आपल्याकडे गेली कित्येक वर्षे अभारतीय खाण्यामध्ये चायनीज खाद्यपदार्थ सगळ्यात प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे मिळणारे इंडियन चायनीज आणि चीनमध्ये मिळणारे चायनीज खाद्यपदार्थ यात फारसे साधर्म्य नाही असं म्हणतात. चीनमध्ये मिळणारे खरे चायनीज पदार्थ कधी खाण्यात आले नसल्याने त्याबद्दल मला फारसे काही बोलता येणार नाही, पण जागोजागी छोट्या रेस्टॉरंट, टपर्या आणि ठेल्यावर मिळणार्या हाक्का नूडल्स किंवा आमच्या दिल्लीच्या आणि पंजाबातल्या भाषेतल्या चौमिन नूडल्स आणि मंचुरियन किंवा लालभडक तेलातल्या असलेल्या पनीर चिलीपेक्षा काही मोठ्या एशियन रेस्टॉरंटमध्ये मिळणारे चायनीज पदार्थ चवीला जास्त चांगले आणि थोडे वेगळे लागतात. पण तेही भारतीयीकरण केलेले चायनीज पदार्थच असावेत.
चायनीज पदार्थ आपल्याकडे गेल्या २५-३० वर्षांपासून तरी नक्कीच खाल्ले आणि केले जात आहेत. मी स्वत: फ्राईड राइस, हाक्का नूडल्स आणि व्हेज मंचुरियन साधारण वीसेक वर्षांपूर्वी करून बघितले होते. त्यावेळी हे चायनीज पदार्थ रांधता येणं फारच कौतुकास्पद मानलं जायचे. असे वेगवेगळे इंडो चायनीज पदार्थ शिकवणारे बरेच क्लासेसही सुरू झाले होते. पण हे असे इंडो चायनीज पदार्थ अजिबातच आरोग्यपूर्ण नसतात. यात अजिनोमोटो/ एमएसजी, भरपूर तेल, बर्याचदा खाण्याचे रंग, नेहमीपेक्षा जास्त मीठ, वेगवेगळ्या विकतच्या सॉस आणि टॉमॅटो केचपचे आणि परिणामी साखरेचं जास्त प्रमाण असतं. अजिनोमोटो न वापरता, फक्त सोया सॉस वापरून किंवा कमी प्रमाणात केचप वापरून, इतर फारसे वेगळे सॉस किंवा मसाले न वापरतासुद्धा घरी मुलाबाळांना आवडणारे, तरीही आरोग्यपूर्ण असे बरेच चायनीज पदार्थ करता येतात. त्यातला फ्राईड राइस हा तर खरंच खूप सोप्पा आणि लवकर बनणारा पदार्थ आहे. घरात असलेल्या थोड्याफार भाज्या, थोडा सोया सॉस आणि मीठ व मिरेपूड इतकेच घटक घालून आणि शिळा भात वापरूनसुद्धा पटकन आणि खूप चांगल्या चवीचा फ्राईड राइस बनवता येतो. सगळ्याच भाज्या एकावेळी न घालता फक्त १-२ भाज्या घालून त्या त्या भाज्यांच्या चवीला उठाव देऊन वेगवेगळ्या चवीचा फ्राईड राईस बनवता येतो.
सहज बनवता येऊ शकतील आणि चविष्ट व आरोग्यादायी अशा चायनीज किंवा इंडो चायनीज पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची (वेगवेगळ्या भाज्या, मांसाचे प्रकार घातलेली) सूप्स, स्टर फ्राय केलेल्या भाज्या/ चिकन किंवा इतर मांसाहारी प्रकार, वेगवेगळ्या भाज्या/ अंडी/ चिकन/ मासे किंवा इतर मांसाहारी पदार्थ वापरून केलेले फ्राईड राईसचे प्रकार, भरपूर भाज्या आणि मांसाहारी पदार्थ घालून बनवले जाणारे वेगवेगळे नूडल्सचे प्रकार, भाज्या किंवा मांसाहारी पदार्थ घालून वाफवून केले जाणारे डंपलिंगचे प्रकार किंवा चायनीज पद्धतीने केले जाणारे सलाड अशा बर्याच पदार्थांची मोठी यादी करता येऊ शकते. यातला कोणता पदार्थ आरोग्यदायी आहे आणि कोणता नाही हे तो पदार्थ करण्याची पद्धत (वाफवून केला आहे की मोठ्या आंचेवर स्टर फ्राय करून केला आहे की सरळ तेलात तळून केला आहे), पदार्थात वापरले जाणारे मुख्य घटक (भरपूर भाज्यांचा वापर, अंडी आणि इतर मांसाहारी पदार्थांचा वापर, वापरले जाणारे धान्य प्रोसेस केलेले आहे की नाही किंवा कोणते आहे), पदार्थात चवीसाठी वापरले जाणारे सॉस (बाजारातून आणलेल्या बर्याच सॉसमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ आणि साखरेचे प्रमाण असते) अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. नूडल्स म्हटले की आपल्याला मैद्याच्या नूडल्स आठवतात आणि त्याही भरपूर तेलात परतून केलेल्या असतात. पण त्याऐवजी गव्हाच्या किंवा तांदळाच्या नूडल्स वापरून एखादं सूप केलं तर त्यात कमी प्रमाणात नूडल्स आणि जास्त भाज्या घालून तो पदार्थ आरोग्यदायी करता येऊ शकतो.
चायनीज पदार्थ करायचे असतील तर सोया सॉस, तिळाचे तेल, राइस वाईन व्हिनेगर, कॉर्न फ्लोअर, मिरेपूड यासारखे काही पदार्थ स्वयंपाकघरात असणे गरजेचे आहे. याशिवाय शेझवान पेपरकॉर्न हा आपल्याकडे कोकणात मिळणार्या तिरफळांच्या जातीचा तिखटाचा प्रकार आणि चक्री फूल हे काही मसाल्याचे पदार्थ काही ठराविक पदार्थांमध्ये घातले जातात.
आपण बाहेर खातो ते बहुतेक सगळे चायनीज पदार्थ जास्त तिखट आणि चमचमीत असतात. आमच्या घराजवळ एका छोट्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये स्लाइस्ड चिकन विथ चायनीज ग्रीन्स अशा नावाचा पदार्थ मिळायचा. थोडासाच सोया सॉस आणि घट्टपणासाठी अगदी थोडे कॉर्नफ्लोअर घातलेला खूपच साधा पदार्थ होता तो आणि तिखट नसल्याने आमच्या घरी लहान मुलांना आवडायचा. मध्यंतरी लॉकडाउनमध्ये ते ठिकाण बंद झाल्यावर आम्ही इंटरनेटवर शोधून आणि चव आठवून तो पदार्थ घरी करून बघितला आणि अगदी तसाच जमला सुद्धा. हा साधा चिकनचा प्रकार आणि सोबत भात एवढंच जेवण म्हणून पुरेसे होते. हे तिखट नसल्याने चवीसाठी स्टार्टर म्हणून आणि मुलांना आवडणारे हनी चिली चिकन ड्रमस्टिक एअरफ्रायर किंवा ओव्हनमध्ये केले तर मुलं पण खुश आणि मुलांना घरी कमी तेलात आवडीचे जेवण दिल्यामुळे आईबाबा पण खुश होतात.
स्लाइस्ड चिकन विथ चायनीज ग्रीन्स
साहित्य : ३ चिकन ब्रेस्ट पिसेस, १ चमचा आले-लसूण पेस्ट, आले आणि लसूण बारीक चिरून (प्रत्येकी एक चमचा), सोया सॉस, अर्धा चमचा राइस वाईन व्हिनेगर, तिळाचे तेल, मिक्स भाज्या, १ चमचा कॉर्न फ्लोअर, मिरेपूड, चवीप्रमाणे मीठ.
भाज्या : एक कांदा मोठा जाडसर चिरून, थोडा पत्ता कोबी (कांद्याप्रमाणेच मोठा चिरून), ब्रोकलीचे तुरे, फ्लॉवरचे तुरे, बीन्स, बेबी कॉर्न, मशरूम, ब्रोकलीची पाने, हिरवी आणि लाल-पिवळी सिमला मिरची, झुकिनी आणि गाजर, स्वीट कॉर्न, पालक इत्यादींपैकी ज्या मिळतील त्या.
कृती : झुकिनी आणि गाजराच्या अर्धगोलाकार चकत्या, मशरूमचे मोठे तुकडे (सूपमध्ये असतात तसे), बीन्स आख्ख्या किंवा दोन तुकडे करून, बेबी कॉर्न उभे किंवा गोल हवे तसे चिरून घ्यावे. सिमला मिरचीचे सुद्धा कांदा आणि पत्ता कोबीप्रमाणेच मोठे चौकोनी तुकडे करावेत. ब्रोकली आणि फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे घ्यावेत. पालक आणि ब्रोकलीची पाने घेतली असली तर हाताने त्यांचे मोठे तुकडे करून ठेवावेत.
चिकनला मीठ, मिरे पूड, आले-लसूण पेस्ट, राइस वाईन व्हिनेगर आणि अर्धा चमचा सोया सॉस लावून अर्धा-एक तास मॅरिनेट करावे आणि नंतर स्टीम करायला ठेवावे. चिकन वाफवून घेतले की त्याचे हाताने छोटे तुकडे करावेत.
चिकन स्टीम होईपर्यंत कढईत थोड्या तेलावर (मी तिळाचे तेल वापरले) चिरलेले आले-लसूण, कांदा, पत्ता कोबी, मशरूम, बेबी कॉर्न, झुकिनी, गाजर, बीन्स, ब्रोकली आणि इतर भाज्या मोठ्या आंचेवर परतून घ्याव्या. भाज्या बर्यापैकी परतल्या गेल्या की त्यात चिकनचे तुकडे घालून अजून परतून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ, मिरपूड आणि किंचितसा सोया सॉस घालावा. यात मॅरिनेट करताना आणि नंतरही सोया सॉस खूप कमी घालायचा आहे. जास्त सोया सॉस घातल्यास या पदार्थाचा रंग पांढरा न रहाता थोडा गडद दिसेल. चिकन वाफवताना साठलेलं पाणीसुद्धा यात घालून घ्यावे. यानंतर यात गरजेप्रमाणे पाणी घालून भाज्या किंचित शिजू द्याव्यात. भाज्या खूप जास्त शिजून गिचका होवू न देता थोड्या करकरीतच राहू द्याव्यात. शेवटी थोड्या पाण्यात कालवलेले कॉर्न फ्लोअर या ग्रेव्हीमध्ये मिक्स करावे. गरम गरम भाताबरोबर हा पदार्थ छान लागतो. शाकाहारी लोकांनी चिकनऐवजी या ग्रेव्हीत सर्वात शेवटी मॅरिनेशन लावून स्टर फ्राय केलेले टोफू किंवा पनीरचे तुकडे घालून एक उकळी आणावी.
ड्रम्स ऑफ हेवन किंवा हनी चिली चिकन ड्रमस्टिक्स
साहित्य : पाच चिकन लेग पीस/ ड्रमस्टिक्स, १ चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा सोया सॉस, २ चमचे टॉमॅटो केचअप, अर्धा चमचा राइस वाईन व्हिनेगर किंवा इतर कोणतेही नॅचरल व्हिनेगर, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मध, अर्धा चमचा मिरे पूड, चवीप्रमाणे मीठ आणि हवे असल्यास थोडा चिली सॉस (हा नसला तरी चालेल), १ चमचा बारीक चिरलेला लसूण. एक कांदा बारीक चिरून, थोडी कांद्याची पात.
कृती : चिकन लेग पीसला कट देऊन १५ मिनिटं मॅरिनेट करा. टोमॅटो केचअप, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, चिली सॉस (हवा असल्यास), मिरेपूड, लाल तिखट, मीठ, अर्धा चमचा मध, पाव चमचा तेल आणि अर्धा चमचा रेड वाईन व्हिनेगर एकत्र करून मॅरिनेशन तयार करा. चिकन लेग पीसला चिरा देऊन हे मॅरिनेशन लावून किमान १५ मिनिटे ते तासभर ठेवा.
एअर फ्रायर १६० अंशावर ५-७ मिनिटे प्री-हिट करा. एअर फ्रायरच्या भांड्याला तेल लावून त्यात १६० अंशावर चिकन १२ मिनिटे ठेवा. नंतर चिकन पीस उलटे करून १८० अंशावर ७-८ मिनिटे एअर फ्राय करा. एवढ्या वेळात चिकन व्यवस्थित शिजते. तुमच्या एअर फ्रायरमध्ये कदाचित २-४ मिनिटे कमी जास्त लागू शकतील.
एका फ्राय पॅनमध्ये थोड्या तेलात थोडा बारीक चिरलेला लसूण आणि कांदा परता. त्यात उरलेलं मॅरिनेशन घाला. ते कमी वाटल्यास अजून थोडे केचप आणि चवीप्रमाणे तिखट-मीठ घालून सॉस तयार करता येईल. सर्व्हिंग प्लेटमध्ये लेग पिस ठेवून त्यावर सॉस घालून आणि वरून चिरलेली कांद्याची पात घालून सर्व्ह करा.
एअर फ्रायरऐवजी हेच चिकन ओव्हनमध्ये किंवा गॅसवरही करता येईल. गॅसवर करताना थोडे जास्त तेल लागेल आणि आधी फ्राय पॅनमध्ये थोडा वेळ झाकून शिजवून नंतर दोन्ही बाजूंनी रंग बदलेपर्यंत झाकण न ठेवता शिजवावे लागेल.