जुन्या जाणकार विद्वान संपादकांचे एक युग होते. या संपादकांनी अनेक पत्रकार तयार केले, जे आज चांगले लिखाण करत आहेत. व्यासंग हेच त्या संपादकांचे व्यसन होते. बाणा होता. आमची व्यंगचित्रकारांची पिढी या संपादकांच्या हाताखाली, मार्गदर्शनाखाली घडली.
दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये विद्याधर गोखले, माधव गडकरी, अरुण टिकेकर, चंद्रशेखर वाघ यांच्या हाताखाली काम करण्याची मला अनेक वर्षे संधी मिळाली. त्यानंतर १९९२च्या दरम्यान नवीन संपादकांनी नवीन टीम आणल्यामुळे मला ‘लोकसत्ता’ सोडावा लागला. चरितार्थासाठी काय करावं हा प्रश्न होता. विकास सबनीस हे माझे १९८३पासूनचे जिगरी दोस्त. आम्ही एक दिवसाआड दादरमधील शिवसेना भवनासमोरील आस्वाद हॉटेल किंवा स्वा. सावरकर स्मारक येथे भेटत असू. व्यंगचित्रविषयक गप्पा मारत असू. आस्वाद हॉटेलचे मालक सूर्यकांत सरजोशी आमचे मित्र. त्याच्या केबिनमध्ये आम्ही चहा घेतला आणि बाहेर आस्वाद हॉटेलला लागून उभे होतो. मी विकास सबनीसना, मी बेरोजगार आहे असं सांगितलं. सबनीस म्हणाले, ‘काही टेन्शन घेऊ नकोस. आपण सरळ बाळासाहेबांकडे जाऊ या.’ त्यावेळी मोबाईल नव्हते. सबनीसनी बाळासाहेबांना आस्वादजवळील पब्लिक फोनवरून फोन लावला. त्यावेळी बाळासाहेबांचे सचिव म्हणून चंद्रमणी काम पहात. त्यांनी आम्हाला लगेच यायला सांगितले. आम्ही दोघे टॅक्सी करून मातोश्रीवर गेलो. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर बाळासाहेबांची भेट झाली. विकास सबनीस यांनीच माझं काम सांगितलं. बाळासाहेबांनी मला अतिशय आस्थेने मी ‘लोकसत्ता’ का सोडला ते विचारलं. त्यांनी फ्री प्रेस सोडला त्यावेळच्या आठवणी सांगितल्या. बाळासाहेब सबनीसना म्हणाले, ‘विकास, संजयला पंढरीकडे घेऊन जा. मी पंढरीला फोन करतो.’
त्याप्रमाणे आम्ही दुसर्या दिवशी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिवसेना भवनच्या गेटवर भेटलो. त्यावेळी ‘मार्मिक’चे कार्यालय शिवसेना भवनात होते. लिफ्टजवळच मोठ्या खिडक्या, शिवाजी पार्कच्या समुद्रावरची झुळूझुळू हवा येणारे कार्यालय होते. बाजूलाच भारतीय कामगार सेनेचे ऑफिस होते. लिफ्टमध्येच दत्ताजी साळवी होते. सबनीसांनी त्यांच्याशी ओळख करून दिली. आम्ही पंढरीनाथ सावंत यांच्या टेबलपाशी बसलो. सबनीस यांनी त्यांना बाळासाहेबांशी झालेलं बोलणं सांगितलं. सावंतांनी लगेच बाळासाहेबांना फोन लावला. त्यांचे बोलणे झाल्यावर सावंत म्हणाले, ‘उद्यापासून सकाळी १० वाजता ये. आपल्या अंकाचे काम सोमवार, मंगळवारी जोरात चालतं. गुरुवारी अंक बाजारात येतो.’ पगाराविषयी बोलणं झालं. सबनीस आणि मी जाऊन छोटीशी पार्टी केली.
दुसर्या दिवसापासून ‘मार्मिक’मध्ये जाऊ लागलो. त्यावेळी ‘मार्मिक’चा स्टाफ मर्यादित होता. पंढरीनाथ सावंत कार्यकारी संपादक, वसंत सोपारकर सल्लागार संपादक, हेमा काटकर पत्रकार, मी व्यंगचित्रकार, अजय ताम्हाणे कॉम्प्युटर पाहाणारा, सुरेश आणि मोहन गांगण सहकारी. बस, एवढाच स्टाफ. राज ठाकरे मुखपृष्ठ रेखाटत. सबनीस आतील रविवारची जत्रा रेखाटत. बाकी पंढरीनाथ सावंत यांच्या गाजलेल्या ‘टोच्या’ सदराला, भाऊ तोरसेकर यांच्या सदराला, श्रीकांत आंब्रे यांच्या ‘टीना बिना’ या आणि ‘दोन्ही कर जोडोनी’, ‘जगाच्या पाठीवर’ मी पूरक व्यंगचित्रे काढत असे. तेव्हा तोरसेकर ‘मार्मिक’मध्ये ‘अरुण टिकेतकर’ या टोपण नावाने लिहीत असत.
त्यावेळी हळूहळू सावंत आणि सोपारकर यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू कळायला लागले. सोपारकर जाहिरातीचे कॉपीरायटिंग करण्यात माहीर होते. सावंत सारखी पुस्तके विकत घेत. वाचत असत. त्यांचे तिथे पुस्तकांचे कपाट होते. माझी वाचनाची आवड लक्षात घेऊन ते वाचायची मुभा देत. सावंत आणि सोपारकर, तोरसेकर जुने मित्र असल्यामुळे त्यांच्या ‘मार्मिक’मधल्या गप्पा म्हणजे अक्षरश: मेजवानी असायची. ‘मार्मिक’मधले वातावरण सतत खेळीमेळीचे असायचे. सावंत अफलातून कोट्या करायचे.
पंढरीनाथ सावंत हे ठाकरे परिवाराच्या जवळचे. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या ‘वक्तृत्त्व शास्त्र’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सावंत यांचा ‘शिष्योत्तम’ असा उल्लेख केला आहे. सावंत आम्हाला प्रबोधनकार आणि बाळासाहेबांच्या तरुणपणीच्या अनेक आठवणी सांगत. ठाकरे परिवाराबद्दल सावंत यांच्या मनात प्रचंड आदर होता आणि बाळासाहेबांना सावंत यांच्याबद्दल प्रचंड जिव्हाळा होता. मी ‘मार्मिक’मध्ये यायचो तेव्हा सावंत लुनाने यायचे. लुना मागून धूर सोडायची, तर सावंत यांच्या तोंडात सिगारेट असायची. ते त्यातून धूर सोडत यायचे. हे कार्टून मी त्यांना काढून दिले होते. त्यात मोटरसायकलपेक्षा सिगारेटचा धूर जास्त दाखवला होता. बरेच दिवस ते कार्टून सावंत यांनी त्यांच्या टेबलजवळ लावून ठेवलं होतं. ‘मार्मिक’मधील सुरेश त्यांच्या अगदी शेजारी रहात असे. त्याला ‘मार्मिक’मध्ये नोकरी सावंत यांनीच लावली होती. सावंत प्रचंड सिगारेट ओढत. एकदा सुरेशने टेबलवर सिगारेटचे मोठे बंडल ठेवले. मी सावंतना विचारले, ‘तुमचे सिगारेट, विडीचे दुकान आहे का?’ ते म्हणाले, ‘नाही, मी एवढ्या दोन दिवसांत ओढतो.’
दुपारी जेवले की सावंत काहीतरी त्रास होतोय म्हणून बाजूला कर्मचार्यांना बसायला भारतीय कामगार सेनेची सोफे होते तिथे जाऊन झोपत. त्यांना काहीतरी दुखत असे. सुरेशला सावंत यांची काळजी असायची. एक दिवस सुरेश मला म्हणाला, सावंत यांच्या छातीत दुखते. पण ते कुणाला सांगत नाहीत. सुरेश तेव्हा दर गुरुवारी ‘मार्मिक’चा अंक बाजारात आला की तो बाळासाहेबांना दाखवायला मातोश्रीवर जायचा. मी त्याला म्हणालो, ‘एक काम कर. मार्मिकचा अंक घेऊन जाशील तेव्हा बाळासाहेबांना सावंत यांच्या तब्येतीविषयी सांग.’ त्याप्रमाणे सुरेशने सांगितले. दुसर्या दिवशी बाळासाहेबांचा सावंत यांना फोन आला, ‘पंढरी, ते काम बाजूला ठेव आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जा. चेक करून घे.’ त्याप्रमाणे सावंत हिंदुजामध्ये गेले. त्यांना बायपास करावी लागली. तो खर्च बाळासाहेबांनी केला.
सावंत नव्या उत्साहाने ‘मार्मिक’चे काम करू लागले. त्यांना विकास सबनीस यांच्याबद्दल विशेष प्रेम होतं. आणि मी त्यांचा खास मित्र म्हणून माझ्यावरही ते प्रेम करत. सबनीस यांना काही खाजगी निरोप द्यायचा असला तर तो माझ्याकडे देत. व्यंगचित्रकारांची पिकनिक असली तर सावंत आवर्जून येत. व्यंगचित्रकार म्हटला की तो सावंत यांना जवळचा वाटे.
एकदा सबनीस यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले. आता ‘रविवारची जत्रा’ कुणी करायची हा प्रश्न निर्माण झाला. सोपारकरांनी मला करायला सांगितले. सोपारकर माझ्या शेजारी रहात. ‘मार्मिक’ सुटल्यावर त्यांच्या गाडीतूनच मस्त गप्पा मारत आम्ही जात असू. आणि व्हायचं तेच झालं. सबनीस मनस्वी होते. ते माझ्यावर नाराज झाले. आणि त्यांनी श्रीकांतजींना माझ्या पुढ्यातच ‘मार्मिक’ मैफिलच्या एका कार्यक्रमाच्या वेळी खोचकपणे सांगितलं, ‘मी यापुढे रविवारची जत्रा करणार नाही. संजयलाच सांगा.’ मीही कलाकार असल्यामुळे अस्वस्थ झालो आणि सबनीस जे काम करतात ते कधीच न करण्याचा निश्चय केला.
काही वर्षांपूर्वी मुंबईत प्रचंड पाऊस पडला होता. सगळीकडे कंबरभर पाणी साचले होते. मी त्यावेळी साडेपाच हजाराचा नोकिया फोन पहिल्यांदाच घेतला होता. त्यावर सावंत यांचा फोन आला. ‘संजय, सबनीस तब्येत बिघडल्यामुळे यावेळी मुखपृष्ठ करणार नाहीये. तू असशील तसा लगेच मार्मिकमध्ये ये. बाळासाहेब मुखपृष्ठाची कल्पना द्यायला एक तासांनी फोन करतील.’ सावंत यांच्या बोलण्यात तणाव दिसला. त्यामुळे त्यांना नाही म्हणणं शक्य नव्हतं. त्यावेळी ‘मार्मिक’ कार्यालय सामना कार्यालयात शिफ्ट झालं होतं. ‘सामना’ कार्यालयाच्या चारही बाजूने मानेपर्यंत पाणी साचले होते. त्या पाण्यातून वाट काढत ‘मार्मिक’ कार्यालयात गेलो. सावंत यांना हायसे वाटले. सावंत उत्तम दर्जाचे चित्रकारही होते. त्यांनी मॉडेल आर्टचे
इस्टिट्यूटमध्ये चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले होते. त्यांच्याकडे विन्सर नुटन या जागतिक दर्जाच्या कंपनीचे रंग आणि ब्रश होते. ते त्यांनी अगोदरच टेबलवर काढून ठेवले होते. पेन्सिलने मुखपृष्ठाची साईझ आखून ठेवली होती. सावंत यांनी बाळासाहेबांना फोन लावला. बाळासाहेबांनी मला कल्पना सांगितली. त्याप्रमाणे पंढरीनाथ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुखपृष्ठ बनविले. ते छापून आले. बाळासाहेबांनी मला मातोश्रीवर बोलावलं. आणि कायम लक्षात राहील असं मुखपृष्ठ म्हणजे काय ते कसं बोलकं आणि सोपं असावं याविषयी मार्गदर्शन केलं. ते आजही मला काम करताना उपयोगी पडतं. आता सबनीस पुन्हा नाराज झाले. श्रीकांतजींना म्हणाले, ‘मला यापुढे कव्हर करायला सांगू नका.’ माझ्याशी आठवडाभर बोलणं सोडलं. माझ्या दृष्टीने कामापेक्षा मैत्री महत्वाची होती. त्यामुळे ज्या ज्यावेळी सबनीस यांची अनुपस्थिती असे आणि ‘मार्मिक’ने काम करायला सांगितलं तर मित्र नाराज होऊ नये म्हणून नकार देत असे. पण काम तर व्हायला हवं. म्हणून मग मी सावंत आणि सोपारकर यांना माझ्या दुसर्या व्यंगचित्रकार मित्रांची नावे सुचविली.
भारतीय कामगार सेनेचा कार्यक्रम असला की बाळासाहेब आवर्जून शिवसेना भवन येथे येत असत. लिफ्टला अगदी लागूनच ‘मार्मिक’चे कार्यालय होते. बाळासाहेब संध्याकाळी येणार म्हणून आमचा ‘मार्मिक’चा स्टाफ ऑफिस संपल्यावर गप्पा मारत बसला होता. तेवढ्यात बाहेर फटाके लागले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या जयजयकराच्या घोषणा झाल्या. आणि काही क्षणातच बाळासाहेब आले. थेट ‘मार्मिक’ कार्यालयात आले. सोबत श्रीकांतजी होते. त्यावेळी ‘मार्मिक’ कार्यालय जुन्या सरकारी कार्यालयासारखे होते. बाळासाहेबांनी ते पाहिलं. भारतीय कामगार सेनेच्या माणसांना बोलावलं आणि सांगितलं, पुढच्या वेळी येईन तेव्हा ‘मार्मिक’ कार्यालयाचे नूतनीकरण व्हायला हवे. त्याप्रमाणे ते झालं. माझी व्यंगचित्रकार म्हणून बसायची जागा सावंत आणि सोपारकर यांच्या बरोबर मध्ये होती. कारण त्यामुळे दोघांना दोन्ही बाजूंनी त्यांना काय हवं ते मला सांगता येत असे. असे टीमवर्कने ‘मार्मिक’चे काम चालत असे. अधूनमधून श्रीकांतजी येत. एकदा त्यांच्यासोबत संगीतकार नौशाद होते. श्रीकांतजींनी त्यांना ‘मार्मिक’बद्दल सांगितले. सावंत यांनी आमच्या सहाजणांच्या स्टाफची ओळख करून दिली.
बाळासाहेब जेव्हा पुढच्या वर्षी ‘मार्मिक’मध्ये आले, त्यावेळी नूतनीकरण झालेले कार्यालय पाहून सावंत यांना म्हणाले, ‘पंढरी, काय खुश ना आता…’
सावंत यांच्यावरील बाळासाहेबांचं खास प्रेम मी जवळून पाहिलं आहे. साहेब भारतीय कामगार सेनेच्या कार्यालयात आले की ‘पंढरीला बोलवा’ असा आदेश देत. सावंत एकटे बाळासाहेबांच्या केबिनमध्ये न जाता आमच्या पूर्ण स्टाफला घेऊन जात. असा दिलदारपणा, मनाचा मोठेपणा सावंत यांच्याकडे होता. एकदा सोपारकर आणि सावंत यांचे काही मतभेद झाले. दोघे जवळपास सहा महिने बोलत नव्हते. सावंत बोलण्याचा प्रयत्न करत, पण सोपारकर त्यांना प्रतिसाद देत नसत. सावंत यांनी मला ‘सामना’च्या चहावाल्याच्या बाहेरूनच फोन करून बोलावलं. आपला मित्र आपल्याशी बोलत नाही याचे त्यांना प्रचंड वाईट वाटले होते. हे सांगताना सावंत यांच्या डोळ्यात पाणी आलं. संध्याकाळी ‘मार्मिक’ ऑफिस सुटल्यावर सोपारकर यांच्या गाडीतून जाताना त्यांना ही गोष्ट सांगितली. तेही खूप हळवे झाले. हा प्रसंग आमचे एक कॉमन मित्र ‘मार्मिक’चे स्तंभलेखक डॉ. सतीश नाईक यांना सांगितला. त्यांनी एक युक्ती केली. सावंत, सोपारकर, मला आणि ते स्वत: ग्रँट रोडच्या एका हॉटेलात घेऊन गेले. सावंत, सोपारकर यांना जवळजवळ बसविले आणि त्यांची मैत्री पुन्हा चालू झाली. असे कितीतरी प्रसंग आज डोळ्यापुढे येत आहेत.
पंढरीनाथ सावंत नुसते पत्रकार नव्हते, लेखकही होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते उत्तम दर्जाचे चित्रकार होते. प्रबोधनकार यांच्या तालमीत तयार झालेले संपादक होते. आणि त्यापेक्षा बाळासाहेबांचे हक्काचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे खास ‘पंढरी’ होते.