ट्रम्पच्या माकडचाळ्यांच्या विरोधात चीनसारखा देश ताठ उभा राहतो, छोटे छोटे देशही त्याला धडा शिकवण्याची भाषा करतात, मग आपले लाल आँखेवाले, छप्पन्न इंची विश्वगुरू चकार शब्द का काढत नाहीत? ही कसली मुत्सद्देगिरी?
– रेवणनाथ टेमगिरे, सोलापूर
अहो, एका माकडाला चाळा करताना पाहून दुसरं माकड काही बोलत नाही, उलट त्याच्याहून जास्त चाळा करतो (काही कळलं का?) ट्रम्पचा चाळा बघून आपले विश्वगुरू तसा काही चाळ करतायेत का? (या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच ठेवा.) विश्वगुरू चकार शब्द काढत नाहीत, पण त्या ट्रम्पचं बोलणं त्याच्या तोंडावर हसण्यावारी नेतात, हे तुम्हाला दिसत नाही? नसेल दिसत तर व्हिडिओ पहा. नसतील ते कोणाला लाल डोळे दाखवत. पण आपल्या शत्रूला आपल्या गावात बोलावून, त्याला झोपाळ्यावर झुलवतात. असं डेरिंग आजपर्यंत कुठल्या हुकूमशहाने तरी केली आहे का? या अँगलने तुम्ही बघा ना. पण नाही तुम्हाला विश्वगुरूंनी चकार शब्दच काढलेला हवा. कारण त्यांनी चकार शब्द काढला की तुम्ही त्यांचे चुकार शब्द शोधायला मोकळे. लगेच त्यावर तुम्ही मीम बनवणार, रील बनवणार. तुमच्यासारख्या विरोधकांचा डाव विश्वगुरू ओळखून आहेत, म्हणून ते चकार शब्द काढत नाहीत.
संतोषराव, त्या ट्रम्पतात्याने यदाकदाचित आपल्या ‘यदाकदाचित’लाही टॅरिफ लावले तर हो!
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
आम्ही त्याच्यावरही नाटक लिहू… पण भीती वाटते, आम्ही ट्रम्पदेवाची विटंबना केली असं तात्यांच्या भक्तांना वाटलं तर हो…
महाराष्ट्रात हल्ली मराठी माणसं हिंदी सण साजरे करत आहेत, हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदी संस्कृती आपली मानू लागली आहेत, मुंबईत तर एकमेकांशी हिंदीत बोलू लागली आहेत… मग हिंदी पहिलीपासून सक्तीची केली तर बिघडलं कुठे?
– चेतना देशपांडे, साप्रस
पहिलीपासून कशाला? आम्ही तर म्हणतो बाळ पोटात असल्यापासून हिंदी सक्तीची करा, नव्हे नव्हे हिंदी येत नसेल तर बाळ जन्मालाच घालू नये अशी सक्ती करा… आतापर्यंत जे घडलेलं होतं ते सगळंच बिघडलंय… अजून बिघडून बिघडून काय बिघडणार आहे? (फक्त माननीय नेते आणि त्यांच्या दिवट्यांना हिंदी सक्तीचे करू नका… (कदाचित त्यांचं दिव्य हिंदी ऐकल्यानंतर आपलं हिंदी बिघडेल असं माननीय नेत्यांच्या आदरणीय नेत्यांना वाटलं असेल… तर त्यांचं काय चुकलं?)
एक काकू म्हणतात की भारतीय जनता पक्षाला मत दिलं नाही, तर देवाचा कोप होतो, पुढचा जन्म प्राण्यांचा मिळतो. खुद्द देवानेच त्यांना सांगितलं आहे. तुम्ही देवाच्या कोपापासून वाचण्यासाठी काय करणार?
– इरफान मुल्ला, डोंगरी
देवाला विरोध करणार्यांची आय माय एक करणार… ते करताना आमचे संस्कार आडवे आले तर संस्कारी पार्टीत प्रवेश करणार.. तिथे प्रवेश नाही मिळाला तर, विरोधी पक्षात स्लीपर सेल म्हणून काम करणार… आणि तुमच्यासारख्या प्रश्न विचारणार्यांना ट्रोल करणार… यावर तुम्ही काय करणार हे आता तुम्ही सांगा मुल्लाजी!
सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदावर भूषण गवई यांच्या रूपाने पुन्हा एकदा मराठी माणूस विराजमान होणार आहे. आता तरी शिवसेना पक्षफुटीच्या खटल्यात न्याय होईल, असं वाटतं का?
– तानाजी कोल्हे, जुन्नर
या आधीचा माणूसपण मराठीच होता… पण देवाला कौल लावून न्यायाला चूड लावणारा होता. आता येणारे गवई भले गाणारे असले तरी कोणाची आरती गाणारे नसावेत, रिटायर झाल्यावर लोकसभेत विराजमान होणारे नसावेत, कुठल्या राज्याच्या राज्यपालपदी विराजमान होणारे नसावेत, जास्त बोलायला लावू नका… नाहीतर शिवसेना पक्षफुटीचा खटला आणि प्रश्न विचारणारे तुम्ही बाजूला राहायचे आणि न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला सुरू व्हायचा… आमच्यावर.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राणा प्रतापांकडून प्रेरणा घेतली आणि गनिमी कावा त्यांनी राणा प्रतापांकडूनच उचलला, असा शोध देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लावला आहे. हे शिवरायांचा गौरव करत असतात की अपमान?
– विनय पाटील, सांगली
सन्मानाच्या हारामधून मान काढून घ्यावी लागणार्यांना मान काय आणि अपमान काय… तुम्हाला काय वाटतं संरक्षणमंत्री फक्त देशाच संरक्षण करतात? ते स्वत:च्या पदाचंही संरक्षण करतात… त्यासाठी अपमानामध्येच मान आहे अस समजून घ्यावं लागतं… आता हा गनिमी कावा ते कुठून शिकले ते त्यांनाच माहीत…