समितीने जारी केलेल्या नवीन सूचनांनुसार कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी 100 टक्के उपस्थिती आवश्यक असेल. तसेच सकाळी 11 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2.30 ते 4.30 अशा दोन सत्रांमध्ये कामकाज होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत न्यायालयांचे कामकाज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येत होते.
सुनावणीसाठी असलेल्या खटल्यातील पुराव्यांची नोंद करणे यासारखी कामे पहिल्या सत्रात करण्यात येणार आहे. तर आदेश प्रलंबित असलेल्या खटल्यांची सुनावणी, सुनावणीबाबतचे निर्देश देणे आणि युक्तिवादाची कामे पुढील सत्रात करण्यात येणार आहेत. त्या दिवसासाठी सुनावणीसाठी निश्चित केलेल्या प्रकरणाशी संबधित वकील, साक्षीदार, आरोपी आणि पक्षकार यांनीच न्यायालयात उपस्थित राहवे, असेही समितीने स्पष्ट केले आहे. तसेच खटल्याशी संबंधित व्यक्तींनाच न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रकरण सुनावणीला घेतल्याशिवाय कोणीही न्यायालयाच्या सभागृहात प्रवेश करू नये. सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात विनाकारण थांबू नये, कामकाजानंतर न्यायालयातून बाहेर पडावे. तसेच सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाबाबतच्या इतर नियमांचे पालन करण्यात यावे, असेही समितीने सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे. न्यायालयाचे उपहारगृह, फोटोकॉपी विभाग, बार रूम्स, वकिलांचे कक्ष, बार लायब्ररी सुरू करण्यासाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी सॅनिटायझेशन करणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
या नवीन मार्गदर्शक सूचनांची अंमलबाजावणी 1 डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा न्यायालयांतर्गत येणारी न्यायालये वगळता महाराष्ट्र, गोवा,दादरा, नगर हवेली आणि दमण व दीव येथील कनिष्ठ न्यायालयांमध्ये 1 डिसेंबरपासून या सूचनांची अंमलबाजवणी होणार आहे.
सौजन्य : दैनिक सामना