खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र मत्स्यपालन मंत्री नितेश राणे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या दालनात बोलावून झापलं व हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये कराल तर तुमचा वेगळा विचार केला जाईल, अशी तंबीही दिल्याची बातमी लगेच व्हायरल झाली. असं काही झालंच नाही, मी मुख्यमंत्र्यांच्या गुड बुकातला मंत्री आहे, अशी सारवासारव नितेश राणे यांनी केली हे सार्यांनाच माहीत आहे. पण त्यानंतर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला जी खबर लागली ती अशी- ही झापाझापी होण्याआधी आदल्या दिवशी स्वत:ला हिंदूकाळीजसम्राट म्हणवणार्या नितेशना केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांनी तातडीने दिल्लीला बोलावून उभा-आडवा झापलाच नाही, तर इशाराही दिला की तुम्ही आणि तुमचे पिताजी भाजपचे नेते आहात हे लक्षात ठेवा. भाजपच्या नावावर स्वत:ची पोळी भाजण्यासाठी काहीही बोलाल तर तुम्हाला मंत्रीपद आणि आमदारकीतून तत्काळ तडीपार केलं जाईल. पोक्याने ही बातमी शंभर टक्के सत्य असल्याचा दावाही माझ्यापाशी केला.
नागपूरच्या दंगलीनंतर चिघळलेल्या परिस्थितीच्या आगीत कोणी स्वत:च्या वक्तव्याने पेट्रोल टाकण्याचं काम करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा दमही फडणवीस आणि अमित शहा यांनी नितेशना दिल्याची माहितीही पोक्याने मला दिली. त्यावर नितेशजी राणे यांना भेटून त्यांची मुलाखत घे, असा पोक्त सल्ला मी पोक्याला दिला.
तीच ही मुलाखत…
– नमस्कार माननीय हिंदू काळीज सम्राट नितेशजी.
– बरं झालं पोक्या तू इतक्या तत्परतेने आलास माझे विचार जाणून घ्यायला. तुला खरं सांगतो पोक्या, या हिंदू समाजाची काळजी मला जितकी आहे ना, तितकी या भाजपवाल्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नाही. मी भाजपात जाऊन आमदार आणि मंत्री झाल्यापासून हिंदूरक्षणाची जबाबदारी परमेश्वराने आणि नियतीने माझ्यावर टाकलीय, हे जाणून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जे आडवे येतील त्यांना तिडवे करून आपण हिंदू धर्माचा गुढीपाडवा साजरा करू अशी प्रतिज्ञा मी कणकवलीत केली. तेव्हापासून मी भगवी वस्त्रं धारण केली. सिंधुदुर्गच्या गल्लीकुचीत, वाड्यावाड्यात फिरून हिंदू धर्म म्हणजे काय, हिंदूंचे खरे शत्रू कोण आहेत, त्यांना नष्ट करून हिंदू धर्माचा झेंडा अरब देशांतही कसा फडकवता येईल यावर मी मार्गदर्शन करीत आलोय. ही क्रांती कशी आणि कोणत्या मार्गाने करावी हे मला कोणी शिकवण्याची गरज नाय. आमचा सिंधुदुर्गातला अनुभव त्यासाठी पुरेसा आहे. आम्ही बाप-लेक अफजल खानाच्या काळात असतो, तर छत्रपतींना त्याच्या छावणीत जाऊन त्याचा कोथळा बाहेर काढण्याची गरजच भासली नसती. महाराजांनी फक्त इशारा केला असता तर आम्ही कामगिरी फत्ते केली असती आणि पाच हजार फटाक्यांची माळ प्रतापगडाच्या पायथ्याशी लावली असती.
– केवढी तळमळ आहे तुम्हाला नितेशजी.
– अरे, तरीही माझं हिंदू धर्मासाठी चाललेलं पवित्र कार्य पाहून अनेकांच्या पोटात मळमळ होतेय ना! त्यात सर्वात जास्त माझ्या प्राणप्रिय भाजपमधलेच पोटदुखे आणि पोटफुगे आहेत हे लक्षात घे. नागपूर दंगलीने केवढी संधी दिली होती आम्हाला हिंदू धर्माचा उदो उदो करण्याची. वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे अनेक असतात. मी त्यातला नाही, असं मी माननीय अमित शहा आणि फडणवीसांना निक्षून सांगितलं. माझा जन्म हिंदू धर्माच्या उद्धारासाठीच झाला आहे, हे त्यांना पटवून दिलं. पण त्यांना ते मान्य नाही. जर भाजपाचा एक खासदार माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना ते शिवछत्रपतींचे अवतार आहेत, असं म्हणतो तर मी कशावरून शिवकाळातील कुणाचा तरी अवतार नसेन? तू विचार कर पोक्या. शत्रूवर चालून जाणं हा आमचा जन्मजात स्वभाव आहे. त्यांना कसं आणि कोणत्या मार्गाने संपवावं हे आम्हाला शिकवावं लागत नाही. आजही शिवछत्रपतींच्या नाटकांतली खोटी शस्त्रं नाटकात पाहिली तरी हात शिवशिवतात. रक्त सळसळतं.
– कमाल आहे तुमची. केवढी कर्तव्यनिष्ठा! केवढा स्वाभिमान!! धन्य धन्य आहे तुमची. पण आजच्या राजकारणात आणि असल्या परिस्थितीत टिकून राहणं हे फारच कठीण आहे.
– पण मी घाबरत नाही.
– ते ठीक आहे हो. तरीही त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दालनात तुम्ही भेटलात तेव्हा नेमकं काय झालं? महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला उत्सुकता आहे सत्य जाणून घेण्याची.
– मी मुख्यमंत्र्यांच्या दालनात प्रवेश करताच त्यांनी स्वत: आसनावरून उठून हसतमुखाने माझं स्वागत केलं. माझा हात प्रेमभराने हातात घेतला आणि एवढंच म्हणाले की, बाहेर जे घडतंय त्याचा डोक्याला ताप करून घेऊ नका. काही दिवस शांत राहा. बस एवढंच. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सध्या मी जे हिंदू धर्माच्या प्रसाराचे राष्ट्रकार्य हाती घेतलंय त्याचा अभिमान आहे त्यांना. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या प्याद्यांमधला मी एक आहे. मुख्यमंत्र्यांची लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे. त्यामध्ये या नितेश राणेचं नाव वर टॉपला आहे. त्यामुळे कुणाला चिंता करण्याची गरज नाही.
– पुढे काय झालं?
– काय होणार! मी माझ्या आनंदाप्रित्यर्थ माझे सहकारी आमदार, हितचिंतक यांच्यासाठी गुरुवारी सामिष भोजनाचं आयोजन केलं होतं. त्याचं खास आमंत्रण सर्वप्रथम मी मुख्यमंत्र्यांना दिलं. खरं तर त्यासाठीच मी त्यांना भेटायला गेलो होतो. पण हे पत्रकार नको ते अर्थ लावतात. ही आमंत्रणपत्रिका बघ. मी मत्स्यपालन मंत्री असल्याने माशाच्या आकाराची बनवलीय. वास घेऊन बघ. फिश सेंट मारलाय तिच्यावर. तूही अवश्य ये. सगळी व्यवस्था केलीय.
– नक्की येईन. माझा ब्रॅण्ड माहीत आहेच तुम्हाला. पण तोपर्यंत तुम्ही कोणाच्याही दबावाखाली मात्र राजीनामा देऊ नका.
– नाहीच देणार. जगाच्या नकाशात हिंदू धर्माचा रक्षणकर्ता म्हणून माझं नाव गौरवानं कोरलं जाईल. जय हिंदू राष्ट्र!!