गायकवाड वाड्यात अस्पृश्यांचा मेळा आणण्याचं धाडस श्रीधरपंत टिळकांच्या पुढाकाराने पार पडलं. ही क्रांतिकारक घटना प्रबोधनकारांनी सविस्तर नोंदवून ठेवलेली आपण पाहिलीच. त्यापुढचा समतेच्या वाटेवरचा श्रीधरपंतांचा प्रवास अडचणींना भरलेला होता. या अडचणींचा सामना करताना आलेली अस्वस्थता त्यांना कणाकणाने संपवत होती.
– – –
लोकमान्य टिळक जिथे राहत होते, जिथून केसरी मराठा वृत्तपत्रं निघत होती, तो वाडा मुळात महाराज सयाजीराव गायकवाडांचा होता. त्यांनी लोकमान्य टिळकांना तो भेटच दिला होता, तरीही त्यांनी सरकारी खप्पामर्जी नको म्हणून कागदोपत्री विक्री केल्याचं दाखवलं होतं. त्यामुळे या वाड्याला गायकवाड वाडा असंच नाव होतं. पण टिळकांच्या कट्टर ब्राह्मणी अनुयायांना हे बहुजनी नाव पचनी पडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्याला टिळकवाडा म्हणणं सुरू झालं. प्रत्यक्षात मात्र केसरीवाडा हे नाव जास्त रुळलं. आजही वाड्याच्या बाहेर हेच नाव लिहिलेलं आहे. भालाकार भोपटकरांसारख्या टिळकवाद्यांच्या लिखाणात तर याला सज्जनवाडा असं नाव आढळतं. त्यांच्यासाठी लोकमान्य हे रामदास स्वामींचे आणि महात्मा गांधी तुकाराम महाराजांचे वैचारिक वारसदार असल्याने त्यांनी हे सज्जनगडाशी जुळणारं वेगळंच नाव दिलं होतं. यावरून लक्षात येतं की गायकवाड वाडा हा टिळकवाद्यांसाठी ब्राह्मणी विचारांचा किल्ला होता. तो जातिश्रेष्ठत्वाचं एक प्रतीकच बनला होता. त्यामुळे रामभाऊ आणि श्रीधरपंत टिळकांनी १९२७च्या गणेशोत्सवात गायकवाड वाड्यातल्या गणपतीसमोर थेट अस्पृश्यांचा मेळाच आणल्याने ब्राह्मणी कंपू हादरला होता.
या घटनेचं सविस्तर वर्णन प्रबोधनकारांनी केलेलं आपण पाहिलंच. याच दरम्यान म्हणजे ४ सप्टेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता समाज संघाची स्थापना मुंबईत केली. रोटीबंदी आणि बेटीबंदी संपवण्यासाठी कार्यक्रम सुरू केले. सगळ्या जातीतल्या लोकांनी एकत्र येऊन सहभोजन करण्याचे कार्यक्रम हे त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. या संघात फक्त अस्पृश्य नव्हते तर विविध जातींमधली सुधारणावादी मंडळी एकत्र आली होती. त्यात प्रबोधनकारही होते. प्रबोधनकारांनी त्यांच्या कायस्थ प्रभू समाजात घडवलेल्या लोकजागृतीमुळे या समाजातले अनेक तरुण समता संघात सक्रिय होते. भा. वि. प्रधान, एस. एस. गुप्ते, जी. आर. प्रधान, भा. र. प्रधान, द. वि. प्रधान ही प्रबोधनकारांच्या चळवळीत घडलेली मंडळी समता संघाची प्रमुख पदाधिकारीही होती. मुंबईतली हुंडाबंडीची चळवळ अर्धवट सोडून प्रबोधनकार अचानक सातार्याला आणि पुढे पुण्यात गेल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांशी जोडले गेले होते.
श्रीधरपंत बाबासाहेबांमुळे आधीच प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांना समता समाज संघाची माहिती थेट बाबासाहेबांमुळे मिळाली असेल. कदाचित प्रबोधनकारांमुळे मिळाली असेल. प्रबोधनच्या कचेरीत श्रीधरपंत आणि प्रबोधनकार या दोघांमध्ये दिवस दिवस चर्चा होत, तेव्हा हा विषय निघाला असणारच. पुण्यात समता संघ सुरू करण्याची तयारीही दोघांनी एकत्र मिळून केली असेल. आज या फक्त शक्यता म्हणून मांडता येतात. याचं खरं खोटं करता येणार नाही. पण श्रीधरपंतांनी पुण्यात समता संघाची शाखा सुरू करण्याचं ठरवलं, तेव्हा प्रबोधनकार सोबत असावेतच. प्रबोधनकार पुण्यात असतानाच याची मानसिकता घडली होती. गायकवाड वाड्यात अस्पृश्यांचा मेळ्याचा कार्यक्रम घडवला म्हणून पुण्यातल्या अस्पृश्यांनी १४ सप्टेंबर १९२७ला त्यांचा सत्कार केला. त्याचा वृत्तांत बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारत या पाक्षिकात आला आहे. डॉ. शत्रुघ्न जाधव यांच्या श्रीधरपंत टिळक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात त्याचा आलेला संदर्भ असा आहे,
श्रीधरपंतांनी आपल्या भाषणात हिंदू महासभा, आर्यसमाज व काँग्रेसमधील सवर्ण व सनातनी यांच्यावर तोफ डागली. आपल्या धारदार व ओजस्वी भाषणातील श्रीधरपंतांच्या या काही ओळी अशा आहेत– हा चांभार, हा महार असे भेद पाडून अस्पृश्यता चिरकाल टिकविण्याचा धूर्त व मतलबी ब्राह्मणांचा कावा वेळीच ओळखला पाहिजे. तुमच्यात भेद पाडून अस्पृश्यता कायम टिकवण्याचे प्रयत्न देशात हल्ली चालू आहेत.
त्यानंतर महाडचा चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने महाराष्ट्रात मोठं वादळ निर्माण केलं. त्यात श्रीधरपंतांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला. त्या पुढचं पाऊल म्हणजे समता समजा संघाची पुण्यात स्थापना होती. ८ एप्रिल १९२८ला श्रीधरपंतांच्या पुढाकाराने गायकवाड वाड्यातच ही स्थापना झाली. पण त्यात प्रबोधनकार सोबत नव्हते. जिवावर बेतलेलं आजारपण आणि अचानक उद्भवलेल्या संकटांमुळे प्रबोधनकारांना पुण्यात जोरात सुरू असलेलं मासिक प्रबोधन आणि साप्ताहिक लोकहितवादी बंद करून मुंबईत आले होते. नोव्हेंबर १९२७पासून साधारण दोन वर्षं प्रबोधन बंद होतं.
८ एप्रिलच्या आदल्या दिवशीच श्रीधरपंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे जवळचे सहकारी देवराव नाईक, गंगाधर सहस्रबुद्धे, भा. र. कद्रेकर, भा. वि. प्रधान, विठ्ठल प्रधान यांना पुण्याला बोलावलं. त्यांचा रात्रीचा मुक्काम गायकवाड वाड्यातच होता. ८ एप्रिलला सकाळी लोकमान्यांच्या दिवाणखान्यातच ब्राह्मण, ब्राह्मणेतर, अस्पृश्य पुढारी एकत्र आले होते. तिथे त्यांनी एकत्र चहापान केलं आणि तिथेच समता संघाच्या पुणे शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. बाबासाहेबांनी श्रीधरपंतांचं फारच कौतुक केलं, संघाच्या कार्यास जागा देऊन समतेच्या तत्त्वास उचलून धरण्यात श्रीधरपंतांनी मोठं धैर्य दाखवलं आहे, यात शंकाच नाही. हे कार्य जर ते नेटाने करत राहतील तर वडिलांच्या कार्याच्या हजारपट अधिक महत्त्वाचे कार्य त्यांनी केले असे जनता म्हणेल.
पाठोपाठ श्रीधरपंतांचंही भाषण झालं. त्यात ते म्हणाले, हिंदू समाजाची स्थिती चिखलात रुतलेल्या गजेंद्रासारखी आहे. त्यास वर्णभेदरूपी मगर पीडित आहे. समता संघरूपी विष्णूच त्या गजेंद्रास वर काढण्यास अवतरला आहे… चातुर्वर्ण्यजन्य जी असमानता हिंदू समाजात आहे, ती नाहीशी करणे या विशिष्ट हेतूनेच या संघाची स्थापना होत आहे. रशियातील आर्थिक समानतेचा प्रचार करणारी बोल्शेविक चळवळ इथे सुरू करण्याचा आमचा विचार नाही. या संघातर्फे सहभोजनादी जी कार्ये होतील त्यांना हा माझा दिवाणखाणा मोकळा राहील. याचप्रमाणे मिश्रविवाहासाठी खास जागा होईतोपर्यंत त्या कामासाठी ही माझी जागा मी देत आहे. प्रबोधनकार मुंबईत आजारी नसते, तर निश्चितपणे त्यांचं भाषण या कार्यक्रमात झालंच असतं. प्रबोधन आणि लोकहितवादी प्रकाशित होत असते तर त्यात याचे वृत्तांत प्रसिद्ध झाले असते. प्रबोधन समता समाज संघाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असता. पण ते घडायचं नव्हतं.
पुण्यातल्या समता समाज संघाचे श्रीपतराव शिंदे हे अध्यक्ष, श्रीधरपंत टिळक उपाध्यक्ष, पां.ना. राजभोज हे चिटणीस तर केशवराव जेधे कार्यकारिणी सदस्य होते. समता संघाच्या स्थापनेच्या क्रांतिकारी घटनेने पुण्यात बॉम्ब पडल्यासारखी परिस्थिती झाली. लोकमान्यांचे स्वयंघोषित शिष्य भालाकार भोपटकर यांनी त्यावर भालात प्रतिक्रियाही लिहिली, सदर शाखा लोकमान्यांच्या सज्जनवाड्यात त्यांच्याच चिरंजीवांच्या नेतृत्वाखाली स्थापन व्हावी, हे दुर्दैव आहे. लोकमान्य चातुर्वर्ण्याभिमानी होते, हे आम्हांस पक्के माहीत आहे. पुढच्या अंकात त्यांनी लिहिलं, खुद्द लोकमान्यांच्याच वाड्यात व त्यांच्याच दोन्ही चिरंजीवांच्या देखत ब्राह्मण ब्राह्मणेतरांनी व अस्पृश्यांनी एके ठिकाणी चहापान करावे ही ब्राह्मण जातीवर मोठी भयंकर आपत्ती ओढवली आहे.
या टीकेने अस्वस्थ होण्याऐवजी श्रीधरपंतांनी अधिक त्वेषाने समतेच्या वाटेवर पुढचं पाऊल ठेवलं. त्यांनी ११ मे रोजी गायकवाड वाड्यात सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी बाबासाहेब आणि त्यांचे सहकारी आदल्याच दिवशी संध्याकाळी गायकवाड वाड्यात पोचले. श्रीधरपंतांच्या पत्नी शांताबाई यांनी दोन ब्राह्मण बायकांना सोबत घेऊन सगळं जेवण बनवलं. त्यात वेगवेगळ्या जातींचे लोक सहभागी झाले होते. जिथे लोकमान्यांच्या काळात मोठमोठ्या नेत्यांच्या जेवणावळी झडल्या होत्या, तिथे हे क्रांतिकारी सहभोजन झालं. श्रीधरपंतांचे चिरंजीव जयंतराव तेव्हा अवघे १० वर्षांचे होते. त्यांनी आपल्या आठवणीत लिहिलं आहे, स्वयंपाक चालू असता पंतांच्या घरातील विजेचे दिवे बंद पडले. तेव्हा त्यांनी मेणबत्त्या, कंदील, गॅसच्या बत्त्या घरात पेटवून सर्व समारंभ अत्यंत उत्साहात पार पाडला.
सनातनी मंडळींनी हे सहभोजन होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न केले होते. वाड्यातली वीजही बंद पाडली. अनेक अफवा पसरवल्या. पण श्रीधरपंतांनी ही क्रांती घडवून आणलीच. समता समाज संघाने ब्राह्मणांमधल्या केशवपन, बालविधवा अशा जुनाट रूढींनाही विरोध करावा, अशी भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. चातुर्वर्ण्य विध्वंसक समता समाज संघ अशी पाटी लावली. या सगळ्यामुळे लोकमान्यांचे ब्राह्मणी अनुयायी अस्वस्थ झाले नसते तरच नवल.
य. दि. फडके यांनी या प्रतिक्रिया नेमकेपणाने नोंदवल्या आहेत. त्या अशा, श्रीधरपंतांच्या या उपक्रमामुळे लोकमान्यांची पवित्र वास्तू विटाळली गेली. सूर्यापोटी शनी यावा असे जन्मलेले टिळकांचे दिवटे चिरंजीव घराण्याच्या कीर्तीला काळे फासत आहेत, असे टिळकभक्तांना वाटत होते, तर श्रीधरपंत म्हणजे हिरण्यकश्यपूच्या घरी जन्मलेल्या प्रल्हादासारखे आहेत, असे ब्राह्मणेतर पक्षाचे लोक म्हणत होते.
प्रबोधनकारांना या घटनेने प्रचंड आनंद झाला असेल. पण तो आनंद व्यक्त करण्याच्या आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याच्या अवस्थेत नव्हते. ते मुंबईत जीवघेण्या आजारपणात मृत्यूशी झुंज देत होते.