ग्रहस्थिती : मंगळ कर्क राशीमध्ये, गुरु, हर्षल-वृषभ राशीत, रवि, बुध वृश्चिक राशीत, शुक्र धनु राशीत, प्लूटो मकर राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, शनि कुंभ राशीत, केतू कन्या राशीत. दिनविशेष : २२ डिसेंबर, भानुसप्तमी आणि कालाष्टमी, २५ डिसेंबर ख्रिसमस, २६ डिसेंबर सफला एकादशी.
मेष – नोकरीत अपेक्षेप्रमाणे फळ मिळेल, कामाचा हुरूप वाढेल. जुनी कामे पूर्ण होतील, आर्थिक बाजू भक्कम होईल. नवीन घर घेण्याचा प्रश्न मार्गी लागेल. अचानक धनलाभ होईल. तरुणांना अनपेक्षित यश मिळेल. व्यवसायात किरकोळ वाद वाढवू नका. सकारात्मक विचार करून प्रश्न सोडवा. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल. मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी घडतील. कलाकारांचा सन्मान होईल. सामाजिक कार्याला वेळ द्याल. चुकीचे काम करू नका. अडकलेले सरकारी काम मार्गी लागेल.
वृषभ – शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षकांसाठी काळ उत्तम आहे. नोकरीत बुद्धिचातुर्याच्या जोरावर यश मिळवाल. मनासारखी स्थिती राहील, वरिष्ठ खूष होतील, प्रमोशन मिळेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तरुणांचा वेळ मनोरंजनात खर्च होईल. कामानिमित्ताने विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. आरोग्याची काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी रागाच्या भरात उलट सुलट बोलू नका. नवी नोकरी मिळेल. मनासारख्या घटना घडतील. दांपत्यजीवनात आनंदी वातावरण राहील. नव्या संकल्पनांना आकार मिळेल.
मिथुन – पैशाचे गणित बिघडू शकते. नसते खर्च टाळा. उधार पैसे देऊ नका. वाद होतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात पैशाच्या अति मागे धावू नका. शिस्तबद्ध पद्धतीने काम करा. थंडी, ताप, डोकेदुखीचा त्रास होईल. घरात किरकोळ कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. इनडोअर क्रीडापटूंना चांगला काळ. ध्यानधारणेमुळे मन प्रसन्न राहील. कामात वेळेचे नियोजन करा, धावपळ होणार नाही आणि आरोग्यावर परिणाम होणार नाही. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – मनासारख्या घटना घडल्याने आनंद होईल. आर्थिक बाजू मनासारखी राहील. नोकरीत तुमच्या शब्दाला मान राहील. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. घरासाठी खर्च करावा लागेल. व्यवसायात यशदायी काळ. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. व्यवसायविस्ताराचा विचार पुढे ढकला. नवीन गुंतवणूक फायद्यात राहील. मित्रमंडळींबरोबर मौजमजेवर पैसे खर्च होतील. धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी जाल. विदेशात शिक्षणाच्या संधी चालून येतील. कलाकारांचा उत्कर्ष घडवणारा काळ. कुठेही बोलताना-वागताना संयम बाळगा.
सिंह – महत्त्वाची कामे पुढे नेताना कसोटीचे प्रसंग येतील. सावध पावले टाका. व्यावसायिकांनी अधिकचे काम व लाभ मिळवण्यासाठी धावपळ टाळावी. नोकरीत भाग्योदय होईल. घरात अनपेक्षित आनंददायी घटना घडेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. तरुणांच्या बाबतीत सुवार्ता समजतील. जुनी कामे मार्गी लागतील. विनाकारण वाद टाळा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. भाऊ-बहिणीकडून आर्थिक मदत मिळेल. नातेवाईकांना मदत कराल. महिलांना आरोग्याच्या तक्रारी त्रास देतील. वाहन चालवताना काळजी घ्या.
कन्या – कागदपत्रांवर डोळे झाकून सही करू नका. विवाहेच्छुंसाठी चांगला काळ. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान होईल. व्यवसायात बुद्धीच्या जोरावर यश मिळवाल. धार्मिक ठिकाणांना भेट दिल्याने समाधान मिळेल. आर्थिक बाजू सांभाळून घ्या. अवास्तव खर्च टाळा. इस्टेट एजंट, बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगला काळ. कोणत्याही ठिकाणी योग्य काळजी घेऊन मध्यस्थी करा. निर्णय चुकू शकतो. बँकेची कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. प्रवासात काळजी घ्या. विदेशात जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.
तूळ – नव्या घराचा प्रश्न काळजीपूर्वक पुढे न्या. व्यवसाय करताना पैसा आणि वेळेकडे लक्ष द्या. भागीदारीत सबुरीने घ्या. घरात ज्येष्ठांचा सल्ला माना. मत मांडताना काळजी घ्या. संततीकडून आनंदवर्धक बातमी कळेल. तरुणांना नव्या संधी मिळतील. कौटुंबिक सहलीचे आयोजन होईल. धार्मिक कार्यामुळे नातेवाईक, जुने मित्र यांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांना उलट उत्तरे देऊ नका. नवा व्यवसाय यशस्वी होईल. खेळाडू, कलावंतांना यश मिळेल. प्रवासात अनोळखी व्यक्तीशी जपून बोला. अचानक मोठा खर्च पडेल.
वृश्चिक – समाजात प्रतिष्ठा वाढेल. ब्रोकर, मार्केटिंगपटूंना आनंद मिळेल. जनसंपर्क, पत्रकारिता, साहित्य या क्षेत्रांत यशदायक काळ. बँकेची प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. भावंडांचे सहकार्य मिळेल. नोकरीत सबुरीने घ्या. मोजकेच बोला आणि काम करा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. मधुमेह, हृदयविकारग्रस्तांनी काळजी घ्यावी. सासू-सुनांमधील वाद वाढवू नका.
धनु – आनंदवार्ता समजल्याने कामातला उत्साह वाढेल. तरुणांना मनासारख्या संधी मिळतील. व्यवसायात यश मिळेल. नव्या ऑर्डर मिळून आर्थिक बाजू भक्कम राहील. नोकरीत आपली भूमिका रेटू नका. सबुरीने घ्या. धार्मिक ठिकाणांना भेटी दिल्यावर मन:शांती मिळेल. जुनी कामे पुढे सरकतील. सार्वजनिक जीवनात नियमाने चाला. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्या. सामाजिक कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळतील. वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा एखादी सुवर्णसंधी गमावाल. कोणताही मोठा विचारपूर्वक घ्या.
मकर – संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यवसायात अपेक्षित यश मिळाल्याने कामाचा हुरूप वाढेल. नोकरीत वरिष्ठ कामावर खूष होतील. नव्या जबाबदार्या मिळतील. घरात वाद टाळा. कोणत्याही व्यवहारात अति घाई नको. मामाकडून मदत मिळेल. सार्वजनिक ठिकाणी आचारसंहिता पाळा. नातेवाईक, मित्रमंडळी यांना आर्थिक मदत करताना दहावेळा विचार करा. थकीत येणे वसूल होईल. तीर्थाटन होईल. शिक्षक, संशोधकांसाठी उत्तम काळ. जुना आजार त्रास देईल. व्यापार्यांना चांगला काळ. मध्यस्थी करणे टाळा.
कुंभ – कोणाला सल्ले देणे, वादात मध्यस्थी करणे टाळा. सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल. नवी संकल्पना कामे पुढे नेईल. तेलकट पदार्थांच्या मोहात पडू नका, घशाचे विकार जडतील. खेळाडूंसाठी यशदायक काळ. बहिणीला आर्थिक मदत करावी लागेल. व्यावसायिकांची आर्थिक बाजू भक्कम राहील. आर्थिक नियोजनात काळजी घ्या. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात वाद टाळा. सरकारी कर्मचार्यांना चांगला काळ. घरासाठी महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल. शेअर, लॉटरीमधून चांगला लाभ होईल. अति मोहात पडू नका.
मीन – नव्या ओळखीच्या माध्यमातून रेंगाळलेला प्रश्न सुटेल. मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू नका. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नव्या वास्तूच्या विषयावर चर्चा टाळा, निर्णय पुढे ढकला. अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. खिशात चांगले पैसे राहतील, पण अनाठायी खर्च टाळा. तरुणांसाठी चांगला काळ. नवे मार्ग सापडतील. नव्या गुंतवणुकीच्या मोहात पडू नका. नोकरीत तुमची बाजू भक्कम राहील. नव्या संधी चालून येतील. ध्यानधारणा, मन:शांतीमधून आध्यात्मिक प्रगती साधाल.
– भास्कर आचार्य