ट्रम्पसाहेबांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी तुम्हाला निमंत्रण आलं होतं म्हणे! गेला का नाहीत मग?
– पीटर मच्याडो, नालासोपारा
आम्हाला निमंत्रण आले नाही… आणि आम्हीही कोणाकडे ‘निमंत्रण मागायला’ गेलो नाही. कोणाकडेही ‘न बोलवता’ जाऊन बिर्याणी खायला आवडते ‘आम्हाला’… काही ‘कळले’ कां तुम्हाला?
सार्वजनिक ठिकाणी मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणार्यांना, रील्स पाहणार्यांना मोफत हेडफोन वाटण्याच्या योजनेसाठी पीएम केअर फंडातून किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मिळू शकतो का?
– निखिल कामतेकर, पनवेल
उद्या निधी मिळाला आणि त्या हेडफोनवर, इलेक्शनदरम्यान जो आवाज मोबाईलवर प्रत्येक फोनच्या आधी ऐकू येतो, तोच आवाज ऐकू आला तर त्याची जबाबदारी म्हणा किंवा क्रेडिट म्हणा तुम्ही घेणार का? का उगाच जे होऊ शकणार नाही असे प्रश्न विचारताय? की असे प्रश्न विचारून तुम्ही होऊ घालणार्या गोष्टीची वातावरणनिर्मिती करताय?
संतोषराव, पेढे वाटले की नाहीत? १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं निर्मलाताईंनी. आणखी काय हवं तुम्हाला?
– राधिका आळवणी, श्रीक्षेत्र गाणगापूर
निर्मलाताईंपासूनच मुक्ती हवी आहे आम्हाला… असं उत्तर आमच्याकडून अपेक्षित आहे का तुम्हाला? प्रश्न विचारून आमच्या नथीतून निर्मलाताईंना तीर मारलाय असं वाटलं असेल तुम्हाला… पण आम्ही उत्तर देऊन तुमच्या नथीतून तीर मारलाय हे कळतंय का तुम्हाला? (आम्ही निर्मलाताईंना तीर मारलाय असं म्हटलेलं नाही.. जस्ट तीर मारलाय..
एखाद्या नाटकातल्या तुमच्या अभिनयावर बेहद्द खूष होऊन एखादी तरुणी रंगमंचावर धावत आली आणि तिने तुमचं चुंबन घेतलं, असं कधी घडलं आहे की नाही संतोषराव?
– निर्मलकुमार साबणे, नंदुरबार
याचे उत्तर हो म्हणून दिलं, की तुम्ही विचारणार ‘ती तरुणी कोण?’ मग तिला विचारणार ‘तुला दुसरा कोणी सापडला नाही का?’ या सार्या प्रश्नांच्या उत्तराने तुमच्या आयुष्यात फरक पडणार नाही. पण कुठल्या कोणाच्या एका चुंबनासाठी आम्ही घरच्या हक्काच्या जेवणाला ‘मुका’व असं वाटतं का तुम्हाला? (मुळात असं काही घडत नाही. कारण आम्ही नाटक करतो. नौटंकी नाही. इथे नौटंकी म्हणजे लोककलाप्रकाराबद्दल आम्ही बोलत नाही. तर काही नट लोक प्रसिद्धीसाठी जे प्रकार करतात त्याबद्दल बोलतो आहोत… एवढं तरी समजून घ्या…)
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांना थेट मोक्षप्राप्ती झाली, असं सांगणारा भोंदू बाबा स्वत: चेंगराचेंगरीत सापडला तर स्वत:लाही हेच ज्ञान देईल का?
– रेवण्णा सिद्धेवार, सोलापूर
या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी तुम्हाला कोणी बाबा वाटतो का? आमची मुलंसुद्धा आम्हाला बाबा म्हणत नाहीत. आणि तुम्ही विचारलंय तसा विचार दुसर्याबद्दल करायला आमच्या आई-बाबांनी आम्हाला शिकवलं नाही, त्यामुळे मोक्ष कसा मिळतो याचा सोक्षमोक्ष बाबा लोकांनी स्वत: प्रात्यक्षिक करून दाखवावा, असं आम्हाला वाटलं तरी आम्ही बोलणार नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाईट कामगिरी करत असलेल्या ज्येष्ठ खेळाडूंना क्रिकेट बोर्डाने रणजी सामने खेळायला लावले आहेत. मराठी रंगभूमीवरच्या काही ज्येष्ठ अभिनेत्यांना पुन्हा एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायला लावला, तर काही सुधारणा होईल काय?
– निनाद काळे, पुणे
तुम्हाला सुधारणा नक्की कशात अपेक्षित आहे? ज्येष्ठ नटांच्या अभिनयात? की एकांकिकेमध्ये… हे एकदा ठरवा आणि आम्हाला कळवा. म्हणजे आम्ही उत्तर ठरवतो आणि तुम्हाला कळवतो. (उगाच का पाण्यात राहून मगरमच्छबरोबर पंगा घ्यायला लावताय?)
महाराष्ट्राच्या राजधानीतल्या, मुंबईतल्या लोकलमध्ये मराठीतून विनंती करणार्या एका माणसाला दुसरा माणूस ‘यहाँ मराठी नहीं चलती’ असं उद्दामपणे कसं सांगू शकतो? यांना सरळ कसं करायचं?
– विनोद शेळके, बदलापूर
मराठी बोलणार्यांना अनुदान जाहीर करा.. आणि मजा बघा. मराठी असून मराठी बोलत नाहीत तेही मराठी बोलायला लागतील (मराठी शाळा बंद होताना आपण मजा बघतो. त्याच पठडीतील ही मजा आहे). मराठी चित्रपट आणि नाटक चालावं म्हणून अनुदान द्यायचं हा ‘एकमेव जालीम उपाय’ माहित असणार्यांना, आम्ही सुचवलेला उपाय पटला आणि ‘लाडका मराठी माणूस’ योजना आली, तरं त्याच श्रेय तुम्ही तरी आम्हाला द्या. शेळके, हा विनोद नाही हे लक्षात घ्या.