभावनांपेक्षा एकमेकांचा आदर करत समजून उमजून एकत्र राहण्याचा संकेत देतात या करंज्या. बाह्यरूप कसेही असले तरी अंतरंगी गोडवा ठासून भरलेला असेल तर संसाराची गोडी वाढेल आणि टिकेल हेच सांगतात जणू. मनातले प्रेम, परस्परांविषयीचा विश्वास कमी पडला तर संसाराचा पोकळ करंजीसारखाच खुळखुळा होतो. वर वर नीट भासणारा, पण आतून फार मजा नसलेला, पोकळ!!
अर्थात केवळ नवदांपत्यांनी नाही तर सर्वांनीच स्थळ काळ व परिस्थितीनुरूप मनाला काही अंशी मुरड घातली तर आपल्यालाच मन:शांती मिळते. हेकेखोरपणापेक्षा ‘जिथे जसं तिथे तसं’ हा श्री माताजी सारदादेवींचा संदेशही हेच सांगतो नाही का? केवळ अहंच्या वावटळीत वाहत जाऊन एकटं राहण्यापेक्षा प्रत्येकच नात्याची गोडी परस्परांच्या सहकार्याने, सामंजस्याने व मीपणाला थोडीशी मुरड घालून वाढवली तर आयुष्याचं सोनं होतं, शुभशकुनी करंजीसारखंच, नाही का?