पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर बसल्यानंतर ११ वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयाला म्हणजे रेशीमबागेला पहिल्यांदाच भेट दिली… संघ हा भारतीय संस्कृतीचा वटवृक्ष आहे, अशी भलामण त्यांनी या भेटीत केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात हा वटवृक्ष बोन्साय बनून कोणाच्या कुंडीत दडलेला होता आणि त्याला पाणी कोण घालत होते, हे अर्थातच मोदींनी सांगितले नाही.
हा फार मजेशीर वटवृक्ष आहे. या वृक्षाच्या फांदीवर लहानाचे मोठे झालेले फाटक्या पंखांचे पक्षी एकदा नेहरू जाकीट घालून, लाखोंचे सूट परिधान करून देशविदेशात उडायला लागले की मातृवृक्षाच्या भेटीला येतच नाहीत. आम्हाला या वटवृक्षाची गरज नाही, अशा गमजा केल्या जातात. मग यांच्या उड्डाणासाठी लागणारं मतांचं इंधन कमी पडू लागतं. मग वटवृक्षाला दया समर्पित कार्यकर्ते नावाच्या सरपणाची व्यवस्था करतो. तेव्हा कुठे हे भानावर येतात आणि मातृसंस्थेत ज्येष्ठांचं
पदप्रक्षालन करायला धावतात. बिहार आणि उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या निवडणुका पुढे येणार आहेत. नुसत्या तोंडच्या वाफेवर निवडणुका जिंकता येत नाहीत, हे महाराष्ट्राच्या निवडणुकीत सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळे तुम्हीच आमचे मायबाप, तुमच्यामुळेच आम्ही आहोत, असं सांगून दंडवत घालायला मोदी रेशीमबागेत आले असावेत.
निर्ढावलेपणा या नावाने ओळखल्या जाणार्या या कलेत ते तरबेज आहेत.
काही महिन्यांपूर्वी ते मुसलमानांना कपड्यांवरून ओळखा असं सांगत होते. त्यांच्या पक्षाचे लोक गोली मारों सालों को, अशा गर्जना करत होते. खुद्द देशाचे पंतप्रधान, मुसलमान तुमची गाय पळवून नेतील, मंगळसूत्रं चोरतील अशी भीती घालत होते (आणि स्थानिक टिल्लू टॉम असली विखारी भाषा का बोलतात, त्यांना संवैधानिक पदाचा, शपथेचा विसर पडतो का, असे प्रश्न आपल्याला पडत असतात… त्यांच्यावरचे ‘संस्कार’च हे आहेत). आता आगामी निवडणुकांमध्ये ही मतंही आवश्यक आहेत, म्हटल्यावर यांचाच पक्ष सौगात ए मोदी नावाची रेवडी मुसलमानांना वाटायला सज्ज झाला आहे… केवढा हा निलाजरेपणा? अरे, या १५-२० टक्क्यांमुळे देशातले ८०-८५ टक्के हिंदू खतर्यात येत होते ना (जगात सर्वात नेभळट बहुसंख्याक म्हणून किती बदनामी होत असेल आपली)? तुम्ही प्रसारमाध्यमांत, सोशल मीडियावर सोडलेले पगारी, बिनपगारी कुत्रे सतत यांच्याच नावाने भुंकत, तंगड्या वर करत फिरत असतात ना? आता मतं कमी पडायची वेळ आली की तुम्ही लाडका भाऊ-लाडकी बहीण म्हणून त्यांच्या गळ्यात पडणार आणि हेच इतरांनी केलं तर त्यांना हिंदूद्रोही म्हणणार? तुम्ही केलं तर राष्ट्रकार्य आणि इतरांनी केलं तर लांगूलचालन?
हे सगळे प्रश्न मोदींना आणि मोदींच्या चरणी आपले इवले इवले मेंदू गहाण ठेवलेल्या त्यांच्या भक्तांना पडत नाहीत. संघाची आम्हाला गरज नाही, अशी आपल्या पित्तूंकरवी वल्गना केल्यानंतर निवडणुकीत जी अवस्था झाली ती पाहताच संघापुढे लोटांगण घालायला मोदी रेशीमबागेत पोहोचले, त्यात काही आश्चर्य नाही.
मात्र इथे त्यांनी गेल्या ७० वर्षांत भारतीय हीन भावनेने जगत होते, संघाने त्यांच्यात स्वत्त्वाचे स्फुल्लिंग जागवले, वगैरे स्तुतिस्तोत्र गायले, ते विनोदी होते. यांचा अवतार होईपर्यंत कोणते भारतीय हीन भावनेने जगत होते? भारत स्वतंत्र झाला (ज्यात मोदींच्या मातृझुडुपाचा कसलाही वाटा नाही), तेव्हा तो गरीब आणि खंक देश होता. तरीही अशा देशाच्या पंतप्रधानांना अलिप्त राष्ट्रांची वेगळी मोट बांधण्यात सहभागी करून घेण्याइतका मान होता. भारताच्या पंतप्रधानांना शेजारी उभे करून त्यांची टवाळी उडवण्याचा किंवा मानहानी केली जाण्याचा प्रसंग मोदींच्या आधी कोणत्याही पंतप्रधानांवर ओढवला नाही. आज ज्या संस्था, यंत्रणा, व्यवस्था कवडीमोलाने किंवा फुकटात मोदी आपल्या मित्राच्या घशात दोन्ही हातांनी घालतायत, त्या सगळ्या त्यांच्या आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानांच्या आधीच्या पंतप्रधानांनी उभारलेल्या आहेत. मोदींनी देशासाठी शौचालयांपलीकडे काय उभारलं आणि तीही किती उभारली, हा संशोधनाचा विषय आहे.
मोदींच्या काळात रुपया नीचांकाला पोहोचला आहे, देशातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हातात साडेतीन लाख रुपयांची सरासरी गंगाजळी उरलेली आहे. गेली दहा वर्षे मध्यमवर्गाचं उत्पन्न जैसे थे आहे, म्हणजे गोठलेलं आहे आणि महागाई मात्र वेगाने वाढते आहे. म्हणजेच उत्पन्न कायम राहूनही मध्यमवर्गही गरीब झालेला आहे. देशात बहुतेक लोक कर्जबाजारी आहेत आणि ही कर्जं कोणत्याही राष्ट्रनिर्मितीच्या कामासाठी घेतलेली नाहीत, रोजीरोटी चालवण्यासाठी घेतली गेली आहेत. ही देशाची गंभीर आर्थिक स्थिती आहे.
देशातल्या लोकांची खरोखरची हीन अवस्था झाली असेल, तर ती विकसित भारताची जुमलेबाजी करणार्या मोदीकाळातच झाली आहे.
मानवी विकासाच्या एकाही निर्देशांकात मोदीकाळात भारत पुढे गेलेला नाही किंवा आहे त्या स्थानावर राहिलेला नाही. सगळीकडे सार्वत्रिक घसरणच झालेली आहे. अमेरिकेच्या दादागिरीला कोलंबियापासून युरोप-चीनपर्यंत सगळेजण प्रतिआव्हान देत असताना भारत मात्र जी हुजूर म्हणून ट्रम्प यांना हवे ते करायला मान झुकवून खडा आहे, ही कोणासाठी अभिमानाची बाब आहे? चीन भारताची जमीन बळकावून बसला आहे, याने कोणाची मान उंचावली आहे?
हे सगळं ज्याच्या कार्यकाळात झालं तो स्वमग्नतेच्या आभाळात स्वच्छंद गिरक्या घेणारा पक्षी कधी नव्हे तो मातृवृक्षाकडे आलाच आहे, तर आता त्याची रवानगी मार्गदर्शक मंडळ नामक खुराड्यात करून टाकायला काहीच हरकत नाही…
…देशासाठी कधीतरी काहीतरी भरीव आणि सकारात्मक केल्याचं समाधान मिळून जाईल!