गौरव सर्जेराव
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित विवेकरेषा व्यंगचित्र प्रदर्शन २०२५ नुकतेच पार पडले. अशा प्रकारचे महाराष्ट्रातील पहिलेच प्रदर्शन होते. यात भारतामधील २५ नामवंत आणि प्रतिभावंत व्यंगचित्रकारांनी भाग घेतला होता. सध्या देशामध्ये तरुणांना भुलवण्यासाठी कट्टरतावादी धार्मिक विचारांना ताकद देण्यासाठी वेगवेगळ्या बुवा महाराजांचा ज्या प्रकारे गैरवापर केला जात आहे, ते बघून मला तीव्र वेदना होतात. समाजातला वैज्ञानिक दृष्टिकोन कुठेतरी हरवत चालला आहे आणि अंधश्रद्धेच्या एका मोठ्या खड्ड्यात आपल्याला ढकलण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला जात आहे, ही भावना मनात खूप सलत होती. पण याबद्दल व्यक्त कसं व्हावं हे मला सुरुवातीला समजत नव्हतं. त्यानंतर माझा कुंचला हेच माझं हत्यार आहे, हे माझ्या लक्षात आलं आणि व्यंगचित्र नावाचं हे समाज प्रबोधनाचं माध्यम आपल्याकडे आहे, त्याचाच वापर आपण करायला हवा, याची जाणीव झाली. पण मला हेही ठाऊक होतं की, ही फक्त माझी भावना नाही तर या देशातल्या अनेक विवेकवादी व्यंगचित्रकारांची भावना आहे. त्यामुळेच आणखी २४ व्यंगचित्रकार जोडून घेतले. हे वर्ष २०२५ म्हणून २५ व्यंगचित्रकार, एक विषय, एक प्रदर्शन अशी संकल्पना आकाराला आली.
ही संकल्पना मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांना ऐकवली. आमची पूर्वओळख नसतानाही त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून यासाठी संपूर्ण साहाय्य केलं… सतीश आचार्य, मंजुल, सजिथ कुमार, घनश्याम देशमुख यांच्यासारख्या नावाजलेल्या व्यंगचित्रकारांनी त्यांची व्यंगचित्र देण्याची तयारी दर्शवली, ही मला खूप मोठी गोष्ट वाटते. या प्रदर्शनासाठी एकाही व्यंगचित्रकाराने एक रुपयाचे देखील मानधन घेतले नाही. एका महिन्याच्या कालावधीत सगळ्या व्यंगचित्रकारांनी यासाठी एकूण १५० व्यंगचित्रे दिली. यात काही जुन्या तर काही नव्या व्यंगचित्रांचा समावेश होता. ही सगळी चित्रे अंधश्रद्धा,कट्टरता,भोंदूपणा आणि अज्ञानाविरुद्ध रेखाटलेली होती.
आम्ही यावेळी व्यंगशिल्प नावाचा एक नवा प्रकार देखील सादर करण्याचा प्रयत्न केला. यासाठी पेपरचा वापर करून आम्ही काही शिल्प घडवली होती. सोबतच आम्ही महाराष्ट्रासाठी लहान गट आणि खुल्या गटामध्ये व्यंगचित्र स्पर्धा देखील आयोजित केली होती. तिला देखील तुफान प्रतिसाद आला.
या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वतःच्या कामामधून विवेकी विचार जपण्याचा मार्ग अवलंबलेल्या व्यक्तींकडून व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, लेखक अरविंद जगताप आणि व्यंगचित्रकार मंजुल यांनी या कार्यक्रमाला येण्याचं लगेच कबूल केलं. त्यांचा मौल्यवान वेळ या कार्यक्रमासाठी दिला. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्ताविकातून महाअंनिसची भूमिका स्पष्ट केली. देशाचे, समाजाचे चित्र कुठे बिघडले आहे हे व्यंगचित्र दाखवते, असं स्पष्ट मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. त्याचसोबत अरविंद जगताप यांनी, नेतेमंडळी आणि व्यंगचित्रकार यांच्यामध्ये पूर्वी कसे चांगले संबंध असायचे याचे छान किस्से सांगितले.. व्यंगचित्रकार या समाजातील किती महत्त्वाचा भाग आहेत हे मंजूल यांच्या अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट झाले. इतक्या मोठ्या मान्यवरांसमोर माझंही मत मला मांडायला मिळालं, याहून मोठी गोष्ट काय असणार!
पुढील दिवसांमध्ये वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके झाली. यामध्ये ओमकार बागवे यांनी कॉमिक्स स्ट्रिपची, जयेश दळवी यांनी अॅनिमेशनची, मी व्यंगचित्रकलेची आणि घनश्याम देशमुख यांनी त्यांच्या हास्यरेषांची प्रात्यक्षिके दिली.. भारत विठ्ठलदास यांनी चमत्कारांची पोलखोल करण्यासाठी त्यांच्या खास शैलीत त्या चमत्कारांमागचं विज्ञान समजावून सांगितलं… त्याला लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला…
अनेक लोक आम्हाला येऊन भेटले.. यामध्ये अगदी ५ वर्षांच्या लहानग्यांपासून ९० वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत अनेक जण होते. मिलिंद देशमुख, अनिल वेल्हाळ, श्रीपाल ललवाणी, सौरभ बगाडे, विजय सुर्वे असे अनेक महाअंनिसचे कार्यकर्ते आणि ओमकार बागवे, जयेश दळवी, आदित्य उल्हारे या माझ्या जिवलग मित्रांनी हे प्रदर्शन घडवून आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले… फक्त संकल्पना असून चालत नाही तर तिच्या पूर्तीसाठी अनेक असे चांगले हात असावे लागतात… तेव्हाचं हे साध्य होतं… महाअंनिसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह,त्यांची जिद्द आणि या कामाविषयीचं प्रेम पाहून मी भारावून गेलो… त्यांच्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर विचारस्वरूपाने आजही जिवंत आहेत हे जाणवलं.. माणूस मारता येतो पण त्याचा विचार मारता येत नाही! डॉक्टरांच्या मुलाखती,त्यांची पुस्तकं वाचण्यापासून सुरू झालेला हा माझा प्रवास आज त्यांच्या संस्थेची कामाशी जोडण्यापर्यंत येऊन पोहोचला याचा मला खूप आनंद आहे… हे प्रदर्शन पुण्यानंतर आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि गावांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे… अधिकाधिक लोक यामध्ये जोडले जातील आणि भूलथापांना बळी न पडता, लोक स्वतःच्या तर्कबुद्धीचा वापर करून आयुष्यातील समस्यांवर मात करतील हा आम्हाला विश्वास आहे! या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही ही विवेकाची ज्योत सतत तेवत ठेवू!