`मार्मिक’नं अनेकांना घडवलं. मराठी विनोदी साहित्यात लुडबूड करू पाहणार्या माझ्यासारख्या लेखकाला `मार्मिक’चं मार्गदर्शन लाभलं. विनोदी लेखनाचे धडे मला इथंच तर मिळाले! त्यामुळेच `मार्मिक’ माझ्या हृदयातच कोरला आहे.
– – –
यंदाच्या १३ ऑगस्टच्या दिवशी आपणा सर्वांचं आवडतं, लाडकं `मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक पासष्ठाव्या वर्षांत दिमाखदार पदार्पण करीत आहे. १३ ऑगस्ट हा दिवस म्हणजे महाराष्ट्राचे अविस्मरणीय बुलंद, बहुआयामी, आडदांड व्यक्तिमत्व आचार्य अत्रे यांचा जन्मदिन. अत्रेसाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे-परिवार यांचे संबंध घनिष्टातले घनिष्ट. त्यामुळेच याच दिवशी महाराष्ट्राच्या पहिल्या व्यंगचित्र साप्ताहिकाला `ट्यँहा ट्यँहा’ करायला भाग पाडण्यात आले! तत्कालीन मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते `मार्मिक’च्या पहिल्या अंकाचं शानदार उद्घाटन झालं.
त्या काळात देशाची राजधानी दिल्लीहून निघणारं `शंकर्स विकली’ हेच एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक होतं. केवळ राजकीय आणि सामाजिक विषयांवर रेखाटलेली हास्यचित्रं आणि छोटेखानी विनोदी कथा/लेखांना प्राधान्य देणारं मराठीतील पहिलंवहिलं साप्ताहिक म्हणजे `मार्मिक’! (`मार्मिक’पासून स्फूर्ती घेऊन एकदोन साप्ताहिकं त्या काळात निघाली; पण ती अल्पजीवी ठरली!)
`मार्मिक’च्या जन्मामागचं नेमकं कारण काहीसं वेगळं आहे आणि ते सांगायलाच हवं. १९५७-६०च्या काळात बाळासाहेब ठाकरे हे मुंबईतील `फ्री-प्रेस’ नावाच्या वृत्तपत्र कचेरीत कार्टूनिस्ट म्हणून नोकरीला होते. त्यांच्या शेजारच्या टेबलावर बसणारे दुसरे कार्टुनिस्ट म्हणजे आर. के. लक्ष्मण. `फ्री-प्रेस’चे व्यवस्थापक ए. बी. नायर यांना बाळासाहेबांची व्यंगचित्रे, खास करून केंद्रीय मंत्री स. का. पाटील, मिनू मसानी यांच्यावर टीका करणारी व्यंगचित्रं रुचत नसत. त्या संबंधाची स्पष्ट नाराजी त्यांनी बाळासाहेबांना ऐकविली आणि सडेतोड मानी स्वभावाच्या बाळासाहेबांनी त्यांच्या टेबलावर राजीनामा-पत्र ठेवले! घरी आल्यावर पिताश्री प्रबोधनकार अर्थात दादा ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी व्यंगचित्र साप्ताहिक काढण्याचा विचार बोलून दाखविला आणि तो विचार प्रबोधनकारांनी केवळ उचलूनच धरला नाही तर त्या क्षणी व्यंगचित्र साप्ताहिकाचं `मार्मिक’ हे नावही सुचवलं! `मार्मिक’चं अंतरंग प्रामुख्यानं राजकीय आणि सामाजिक विषयांवरील व्यंग-हास्य चित्र आणि चटपटीत शैलीत लिहिलेला चटकदार मजकूर असावा असं ठरलं. त्यातील व्यंगचित्रांची जबाबदारी अर्थातच ठाकरे बंधुद्वयाची आणि आतील मजकुराची जबाबदारी त्या काळातील माननीय लेखकांकडे सोपवण्याचं ठरलं. सुरुवातीच्या काळात विजय तेंडुलकरांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि काही अवधीनंतर सोडूनही दिली. त्यानंतर चतुरस्त्र लेखक-पत्रकार द. पां. खांबेटे यांनी ती स्वीकारली आणि संधीचं सोनं केलं. त्यानंतरच्या काळात सर्वश्री प्रमोद नवलकर, भाऊ तोरसेकर, ह. मो. मराठे, पंढरीनाथ सावंत आणि वसंत सोपारकर यांनी हे पद भूषविलं.
१९६० साली जन्माला आलेल्या `मार्मिक’चा मला स्वत:ला सुगावा लागला तो फेब्रुवारी १९६२ साली. ज्येष्ठ भगिनीच्या लग्नासाठी म्हणून मी, हुबळी या कर्नाटक राज्यातील शहरातून एकदोन दिवसांसाठी मुंबईत आलो; त्यावेळी रेल्वे स्थानकावरील पेपर-स्टॉलवर मला पहिलंवहिलं दर्शन घडलं ते `मार्मिक’च्या `शिमगा विशेषांकाचं!’ अवघ्या २४ पानांच्या आणि २५ पैसे किंमतीच्या या अंकाच्या अंतरंगानं मला इतकं मोहित केलं की, त्या काळातील विविध नियतकालिकांतील माझ्या सर्वात आवडीचं नियतकालिक म्हणजे `मार्मिक’ हे समीकरणच झालं!
अंकातील मध्यभागातल्या दोन पानात मांडलेली `रविवारची जत्रा’ या शीर्षकाखालील, ताज्या ताज्या बातम्यांवरील खास मल्लीनाथी केलेली राजकीय व्यंगचित्रं हे `मार्मिक’चं खास आकर्षण असे. त्यातलं शेवटच्या कोपर्यातलं `स.फि.टि.का’ म्हणजेच `सर्वत्र फिरणार्या रिकाम्या काळाचं दर्शन गुदगुल्या करायचं. शिवाय अर्ध्या पानात मावणारी श्रीकांतजींची व्यंगचित्रं खास वाटायची. राजकीय विषयांप्रमाणेच तत्कालीन अन्य विषयांवरची हास्यचित्रंही अंकभर विखुरलेली असत. अंकाच्या अखेरच्या पानावरचं `अंधेर नगरी’ शीर्षकाखाली प्रसिद्ध होणार `शुद्ध निषाद’ (म्हणजेच श्रीकांतजी!) याचं त्या आठवड्यात प्रदर्शित होणार्या हिंदी-मराठी चित्रपटाचं परीक्षण म्हणजे सुग्रास जेवणानंतरची `स्वीट डिश’च. परिणामी थेट मुखपृष्ठापासून ते शेवटच्या पानापर्यंतचा `मार्मिक’ कितीही वेळा वाचला वा पाहिला तरी पुन्हा पाहावासा वाटेच! इतर दैनिक-साप्ताहिकं महिनाअखेर रद्दीत जात, एकमेव अपवाद म्हणजे `मार्मिक’. दर गुरुवारी मुंबईत प्रसारित होणार्या आणि शनिवार रविवारी इतर शहरांत पोहोचणार्या `मार्मिक’ची वाट सोमवारपासूनच पाहणारे कितीतरी असतील.
अन्य व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या `वस्त्रे अशी अब्रू घेतात’ या दोन भागातील व्यंगचित्र-सदराचा उल्लेख करावासा वाटतो. येवले येथील, सध्याचे प्रस्थापित हास्यचित्रकार प्रभाकर झळके या सदराचं ऋण आजही मानतात. त्या काळातील आधीच प्रस्थापित झालेले सर्वश्री हरिश्चंद्र लचके, प्रभाकर ठोकळ, बाळ राणे यांच्यासोबत नवोदित चित्रकार बोरगावकर, भीमसेन, श्रीगजानन सावे, यशवंत सरदेसाई यांचीही हास्यचित्रं आवर्जून पाहावीत अशीच असत.
`मार्मिक’मधील संपादकीय लेखासह इतर मजकुराची जुळवाजुळव करणारे द. पां. खांबेटे स्वत: विविध टोपणनावानं लिहीत. त्यातली काही नावं म्हणजे `सोमाजी गोमाजी कापसे’, `दत्ता मराठे’, `निसर्गप्रेमी’, `नारबा भोळे, `मंडणमिश्र’ इत्यादी. माझ्यासारख्या नवोदित लेखकांना ते प्रोत्साहन देत. सर्वश्री नरेंद्र बल्लाळ, अनिल नाडकर्णी, दिलीप प्रभावळकर, सुनील अणवेकर, के. रामचंद्र, व्यंकटेश आपटे प्रभृतींचं नियमित प्रसिद्ध होणारं लेखन आल्हाद देणारं असे. केशव शिरसेकर यांच्या विनोदी कविता बहारदार असत. याव्यतिरिक्त चटकदार लेख म्हणजे `मोरुचा बाप’ (या टोपणनावानं लिहिणारे दि. वि. गोखले यांचे लेख), `कुटाळ’ या खुद्द द. पा. खांबेटे यांचे `चाळीतल्या चकाट्या’, `टपल्या आणि टिचक्या’ या सदरांसोबत आणखी एक सदर लोकप्रिय होते, `दोन्ही कर जोडोन’ या एकपानी सदरात वाचकांच्या खुषीपत्रांसोबतच मर्मभेदी टीका करणारी पत्रेही छापली जात. पत्रांच्या शेवटी खास संपादकीय शेरेबाजीही वाचयला मिळे. काही खुषीपत्रांची शीर्षकच पाहा ना… `मार्मिक’च्या लोकप्रियतेचे रहस्य, `सामान्य माणसाचा दोस्त’, `सामाजिक दीपस्तंभ!’ याचबरोबरच `मार्मिक’चा दिवाळी अंक म्हणजे किस पेड की पत्ती!’, `उगीच का कुरकुरता?’, `एकानं तर लिहिलं होतं की, तुम्ही `मार्मिक’ हा शब्द तुमच्या साप्ताहिकात इतक्यावेळा वापरता की हा शब्द जणू काही तुम्हीच शोधून काढलात!’ प्रबोधनकारांची अनुभवसंपन्न `माझी जीवनगाथा’ मार्गदर्शक असायची.
`मार्मिक’च्या सुरुवातीच्या काळातील कार्यालय म्हणजे ठाकरे कुटुंबियांचं दादर येथील रानडे रोडवरच निवासस्थान. दर्शनी खोलीत प्रवेश केलात तर खिडकीजवळच्या टेबलासमोरीतल खुर्चीत बसलेले प्रबोधनकार ठाकरे दिसत आणि त्यांच्या पुढ्यात `मार्मिक’चे गोरेपान देखणे व्यवस्थापक यशवंत देशपांडे. आपल्या मोत्यासारख्या अक्षरांमुळेच खुद्द प्रबोधनकार दादांनी आपली निवड केली असं देशपांडे सांगत. बाळासाहेब आतल्या खोलीतल्या पलंगावर बसून `रविवारची जत्रा’ चितारीत.. तिकडं दादर (प.) रेल्वे स्टेशनच्या पुलासमोरील विजयनगर कॉलनीच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या डबल रूममध्ये द. पां. खांबेटे `मार्मिक’मधल्या मजकुराचं कार्यालय (?) सांभाळीत! त्या सहा मजली इमारतीच्या प्रवेशद्वाराशीच लिफ्ट दिसायची. पण क्वाचितच कधी ती वर-खाली व्हायची! त्याबद्दल कसलीच कुरकूर न करता, टणाटण उड्या मारत खांबेटे यांच्या बंद दाराशी पोहोचण्यातही मजा यायची!!
अगदी सुरुवातीच्या काळात वाचकांना केवळ निखळ आनंद देणारं साप्ताहिक काढण्याच्या मूळ हेतूनं कालांतरानं बदल होणं स्वाभाविकच होतं; आणि तो तसा झालाही. सामुदायिक अन्यायाला चव्हाट्यावर मांडून पीडिताला न्याय मिळवून देण्याच्या मूळ वृत्तपत्रीय धोरणाला प्राधान्य मिळालं. १९६२-६४ सालात लोकप्रिय असलेल्या शब्दकोड्यांच्या स्पर्धातील बक्षिसांच्या वाटपात संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहताच आणि `शब्दकोड्यात गेलेले पैसे वसूल करून द्या’ अशी संबंधितांकडून मागणी येताच शब्दकोडेवाल्यांच्या फसवणुकीचं स्वरूप आम जनतेसमोर अशा काही उग्र स्वरुपात मांडण्यात आलं की, शब्दकोडेवाल्यांना ते कायमचं बंद करणं भाग पडलं! भोळ्या भाबड्या भक्तांना गंडवणार्या, त्या काळात एक प्रस्थ होऊन वावरणार्या अक्कलकोट येथील बेलेनाथबुवाच्या साधुत्वाच्या खोटेपणाचा मुखवटा टराटरा फाडून त्याचं खरं ढोंगी रूप जनतेला दाखवण्याचा यशस्वी प्रयत्नही `मार्मिक’नं केला.
नंतरच्या काळातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपर्या परप्रांतीयांचा मराठी माणसांवर होणारा वरचष्मा. गुदमरलेल्या मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रश्न `मार्मिक’नं अशा काही आवेशात उभा केला की त्या संबंधीचा धगधगता इतिहास आता सर्वांच्याच परिचयाचा आहे.
`मार्मिक’नं अनेकांना घडवलं. माझ्या स्वत:च्या बाबतीत सांगायचं तर मराठी विनोदी साहित्याच्या क्षेत्रात लुडबूड करू पाहणार्या माझ्यासारख्या होतकरू लेखकाला `मार्मिक’चं मार्गदर्शन लाभलं. विनोदी लेखनाचे धडे मला इथंच तर गिरवायला मिळाले! त्यामुळेच `मार्मिक’ माझ्या हृदयातच कोरल्यासारखा आहे, असं म्हटलं तर कुणाला त्यात अतिशयोक्ती वाटायला नको! नाही का?