१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ‘आयपीएल’मध्ये दिमाखदार कामगिरी दाखवत क्रिकेटरसिकांची मने जिंकली आहेत. बिहारच्या या बालकाकडून एकीकडे मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत, तर दुसरीकडे त्याच्या वयाबाबत शंका प्रकट केली जाते आहे. ऐन उमेदीच्या वयातील ही गुणवत्ता टिकेल का, याचे केलेले विश्लेषण.
– – –
वैभव सूर्यवंशीच्या वैभवशाली कारकीर्दीची क्रिकेटजगताने सर्वप्रथम दखल घेतली, ती नोव्हेंबर २०२४मध्ये. १३ वर्षांच्या एका शाळकरी मुलाच्या समावेशासाठी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या लिलावात बोली लावल्या गेल्या. ३० लाख रुपये पायाभूत किंमत असलेल्या वैभववर बोलीचा आकडा पाहता-पाहता एक कोटीचा टप्पा ओलांडून गेला. राहुल द्रविड मुख्य मार्गदर्शक असलेल्या राजस्थान रॉयल्सनं एक कोटी, १० लाख रुपये मोजून त्याला संघात स्थान दिले. ‘आयपीएल’च्या संघाशी करारबद्ध झालेला सर्वात युवा क्रिकेटपटू हा मान मिळवत त्याने आपले नाव अधोरेखित केले. वैभवचा कागदोपत्री जन्म २७ मार्च २०११ या दिवशी झाला. म्हणजे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय प्रकाराचा विश्वचषक उंचावला, त्याच्या आधीच्याच आठवड्यात. तोवर ‘आयपीएल’ स्थिरस्थावर झाले होते. ही लीग सुरू झाल्यानंतर जन्माला आलेलाही तो पहिलाच ‘आयपीएल’ खेळाडू. पण, यंदाचा हंगाम वैभवसाठी खास होता. १४ वर्षे, २३ दिवसांच्या वैभवला १९ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली. ‘आयपीएल’मधील सर्वात युवा पदार्पणवीर, पहिल्याच चेंडूवर षटकार आणि २० चेंडूंत ३४ धावांची छोटेखानी, परंतु वेगवान खेळी सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली. या वैभवशाली वाटचालीत २८ एप्रिलला आणखी एक सुवर्णाध्याय लिहिला गेला. १४ वर्षे, ३२ दिवसांच्या वैभवने ११ षटकार आणि ७ चौकारांच्या साहाय्याने फक्त ३८ चेंडूंत १०१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. ३५ चेंडूंमधील त्याचे शतक ऐतिहासिक ठरले. प्रतिस्पर्धी गोलंदाज होते, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, राशिद खान, वॉशिंग्टन सुंदर आणि आर. साईकिशोर. पाचही आंतरराष्ट्रीय दर्जाचे. ‘आयपीएल’च्या व्यासपीठावरील सर्वात युवा शतकवीर, ख्रिस गेलनंतर दुसर्या क्रमांकाचे वेगवान शतक आदी असंख्य विक्रम त्याच्या नावावर नोंदले गेले. या पराक्रमानंतर स्वाभाविकपणे प्रकाशझोतात आलेल्या वैभववर स्तुतिसुमनांचा वर्षावर करणारे अनेक उद्गार माजी क्रिकेटपटू-मार्गदर्शकांनी काढले, तर काहींनी टीकाही केली. याशिवाय, वैभवच्या वयाचा मुद्दाही ज्वलंत झाला आहे.
वैभवचा हा बिहारचा. मिथिला भागातील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर परिसरातील मोतीपूर गावचा. भारताच्या नैऋत्येकडील नेपाळच्या सीमेनजीकचे हे गाव. वैभवच्या कारकीर्दीपुढील प्रश्न येथूनच सुरू होतात. वयाच्या चौथ्या वर्षीपासून तो क्रिकेट खेळू लागला. सुरुवातीला वडिलांनीच त्याला धडे दिले. नवव्या वर्षीपासून समस्तीपूर येथील क्रिकेट अकादमीत तो शास्त्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण घेऊ लागला. वयाच्या १२व्या वर्षी त्याला विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी बिहारच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळाले. जानेवारी २०२४मध्ये त्याने १२ वर्षे, २८४ दिवसांचा असताना बिहारकडून मुंबईविरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले. दुसर्या क्रमांकाचा सर्वात युवा रणजी पदार्पणवीर हा विक्रम तेव्हाच त्याच्या खात्यावर जमा झाला. नोव्हेंबर २०२४मध्ये त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेट पदार्पण केले, ते राजस्थानविरुद्ध. त्यावेळी तो १३ वर्षे, २४१ दिवसांचा होता. मग सप्टेंबर २०२४मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघापर्यंत त्याने मजल मारली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्दापणाच्या सामन्यातच त्याने शतक झळकावले. डिसेंबर २०२४मध्ये मध्य प्रदेशविरुद्ध तो विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा खेळला. त्यावेळी त्याचे वय १३ वर्षे, २६९ दिवस होते. म्हणजेच ‘आयपीएल’च्या आधीच त्याने देशांतर्गत आणि युवा क्रिकेटचा स्तर गाजवला आहे.
वैभवने ‘आयपीएल’मधील सर्वात युवा शतकवीराचा मनीष पांडेचा विक्रम मोडला. विक्रमाची तुलना केल्यास दोघांमध्ये पाच वर्षांचे अंतर. मनीषने शतक नोंदवले, तेव्हा २००९मध्ये त्याचे वय होते, १९ वर्षे, २५३ दिवस. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील युवा शतकवीर पाकिस्तानचा शाहीद आप्रिâदी. विक्रमाप्रसंगी (१९९६) तो १६ वर्षे, २१७ दिवसांचा होता. तर कसोटी क्रिकेटमधील युवा शतकवीर बांगलादेशचा मोहम्मद अश्रफुल १७ वर्षे, ६१ दिवसांचा (२००१) होता.
वैभवच्या यशाचे एकीकडे कोडकौतुक होत असतानाच काहींच्या भुवयाही उंचावल्या गेल्या. १४ वर्षांच्या बालकाच्या या पराक्रमाबाबत शंकाकुशंका उपस्थित केल्या गेल्या. नेमक्या याच वेळी २०२३मधील वैभवच्या एका मुलाखतीची चित्रफीत चर्चेत आली. या मुलाखतीत त्याला ‘तुझे वय किती?’ असा प्रश्न विचारला होता. यावर ‘‘२७ सप्टेंबरला मी १४ वर्षांचा होईन,’’ असे वैभव म्हणालेला. ही मुलाखत खरी मानली, तर आज तो १४ वर्षांचा नव्हे, १६ वर्षांचा असायला हवा. ही चर्चा सुरू झाल्यावर वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी वयचोरीचा आरोप फेटाळून लावला. ‘‘वैभव साडेआठ वर्षांचा असतानाच त्याने ‘बीसीसीआय’ची ‘बोन टेस्ट’ म्हणजेच हाडांची वयोनिर्धारण चाचणी केली होती. त्यामुळेच तो भारताच्या १९ वर्षांखालील संघात खेळू शकला. आम्ही कुणाला भीत नाही. पुन्हा कोणत्याही प्रकारच्या वयचाचणीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत,’’ असे स्पष्टीकरण वडिलांनी दिले.
वयचोरी ही क्रिकेटसाठी नवी मुळीच नाही. पाकिस्तानच्या हसन रझाने १९९६मध्ये मोठा गाजावाजा करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला, पण तो त्याच्या अंगलट आला. १४ वर्षे २२७ दिवस वयाच्या हसनने आपण सर्वात युवा कसोटी पदार्पणवीर असल्याचा दावा केला. परंतु हसनच्या वयासंदर्भात संशय निर्माण होताच पाकिस्तान क्रिकेट मंडळाने वैद्यकीय चाचणी घेऊन त्याचे खरे वय स्पष्ट केले. राजस्थानचे प्रशिक्षक द्रविड यांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे. वैभवकडे सध्या प्रसिद्धीचा झोत आहे. हे त्याच्यासाठी योग्य नाही, असे द्रविड म्हणाला. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही मोलाची सूचना दिली. गावस्कर म्हणाले की, ‘वैभवचे इतके कौतुक करू नका की त्याला आकाशही ठेंगणे वाटेल. त्याला अजून कारकिर्दीतील चढ-उतार पाहायचे आहेत.’ गावस्कर आणि द्रविड यांच्या विश्लेषणात तथ्य आहे.
गेल्या तीन दशकांकडे दृष्टीक्षेप टाकल्यास सचिन तेंडुलकरची गुणवत्ता शालेय वयातच हेरली गेली. हा खेळाडू भविष्यात मोठे नाव कमावणार हे तेव्हाच म्हटले गेले, तसे घडलेही. विनोद कांबळी, पृथ्वी शॉ, सर्फराज खान यांनीही शालेय वयात कर्तृत्व दाखवले. पण या तिघांच्या कारकिर्दीत खाचखळगे बरेच आले. ठाण्याच्या १५ वर्षीय प्रणव धानवडेने २०१६मध्ये १००९ धावांची मॅरेथॉन खेळी उभारत भविष्यातला तारा घडतोय अशी ग्वाही दिली. सचिन, धोनीने मुक्त कंठाने कौतुक केले. प्रणवचे वडील ऑटोरिक्षाचालक. त्याला गरिबीवर मात करून क्रिकेटपटू म्हणून घडता यावे, म्हणून त्याच्या प्रशिक्षणाचा आणि शिक्षणाचा खर्चही उचलला गेला. पण पुढील दीड वर्षात प्रणवला अपेक्षित सूर गवसलाच नाही. परिणामी त्याच्या वडिलांनी पत्र लिहून मुलासाठीची शिष्यवृत्ती थांबवली. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने २०१२मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. आई-वडील शिक्षकी पेशातले असल्याने क्रिकेटसह शैक्षणिक गुणवत्ताही त्याची कमालीची उत्तम होती. पुढच्याच वर्षी त्याने ‘द स्काय इज द लिमिट’ हे पुस्तकही लिहिले. परंतु उन्मुक्तची कारकीर्द अपेक्षेनुसार बहरली नाही. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. परदेशातील लीग खेळून पैसा कमावण्याच्या हेतूने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. अरमान जाफरनेही शालेय वयातील खेळीनिशी काका वसीम जाफरप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावेल अशा आशा निर्माण केल्या. पण सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. २०१८च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात कमलेश नागरकोटीने आपल्या वेगवान मार्याने वाहवा मिळवली. त्यामुळे ‘आयपीएल’मध्येही त्याला संधी मिळाली. परंतु वारंवार होणार्या दुखापतींमुळे त्याच्या कारकिर्दीला ग्रहण लागले.
तूर्तास, ‘आयपीएल’ उत्तरार्धाकडे वाटचाल करीत आहे. १४ वर्षीय वैभवच्या कामगिरीचे कोडकौतुक होऊ दे. वैभवच्या संदर्भातील वयाच्या प्रश्नांची ‘बीसीसीआय’ दखल घेऊन त्याला वयनिर्धारण चाचणीला पुन्हा सामोरे जावे लागेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण, हे बालवयातील सूर्यवंशी तेजाचे वैभव टिकेल का, याचे उत्तर काळच देईल!