ज्येष्ठ पत्रकार, चतुरस्र लेखिका, पत्रकारितेच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका नीला उपाध्ये यांच्या स्मृतींना समर्पित ‘नीलाई’ हा ग्रंथ महाराष्ट्रदिनी प्रकाशित करण्यात आला. त्यात नीलाताईंची आईसारखी माया लाभलेले जुने सहकारी आणि मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी लिहिलेला हा लेख…
– – –
बाई महाराष्ट्र टाइम्समधल्या माझ्या ज्येष्ठ सहकारी… चित्रपश्चिमा आणि इतर अनेक सदरं गाजवणार्या, अनेक विषयांवर व्यासंगी लेखन करणार्या लेखिका, पत्रकारितेच्या वर्गातून नवे पत्रकार घडवणार्या तळमळीच्या शिक्षिका, अनेक सांस्कृतिक उपक्रमांमधल्या शिलेदार, विधिमंडळात वार्तांकनासाठी जाणार्या मराठीतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या एकंदर पत्रकारितेमधल्या पहिल्या वहिल्या महिला वार्ताहरांपैकी एक आणि बरंच काही, ही झाली त्यांची औपचारिक ओळख… पण, ही सगळी कोरडी, अल्पपरिचयाच्या सदरात छापली जाणारी ओळख… बाई आमच्यासाठी म्हणजे महाराष्ट्र टाइम्समधल्या किमान तीन पिढ्यांसाठी ‘दि ग्रेट बाई’ होत्या… त्यांची ‘मेल्या, टोण्या’ ही मिश्कील हाक ज्याच्या कानी पडली नसेल असा मटाच्या परिवारातला एकही पुरुष सदस्य नसेल किमान पंचवीसेक वर्षांतला…
मटामध्ये बाईंनी पाहिलेली आमची दुसरी पिढी असावी… त्यांच्या प्रारंभिक काळाविषयी अनेकदा त्यांच्या तोंडूनच ऐकायला मिळायचं… त्यात फार कटुता होती… बाई कामगार युनियनचं कामही हिरिरीने करायच्या, त्यामागेही त्यांच्यावर सुरुवातीला झालेला अन्याय कारणीभूत असावा… तेव्हा त्यांना बाई म्हणून दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न झाला, तो मटामधल्या थोरामोठ्यांनीच केला, याचं त्यांना फार वैषम्य होतं… मूळच्या नीला पाटील आणि रायगडच्या भूमिकन्या असल्यामुळे संघर्ष हा त्यांच्या घराण्याचाच स्थायीभाव… त्या त्वेषाने लढल्या, त्यातून आमच्या आधीच्या पिढीतल्या अनेकांशी त्यांचं सकारण-अकारण शत्रुत्वच निर्माण झालं… वेगवेगळ्या किरकोळ कारणांनी त्यातल्या काहींशी खूप काळ अबोलाही होता… अनेकांशी त्यांचे संबंध कायमच बिघडलेले राहिले… कारण, बाईंचे पूर्वग्रहही कमालीच्या टोकाचे असायचे… पण, १९९० च्या दशकात आमची तरुण पिढी मटामध्ये आली तेव्हा तिकडची परीटघडी मोडायला सुरुवात झाली होती (असं जुने सहकारीच सांगायचे). त्यात बाईंशी आमचं काहीच वाकडं नव्हतं… उलट आमच्यातल्या अनेकांसाठी त्या आमच्याच आईचं प्रतिरूप होत्या… आम्ही त्यांच्यासाठी मुलंच… मी आणि उमेश करंदीकर (यात उमेश अधिक) त्यांच्या काय वाट्टेल त्या फिरक्या घ्यायचो, काहीही म्हणजे काहीही थट्टामस्करी करायचो. बाई ती मजेत घ्यायच्या, शिंगं मोडून आम्हा वासरांमध्ये शिरायच्या आणि खुदुखुदू हसत आम्हाला कृतककोपाने ‘मेल्या, टोण्या’ म्हणून खोटे खोटे शिव्याशाप द्यायच्या. त्याने आम्ही आणखी चेकाळायचो… ऑफिसात बिनतिकिटाचा आणि हमखास रंगणारा एक मनोरंजनाचा कार्यक्रमच सादर व्हायचा… एका काळात तर बाई त्यांच्या दोन्ही खांद्यांवरच्या भरपूर जड पिशव्या सांभाळत, थकल्या भागल्या ऑफिसात आल्या की बाकीचे सगळे सहकारी उमेश कुठे आहे ते शोधायचे… आता उमेश बाईंना काहीतरी आचरट पृच्छा करणार आणि ‘हात् रे मेल्या टोण्या’ असं म्हणताना बाई खो खो हसू लागणार, त्यांचा सगळा शीण निघून जाणार, हा परिपाठच बनून बसला होता. बाई आम्हा दोघांना कधी कधी म्हणायच्या पण, ‘मी काय तुमच्या वयाची आहे का रे टोण्यांनो?’ पण, तो कोप काही खरा नसायचा.
टाइम्सच्या गंभीरच्या कँटीनमध्ये रात्रीच्या जेवणाची वेळ संपली की त्या मोठ्या डब्यांमध्ये भरून भात, भाजी वगैरे उरलेलं जेवण घेऊन जायच्या. चेंबूर स्टेशनवर काही बेघर मुलांना ते जेवण त्या द्यायच्या. इतकं अन्न वाया जाणारच असेल, तर ते कुणाच्या मुखी लागावं, अशी त्यांची इच्छा. त्यावरूनही त्यांची मस्करी व्हायची, पण ती कधी मनाला लावून घेतली नाही त्यांनी. मी ‘मामंजी’ या नावाने मुंबई टाइम्समध्ये विनोद लिहायचो, त्यात गजराबाई ही व्यक्तिरेखा रेखाटताना नकळत तिच्या भाषेत बाई उमटल्या… पण, माझं असं अर्कचित्रण का करतोस, असं कधी त्यांनी दटावलं नाही… उलट तेही धमाल एंजॉय केलं… त्यांची माझ्यावरची माया अशी की मी चवीने मासे खातो म्हटल्यावर त्यांच्या रोजच्या धबडग्यातून वेळ काढून त्यांनी गाभोळी नावाचा माशांच्या अंड्याचा प्रकार स्वहस्ते बनवून माझ्यासाठी आणला होता. तोही इतक्या प्रमाणात की मी आणि ऑफिसातले मासेखाऊ दिवसभर तेच खात होतो…
फार फार पूर्वी त्यांना माझ्या लग्नाची चिंता लागली होती… माझ्या आईला लागली होती तशीच. एकदा ऑफिसात मला म्हणाल्या, ‘अरे सोन्या, एखादी चांगली मुलगी बघून लग्न करून टाक. आम्हाला सूनमुख दाखव’… तेव्हा ऑफिसात इंटर्नशिप करायला आलेली एक सडपातळ, शेलाटी मुलगी मागच्या रांगेतून टॉक टॉक हाय हिल्स वाजवत चालत होती… तिला कळणार नाही अशा बेताने तिच्याकडे बोट दाखवून त्या खट्याळ हसत म्हणाल्या, ‘हिच्यासारखी एखादी पोरगी गटव’… कमाल आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जवळपास पाचेक वर्षांनी खरोखरच त्याच मुलीशी माझं लग्न झालं… ती अमिता होती… ही गोष्ट लग्नाआधी बाईंना सांगितली तर त्यांना कोण आनंद झाला… त्यांनी आमच्या लग्नात भेटवस्तूबरोबर फार सुंदर चिठ्ठी लिहिली होती, ती अमिताने अजून जपून ठेवली आहे…
बाई बिनधास्त होत्या. कुठेही बेधडक धडक मारायच्या. बड्या बड्या राजकारण्यांना ‘अरे तुरे’ करू शकायच्या. एखाद्या मुख्यमंत्र्यालाही त्यांनी त्याच्या चेंबरमध्ये ‘मेल्या टोण्या’ म्हटलं असेल, याची मला तरी खात्रीच आहे. पण सार्वजनिक जीवनात त्या डेकोरम कायम पाळायच्या. त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनात, अगदी ललित लेखनातही घडणीच्या वयात, खासकरून मटामध्ये भोगाव्या लागलेल्या त्रासांचं दुखरं आणि कटू प्रतिबिंब हमखास उमटायचं. ते बर्याचदा अनेकांना दुखावणारं होतं. पण अजातशत्रू वगैरे बनण्याची हौस बाईंनी कधी बाळगली नव्हती. ‘दोन द्या, दोन घ्या’, असा बाणा होता त्यांचा. मात्र कधी गैरसमजातून किंवा कधी आकसातून बिघडलेले संबंध पुन्हा ताळ्यावर आले की बाईंच्या प्रेमाचाही धबधबा पुन्हा पूर्ववत व्हायचा… अशी काही बिघडलेली नाती आमच्या पिढीने दुरुस्त करून दिली होती आणि ऑफिसातले त्यांचे काही अबोले संपवले होते, हे साभिमान सांगायला हरकत नाही…
बाई रसाळ, ओघवतं लिहायच्या. सरोजिनी बाबर, शांता शेळके यांच्याशी नातं सांगणारी मराठमोळी सात्त्विक शैली त्यांना लाभली होती. रसिक वृत्तीमुळे त्यांनी ‘चित्रपश्चिमा’ हे हॉलिवुडच्या सिनेमांचा परिचय करून देणारं सदर गाजवलं होतं. मटामध्ये जमेल तिथे त्यांची कोंडी करण्याच्या सगळ्या प्रयत्नांना हाणून पाडून त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या शैलीदार भाषेत काही ना काही लिहायच्याच. सतत व्यग्र असायच्या. नाना उपक्रम करायच्या. मराठी सांस्कृतिक वर्तुळात त्यांचा वावर होता आणि दबदबाही. ‘रोव्हिंग कॉरस्पाँडंट’ हे पद असल्याने अनेक ठिकाणी फिरून दिवसभराच्या दगदगीनंतर खांद्याला दोन भल्यामोठ्या पिशव्या लावलेल्या बाई ऑफिसात यायच्या आणि कॉपी लिहायला बसायच्या. व्याकरणाबद्दल, भाषेबद्दल अत्यंत सजग. आम्हालाही वेळोवेळी दुरुस्त्या सुचवायच्या. लेखन आवडलं तर कौतुक करायच्या. वडिलकीच्या अधिकाराने चार गोष्टी सांगायच्या. त्यांच्या उपक्रमशीलतेत अखेरपर्यंत खंड पडला नव्हता…
मटा सोडल्यानंतरही ज्यांच्याशी संपर्क कायम राहिला, त्यापैकी बाई एक. त्यांना मटा सोडून पुढे इतर वर्तमानपत्रांमध्ये गेलेल्या आणि वरिष्ठ पदांवर पोहोचलेल्या सहकार्यांविषयी फार कौतुक होतं. (मराठी पत्रकारितेतला सर्वोच्च टप्पा मानला जाणारा मटा सोडणं ही एकेकाळी फार धाडसाची गोष्ट मानली जायची, मित्रवर्य रोहित चंदावरकरांच्या भाषेत मटा हा सोन्याचा पिंजरा होता, तो सोडून उडण्याचं धैर्य दाखवणारी पाखरं कमीच होती… आता एकंदरच छापील माध्यमांमधलंच सोन्याच्या आतलं सगळंच कथील उघडं पडलं, तो वेगळा विषय). मी तर मटामध्ये असतानाही त्यांचा लाडका होतोच. मी फक्त त्यांच्या ‘मेल्या टोण्या’चाच धनी नव्हतो, तर ‘सोन्या, बाळा’ अशा शब्दांमधली आईची मायाही माझ्यासाठी पाझरली होती. माझ्याकडून त्यांना फोन केला जावो न जावो, त्यांच्याकडून अधून मधून फोन यायचाच. काही वेळा कामांसाठी, पण बहुतेक वेळा त्यांचं काही काम नसायचं. ‘माझी लेक कशी आहे, माझ्या नाती कशा आहेत’, असं फार जिव्हाळ्याने विचारायच्या. मी ‘बरा’ लिहितो (हे त्यांचे शब्द), त्यामुळे मी खूप पुस्तकं लिहायला हवीत, हा त्यांचा आग्रह होता. ‘तू छान छान पुस्तकं लिहिलीस की मी तुला आमचा ग्रंथ पुरस्कार देईन’, अशी मजेशीर लालूच त्या दाखवायच्या.
‘मी मराठी’ या दैनिकाचा संपादक असताना बाईंची ग्रेट भेट मी माझ्या सगळ्या सहकार्यांना घडवली होती. पत्रकारितेचं अनौपचारिक प्रशिक्षण मिळावं आणि एका थोर व्यक्तिमत्त्वाचं दर्शन सहकार्यांना घडावं, या हेतूने योजलेला तो फारच हृद्य सोहळा झाला. बाईंनी चौफेर बॅटिंग करून त्या मेल्या टोण्यांना मनसोक्त हसवलं होतं, कानपिचक्याही दिल्या होत्या आणि ‘बाळांनो, जरा या गोष्टी सांभाळा रे’, असं म्हणून भाषा कशी वापरावी, याची शिकवणही दिली होती. त्या दिवशीच्या बाई मनात घट्ट बसल्या आहेत, इतकी धमाल त्यांनी आमच्यासोबत केली होती. तेव्हाची माझी सेक्रेटरी पूनम, तिचा पत्रकारितेशी काहीही संबंध नव्हता, त्या काही तासांच्या भेटीत ती बाईंच्या इतकी प्रेमात पडली की एखाद्या मुलीने आईबरोबर काढून घ्यावा, तसा फोटो तिने बाईंबरोबर काढून घेतला.
अलीकडच्या काळात बाईंशी व्हॉट्सअपवर संभाषण होतं… त्यांची विचारसरणी उजवीकडे झुकलेली… माझ्या विचारसरणीच्या थेट विरुद्ध… त्या कधी कधी अतिशय तळमळीने व्हॉट्सअपवरचे आयटी सेलने बनवलेले बनावट फॉरवर्ड मेसेज मला पाठवायच्या… इतरांकडून येणार्या अशा मेसेजेसकडे मी कधी लक्ष द्यायचो नाही… पण, बाईंचा मेसेज आला की मग शांतपणे मी त्यांना वस्तुस्थिती कळवायचो, कधी फॅक्ट चेकर मेसेज पाठवायचो… त्या ते समजून घ्यायच्या… काही वेळा तर मी त्वेषाने ताड ताड लिहिलेलंही वाचायच्या, आपल्या माहितीत बदल करून घ्यायच्या… कधी कधी मीही त्यांना काही वेगळ्या गोष्टी कळवायचो… मटामध्ये असताना प्रत्यक्ष समोरासमोर वाद घालताना किंवा व्हॉट्सअपवर एकमेकांची मतं, माहिती खोडताना आमच्यात कधीच कटुता आली नाही… ‘तुमची पुढची पिढी आहे बाळांनो, तुम्हाला अधिक माहिती असतं’, असं त्या म्हणायच्या…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा खास स्नेह होता. त्यामुळे मी साप्ताहिक मार्मिकची धुरा सांभ्ााळल्याचा त्यांना विशेष आनंद झाला होता. त्यांनी आवर्जून मार्मिकसाठी लेखन केलं. त्यांचं त्यांच्या हयातीतलं शेवटचं लेखन मार्मिकमध्येच छापून आलं आहे. त्यांची तीन भागांची लेखमाला सुरू होती विधान परिषद गाजवणार्या सदस्यांबद्दलची. हा मुळात दिवाळी अंकासाठी दिलेला लेख. पण, दिवाळी अंक विनोद विशेषांक निघणार असल्यामुळे लेख आधी छापला गेला, त्यामुळे तो त्यांना पाहायला मिळाला असेल, अशी आशा आहे.
ऑगस्ट महिन्याच्या २९ तारखेला वसंतराव उपाध्ये स्मृती पुरस्कार सोहळा होणार होता. पुरस्काराचे मानकरी डॉ. श्रीराम गीत यांनी माझं नाव सुचवलं आणि बाईंनी मला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येण्याचा आदेश दिला. पण, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते शक्य होणार नाही, हे त्यांना कळवलं. दुर्दैवाने बाई त्याआधीच आजारी पडल्याने तो कार्यक्रम रहित झाला… मधुरा, माधव या त्यांच्या मुलांनी कळवलं होतं सगळ्या सुहृदांना की त्यांची प्रकृती तशी चिंताजनकच आहे, पण त्यावर आम्ही फारसा विश्वास ठेवला नव्हता… बाई भलत्याच चिवट होत्या, त्या यमराजालाही ‘मेल्या, टोण्या, आता काय वय आहे का रे माझं तुझ्याकडे येण्याचं, अजून किती काम बाकी आहे’, असं म्हणून चार कानपिचक्या देऊन परत आल्याच असत्या, याची आम्हाला खात्री होती…
पण, तसं झालं नाही… त्यांची प्राणज्योत मालवली…
…बाई अलीकडे कशा दिसायच्या, ते मला माहिती नाही. आशा मटालेने मला सांगितलं की बाई आता थकल्या होत्या, थोड्या पाठीतून वाकल्या होत्या… अशा रूपात मी त्यांना पाहिलं नाही. मला बाई आठवतात त्या मटाच्या ऑफिसातल्या.
आपल्या तेव्हाच्या रूपावर मनसोक्त हसून ‘तरुणपणी मी पण छान दिसायचे रे टोण्या’ असं आम्हा सगळ्यांना सांगून झकास लाजणार्या, खणखणीत आवाजात बोलणार्या आणि मी मराठीमधली भेट गाजवणार्या बाई…
…बाईंना तशाच प्रफुल्लित, उत्साही आणि गडगडाटी स्वरूपातच लक्षात ठेवायचं आहे…
…त्या कुठेही जावोत, आमच्यापासून त्यांची सुटका नाही.