□ गृहराज्यमंत्र्यांच्या अकलेचे तारे; बलात्कार शांततेत पार पडला!
■ त्यांनी आणि त्यांच्या महाशक्तीने महाराष्ट्रात पक्षीय लोकशाही, संवैधानिक परंपरा आणि विधिमंडळाची प्रतिष्ठा यांच्या बाबतीत जे काही शांततेत केले, त्याबद्दल बोलत असतील हो ते. महाराष्ट्रातल्या शांततेमुळेच त्यांची भीड चेपली असेल, तर त्याबद्दल त्यांना दोष का द्यायचा?
□ मिंध्यांना पुन्हा धक्का; उद्योगमंत्र्यांना दूर ठेवून फडणवीसांचा दक्षिण कोरियाच्या कंपनीशी करार.
■ हा मोदी पॅटर्न आहे. हळुहळू महायुती सरकार या शब्दप्रयोगाची जागा फडणवीस सरकार हा शब्दप्रयोग घेईल… दिल्लीची रंगीत तालीम सुरू आहे ही.
□ भाजपने बोगस मतदार घुसवून महाराष्ट्र-दिल्लीची निवडणूक जिंकली – ममता बॅनर्जी यांचा आरोप.
■ या दोन्ही निवडणुका आणि आधीच्याही निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग या भाजपच्या शाखेने केलेली लखलखीत कामगिरी आहे ती.
□ ‘हू इज ढसाळ?’ म्हणत सेन्सॉर बोर्डाने ढसाळ यांच्या कविता असलेला ‘चल हल्ला बोल’ चित्रपट नाकारला.
■ सेन्सॉर बोर्डाला नावं ठेवण्याच्या आधी मराठीजनांनी स्वत:ला प्रामाणिक प्रश्न विचारायला हवा, आपल्या घरातल्या नव्या पिढीला माहिती आहेत का ढसाळ? त्यांचं कुठे आणि कसं स्मरण ठेवलं आहे महाराष्ट्राने?
□ १० मंत्र्यांची ओएसडीवरच बोळवण; फिक्सिंगमुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी पीए नाकारले.
■ ज्यांनी अख्खा देश फिक्सिंग करूनच ताब्यात घेतला आहे, ते फिक्सरांना नाकारत आहेत, यापेक्षा मोठा विनोद दुसरा नाही. तुमचे फिक्सर चालणार नाहीत, आमचेच घ्यावे लागतील, एवढाच याचा अर्थ.
□ चारकोपमधील चौकाच्या नामकरणात महापालिकेचा मराठीद्वेष; शिवसेनेच्या दणक्यानंतर गुजराती फलक झाकला.
■ महाराष्ट्रात, खासकरून महाराष्ट्राच्या राजधानीत नोकरीधंदा करताना, जगताना, वावरताना मराठी भाषा येण्याची गरज नसते, हे वास्तव आपण कसं आणि किती काळ झाकणार आहोत? त्याबद्दल काय करणार आहोत?
□ मोदींनी उद्घाटन केलेल्या उद्योजकांच्या परिषदेत लोक जेवणावर तुटून पडले.
■ भाजपच्या सभांप्रमाणेच गर्दी दाखवायला पाचशे पाचशे रुपये रोजाने लोक गोळा करून आणले गेले असणार… बिचारे भुकेलेले जीव, अन्नावर तुटून पडले… आणि हे म्हणे लोकांना रोजगार देणार होते!
□ केईएममध्ये घाणीचे साम्राज्य… रुग्णांना संसर्गाचा धोका.
■ सगळ्या सार्वजनिक सोयी-सुविधांची हीच अवस्था आहे आणि त्याबद्दल सत्तेत बसलेल्यांना शरम वाटत नाही, ते या सगळ्या सोयी सुविधा खासगीकरणाच्या नावाखाली मित्रमंडळींना वाटून कमिशन खायला सोकावलेले आहेत.
□ अस्वस्थ शिंदेंची नुसतीच चिडचिड; अधिकार्याला म्हटले ‘गेट आऊट’.
■ आणखी कोणाला गेट आऊट म्हणणार ते? आता नकली पक्ष विसर्जित करण्याची वेळ आली. तुम्ही दोघेच राहाल, असं इतरांना सांगत होते, हे तर एकटेच राहतील.
□ कायदा आला तरी झोपड्या संपल्या नाहीत – हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण.
■ कायद्याला विचारतो कोण? तसे बरेच कायदे आहेत. त्यांच्यानुसार काय चाललेलं आहे?
□ शिवाजी महाराजांचा अवमान करून संरक्षण मिळवणारे लोक सत्तेत बसले आहेत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका.
■ सगळं काही अजेंड्यानुसारच चाललं आहे. बहुजनांना भ्रमजाळ्यातून बाहेर काढण्याची ऐतिहासिक जबाबदारी काँग्रेस कशी पार पाडणार, यावर सगळं अवलंबून आहे.
□ हिंदीने २५ भाषांना संपवले – तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा हल्ला.
■ २६वी भाषा म्हणून मराठीही जोडायला हरकत नाही. भाषेचं सांस्कृतिक संचित लयाला चाललेलं आहेच. राज्याची प्रागतिक परंपरा विसरून उत्तर भारतीय कुसंस्कार लोक हौसेने करवून घेत आहेत धर्माच्या नावाखाली.
□ भाजप सरकारचे अपयश; दोन वर्षांत बलात्काराच्या गुन्ह्यांतील ४०६ नराधम मोकाट.
■ अपयश कसलं त्यात? उद्या त्यांच्यापैकी काही पक्षात सामील होतील. नंतर त्यांचा हारतुरे घालून सत्कारही होईल जाहीर.
□ परदेशातील मोदींच्या जयजयकारावर १५ कोटींचा चुराडा.
■ अरे देवा, तिथेही भाड्याचीच गर्दी गोळा करावी लागली? मग यांची लोकप्रियता आहे तरी कुठे? चंद्रावर?
□ मिंध्यांना फडणवीसांचा धक्के पे धक्का; आता आरोग्य विभागातील ३२०० कोटींच्या कामांना स्थगिती.
■ मुळात हे पक्ष नव्हेत, मूळ पक्षांवरची, कसलीही विचारधारा, बैठक नसलेली बांडगुळं आहेत, काम झालेलं असल्याने आता ती कापून फेकून दिली जाणार आहेत. त्यात आश्चर्य काय?
□ ईव्हीएम मशीन मतदानासाठी नाहीत, बॅलेट पेपरच योग्य – ट्रम्प यांनी मोदींना दाखवला आरसा.
■ पण बॅलट पेपर वापरूनही अमेरिकेतल्या लोकांनी जर हे नमुनेदार ट्रम्प तात्याच निवडून दिले असतील, तर त्याचा तरी काय उपयोग?