केवळ छंद म्हणून एखादे वाद्य वाजवणे आणि त्या वाद्यवादनात देशात नव्हे तर थेट परदेशात नाव कमावणे यात खूप फरक असतो. आपण बहुतेकजण छंद म्हणून एखादे वाद्य वाजवतो, पण त्यात लौकिक प्राप्त करत नाही. मात्र अभिनेत्री नेहा महाजन हिने मात्र आपल्या सतारवादनाचा डंका थेट परदेशात वाजवला आहे. एकूणच नेहासाठी हे वर्ष खूपच लाभदायक ठरले आहे. कारण ती फक्त उत्तम सतार वाजवत नाही, तर तिने आपल्या याच कलेचा डंका साता समुद्रापार वाजवला आहे.
नेहा आणि लॅटीन पॉप किंग रिकी मार्टिन यांच्या ‘पॉसा’ या अल्बमला तिकडे परदेशात ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. रिकीने नेहाला तिच्या आगामी अल्बमसाठी सतारची रेकॉर्ड मागवली होती असे बोलले जाते. नेहा आणि रिकीचा हा अल्बम ‘बेस्ट लॅटीन पॉप’ या विभागात नामांकित झाला आहे. या अल्बमने लॅटीन ग्रॅमीमध्येही आपले नाव मोठे केले आहे. नेहाने तिचे वडील विदुर महाजन यांच्याकडून सतार वादनाचे प्राथमिक धडे घेतले आहेत. कुणामुळेही का असेना, पण नेहामुळे भारताच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला आहे असे म्हणायला हरकत नाही.