आपला संकल्प वर्षभर व्यायाम करायचा असल्याने अर्थातच जिमची मेंबरशिप आपण वर्षाची घेतो. पण आठवडा पंधरवडाभर अति गजबजलेल्या जिम पुन्हा पूर्ववत होतात. काही दिवस गॅप घेतला असला तरी अजून वर्षभराची मेंबरशिप आहे म्हणून नवग्राहक खूश आणि वर्षभराची फी जमा झाल्याने जिम मालक खूश. असा हा ‘फील गुड‘ व्यवसाय आहे.
– – –
नववर्षाची म्हणजे २०२५ची नवी नवलाई सुरू आहे, सगळ्यांचे संकल्पपूर्तीचे प्रयत्न (सध्या तरी) जोरदार सुरू असतील. वर्षभर हे संकल्प पूर्ण करण्याची इच्छा, ऊर्जा आणि भवताल आपणा सर्वांस मिळो अशा शुभेच्छा!
साधारणपणे नवीन वर्षाचा उत्साह आधी ओसरतो की संकल्प आधी विरतो, अशी चढाओढ असते. कारण जगात दोन प्रकारचे लोक असतात, चांगल्या गोष्टीसाठी नवीन वर्षाचा मुहूर्त कशाला असं म्हणणारे आणि मुहूर्ताशिवाय चांगलं काम होणार कसं म्हणून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून काहीतरी चांगलं, ‘हेल्दी‘ सुरू करणारे. दोघांच्याही संकल्पाची गाडी थोडी घरंगळत जाते.
संकल्प म्हणजे काय तर एखादी गोष्ट ठरवून पूर्णत्वास नेणे. नववर्षाला जगभरात सगळ्यात जास्त लोक कुठला संकल्प घेत असतील तर तो असतो फिट आणि हेल्दी राहण्याचा, त्यातही सर्वाधिक संकल्प वजन कमी करण्याचे सोडले जातात. मॉर्निंग वॉक, डाएट करून तितकासा लाभ न झाल्याने आता काहीतरी सॉलिड करायला हवं या मुद्द्यावर गाडी येते आणि जिम्नॅशियमची शोधाशोध सुरू होते. आज तुम्ही फोनवर फिटनेस, वेट लॉस असे शब्द उच्चारले की लगेच मोबाईलमधील जिनी तुमच्या जवळच्या जिमच्या जाहिराती पेश करतो. त्यातलीच एखादी ऑफर निवडून कधी एकट्याने कधी कुटुंबातल्या किंवा मित्रमैत्रिणीपैकी कुणास भरीस पाडून जिमला जाण्याची सुरुवात होते. जिम मालक हुशार आहेत, ते महिन्याला दोन हजार रु. फी भरा अथवा वार्षिक डिस्काउंट मिळवून पाच हजार भरा असा फी तक्ता आपल्यासमोर ठेवतात. आपला संकल्प वर्षभर व्यायाम करायचा असल्याने अर्थातच मेंबरशिप आपण वर्षाची घेतो. त्यानुसार जिमची बॅग, कपडे, शूज, पाण्याची बॉटल असा सगळा जामानिमा जमवण्यात खिशाचं जे वजन कमी होतं त्याने शारीरिक वजन कमी झाल्याची खात्री पटते. पहिला आठवडा जोरदार जिमिंग केलं जातं, पण पहिल्या रविवारनंतर बरेच मोहरे गळतात. जे उरतात ते संक्रांतीचा हलवा आणि गुळपोळी खाऊन मैदान सोडतात (नियमित व्यायाम करणारे वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात जिमकडे फिरकत नाहीत, इथे हौशानवशांची गर्दी लोटली असणार, हे त्यांना माहिती असतं). आठवडा पंधरवडाभर अति गजबजलेल्या जिम पुन्हा पूर्ववत होतात. काही दिवस गॅप घेतला असला तरी अजून वर्षभराची मेंबरशिप आहे म्हणून नवग्राहक खूश आणि वर्षभराची फी जमा झाल्याने जिम मालक खूश. असा हा ‘फील गुड‘ व्यवसाय आहे.
कोणत्याही व्यवसायात ग्राहकांची मागणी वाढते तेव्हा तो व्यवसाय व्यावसायिकांसाठी लाभदायक असतो. गेल्या काही वर्षांत फिटनेस व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे लोकांची बैठी जीवनशैली. सतत बैठे काम केल्याने वाढते वजन आणि सुटलेलं पोट यामुळे हैराण असलेले अनेकजण आपण आजूबाजूला किंवा आरशात पाहतो. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, आजार येण्याआधीच त्याला रोखा, असं म्हणतात. कामाचा ताण, स्क्रीन बिंज ईटिंग (स्क्रीनसमोर बसून सतत खाणं, नैराश्यातील खाणं (इमोशनल ईटिंग) यामुळे वजनकाटा पुढे पुढे धावायला लागतो आणि मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल अशा अनेक व्याधी शरीराला जोडल्या जातात. यावर उपाय म्हणून व्यायामशाळा, योगा क्लासेस आणि इतरही अनेक फिटनेस माध्यमांकडे लोकांची गर्दी वाढू लागते.
शारीरिक कसरतीच्या इतिहासात डोकावलं तर प्राचीन भारतात मल्लखांब, कुस्तीचे आखाडे आणि योग साधना यांना प्राथमिकता दिली जात असे. पैलवानांनी आखाड्यात विशेष प्रकारच्या सराव पद्धती विकसित केल्या. ब्रिटिशांच्या प्रभावामुळे भारतात आधुनिक व्यायामप्रकार आले. गावाकडील मंडळी अर्थार्जनासाठी शहरात आल्यावर तालमींची जागा छोट्या छोट्या व्यायामशाळांनी घेतली. अशीच एक व्यायामशाळा विष्णू तळवलकर यांनी १९३२मध्ये मुंबईत खार येथे रामकृष्ण फिजिकल कल्चर इन्स्टिट्यूट या नावानं स्थापन केली. त्या काळात सदस्यांना फी म्हणून दोन ते चार आणे (रुपयाचा १/१६वा भाग) आकारले जात होते.
विष्णू तळवलकर हे सांगलीतील आष्टा गावातील कुस्तीपटू. १९२८मध्ये वयाच्या २२व्या वर्षी ते मुंबईला आले, फावल्या वेळात गिरगावच्या हिंदू सार्वजनिक व्यायामशाळेत (तालीम) शारीरिक प्रशिक्षक म्हणून काम करीत असताना विष्णूंनी त्या काळात गिरगाव चौपाटीवर होणारी कुस्ती स्पर्धा जिंकली. हे प्रसिद्धीवलय असताना त्यांच्या सहकार्यांनी आणि मित्रांनी स्वतःची व्यायामशाळा स्थापन करण्याचा सल्ला दिला. तळवलकरांनी फिटनेस क्षेत्रात सुरुवातीपासूनच स्वत:चा वेगळेपणा जपला. ज्या काळात बालगंधर्व आणि इतर पुरुष नटमंडळी रंगमंचावर स्त्रीपात्रे साकारत असत, त्या काळात विष्णू तळवलकरांनी घरच्या महिलांनाही व्यायामशाळेत आणा, असं व्यायामशाळेतल्या सदस्यांना सांगितलं. पुरुषासोबत महिला कसरत करण्यासाठी जिममध्ये यायला लागल्या तेव्हा खर्या अर्थाने तळवळकरांची जिम ही फॅमिली जिम बनली. मुंबईत त्यांच्या अनेक शाखा सुरू झाल्या.
२००५मध्ये हैदराबादमध्ये त्यांची पहिली व्यायामशाळा सुरू झाली तेव्हा मराठी माणसाचा ‘तळवलकर्स’ हा ब्रँड देश पातळीवर पोहोचला. आमची कुठेही शाखा नाही असे बोर्ड अभिमानाने दुकानावर झळकवणार्या मराठी माणसात तळवळकर भारतभर जिमच्या शाखा विस्तारणारे तळवलकर्स वेगळे ठरतात. तळवलकर हे भारतातील फिटनेस उद्योगाचे गॉडफादर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
स्वातंत्र्योत्तर काळात साध्या उपकरणांसह जिम्स उघडण्यास सुरुवात झाली, जिथे स्थानिक स्तरावर प्रशिक्षण दिले जाई. ८०च्या दशकात व्यायामशाळा मुख्यतः बॉडी बिल्डिंग आणि वजन उचलण्यावर आधारित होत्या. भारतात जिमसाठी कोणतेही ठराविक व्यावसायिक मॉडेल नव्हते. उपकरणे स्थानिक पातळीवर तयार केली जात, जी सोपी व कमी तांत्रिक होती. जिम्स बहुतेक वेळा चाळीतील छोट्या खोलीत चालवले जात. राज कपूर, देव आनंदचा जमाना मागे पडून धर्मेंद्र, विनोद खन्ना यांच्यासारखे सौष्ठवपूर्ण शरीराचे नट आले, हे फिटनेससाठी प्रेरणादायक होते. १९९०च्या दशकात सलमान, शाहरुखसारखे नव्या दमाचे हिरो पडद्यावर दिसायला लागले. जागतिकीकरणानंतर तरुणाईकडे पैसा खुळखुळू लागला. साधी राहणी मागे पडून उच्च राहणीमान, आकर्षक दिसणं या बाबी प्रकर्षाने पुढे येऊ लागल्या यामुळे फिटनेस व्यवसायात अधिक संधी निर्माण झाल्या. जिम्समध्ये आधुनिक व्यायामपद्धती समाविष्ट होऊ लागल्या. आंतरराष्ट्रीय ब्रँडची उपकरणे भारतात येऊ लागली. जोर बैठकांसोबतच एरोबिक्स आणि कार्डिओ वर्कआउट्स लोकप्रिय झाले. वेट लॉस आणि फिटनेससाठी महिलांची जिममध्ये उपस्थिती वाढली.
चाळीतील तळमजल्यावरील लहान जागेतील व्यायाम शाळा आता अनाकर्षक आणि आऊटडेटेड झाल्या. भिंतीवरील दारासिंगचे फोटो बदलून त्या जागी अर्नोल्ड आणि सिल्वेस्टर स्टॅलोन याचे दंडावरची बेंडकी दाखवणारे फोटो झळकू लागले. घामाचा वास येणार्या दाटीवाटीच्या व्यायामशाळेऐवजी प्रशस्त जागेत एयर कंडिशनर, व्यायामाची अद्ययावत साधनं आणि म्युझिक सिस्टीम असणारी हाय फाय जिम तरुणाईला खुणावत होती. मागणी तसा पुरवठा हा व्यापाराचा प्रमुख नियम आहे. ग्राहकांच्या मागणीमुळे जुना जिमचा कायापालट झाला.
प्रत्येक नोकरदार माणसाला एकदा तरी व्यवसाय करावासा वाटतो. त्यातील अनेकांना रेस्टॉरंट उघडावं किंवा जिमचा व्यवसाय करावा असं वाटतं. हे दोन्ही धंदे दिसायला खूप सोपे दिसतात. आपल्याला जगण्यासाठी खाणं लागतं म्हणून रेस्टॉरंट हवं आणि खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी, फिट राहण्यासाठी जिम हवीच. जिम व्यवसायात दोन गोष्टी प्रमुख आहेत. मोठी जागा आणि जिम साहित्य (कार्डिओ उपकरणे, वजने आणि ट्रेनिंग मशीन) एक साधारण जिम उभारण्यासाठी पाच ते दहा लाखांपासून ५० लाखांपर्यंत गुंतवणूक लागू शकते. हे मुख्य खर्च कागदावर मांडून संभाव्य सदस्यांकडून येणारी फी वजा केली तर कागदावर मोठा फायदा नजरेस पडतो. पण कोणत्याही व्यवसायाचे कागदावरचे अंदाजपत्रक आणि प्रत्यक्षात व्यवसाय करतानाचा जमा-खर्च यात फरक असतो. यामुळेच वर्षाच्या सुरुवातीला उघडणार्या अनेक जिम पुढील सहा महिन्यांत बंद होताना दिसतात.
त्यामुळेच एखाद्या तरुण उद्योजकाने जिम व्यवसायात येताना कोणत्या गोष्टी आधी विचारात घ्यायला हव्यात हे पाहू. जिम सुरू करताना सर्वात महत्त्वाचं आहे ते लोकेशन. जिमची जागा शहरातील महत्त्वाच्या चौकात असेल तर तिथे कामानिमित्त येणार्या जाणार्यांचं लक्ष वेधलं जाईल, जिमला नवनवीन ग्राहक मिळतील. पादचार्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिमच्या दर्शनी भागात मोठ्या पारदर्शक काचा बसवल्या जातात, जेणेकरून कार्डिओ मशीनवर चालणारी माणसं दिसू शकतात. ग्राहकांसाठी बाईक आणि कार पार्किंग सुविधा असणं हेही आजच्या काळात खूप गरजेचे आहे. जिमच्या आजूबाजूला कोणत्या आर्थिक गटातील माणसं राहतात, यानुसार जिमची फी मांडणी असावी लागते. ५० लाख रुपये खर्च करून चांगल्या लोकेशनला प्रशस्त आणि अद्ययावत जिम तयार केली आणि दरमहा पाच हजार रुपये फी आकारण्याचं ठरवलं, पण जिमच्या आजूबाजूला वीस हजार मासिक पगार घेणारी माणसं असतील तर ती दहा हजार रुपये जिमची फी भरू शकत नाहीत. इथे व्यवसाय गोत्यात येऊ शकतो. म्हणूनच जिम सुरू करण्याआधी आपल्या विभागातील संभाव्य ग्राहकांच्या खिशाचा सर्वे करणे क्रमप्राप्त आहे.
जागेनुसार कोणते इक्विपमेंट घ्यावेत आणि त्याची मांडणी कुठे कशी करावी यावर त्या जिमचा लुक ठरेल. महत्त्वाचे सगळे साहित्य येऊनही जिम प्रशस्त आणि मोकळी दिसली तरच कसरत करणार्या लोकांना मोकळा श्वास घेता येतो. व्यवहारिक दृष्टिकोनातून जी गुंतवणूक कराल त्याची परतफेड दीड ते दोन वर्षात होईल अशा पद्धतीचा प्लॅन बनवणं आवश्यक आहे. खूप जास्त पैसे इन्वेस्ट करून हाय फाय जिम बनवली आणि कॉम्पिटिशनमुळे कमी ग्राहक आले तर जिम नुकसानीत जाण्याची शक्यता जास्त असते. जिमचा व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्या लोकेशनच्या आजूबाजूला कोणत्या जिम सुरू आहेत, ते किती फी आकारून कोणत्या सुविधा देत आहेत याचा अभ्यास करायला हवा. तसेच आपली जिम उत्तम चालू लागल्यानंतर कुणीतरी त्याच परिसरात नवीन जिम उघडणारच. भविष्यातील कॉम्पिटिशनला व्यावसायिक धोबीपछाड कसा द्यायचा याचा प्लॅन व्यवसाय चांगला चालत असतानाच तयार करून ठेवावा लागेल. या व्यवसायात उतरणार्या नवउद्योजकांना वाटतं की इतरांपेक्षा कमी फी घेतली तर धंद्यात लवकर जम बसेल. परंतु प्राइस वॉरपेक्षा क्वालिटीवर लक्ष ठेवलं तरच या व्यवसायात टिकाव धरता येतो, पैसा कमावता येतो.
बोलेल त्याची माती खपते, गप्प बसणार्याचं सोनंही विकलं जात नाही, असं म्हणतात. काही वर्षांपूर्वी जिमचा व्यवसाय सुरू करताना नाक्यावर एक बॅनर लावला तरी लोक नोंदणी करत असत, पण आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तुम्हाला टार्गेट मार्केटिंग करणे अनिवार्य आहे. इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर जिमच्या लोकेशनच्या पाच किलोमीटर रेडियसमध्ये टारगेट मार्केटिंग करणे. ब्रँड बिल्डिंगसाठी फिटनेस इन्फ्ल्यूएन्सरला काम देणे, फिटनेस इव्हेंट्स आणि लोकल प्रमोशन्सचा वापर करणे हे करावे लागते. मुख्यत्वेकरून वजन कमी करणे आणि फिटनेस राखणे या दोन गोष्टींसाठी जिममध्ये लोक येतात. त्यात आधीचा आणि नंतरचा असे ग्राहकांचे वास्तविक फोटो घेऊन ठेवून ते ग्राहकांना दाखवण्यानेही जिमची विश्वासार्हता वाढते. आपली जिम पहिल्या दिवसापासून रिझल्ट ओरिएंटेड आहे हे ग्राहकांवर बिंबवावे लागते.
जिमची जागा आणि जिमचे साहित्य यांच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा माणूस असतो तो म्हणजे कसरत शिकवणारा जिम ट्रेनर. जुन्या व्यायामशाळेत जुने सदस्य, मास्तर नवीन आलेल्या मुलाला मार्गदर्शन करायला तत्पर असायचे. एअर कंडिशन्ड आधुनिक जिममध्ये जिम ट्रेनर उपलब्ध असतो, तो सामूहिक मार्गदर्शन करतो. धनवंत सदस्य व्यक्तिगत ट्रेनर मदतीसाठी घेतात. हा पर्सनल ट्रेनर एकावेळी एकाच व्यक्तीला प्रशिक्षण देत असतो. त्या व्यक्तीच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती त्याला असते. अगदी आहारासंबंधी नियोजनही तो करून देतो. हे पर्सनल ट्रेनर प्रकरण शाहरुख खानमुळे मोठं झालं. २००७ साली ओम शांती ओम सिनेमात दर्द ए डिस्को गाण्यात शाहरुखने शर्टलेस सीन दिला आणि बॉडी दाखवली. अंगावरचा शर्ट काढून अंगप्रदर्शन करणे ही मक्तेदारी तोवर सलमान खानची होती. पोटावर ‘फॅमिली पॅक’ बाळगणारे तरुणतुर्कही सलमानच्या सिक्स पॅक बॉडीचे फॅन होते. रोमान्सचा बादशाह शाहरुख पिळदार शरीर कमावून पडद्यावर दिसला तेव्हा त्याच्या चाहत्यांना हा सुखद धक्का होता. शाहरुखचा हा कायापालट प्रशांत सावंत या पर्सनल ट्रेनरने घडवून आणला होता. मग काय! ‘कहते हैं अगर किसी चीज़ को दिल से चाहो… तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है’ हा संदेश मानून सारी तरुणाई सिक्स पॅक बॉडी बनवायला पुढे आली. अचानक मागणी वाढल्यावर या कामात मार्गदर्शन करण्यासाठी नियमित व्यायाम करणारे, शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेणारे अनेक तरुण ‘मैं हूँ ना’ म्हणत जिममधील पर्सनल ट्रेनर झाले. पण पर्सनल ट्रेनरचे काम कोणत्या मशीनवर किती आणि कसा व्यायाम करायला सांगणे इतकच नसून ग्राहकाचे वजन निर्धारित करणे, तणाव कमी करण्याचे व्यायाम प्रकार शिकविणे अशी विविधांगी कामे त्याला करावी लागतात. फिटनेस ट्रेनरला त्याच्या क्षेत्रातील इत्थंभूत शास्त्रीय माहिती हवी. पर्सनल ट्रेनिंग, फिटनेस मॅनेजमेंट याविषयीचे कोर्स इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्टस सायन्स दिल्ली, गोल्ड्स जिम युनिव्हर्सिटी मुंबई, साई एनएस साउथ सेंटर युनिव्हर्सिटी बेंगलोर अशा अनेक संस्थामध्ये उपलब्ध आहेत.
जिमच्या व्यवसायात उतरू इच्छिणार्या पण हाताशी पुरेसं भांडवल नसलेल्या तरुणांनी प्रथम पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स करावा. करिअरच्या सुरवातीला या क्षेत्रात अल्प वेतनावर काम करावे लागते. पण तुमचे नाव आणि कामाचा दर्जा लोकांना भावला की चांगली कमाई होते. स्वयंरोजगाराच्या दृष्टीनेही हा व्यवसाय उत्तम आणि बिनभांडवली आहे. या स्वयंरोजगारात पिळदार शरीर हेच भांडवल आहे. जो दिखता है वही बिकता है या वाक्यानुसार आपला फिटनेसच अधिकाधिक ग्राहक मिळवून देईल. अर्थात चांगल्या फिटनेसबरोबरच संवादकौशल्य आणि नम्रताही व्यवसाय अधिक प्रमाणात वाढवू शकते. आज अनेक मोठ मोठे उद्योगपती, अभिनेते, राजकारणी फिटनेससाठी आग्रही आहेत आणि या सर्व मंडळींकडे त्यांचे पर्सनल ट्रेनर आहेत. प्रसिद्ध पर्सनल ट्रेनर तासाला अगदी दहा हजारसुद्धा कमवतात. नाव झालं की स्वत:ची जिम उभारून स्वतंत्र व्यवसाय करता येतो.
आधीच्या काळात पैलवान तब्येत कमविण्यासाठी नैसर्गिक पौष्टिक खुराक खाऊन कसरत करायचे. आत्ताच्या काळात इतका वेळ कुणाकडेही नाही. दोन मिनिटांत स्विगी फूड पार्सल आणि दोन आठवड्यांत पिळदार शरीर अशी आजच्या ग्राहकाची मागणी. भरीला भर म्हणून दहा दिवसांनी लग्न आहे हो, दहा किलो वजन कमी करून द्या, असं सांगणारे तरुण तरुणी जिमची पायरी चढताना दिसतात. सगळ्यांनाच कमी काळात वजन कमी करायचंय किंवा बॉडी बिल्डर बनायला प्रोटीन शेक, सप्लिमेंट्सना पर्याय नाही असं मानून घेण्याचे दिवस आले आहेत. सप्लिमेंट्स हा जिमचा एक स्वतंत्र उद्योग आहे. नवखे लोक प्रोटीन पावडर घेताना ट्रेनरला विचारतात, ‘हे घेतल्यावर माझं सिक्स पॅक होईल ना?’ यावर प्रशिक्षक म्हणतो, ‘हो, पण सोबत व्यायामही करावा लागेल.’ गमतीचा भाग सोडला तर क्रीडापटूंपासून ते व्यायामशाळेच्या उत्साही लोकांपर्यंत सगळेच हल्ली प्रोटीन सप्लिमेंट्स पावडर आणि प्रोटीन शेक घेत असतात. प्रोटीन सप्लिमेंट्स वाईट नाहीत पण दररोज प्रोटीन सप्लिमेंट्स घेताना त्याच्या परिणामांचा विचार केला पाहिजे. जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्याने मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण येऊ शकतो (शरीराच्या प्रति किलोग्रॅम वजनाच्या तुलनेनुसार दोन ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन्स शरीरामध्ये असणे हानिकारक असते) असं डॉक्टर सांगतात. प्रथिन पावडरचे शरीरसौष्ठव, ऊर्जावाढ, दुखापतीमधून सावरणे, मसल टोनिंग हे फायदे आहेत. या फायद्यांमुळे प्रोटीन पावडर जगभरात अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. जास्त कालावधीसाठी वर्कआउट करताना एनर्जी टिकून राहण्यासाठी सप्लीमेंट्स घ्याव्या लागतात. अॅथलीट्समध्ये, खेळाडूंमध्ये प्रोटीन पावडरची मोठी बाजारपेठ आहे. मागणी तसा पुरवठा या व्यापारी तत्त्वाला अनुसरून प्रथिन पावडर तयार करणार्या अनेक कंपन्या गेल्या काही वर्षात निर्माण झाल्या. जिममध्येही प्रोटीन पावडर विकण्याचा व्यवसाय अगदी जोरात चालला आहे. अधिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून अनेक जिम मालक आणि पर्सनल ट्रेनर यांनी एजन्सी घेतली आहे. प्रोटीन पावडरचा होलसेल दर सामान्यत दोन हजार ते ३५०० रु. प्रति किलो आहे आणि रिटेल किंमत ब्रँड आणि उत्पादनाच्या प्रकारानुसार ३००० ते ६००० रु. प्रति किलो आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमाच्या आजूबाजूला प्रोटीन पावडर विकणारी अनेक दुकाने आहेत.
भारतात अंदाजे २५ ते ३० हजार व्यायामशाळा (जिम्स) आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये मोठ्या चेन जिम्सचे प्रस्थ असून लहान शहरांमध्ये स्थानिक जिम्स जास्त आढळतात. जिममध्ये व्यायामाबरोबर महिलांसाठी पारंपारिक व्यायामासोबतच झुंबा, योग, पिलेट्स, क्रॉसफिट असे क्लासेस घेतले जातात. घरबसल्या कसरत करणार्यांसाठी ऑनलाइन फिटनेस वर्कआउट्स व व्हर्च्युअल ट्रेनिंग देखील उपलब्ध आहे. आजच्या आधुनिक जिम्स तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. एसी, म्युझिक सिस्टम, व्हीआरसारखी स्मार्ट उपकरणे, शॉवर्स, स्पा आणि स्टीम बाथ जिम्समध्ये कॉमन झाले आहेत.
भारतात जिम व्यवसाय वेगाने प्रगती करतोय. फिटनेस आणि जिम व्यवसायाची उलाढाल २०२४मध्ये अंदाजे २० हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. २०३०मध्ये ही उलाढाल ५० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. लोकांची फिटनेसबाबत जागरुकता वाढली म्हणून या व्यवसायाला गती मिळाली. मोठमोठ्या धनाढ्य कंपन्या छोटे छोटे व्यवसाय गिळंकृत करत असताना जिम व्यवसायात अजूनही मोठ्या ब्रँड्सचा हिस्सा फक्त २० टक्के आहे, तर स्थानिक जिम व्यवसाय ८० टक्के या व्यवसायावर अधिराज्य गाजवतात. म्हणूनच या क्षेत्रात स्वयंरोजगार करू इच्छिणार्या तरुणांना मोठी संधी आहे. लोकांचं आरोग्य वाढवणार्या फिटनेसच्या फील गुड व्यवसायात पदार्पण करून हॅपी न्यू इयर साजरं करूया.