विजयादशमीचा संदेश हा विद्रोहाचा पोवाडा आहे. सर्व भेदांच्या सीमा ओलांडून समग्र मानवजातीच्या उद्धाराचा विचार देणारं हे काव्य आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचं सार या पोवाड्यात सापडतं.
– – –
प्रबोधनकारांच्या काव्याचा-शाहिरीचा मागोवा घेताना १९२५ सालातून चार वर्षं उडी घेऊन थेट ऑक्टोबर १९२९ गाठावं लागतं. १९२५च्या प्रबोधनच्या अंकात प्रबोधनकारांचे पोवाडे प्रकाशित झाले असले तरी त्याच्याही सात वर्षं आधीच ते लिहिलेले होते. प्रबोधनमध्ये कविता सातत्याने छापल्या गेल्या आहेत. त्यांना मानाची जागाही आहे. पण प्रबोधनकारांच्या कविता फारच कमी आढळतात. १९२५नंतर थेट नोव्हेंबर १९२७च्या प्रबोधनमध्ये प्रबोधनकारांची कविता सापडते. दादा, मला हीच ओवळणी घाल ही कविता दिवाळीच्या निमित्ताने लिहिलेली आहे. कवितेतली जगावेगळी बहीण भावांकडून मर्दुमकीची ओवाळणी मागते आहे,
माझ्या भाऊराया भेटीला आलासी ।
ओवाळणी घालिशी कसली आतां ।।
नको तुझी पदवी नको तुझे धन ।
पाहिजे मज मन मर्दाईचे ।।
मर्दुमकी नाही पदव्या रग्गड घेई ।
ठेचूं त्याला पायीं कोणी असो ।।
ही कविता छापून आलेल्या अंकानंतर प्रबोधन जवळपास दोन वर्षं बंद होतं. १९२७च्या दिवाळीनंतर १९२९च्या दसर्याला प्रबोधनचा अंक प्रसिद्ध झाला. आधीच्या पुण्याच्या मुक्कामातले अनुभव आणि नंतर दोन वर्षांच्या अज्ञातवासातली विचारांची घुसळण यामुळे प्रबोधनकारांकडे सांगण्यासारखं खूप काही होतं. ते एका पोवाड्यातून उलगडलं. एका अर्थाने स्वतंत्रपणे लिहिलेलं प्रबोधनकारांचं ते आज वाचण्यासाठी उपलब्ध असणारं शेवटचं काव्य आहे. त्यात प्रबोधनकारांच्या विचारांचा आणि चरित्राचंही सार सापडतं.
या पोवाड्याचं शीर्षकही आधीच्या पोवाड्यासारखंच विजयादशमीचा संदेश असंच आहे. पण १९२२ सालचा जुना पोवाडा चांद्रश्रेणीयकायस्थ प्रभू समाजासाठी संदेश अशा उपशीर्षकाचा होता. सात वर्षात वाचकवर्गाची ही बंधनंही साफ तुटून गेली आहेत. हा पोवाडा सगळ्या मानवजातीच्या नव्या तत्त्वज्ञानाचं गाणं गातो. जात, धर्म, देव यांची नवी परिभाषा मांडतो. हा खर्या अर्थाने मानवमुक्तीचाच पोवाडा आहे. यातला एकेक शब्द महत्त्वाचा आहे. आजही यातला विचार कुठेही जुना होत नाही. त्यात प्रबोधनकारांच्या विचारांची धार आहे आणि शैलीचा नेम आहे. दोन ओळींची बहुतेक कडवी हा स्वतंत्र सुविचारच आहे. विचारधारांची सगळी बंधनंही प्रबोधनकारांनी तोडलेली दिसतात.
दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर आलेल्या या अंकाला प्रबोधनकारांनी क्रान्त्यंक म्हटलं आहे. नव्या बदलांची कहाणी या अंकात आणि यानंतर प्रबोधनच्या शेवटच्या सहा अंकांमधून आली आहे. देवळाचा धर्म, धर्माची देवळे यासारखे प्रबोधनकारांचे सगळयात महत्त्वाचे लेखही इथेच सापडतात. त्याची सुरुवात या पोवाड्यापासून झाली, असं म्हणायला हरकत नाही. प्रबोधनच्या वैचारिक शिखराचा प्रारंभच इथे झालेला आहे. म्हणून हा पोवाडा मुळातून वाचायला हवा. तो असा,
विजयादशमीचा संदेश
(चाल : सबसे रामभजन कर ले)
तूं तोड बन्धने सारी, सांगे सगळ्याना दसरा ।। धृ. ।।
सुखदु:खांच्या सर्व भावना गुलामगिरिचे पाश ।
कोण तुझ्याविण तयार करतो? तुझा तूंच परमेश ।। १ ।।
सांगे सगळ्याना दसरा ।।
बुद्धीचा चवचालपणा तव आखुनि घेतो सीमा ।
धर्माचें थोताण्ड त्यामधें तडफढ करिशि रिकामा ।। २ ।।
सांग कधिं मानव केला धर्मानें पैदा ।
देव धर्म हे मानवनिर्मित, मग कां उलट सौदा ।। ३ ।।
मनुष्य उघडाउघड बाप तो धर्माचा देवाचा ।
मानियला तर देव नाहि तर धोण्डा कुचकामाचा ।। ४ ।।
‘धर्म असा अन् देव तसा’ ही चोरांची नीती ।
सीमा सगळ्या स्वयंनिर्मिता, कसली त्यांची भीती ।। ५ ।।
चौंढाळांची स्वार्थी बडबड अखेर बनले वेद ।
कितीक चरले त्यावर मुबलक जार चोर निर्वेध ।। ६ ।।
देवासाठी जीव टाकिती उलटे सुटले हिन्दू ।
माणुसकीची दाद न कोणा, द्वैताचे विषसिन्धू ।। ७ ।।
शोधित बसले देव अजागळ देश हातचा गेला ।
गुलाम मुर्खी धर्म कोणता? वाहि पखाली हेला ।। ८ ।।
‘धर्मा येते ग्लानी तेव्हां देव घेइ अवतारा’ ।
नामर्दाचा हाच तंबुरा छेडित बसले तारा ।। ९ ।।
‘धारण करि तो धर्म’ म्हणतसां तोण्डानें एका ।
ग्लानि येई तो धर्म कशाचा? कर्म तुझें तें लेका ।। १० ।।
उपनिषदांना देव न कळला, तुलाच वैâसा फळला ।
पुराण-मदिरा ढोसुनि ढोसुनि विवेकगड ढासळला ।। ११ ।।
खुद्द स्वदेशी गुलाम बनले भक्त तीस कोटी ।
पाहवते ज्या देव कशाचा? ती सैतानी कोटी ।। १२ ।।
सैतानाचा धर्म पाळतां, मोक्ष त्यास सैतानी ।
धर्म श्रेष्ठ तर भरतखण्ड कां सडलें कटु द्वैतांनी ।। १३ ।।
देव धर्म हे भटी सांपळे घातक झाले देशा ।
मोहा तोडा उलथुनि पाडा उखडा त्यांच्या पाशा ।। १४ ।।
धर्मावाचुनि प्राण न जाई देवाविण नच अडते ।
आत्मशक्ति खंबीर तयाच्या त्रिभुवन पायां पडते ।। १५ ।।
संस्कृति रूढी जातिभेद या धर्माच्या अवलादी ।
माणुसघाण्या हिन्दू केला, बाप लेक प्रतिवादी ।। १६ ।।
गर्व सर्व हिन्दूना मोठा, जननाची पुण्याई ।
ब्रह्मदेवही उभाच चिरला! काय धर्म-नवलाई ।। १७ ।।
रवि-चंद्राचे वंशज कोणी, कुणि शेषाचे लेक ।
ब्रह्ममुखांतुनि भटजी कोणा कूर्मी अलगद टेक ।। १८ ।।
उच्चनीचता हडळ माजवी भरतखण्डि जो धर्म ।
‘शिवू नको हो दूर’ म्हणे तो, फुटलें त्याचें कर्म ।। १९ ।।
पावित्र्याचा श्रेष्ठपणाचा भटांस मोठा तोरा ।
भटेतरांना नीच गणाया, काय हक्क या चोरां ।। २० ।।
विचारक्रांन्ति अखंड घडवी काळ बडा गारोडी ।
नित्य नवें तें हवें क्रान्तिला, जुन्यास लाभे तिरडी ।। २१ ।।
एकोणिस शतकांचि थेरडी मनुस्मृति कवटाळी ।
माणुसकीला लावी टाळी, भटजी तिज कवटाळी ।। २२ ।।
नव्या मनूच्या नव्या स्मृतीचे नव्या हिमतीचे घोडे ।
बघ फुरफुरती झाडिति टापा, जुन्यास खेटर जोडे ।। २३ ।।
सिन्धूपासुनि हिन्दु निघाला हिन्दु सिन्धु हा मोठा ।
भिक्षुकशाही विष-बिन्दूनें सिन्धु ठरविला खोटा ।। २४ ।।
समाज हिन्दू अमृतसिन्धू बनला घाण उकिरडा ।
जातिरुंढिच्या बाष्कळ गप्पा, हाणा त्याना जोडा ।। २५ ।।
सीमा जोंवरि तोंवरि समता? बोल फोल तो समजा ।
सीमा तुडवा, चालतील ना मग काळाच्या गमजा ।। २६ ।।
सिन्धुसारखा हिन्दु सगळा एकजीव जर झाला ।
याच उकिरड्यावरती समजा स्वर्ग धावुनी आला ।। २७ ।।
‘समतावाला गोकुळकाला’ बरळे भटि भाला ।
गोकुळकाला जगां दाखवी भगवद्गीतावाला ।। २८ ।।
सीमा तोडा, प्रेमा जोडा, गुलामगिरीला तुडवा ।
माणुसकीचा धर्म साधण्या जातिभेद खल बुडवा ।। २९ ।।
मानित सीमा ते नर कसले? जिवंत प्रेतें सारी ।
या प्रेतांना स्वराज्य कसले? काळचक्र त्या मारी ।। ३० ।।
सिन्धुसारखा समर्थ व्हावा हिन्दू चौखण्डीं ।
रमाकान्त शाहीर डफावर हाणि थाप लोखण्डी ।। ३१ ।।
या पोवाड्याचा शेवट शाहीर रमाकांत या नाममुद्रेने झाला आहे. शाहीर केशव ते शाहीर रमाकांत हा प्रबोधनकारांचा दहा वर्षांचा प्रवास आहे.
स्वत:ची ओळख ही आपल्या पत्नीशी जोडून सांगण्याची हिंमत प्रबोधनकारांनी त्या काळात दाखवली आहे. या काळात अनंत हालअपेष्टांमधून प्रबोधनकार पुन्हा नव्याने भरारी घेण्याची हिंमत दाखवत होते, ते केवळ रमाबाईंच्या साथीमुळे. त्याचा सन्मान प्रबोधनकारांनी स्वत:चा रमाकांत असा उल्लेख करून केला आहे.
हा प्रबोधनकारांमधल्या बदलाचा एक पैलू आहे. या कवितेत पूर्णपणे बदललेले प्रबोधनकार दिसत आहेत. विद्रोहाच्या शिखरावरचा हा पोवाडा आहे.
देव धर्म हे भटी सांपळे घातक झाले देशा ।
मोहा तोडा उलधुनि पाडा उखडा त्यांच्या पाशा ।।
धर्मावाचुनि प्राण न जाई देवाविण नच अडते ।
आत्मशक्ति खंबीर तयाच्या त्रिभुवन पायां पडते ।।
पोवाड्यातल्या या ओळींमध्ये प्रबोधनकारांच्या विचारांचं सार दिसतं, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. धर्मचिकित्सा हे प्रबोधनकारांच्या एकंदर लिखाणाचं सूत्र आहे. ते या पोवाड्यातही दिसतं. धर्म आणि देवाच्या चिकित्सेला देशभक्तीशी जोडण्याचा त्यांचा विचार महत्त्वाचा आहे.
या नंतरच्या काळात प्रबोधनकारांची काव्यरचना ही संगीत नाटकांची पदं म्हणूनच दिसते. काही वर्षांपूर्वी प्रबोधनकारांच्या पोवाड्यांना चाली लावून कलाकारांनी ते सादरही केले होते. त्याची एक सीडीही मर्यादित स्वरूपात वितरित झाली होती. मात्र त्याची माहिती आता उपलब्ध नाही.