□ दावोसमधील करारांत फक्त एकच कंपनी परदेशातील- २९पैकी २८ कंपन्या हिंदुस्थानी.
■ तिकडच्या आकड्यांच्या फेकाफेकीत काहीही अर्थ नसतो, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्यांना एक स्वित्झर्लंडवारी घडते, हे आता जनतेलाही माहिती आहे. उगाच इकडच्याच उद्योगपतींशी तिकडे करार करून मोठमोठे आकडे तरी कशाला फेकता?
□ पुण्याच्या कार्यक्रमात शरद पवारांच्या शेजारी बसणे अजितदादांनी टाळले.
■ कुठून बसतील? आता नातं संपलं. राजकारण आलं त्यात. या सगळ्यात महाराष्ट्राचं केवढं मोठं नुकसान झालं, याचं भान त्यांना येणं कठीण. ते असतं तर ईडीच्या भयाने पळ काढला नसता पक्ष काखोटीला मारून.
□ भोंगा लावणे हा धर्माचा भाग नाही – हायकोर्टाचा निर्वाळा.
■ हे सर्व कोर्टांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. तरीही भोंगे लावले जातात आणि एरवी ज्यांच्याविरुद्ध बेंबीच्या देठापासून केकाटणं सुरू असतं, त्यांच्या प्रार्थनास्थळांवरचे भोंगे काढले जात नाहीत… ते त्यांच्याविरोधात विद्वेष निर्माण करत राहण्याचं साधन आहे आणि आपण वर्षभर ध्वनीप्रदूषण करण्याचा परवानाही.
□ सैफ हल्ला प्रकरणात अटक केलेली व्यक्ती आणि सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती एकच आहे का? – नाना पटोले यांचा सवाल.
■ ही शंका कोणाही कॉमन सेन्स असलेल्या माणसाला येतेच आहे. हा हल्ला हा एकंदरच गौड’बंगाल’ प्रकार आहे. त्यात अनेक रहस्यं दडलेली असावीत असं सर्वसामान्य माणसांनाही वाटतं. ही रहस्यं कदाचित कधीच उघड होणार नाहीत.
□ बीकेसीवरील मिंधेंच्या मेळाव्यात पुन्हा तेच रडगाणे; गद्दारीचे वारंवार समर्थन.
■ त्यांच्यापाशी दुसरा इलाज काय आहे? आता महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्यालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे, अशा टिर्या बडवणं सुरू आहे, पण यांच्यात कधी नव्या फाटाफुटीचा उदय होईल, ते सांगता येत नाही. इथे केलेलं इथेच भरावं लागणार आहे.
□ मिंधे-अजितदादा वाद चव्हाट्यावर; सुनील तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा भरत गोगावलेंचा जाहीर आरोप.
■ महाशक्ती गालातल्या गालात हसत असेल. हे दोन्ही पक्ष आतून पोखरणारी वाळवीही तिनेच पेरलेली असणार आणि मग एका क्षणी महाशक्तीला त्यांच्या कार्डबोर्डच्या पुढार्यांची गरज उरणार नाही, तिला आपोआप स्वबळ प्राप्त होईल. खूब लडो आपस में… खतम कर दो एक दूसरे को…
□ महायुती सरकारची बनवाबनवी उघड; मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्तावच नाही.
■ हाच प्रकार मराठीला अभिजात दर्जा देण्याच्या अधिसूचनेच्या बाबतीतही झाला होता… सतत वाजणार्या ढोलात चामड्याचा भाग सोडला तर बाकी फक्त हवा असते… हळुहळू येईल लक्षात महाराष्ट्राच्या! पण तोवर फार उशीर झालेला नसला म्हणजे मिळवली!
□ राज्यात दर दोन महिन्यांत चार हजारांवर ‘लेकी’ बेपत्ता – हायकोर्टाने व्यक्त केली चिंता.
■ त्यांची चिंता आईबापांनी, नातेवाईकांनी करावी. आम्ही दीड हजाराची भीक दिली की बाकी सगळ्या जबाबदार्यांमधून मोकळे. मग कॉर्पोरेट मालकांच्या सेवेतून आणि त्यांनी दिलेले मेवे ओरपण्यातून वेळ कुणाला आहे?
□ धारावीत ना सर्वेक्षण, ना अपात्रतेची यादी; मुलुंडमधील मिठागराची जागा कवडीमोल दरात अदानीला आंदण.
■ कवडीमोल दर तरी का घेतात कोण जाणे! अशीही भारतात तरी सबै भूमी अडानी की झालेली आहेच. आपली घरं आपली आहेत अजून काही काळासाठी तरी, हेही खूप आहे.
□ सत्र न्यायालयाचा ईडीला झटका; अनिल देशमुख यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला मुभा.
■ ईडी लाजप्रूफ आहे, शॉक देऊन उपयोग काय? रोज न्यायालयांकडून इतक्यांदा चंपी होते, पण ही कणाहीन यंत्रणा गुलामासारखी वागते, दिल्लीश्वर छू म्हणतील तिकडेच धावते. कमालीचे कोडगे आहेत हे.
□ अमित शहांच्या दौर्यात भुजबळांच्या जवळीकीमुळे अजित पवार समर्थकांमध्ये खळबळ.
■ कसली खळबळ? ते तुमचेच बनून राहणार होते का? ज्यांनी ओळख दिली, पदं दिली, सत्ता दिली, त्यांचे नाही झाले, तुम्ही कोण?
□ अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत – शरद पवारांचा सणसणीत टोला.
■ कोल्हापूरचे सोडा पवारसाहेब, कुठलेच वाटत नाहीत- संस्कारवर्गाला दांडीच मारलेली दिसते त्यांनी.
□ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मसुद्यावरून एनडीएत अस्वस्थता.
■ नुसती अस्वस्थता काय उपयोगाची? सगळी संघराज्य व्यवस्था कचर्याच्या डब्यात टाकली गेल्यावर जागे होणार आहेत का नीतीश कुमार आणि चंद्राबाबू? भविष्यातल्या इतिहासात आजच्या काळाचे सर्वात मोठे खलनायक ठरतील ते.
□ पैसा जातोय कुठे, महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत महाराष्ट्र सरकारची भूमिका निर्लज्जपणाची – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.
■ गेंड्याची कातडी आणि बैलाची बुद्धी यांचा सुरेख संगम आहे तो. किती असुड ओढा, काहीही फरक पडणार नाही. सगळ्या लोकशाही यंत्रणा सडवून त्यांच्यावरचा सर्वसामान्यांचा विश्वास उडवणे हेच तर ध्येय आहे त्यांचं.