□ टँकरच्या संपामुळे मुंबईत पाणीसंकट, लोकांचे हाल; महापालिकेचे अधिकारी सुट्टीत मस्त.
■ सर्वसामान्य नागरिकांना उत्तरदायी असलेले लोकप्रतिनिधीच पालिकेत नाहीत, मग हे बाबू लोक थेट मंत्रालयाला उत्तरदायी होतात, तिकडचं सेटिंग फिट झालं की तुम्हाआम्हाला विचारतो कोण? न्यायालयही या प्रकरणांची अंडी उबवत बसलेलं आहे, हे सर्वात मोठं आश्चर्य आहे.
□ न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह; माजी सरन्यायाधीशांचा निर्णय सिंगापूरच्या न्यायालयाकडून रद्द.
■ जिथे सरन्यायाधीशच शेकडो पानं इकडून तिकडे कॉपी पेस्ट करत असतील, तिथे बाकीचे न्यायाधीश काय करत असतील आणि आपण कोणत्या तोंडाने मुलांना शिकवणार की कॉपी करणं चुकीचं आहे, तुमच्या मनाचं लिहा म्हणून! शिवाय हे सगळे कोणत्याही कायदेशीर कारवाईच्या पलीकडे असतात, ते वेगळंच.
□ लाडक्या बहिणींना घरबसल्या पैसे; मग एसटी कर्मचार्यांवर अन्याय का? एसटी कर्मचारी, अधिकार्यांत संताप.
■ सदावर्तेसारख्या सत्ताधीशांनी नेमलेल्या भाड्याच्या तट्टाच्या नादी लागण्याची चूक त्यांनीही केलेली आहेच ना! असले नेते असल्यावर तुमच्यावर हीच वेळ येणार. लाडक्या बहिणींनाही आता ठेंगाच मिळणार आहे. तुम्ही तर सरकारी नोकर. जाऊन जाऊन कुठे जाल?
□ निष्क्रियता लपवण्यासाठी महायुतीकडून ‘आपले सरकार’ पोर्टल बंद.
■ ‘आपले सरकार’च लोकांच्या कामांच्या संदर्भात बंद आहे, तर पोर्टलचं काय घेऊन बसलात… हे फक्त गुजरातची धन करण्यासाठी आणि दिल्लीतल्या गुजरात टोळीचा अजेंडा राबवण्यासाठी नेमलेले बाहुले आहेत सगळे. ते काय करतात ते पोर्टलवर मांडून चालेल का?
□ सांगली लोकसभेच्या लढतीत अपक्ष निवडून आलेल्या विशाल पाटील यांना मंत्रीपदाचे वेध.
■ सगळे वाहत्या गंगेत मनसोक्त हात धुवून घेतायत तर त्यांनी काय घोडं मारलंय? महत्त्वाकांक्षा नसेल तो राजकारणी कसला?
□ लाखो वीज ग्राहकांच्या घरी अदानीचे स्मार्ट मीटर लावण्यासाठी महायुती सरकारची दादागिरी.
■ असं कसं? मालकांचं काम करण्याचाच पगार मिळतो नोकरांना! पगाराचं काम केलं नाही तर मालक ठेवतील का कामावर? देशात आधीच बेरोजगारी किती आहे. विचार करा.
□ भररस्त्यात चुलीवर भाकरी थापत सरकारच्या विरोधात संताप; पुणे, सांगलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन.
■ आंदोलनापेक्षा आता विरोधी पक्षांनी जंगलातून लाकूड फाटा कसा आणावा, चूल कशी पेटवावी, कशी फुंकावी, कशी वापरावी, याचे वर्ग आयोजित करायला पाहिजेत. त्याचा अधिक फायदा होईल जनतेला.
□ शिंदे गटाला धास्ती; अमित शहा घेणार सुनील तटकरेंच्या घरी पाहुणचार.
■ खुराड्यातले कोंबडे एकमेकांशी झुंजतात, एकमेकांची धास्ती घेतात, तसाच हा व्यर्थ प्रकार आहे. मालक कोंबडे झुंजवतात, एकाला जवळ करतात, दुसर्याला दूर ठेवतात. शेवटी सगळ्यांचा शेवट मालकाच्या ताटातच होतो.
□ मिंधेगिरीला चपराक; तनिषा भिसे कुटुंबीयांनी मिंध्यांनी दिलेला पाच लाखांचा मदतनिधी नाकारला.
■ दोन बाळांची आई गेली, त्याची भरपाई कशाने होणार? सगळ्या गोष्टींची भरपाई नोटांची बंडलं फेकून होत नाही, हे पैशांसाठी आईचं दूध विकणार्यांना कुठून कळणार?
□ ‘फुले’ चित्रपटावरून नव्या वादाचा ट्रेलर.
■ काही दिवसांनी नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळी झाडल्याचा सीन दाखवल्यामुळे आमच्या भावना दुखावतात, असा कांगावा करायला कमी करणार नाहीत सनातनी बदमाष. गांधीजी आत्महत्या करतात आणि ती रोखू पाहणार्या नथुरामला नेहरू हत्येच्या कटात गोवतात, असा विवेक अग्निहोत्रीचा गांधी फाइल्स नावाचा सिनेमा निघेल लवकरच.
□ ईव्हीएम हॅक करता येतं, निकालही फिरवता येतो – अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे.
■ आमच्याकडे २०१९ आणि २०२४च्या निवडणुकांमधून सत्तेवर बसलेल्या पुंडांच्या रूपाने जिवंत पुरावे आहेत, ईव्हीएम हॅकिंगचे. पण यांनी लोकांचे मेंदूही हॅक केलेले असल्याने आता पूर्णपणे खड्ड्यात गेल्याशिवाय जाग येणे कठीण आहे.
□ एसटीच्या पगारावरून महायुतीत टक्कर; अजित पवार व सरनाईकांमध्ये जुंपली.
■ कसली जुंपली आणि कसलं काय? सगळे लोकांना उल्लू बनवण्याचे धंदे. एसटी कर्मचार्यांचे पगार करता येत नसतील तर मी देतो राजीनामा, असा बाणा कोणी मंत्री दाखवतो का कधी? संपला विषय. एसटी मोडकळीला आणून यांना खासगी व्यावसायिकच पोसायचे आहेत. तिथे पार्टनरशिप करता येते छुपी.
□ सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश केराच्या टोपलीत; अपात्र धारावीकरांना डंपिंग ग्राऊंड, मिठागरांवर फेकणार.
■ सर्वोच्च न्यायालयाच्याही वर एक अडाण्यांनी निवडून दिलेली अडाण्यांसाठी राबणारी महाशक्ती बसलेली आहे, ती सरकारं उचलून डंपिंग ग्राऊंडवर फेकण्याची ताकद बाळगते, तिथे धारावीकरांना कोण विचारतो?
□ कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतात आणि भाव पडतात – माणिकराव कोकाटे पुन्हा घसरले.
■ कृषिमंत्री कसा नसावा, याचं उदाहरण म्हणून मोकाट कोकाटे इतिहासात अजरामर होणार आहेत… सकारात्मक काही करण्याची योग्यता नसली की लोक दुसरं काय करतील?