काही नाटके विस्मरणात जाता जात नाहीत, कारण ती रंगवैभवी असतात. नव्या पिढीने अशा दर्जेदार नाटकांना पुन्हा भेटावे आणि गतवैभवाचे दर्शन घ्यावे, ही अपेक्षा असणे काही गैर नाही. रंगकर्मी तसेच प्रेक्षकही अशा ‘प्रयोगां’साठी सज्ज असतात. त्यामुळे भूतकाळ पुन्हा एकदा जागा होतो. याचा अनुभव आपण सारे आजकाल काही नाटकांतून घेत आहोतच. आचार्य अत्रे यांचे ‘मोरूची मावशी’, गंगाराम गवाणकरांचे ‘वस्त्रहरण’, केदार शिंदे याचे ‘सही रे सही’, प्रशांत दळवीचे ‘चारचौघी’, संजय पवार याचे ‘कोण म्हणतो टक्का दिला?’, देवेंद्र पेमचे ‘ऑल द बेस्ट’, वसंत सबनीस यांचे ‘गेला माधव कुणीकडे?’ या यादीत नाटककार शेखर ढवळीकर यांचे २४ वर्षापूर्वी रंगभूमीवर आलेलं ‘नकळत सारे घडले!’ हे नाटक पुन्हा एकदा नव्या-जुन्या रसिकांना पुनर्भेटीचा आनंद देतंय. एक पिढी बदलली तरी त्यातला विषय हा आजही फ्रेश, ताजातवाना आहे. जो नव्या पिढीला सतर्क करतोय आणि जुन्या पिढीलाही काही सांगू पाहतो आहे. थोडक्यात दोघांचही काऊन्सिलिंग एकाच वेळी!
एखाद्या गोष्टीमुळे किंवा घटनेमुळे किंवा प्रतिक्रियेमुळे कळत-नकळत माणूस भारावून जातो. त्यावरून आपली काही ठोस मते बनवितो. ती एवढी पक्की असतात की त्याला विरोध करणार्यांविरुद्ध तो प्रसंगी आक्रमक बनतो. भान विसरतो. दुसर्याचेही बरोबर असू शकेल, ही दुसरी बाजू तो कदापि मान्यही करीत नाही. हट्टीपणा करणं हा तसा मनुष्यस्वभाव आहे, पण इथे या नाटकातला तरुण या बॅकफायर इफेक्टला बळी पडलाय. त्याला वास्तवात, ताळ्यावर आणून सत्य विचार करण्यास भाग पाडण्याची प्रक्रिया म्हणजे समुपदेशनाची उपचारपद्धती! टोकाच्या दुर्वर्तनाचा वेध हा या नाट्याचा गाभा आहे. अर्थात त्याला देण्यात आलेल्या कौटुंबिक कथानकाची जोड हृदयस्पर्शी. यातूनच ‘नकळत सारे घडले!’ची नाट्यभट्टी मजबुतीने आकाराला येते.
आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ यात ढोंगी बुवा राधेश्याम महाराज हा ज्याप्रमाणे येता-जाता जशी परमेश्वराची चौकशी करायचा, विचारपूस चालू ठेवायचा त्याच प्रकारे या नाट्यातील तरुण पडदा उघडताच ‘थेट’ करिश्मा कपूरशी संवाद साधतो. त्याचा हा ढोंगीपणा नाही तर चक्क वेडेपणा आहे. करिश्माच्या एका कौतुकाच्या वाक्याने त्याचा पूर्णपणे कब्जा घेतलाय. त्याचा पुरता कायापालट झालाय. भिंती, पुस्तके, विचार सारं काही येताजाता करिश्मा आणि करिश्मा! तो तिच्यासाठी नाचतो, गातो, फोनवर बोलतो. टक्कल करतो. नवे कपडे आणतो. तिच्यासाठी सोन्याची चेनही विकतो. करिश्माच्या स्वप्नांच्या राज्यात तो पुरता गुंतलाय.
करिश्मासोबत ‘हिरो’ बनण्याच्या तयारीत असलेला हा राहुल नावाचा तरुण एमबीएचं शिक्षण घेतोय. एकांकिका करीत असतानाच एका प्रसंगी करिश्मा कपूर बक्षीस समारंभात त्याचं कौतुक करते आणि तो पुरता बदलतो. सिनेमा हेच करिअर करण्याचं मनोमनी ठरवितो. त्याचे आईवडीत हे दुबईत आहेत. राहुल बटुमामांकडे शिक्षणासाठी राहतो. दोघांचे या विषयावरून खटके उडताहेत. राहुलची एक मैत्रीण आहे. मोनिका तिचं नाव. तिचेही राहुलची गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत, पण ती हतबल ठरते. अखेरीस ती मीराला घेऊन येते आणि सुरू होतात समुपदेशनाचे एकेक टप्पे!
आता राहुलचा ताठर स्वभाव, सिनेमाचे वेड यात बदल होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच कठोर, शिस्तबद्ध असलेला राहुलचा मामा बटुमामाही अलगद उलगडत जातो. कोकणातल्या देवरुख गावाचे त्यांचे आकर्षण. त्याचे अंतरंग आणि त्यातील नाजूक, हळवा कोपराही हृदय हेलावून सोडतो. समुपदेशन करण्यास आलेली मीरा हिचाही दुसरा मुखवटा सुन्न करतो. मीराही भावनिक न होता प्रसंगी कठोरही बनते. एकूणच या नाट्यातल्या तिघाजणांचे विलक्षण भावनिक कंगोरे ही नाट्याची जमेची बाजू आहे. त्यांच्यात होणारा बदल हा हे नाट्य एका उंचीवर घेऊन जाते. प्रत्येकाची कथा-व्यथा स्वतंत्र. जी प्रत्यक्ष बघणं उत्तम.
मूळची ही ‘राहुल’ची गोष्ट आहे. संहितेचा त्याच्यावर ‘स्पॉटलाईट’ आहे. पण बटूमामा आणि मीरा या दोघांचे उपकथानकही स्वतंत्र नाटकाचा विषय होऊ शकतो. कारण त्यांनी भोगलेले भोग हे कमाल आहेत. सारं काही पचवून हे दोघे आपल्या पायावर परिस्थितीशी झुंज देत खंबीरपणे उभे आहेत. हे महत्वाचे.
नटवर्य विक्रम गोखले यांच्यासारख्या समर्थ अभिनेत्याने यापूर्वी बटुमामा साकारला होता, त्यामुळे या भूमिकेत त्यांच्याशी तुलना होणं तसं स्वाभाविकच आहे. अभिनयातले ‘बॅरिस्टर’ असलेल्या विक्रमजींच्या अनेक भूमिका या रसिकांच्या कायम स्मरणात आहेत. यातला हा वैशिष्टपूर्ण बटुमामा ऊर्फ बटू नेने अभिनेते आनंद इंगळे यांनी समर्थपणे उभा केलाय. ‘विनोदवीर’ अशी ओळख असतानाही प्रारंभी काहीशी खलनायकी छटा असलेली भूमिका त्यांनी तपशीलांसह साकार केलीय. विशेषत: दुसर्या अंकातील त्या भूमिकेची वेगळी छटा हटके आहे. हृदय हेलावून सोडणारा त्या भूमिकेचा पूर्णेतिहास ताकदीने मांडला गेलाय. त्यात अभिनयाचा कस लागतो. प्रत्येक कलाकाराची वैशिष्ट्ये व मर्यादाही असतात; पण एक आव्हान म्हणून ते शंभर टक्के इथे यशस्वी झालेत. अप्रतिम संवादफेक, भूमिकेचं बेअरिंग, देहबोलीताली सहजता ही नोंद घेण्याजोगी. आनंद इंगळे यांच्या नाट्यवाटचालीतली ही भूमिका निश्चितच त्या वाटचालीला कलाटणी देणारी आहे.
समुपदेशक मीरा ही भूमिका पूर्वी स्वाती चिटणीस करीत असत. विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस या दोघांची जुगलबंदी गाजली होती. इथे डॉ. श्वेता पेंडसे यांनी यात संयमाने रंग भरलेत. अनेक रिकाम्या जागा केवळ अभिनयाच्या जोरावर भरल्या आहेत. त्या काही संवादांना रासिकांच्या उत्स्फूर्त टाळ्याही वसूल करतात. शब्दांसोबत मुद्राभिनयही अप्रतिम. समुपदेशक म्हणून त्या शोभून दिसतात.
नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा राहुल. या भूमिकेत प्रशांत केणी शोभून दिसतो. मनोवृत्तीत झालेला बदल लक्षणीय असाच आहे. मोनिकाच्या भूमिकेत तनिषा वर्दे हिने चांगली साथसोबत केली आहे.
शेखर ढवळीकर या नाटककाराने निवडक पण लक्षवेधी नाटके मराठी रंगभूमीला दिलीत. त्यात ‘बहुरूपी’, ‘सावधान शुभमंगल’, ‘रिमोट कंट्रोल’, ‘ये दिल अभी भरा नहीं’ वगैरेंचा समावेश प्रामुख्याने करता येईल. यात दोन पिढ्यांचा संघर्ष आणि त्यातून दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयोग केलाय. संवाद अप्रतिमच. पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक अधिक पकड घेतो. आजचा आघाडीचा आणि ‘बिझी’ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी २४ वर्षापूर्वीही याचे दिग्दर्शन केले होते. आजही त्यांच्याच हाती नाटक आहे. दोन्ही प्रयोग बघण्याचा योगायोग सुदैवाने जुळून आला. आणखीन एक महत्वाची नोंद म्हणजे या नाटकाच्या मूळ प्रयोगाची ‘कॅसेट’ ही आज बाजारात उपलब्ध आहे. अभ्यासकांना दोन्ही ‘प्रयोगांची’ तुलना करण्याचा मोह होईल यात शंका नाही.
विजय केंकरे यांचे दिग्दर्शन कौशल्य नजरेत भरतं. नाट्य रेंगाळणार नाही, याची त्यांनी दक्षता घेतल्याचे दिसते. नाट्याचा काळ कायम ठेवलाय. पण कुठल्याही काळात घडणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे पुनर्लेखन करण्याची गरज नाही.
राजन भिसे यांचे नेपथ्य नाटकाला पूरक. त्यातून वातावरणनिर्मिती उत्तम होते. भिंतीवरली खुंटी, दरवाजाजवळचा हंडा, जुना फोन… हे सारं वीसएक वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाते. शितल तळपदे यांची प्रकाशयोजना चांगली आहे. संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत भडक नाही, नाट्याच्या शैलीला अनुकूल आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषाही योग्य.
चार पात्रांचं हे नाटक. त्यामुळे ते प्रत्येकाला वाव देणारं ठरतं. पात्रनिवड व पडद्यामागली जुळवाजुळवी यात ‘दिग्दर्शक’ दिसतो. बुकिंगचे अर्थशास्त्र पुरेपूर ठावूक असणारे निर्माते नितीन भालचंद्र नाईक आणि राहुल पेठे यांनी या नाटकाची निर्मिती केली असून त्यांचा हा तसा पहिलाच प्रयत्न आहे. त्यांनी जुनं दर्जेदार नाटक निवडलं, हे विशेष!
सध्या सस्पेन्स किंवा विनोदी नाटकांकडे रसिकांचा ओढा दिसतोय. यातला विषय तसा कौटुंबिक, गंभीर असला तरी त्यातील व्यक्तिरेखा रसिकांच्या जवळ पोहचतात. त्या फसव्या वाटत नाहीत. मग गावी जाणारा मामा असो, त्याचा टिपिकल तरुण भाचा असो, दोन पिढ्यातला संघर्ष, भावभावनांचे त्यांचे तरल नाते आणि दोन्ही बाजूंनी होणारी कुचंबणा, घुसमट दूर करण्याचा प्रयत्न, हे सारं काही कालबाह्य न होणारं. एक दर्जेदार नाट्यकृती जी उत्कट अनुभव देते आणि सारं काही घडत असतानाच नकळत हृदय हेलावून सोडते!
नकळत सारे घडले
लेखक – शेखर ढवळीकर
दिग्दर्शक – विजय केंकरे
नेपथ्य – राजन भिसे
प्रकाश – शितल तळपदे
वेशभूषा – मंगल केंकरे
संगीत – अशोक पत्की
निर्माते – राहुल पेठे, नितीन भालचंद्र नाईक