लाख गाव. केवडाभाऊच्या खुर्चीचढण समारंभाची पूर्वतयारी चालू. गावात मात्र कुठेही उत्साह नाही. कुणालाही समारंभ कुणाचा, कशाचा, याबद्दल काहीही कल्पना नाही. सगळीकडे स्मशानशांतता पसरलेली. कार्यकर्ते सुतकी चेहर्याने तोरण बांधतायत. कुणी जुन्या न फुटलेल्या फटाक्यांना काड्या लावतायत. कुणी तुतारी नको म्हणून शिंग आणून फुंकण्याचा सराव करतायत. कुणी मशाल नको म्हणून टेंभे पाजळतायत. खुर्चीवर बसेपर्यंत आप्तस्वकीयांनाच सुगावा लागू नये. याची काळजी घेत, गुप्तता पाळत केवडाभाऊ आपल्या खोलीत तयारी करतायत. तयारी करताना मधूनच स्वतःशी खुदकन हसतायत. ते एक अंगरखा उचलतात, पण नुसत्या त्याच्या वासाने शिंका चालू होतात. बहुतेक तो मिर्ची होमाच्या वेळी वापरलेला असावा. दुसरा उचलतात, तो बराय का, हे अंगात घालून आरशासमोर उभे राहून बघतात. आरश्यात बघताना स्वतःच स्वतःशी लाजतात. ‘धनी वाजवा की! वाजवा की! पुनवेची अवस होऊ द्या’ वगैरे गाणं गुणगुणत कपाळावरले केस झोकात उडवतात. खुंटीला अडकवलेल्या काही पेशवे पगड्यांतून एक तुर्रेदार पगडी निवडतात. ती डोक्यात घालतात. पण तिचा ऊग्र दर्प नाकात जाऊ लागताच झटकन काढतात. बहुतेक तीही ३६ घंट्याची साक्षीदार असावी. तो आठव येताच केवडाभाऊ झटकन ती पगडी कोपर्यात भिरकावतात नि दुसर्या एक पगडीला हात घालतात. मनपसंत रंगाची सुबक हिरेजडित तुर्रेदार पगडी काढून डोक्यावर ठेवतात. पुन्हा आरश्यात छबी बघून काहीवेळ हरखून जातात. पण तोच कपाटावरची हाडाणीची बाचकी खांद्यावर पडतात. ‘आऽऽयऽवं!’ केवडाभाऊ विव्हळतात. पण बाचकी बघून धाकवतात. आता खुर्ची मिळताच ही चौथाई द्यावी लागेल, ह्या विचाराने ते घाबरतात. न देऊन सांगायचं कुणाला? तोच माजघरातून वहिनी येतात. नव्या पाश्चात्य पोशाखात त्या ठुमकत आत येतात.
‘किनई तुम्हांसाठी मी २२ मण पुरणपोळ्या नि दहा हंडे साजूक तूप यांचं जेवण ठेवलंय. तुमच्या सोबतींना अगत्याने आमंत्रण द्या हं!’ आता दर उत्सवाला साजूक तूप खाऊन जीव आंबलाय. त्यात पुन्हा तेच म्हंटल्यावर केवडाभाऊचा चेहरा कोमेजतो. आयुष्यात झणझणीत असं काहीच नाही का? केवडाभाऊला प्रश्न पडतो. केवडाभाऊ वहिनीकडे बघून कसनुसं हसतो.
‘मी तुमच्यासाठी समारंभात एक गाणं गाऊ का?’ वहिनी काहीतरी भलतं आठवून विचारू लागतात. केवडाभाऊ केवळ प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघतात.
वहिनी मोठ्याने गात विचारतात. ‘राजसा खुर्चीवरी बसा, जीव हा पिसा! तुम्हासाठी बाई! हे गाणं कसं वाटतं?’ त्यांच्या प्रश्नावर केवडाभाऊला ठसका लागतो. वहिनी घाई घाईने कसलीशी बॉटल उचलून झाकण खोलतात नि केवडाभाऊंच्या तोंडाला लावू जातात. पण अचानक केवडाभाऊचं लक्ष त्यावरील स्टिकरवर जातं नि सदरहू द्रावण काच साफ करण्याचं आहे, हे कळताच तोंडापर्यंत आलेली बॉटल ते घाईने दूर लोटतात. त्यात ती पडते, फुटते. ते द्रावण जमिनीवर फसफसतं. ते बघून वहिनींना चूक कळते. त्यात केवडाभाऊची नजर चुकवत त्या मागे सरतात.
तोच एक शिपाई आत येतो, अमिश्याही राजवस्त्र नि रत्नजडित तरवार एका तबकात घेऊन पाठोपाठ दासी आत येते. ती वस्त्र बघून केवडाभाऊचा राग क्षणार्धात गळून पडतो, ते अत्यानंदाने वहिनींना मिठी मारतात. वहिनी आयुष्यात २२व्यांदा लाजतात. केवडाभाऊ शिपायाला बिदागी म्हणून २००० किमतीच्या ५६ नोटा बहाल करतात. दासीला बुडीत ‘नको ना!’ पतसंस्थेचा कोरा करकरीत चेक देतात. खुश होऊन शिपाई आणि दासी दोघेही बाहेर निघून जातात.
केवडाभाऊ मात्र आलेल्या राजवस्त्रांवर हात फिरवत मोहरून जातात. त्यांचं मन उकिरड्यावरच्या गाढवागत थयथया नाचू लागतं. त्यापाठोपाठ तेही बीभत्स रागावर नृत्य करू लागतात. त्यांचं ते नाचणं बघून वहिनी अक्षरशः थक्क होतात. बेफाम नाचून झाल्यावर घामेघुम केवडाभाऊ मघाचं खाली सांडलेलं फुटक्या बॉटलमधलं द्रावण ओठांना लावत घटाघटा पितात. त्याने त्यांचं मनही काचेसारखं साफ होतं आणि पोटही! कारण पुढल्याच क्षणाला ते नमोलयाकडे पळतात. आणि गडगडाटी आवाज काढत पोट साफ करून फ्रेश बाहेर पडतात.
वहिनी अजूनही केवडाभाऊच्या प्रतिमेच्या प्रेमात. त्यांची नजर केवडाभाऊवर. केवडाभाऊ मात्र नजर चोरून पुढे सरकतात. वहिनी दोन पावलं पुढे सरकतात, केवडाभाऊचे दोन्ही हात गच्च पकडत केवडाभाऊला पुढे खेचतात. त्यासरशी केवडाभाऊ अंगभर मोहरतात नि अचानक दोघेही फुगडी खेळू लागतात. अगदी घाम निघेपर्यंत!
अखेर केवडाभाऊचाच हात सुटतो आणि फुगडी थांबते. घामेघुम वहिनी केवडाभाऊच्या गालावर हळुवार टिचकी मारून हसत निघून जातात. दमलेला केवडाभाऊ खुर्चीवर बसत आलेल्या किताबतच्या विचारात बसतात. लोकांना खुर्चीचढणचा अधिकृत शिलेदार आपण आहोत, हे कळल्यावर होऊ शकणार्या शुभेच्छुकांच्या गर्दीच्या स्वप्नरंजनामध्ये केवडाभाऊ पुन्हा रमतात. गावतंटीवार अशी काही बातमी कळल्यावर आपला गौरव करता करता आपल्याला देऊ शकणार्या गॅलेक्सीगौरव उपाधीच्या शक्यतेने त्यांना काकणभर मांस चढतं. त्रेपनलुळे आपल्यासाठी भाषाप्रताडित वृत्तात एखादं कवण रचू शकतात, ते ऐकताच कानाला दडे बसू शकतात, ह्या कल्पनेने केवडाभाऊ खुर्चीच्या लोडमधून घाईने कापूस काढून कानात कोंबतात.
दुर्जनासहित चांडाळ चौकडी? ती तर पडक्या भिंतीवर उभारून गाल फुटेपर्यंत चित्कारत राहील. अगदी ढुंगणाच्या कपड्याचं भान न राहता, हे घडू शकतं. ही शक्यताच भाऊला गुदगुल्या करून जाते. भाऊचा त्या कल्पनेनेच ऊर भरून जातो. भाऊ त्यासरशी खिडकीत जाऊन उभा होतो. भाऊच्या नरड्यातून ‘बघा, मी पुन्हा आलोय!’ अशी हाकाटी बाहेर येणार तर भाऊ घाईने स्वतःचं नरडं घट्ट आवळून हाकाटीचा अवेळी गर्भपात घडवून आणतो. पुन्हा नकोच ते नष्टचक्र! मनातल्या मनात म्हणत केवडाभाऊ स्वतःला सावरतात.
पण राजवस्त्र आपल्या खोलीत येऊनही अजून कुणी शुभेच्छा द्यायला कसं आलं नाही? याचं त्यांना कवतिक वाटतं! आपण दिलेल्या शिळोप्यावर जगणारी पिलावळ सुद्धा या प्रसंगी अंगास बिलगून जिभल्यांनी बूट चाटावयास येईना म्हंटल्यावर केवडाभाऊचा जीव कासावीस होतो. त्याच बैचेनीत केवडाभाऊ खोलीत येरझर्या घालू लागतात. मधूनच खिडकीतून डोकावत कुणी येतंय का? याचा अदमासही घेतात.
तोच पुढल्या दाराने एकजण धावत येताना दिसताच त्यांचं मन अधीर होतं. पण हाय रे! ती व्यक्ती शिपायाला भेटते नि शिपाई खिश्यातील तंबाखू त्या व्यक्तीस देताना पाहून केवडाभाऊचा हिरमोड होतो. दुर्मुखलेलं तोंड घेऊन भाऊ मटकन खिडकीतच बसून घेतो. उद्या आपला खुर्चीचढण समारंभ आहे तरीही कुणालाच कसं त्याचं कवतिक नाही? ह्या विचारानेच केवडाभाऊ नाराज होतो.
पण ते काही क्षणच! कारण भयंकर खडखडाट करत कर्णकर्कश्श सायरन वाजवत एक शववाहिका पुढल्या दरवाजात येऊन थांबते. त्यातून रगेल प्रवृत्तीचा कुरूप पुंडोबा बरबटे उतरतो. हा तोच जो भाऊचे लुटुपटूचे ‘उठाव’ लढतो, ‘काळे भराव’ भरतो. त्याच्या हातात स्मशानात वाहिलेल्या फुलांपासून बनवलेल्या माळा आणि स्मशानातच वाहिलेल्या धान्यापासून बनवलेला केक दिसतो. चला कुणीतरी आलंय! म्हणत आणि धावत केवडाभाऊ शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दारात पोहोचतात. गौहत्तीवारीनं बरबटेला दहा हत्तीचं बळ आलं होतं. त्यानं दोन घरफोड्या आणि वैâक गावं लुटली होती. बायामाणसं तर…
तोंडात भरलेली तंबाखू पचकन थुंकत पुंडोबा अचकटविचकट हासत केवडाभाऊचं स्वागत करतो आणि गळ्यात माळा टाकून आलिंगन देतो. दोघं प्रसन्न मुद्रेने दारात केक कापतात, एकमेकांना भरवतात. पुनः पुन्हा हात हातात गच्च धरून मौनाने शुभेच्छांची देवाणघेवाण करतात.
तोच पुढल्या सीटवर बसलेलं अशांतीचं कारटं किरकिर करतं. भोकाड पसरतं. ते बघून केवडाभाऊ पुढे सरकतात, त्याला केक भरवू बघतात. ते हातचा केक घेऊन भिरकावून देतं! भाऊ त्याला माळीतली फुलं काढून त्याच्यापुढं धरतात, ते ती कुस्करून फेकतं. पण त्याची किरकिर काही थांबत नाही. ते बघून हसून पुंडोबा पुढे होतो. भिंतीला लावलेले टेंभे हातात घेऊन त्याच्याकडं देतो. तसं अशांतीचं कारटं शांत होतं, हसू लागतं. टेंभा हाती घेऊन ते तोंडात आगीची चूळ भरून ती हवेत सोडू लागतं नि आगीच्या खेळात मश्गुल होतं. ते बघून केवडाभाऊ विस्मयचकित होतात. त्यात त्यांचं लक्ष काचेवरल्या ठळक ‘शववाहिका’ शब्दावर येतं.
‘काय पुंडोबा? दुसरे वाहन मिळाले नाही का?’ बरबटे भाऊच्या प्रश्नावर लाजतो.
‘भाऊ, तुम्ही दहा वर्षांपूर्वी दिलेलं विकासचं बेवारस प्रेत वाटे लावायला दक्षिणोत्तर फिरून आलो. नदीकाठ हाडाणीला दिलेत, डंपिंग ग्राउंड त्यानंच बळकावलेत. शासनाच्या जमिनी त्याला बिनभाड्यानं दिल्यात. त्यामुळे बेवारस प्रेत पुरायला जागा उरली नाही. त्यामुळे जागेच्या शोधात रोज भटकंती चालूय… ‘
‘मग कब्रस्तान?’ केवडाभाऊ पुढला प्रश्न करतात.
‘तिथले मुडदे रोज उकरून कोण कोणाचा बाप याचा पंच मंडळी शोध घेत बसलीयेत, त्यामुळे तिथंही पुरायची सोय उरली नाही. अश्यात आज तुमच्या खुर्चीचढण कार्यक्रमाची चाहूल लागली नि धावत इथे आलो. म्हंटलं माझ्या गिधाडाच्या वाट्यामुळे तुम्हाला खुर्ची मिळतेय तर गळाभेट घ्यावी! त्यात ह्या शववाहिकेहून अधिक संयुक्तिक वाहन कोणते असेल?’ पुंडोबा बरबटे बिनतोड उत्तर देतो.
तोच अशांतीचं कारटं तोंडाद्वारे आग ओकत शेजारच्या काही इमारती पेटवतं. केवडाभाऊ विकासचं दुर्गंधीयुक्त प्रेत नि जळत्या इमारती भयचकित नजरेने बघत राहतात.
– ऋषिराज शेलार